21 November 2017

News Flash

जातिअंताची लढाई कठीणच

संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या ‘सोवळे’ प्रकरणाचे ‘भेदाभेद भ्रम..

लोकसत्ता टीम | Updated: September 11, 2017 4:06 AM

संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या ‘सोवळे’ प्रकरणाचे ‘भेदाभेद भ्रम.. कसले काय?’ या अग्रलेखात (९ सप्टें.) अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषण केले आहे. या प्रकरणात विविध पातळ्यांवर होणाऱ्या चर्चेत काही महत्त्वाच्या बाबी दुर्लक्षित राहिल्या आहेत. त्या म्हणजे एक तर ‘ही’ घटना, वर्णव्यवस्था ही कर्मावर आधारित नसून जन्मावरच आधारित आहे हे अधोरेखित करते. अब्राह्मण, (अस्पृश्य नव्हे!) समाजातील (आणि हिंदू धर्मातीलच) ती महिला ‘सोवळे’संबंधित ‘कर्म’ करण्याच्या बाबतीत पूर्णपणे पारंगत असून दोन वर्षे तिने केलेले धार्मिक ‘कर्म’ अगदी व्यवस्थित चालून गेले, परंतु तिची जन्मानुसार जात कळल्यावर मात्र ती लगेच अपात्र ठरली. ती कर्माने जरी परिपूर्ण ब्राह्मण असली तरी जन्माने अब्राह्मण – ‘खालच्या’ जातीतील – असल्याने ती कधी ब्राह्मण होऊ  शकेल की नाही हे दूरच, पण ब्राह्मणांचे ‘कर्म’सुद्धा करू शकत नाही, हा संदेश ‘या’ घटनेने दिला आहे. आमची ‘महान’ वर्णव्यवस्था केवळ कर्मावरच आधारित आहे, असे छाती ठोकून दावा करणाऱ्यांचा फुगा या प्रकरणाने फोडला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की, हिंदू धर्म हा जिना नसलेल्या बहुमजली इमारतीसारखा आहे, त्यात एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाता येत नाही. हेही या प्रकरणाने आजच्या काळात खरे करून दाखविले.

दुसरी बाब म्हणजे त्या अब्राह्मण महिलेची जात शेवटपर्यंत जर कळलीच नसती तर तिने केलेले ‘कर्म’ असेच चालू राहिले असते व त्याने काही बिघडलेही नसते, परंतु ज्या क्षणी तिची जात समजली त्या क्षणी ‘सोवळे’ भंग झाले! म्हणजेच सोवळे हा प्रकार श्रद्धेच्या नावाखाली चालू असलेला केवळ एक भ्रम आहे हेही या निमित्ताने सिद्ध झाले असे दिसते. तिसरी बाब म्हणजे गणराय हे सर्व जातींचे एकच दैवत असले तरी त्यांचे पूजा-विधी ब्राह्मण जातीत वेगळे व अन्य जातींत वेगळे असतात. तसेच ब्राह्मण जात ‘स्वत:च्या’ विधींच्या बाबतीत कर्मठ असते हेसुद्धा, हे प्रकरण ज्या पद्धतीने पोलिसात नेले त्यावरून दिसून आले. एका बाजूला अस्पृश्य जातीच्या बांधवांना सोबत घेऊन जातिअंतासाठी लढणारे, दूरदृष्टी बाळगणारे ‘जुन्या’ काळातील सुधारक ब्राह्मण, तर दुसऱ्या बाजूला सवर्ण स्त्रीचासुद्धा विटाळ होणारे ‘आधुनिक’ काळातले कर्मठ ब्राह्मण, हे चित्र जातिअंताची लढाई किती कठीण आहे हेच दाखवून देते.

– उत्तम जोगदंड, कल्याण

 

प्रतिक्रियांतूनही जातीयवादच दिसला !

‘भेदाभेद भ्रम.. कसले काय?’ हे संपादकीय (९ सप्टें.) वाचले. एक उच्चशिक्षित आणि विज्ञानाच्या क्षेत्रात कारकीर्द घालविलेल्या व्यक्तीमध्येसुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पूर्ण अभाव असणे ही खरी चिंतेची बाब आहे. आधुनिक विद्येने आधुनिक मन या मंडळींच्या ठिकाणी निर्माण झाले नाही, मन तेच सनातनी व परंपराप्रिय राहिले. उलट आधुनिक विद्येने परंपरा समर्थनाचे नवे युक्तिवाद मात्र उपलब्ध झाले. पण या निमित्ताने एकमेकांविरोधात ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्यातही पुन्हा जातीयवादच दिसून आला. ब्राह्मण संघाच्या अध्यक्षांनी डॉ. मेधा खोले यांचे पूर्ण समर्थन केले नसले तरी डॉ. खोले यांना त्यांच्या धार्मिक श्रद्धा जपण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे म्हटले. यात कायदेशीर पळवाट असली तरी डॉ. खोले यांच्या कृतीचे अनिष्ट परिणाम होऊ  शकतात याची दखल घेतलेली नाही. याचे कारण त्यांची कृती ही ‘ब्राह्मण्याला’ सुखावणारी अशीच आहे. तर दुसरीकडे डॉ. खोले यांच्या घरी स्वयंपाक करणारी जी महिला आहे तिच्या जातीच्याच संघटनेने निषेध करण्यात पुढाकार घेतला. येथे एक प्रश्न विचारावा लागेल तो असा की, डॉ. खोले यांचा निषेध करणाऱ्यांपैकी किती जण त्यांच्या घरातील परंपरागत धार्मिक कार्यासाठी जाणीवपूर्वक एखाद्या विधवा दलित महिलेला बोलावतील?

