विलीनीकरणाने बँकांचा केवळ व्यापच वाढतो!

‘चिमण्यांचा गरुड!’ हे संपादकीय (३ एप्रिल) वाचले. खरे तर सारा भारत करोनाशी दोन हात करत असताना बँकांच्या विलीनीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी लांबवणीवर न टाकणे, हे नक्कीच योग्य नाही. वास्तविक विलीनीकरण ही एका रात्रीत होणारी प्रक्रिया नाही. त्यात गुंतवणूकदार ते खातेधारकांपर्यंत अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असतात. बँक कर्मचाऱ्यांना अहोरात्र काम करून विलीनीकरण पूर्णत्वाला आणायचे असते. शासनाचा हस्तक्षेप सुकर व्हावा यासाठी धोरणकर्त्यांना बँकांच्या विलीनीकरणाची भुरळ नेहमीच पडते. अनुत्पादित कर्जाबाबत उपाययोजनांसाठी कदाचित ते सोयीस्कर असेलही; पण आजवरचा भारताचाच काय, पण जगाचा इतिहास पाहता विलीनीकरण म्हणजे मृगजळ असल्याचे सिद्ध झाले आहे. उदा. पंजाब नॅशनल बँकेला १९९६ मध्ये न्यू इंडियन बँकेच्या विलीनीकरणातून झालेला ९६ कोटींचा तोटा; २०१७ मध्ये आपल्या सहयोगी बँकांच्या विलीनीकरणामुळे स्टेट बँकेच्या नफ्यात झालेली लक्षणीय घसरण; बँक ऑफ बडोदाचे प्रकरण तर यासंबंधी खास अभ्यासाचा विषय आहे. २००२ सालच्या बँक ऑफ बनारसच्या विलीनीकरणामुळे तोटा झाला नसला, तरी फायदाही झाला नव्हता. २०१९ मध्ये देना बँक आणि विजया बँक यांच्या विलीनीकरणामुळे सुरू झालेली नफ्यातील घसरण अद्यापही सुरू आहे. एकंदरीत विलीनीकरणामुळे बँकांच्या व्यापाखेरीज कशातही वृद्धी होत नाही. तेव्हा केवळ विलीनीकरणाऐवजी कार्यक्षमता वाढविण्यासाठीची उपाययोजना सरकारने करणे जास्त योग्य ठरेल.

– श्रेयस देशमुख, आणंद (गुजरात)

रिझव्‍‌र्ह बँकेने कर्जदारांमधील संभ्रम दूर करावा..

रिझव्‍‌र्ह बँकेने करोना संकटाच्या पाश्र्वभूमीवर २७ मार्चला जारी केलेल्या निर्देशानुसार सर्व बँकांनी ग्राहकांना कर्जाचे मासिक हप्ते भरण्यासाठी तीन महिन्यांची सवलत देणे अपेक्षित आहे. मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांचे हप्ते खात्यातून कापले जाऊ नयेत आणि ही रक्कम नंतर घेण्यात यावी, अशी सूचना त्यात केली आहे. बहुतांश बँकांनी याबाबत आपापल्या निर्णयांची घोषणा केली, मात्र अनेक बँकांनी कर्जदारांचे मासिक हप्ते कापले आहेत. त्यामुळे कर्जदारांत संभ्रमाची भावना आहे. टाळेबंदी असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. अशा वेळी रिझव्‍‌र्ह बँकेने दिलासा दिला असला, तरी काही बँका तो आदेश न पाळता हफ्ते कापून घेत असल्यामुळे कर्जदारांना मासिक घरखर्च कसा चालवायचा याची चिंता सतावत आहे. तरी रिझव्‍‌र्ह बँकेने पुढाकार घेऊन अशा बँकांना हफ्ते कापण्यापासून परावृत्त करावे.

– दीपक काशीराम गुंडये, वरळी (मुंबई)

‘तबलिगी’बाबतची अनभिज्ञता अनाकलनीय

‘इस्लाम ‘खतरे में’..!’ हा अग्रलेख (२ एप्रिल) वाचला. ‘तबलिगी जमात’ची स्थापना १९२७ साली झाली. त्याच सुमारास – १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. स्थापनेपासून ते आजतागायत रा. स्व. संघ या ना त्या कारणांमुळे नेहमी चर्चेत राहिला. परंतु तबलिगी जमात म्हणजे काय, याबाबत बहुसंख्य आजतागायत अनभिज्ञ होते. हे असे का व्हावे, हे उमगत नाही. ‘धर्माचा प्