या दांभिक मानसिकतेतील फोलपणा विशद करताना नरहर कुरुंदकर म्हणतात, ‘‘आपण ज्या जातीचे नाही त्या जातीवर टीका करीत बसल्यामुळे आपली जातही दुबळी होत नाही आणि ज्या जातीवर टीका करतो ती जातही दुबळी होत नाही. जातीयवाद दुबळा करण्याचा मार्ग स्वत:च्या जातीवर टीका करणारे, आपल्या जातीच्या हितसंबंधांच्या विरुद्ध संघर्षांला उभे राहणारे लोक आपण किती प्रमाणात तयार करू शकतो, इथून आरंभ होतो.. ब्राह्मण्य केवळ ब्राह्मणांच्याच ठिकाणी आहे असे नाही. ते मराठय़ांच्या ठिकाणीसुद्धा आहे. ब्राह्मण आपणापेक्षा वरिष्ठ आहेत, हे मराठय़ांना मान्य नसते, पण उरलेल्या सर्वापेक्षा आपण वरिष्ठ आहोत, सर्वानी आपले हे वरिष्ठत्व बिनतक्रार मान्य केले पाहिजे, अशी जी जाणीव असते, त्या जाणिवेलाच बाबासाहेब ‘ब्राह्मण्य’ असे म्हणतात.’’ (भजन, पृष्ठ : ३२/१३३)

– अनिल मुसळे, ठाणे

 

..तर मग बहुसंख्याक कोण?

‘भेदाभेद भ्रम .. कसले काय?’ हे शनिवारचे संपादकीय आणि दुसऱ्याच दिवशी  ‘मेधा खोले यांची दिलगिरी’, ‘वैदिक ब्राह्मणांना अल्पसंख्याक दर्जा?’ या बातम्या वाचून विचारांचा कल्लोळ उठला. कुणी आपल्या घरात सोवळे पाळावे हा ज्याचा त्याचा असलेला प्रश्न डॉ. खोलेंच्या वागण्याने वादाचा विषय ठरला, पण त्यांनी वेळेवर दिलगिरी व्यक्त करून एफआयआर मागे घेतल्याने वाद संपेल असे वाटत असतानाच वैदिक ब्राह्मणांना अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडून चाचपणी केली जाते आहे हे वाचून धक्का बसला. कारण ब्राह्मणांपासून ते मराठय़ांपर्यंत सर्वच जर अल्पसंख्याक, तर बहुसंख्याक कोण? या सर्व जातीय आरक्षणांपेक्षा सरसकट आर्थिक निकषांवर आरक्षण व सुविधा दिल्या गेल्या तर कुणावरही अन्याय होणार नाही आणि खऱ्या अर्थाने गरजूंना मदत होईल.

– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

 

काश्मिरी पंडितांनाही कुणीच वाली नाही..

‘स्वप्नभूमी आणि भूमीचं स्वप्न’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (अन्यथा, ९ सप्टें.) वाचला. त्यात दोन स्वतंत्र राष्ट्रांमध्ये कालौघात झालेला बदल विस्ताराने मांडलेला आहे, परंतु एक मुद्दा कदाचित नजरचुकीने राहून गेला असावा असे वाटले म्हणून तो मांडत आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेतील ट्रिमर्सना देश सोडून जाण्यास सांगितले. तिकडे म्यानमारने रोहिंग्यांना ते मूळचे म्यानमारचे नाहीत म्हणून देश सोडून जाण्यास सांगितले. ही दोन्ही उदाहरणे अन्य देशांतील आहेत. अर्थात हे सर्व माणुसकीला धरून नाही हे खरेच. अगदी अशाच प्रकारचे एक उदाहरण आपल्याकडे जानेवारी १९९० रोजी म्हणजे सुमारे २७ वर्षांपूर्वी घडले आहे. ते म्हणजे सुमारे साडेतीन लाख काश्मिरी पंडितांना राहते घरदार सोडून अन्यत्र जावे लागले. कारण दहशतवादी, धार्मिक का राजकीय, हा प्रश्न महत्त्वाचा नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. अजूनही त्यांचे सन्मानाने पुनर्वसन होऊ  शकले नाही आणि त्याविषयी कोणी बोलतही नाही. काश्मिरी पंडितांची स्वप्नातली भूमी व भूमीचे स्वप्न काश्मीर खोरेच आहे, पण तेही एकता व अखंडतेच्या लोकशाही भारतात भंग पावले, कारण मेरा भारत महान है!

– आनंद चितळे, चिपळूण

 

मंत्री बदलले तरी रेल्वे अपघात सुरूच!

ऑगस्ट महिन्यात रेल्वेचे बरेच अपघात झाले म्हणून सुरेश प्रभू यांच्यावर टीकेची झोड उठली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कायापालटात प्रभूंकडील रेल्वे खाते जाऊन मुंबईचेच पीयूष गोयल रेल्वेमंत्री झाले; पण अपघातांचे सत्र सुरूच आहे. ७ सप्टेंबरला सुमारे दहा तासांच्या अवधीत तीन ठिकाणी रेल्वे अपघात झाले. ९ सप्टेंबरला दिल्लीत काशी विश्वनाथ एक्स्प्रेसचे इंजिन रुळांवरून घसरले. हे अपघात गोयल कार्यभार स्वीकारत नाहीत तोच घडले असल्याने आता त्यांचा राजीनामा मागितला जाणार काय? या घटनांवरून हेच सिद्ध होते की, मंत्री किंवा अधिकारी बदलल्याने कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल होत नाही. अपघात होण्याचे मुख्य कारण कर्मचाऱ्यांची तुटपुंजी संख्या हे असावे असे दिसते. रेल्वे रुळांची नियमित तपासणी करणारे गॅँगमन व ट्रॅकमन अत्यंत कमी असल्याने तपासणी व्हावी तशी होत नाही. त्यांची संख्या वाढविणे व संभाव्य धोक्याची सूचना देणारी यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित करणे हे यासाठी तातडीचे उपाय ठरतील असे वाटते.

– अनिल रा. तोरणे, तळेगाव दाभाडे

 

रेल्वेला महिलांच्या सुरक्षेविषयी काळजी नाहीच

‘चोराने लोकलमधून तरुणीला फेकले’ ही  बातमी (९ सप्टें.) वाचली आणि संताप आला. एक गोष्ट समजत नाही की, विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या या गाडीत कोणीही महिला प्रवासी नसताना रात्रीच्या वेळी ही तरुणी एकटी या डब्यात बसलीच का? आपण या डब्यात एकटे आहोत म्हटल्यावर, आपल्यावर कोणतेही संकट येऊ  शकते, याचा विचार करून तिने स्टेशन मास्तरकडे जाऊन महिलांच्या डब्यात पोलीस नसल्याचे निदर्शनास आणून द्यावयास हवे होते. महिलांच्या डब्यात रात्री ठरावीक वेळेनंतर महिला पोलीस असणे गरजेचे असताना त्या गाडीत का नव्हते, याचे उत्तर रेल्वे खात्याकडे आहे? या घटनेनंतर एक गोष्ट अधोरेखित झाली की, रेल्वे खात्याला महिलांच्या सुरक्षेविषयी जराही काळजी नाही.

– गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली (मुंबई)

 

व्याख्या कोण करणार?

‘किती ही अंधश्रद्धा!’ हे पत्र (लोकमानस, ९ सप्टें.) वाचले. पुरोगामी व डाव्या विचारसरणीचे लोक कशाला श्रद्धा व कशाला अंधश्रद्धा म्हणायचे ते स्वत:च ठरवतात. जनतेचा, समाजाचा विचार करत नाहीत, म्हणूनच त्यांचा जनाधार ढासळत चालला आहे. अलीकडील सर्व निवडणुकांत हे सिद्ध झाले आहे. आता या लोकांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यांच्या व्याख्या समाजासमोर लवकर ठेवाव्यात. पूर्ण जनाधार ढासळण्याची वाट पाहू नये, असे सुचवावेसे वाटते.

– सां. रा. वाठारकर, चिंचवड

 

या मोठय़ा त्रासाचे काय?

‘वैयक्तिक श्रद्धेसाठी पोलिसांना त्रास कशासाठी?’ हे  पत्र (लोकमानस, ९ सप्टें.) वाचले.  सगळे धार्मिक सण रस्त्यावर आणले गेले आहेत. त्यात भाग घेणाऱ्यांची श्रद्धा वैयक्तिकच असते ना? पुण्यात आठ हजार पोलीस गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी तैनात होते.  पोलिसांच्या या त्रासाबद्दल काय? श्रद्धावान शांततेने मिरवणूक काढू शकत नाहीत का? वैयक्तिक श्रद्धेसाठी गोंगाट करणाऱ्यांवर खटले भरणे आणि नंतर काढून घेणे हा पोलिसांना नुसता त्रासच नाही तर त्यांचा अपमानही नव्हे काय? वारकरी यात्रा शांतपणे काढतात. तिथे वैयक्तिक श्रद्धेसाठी पोलिसांना त्रास दिला जात नाही. मध्यंतरी महामोर्चे निघाले. त्यात कुठेही शांतता भंग झाला नाही. म्हणजे हे होऊ  शकते.

– किसन गाडे, पुणे

 

First Published on September 11, 2017 4:06 am

Web Title: loksatta readers letter part 82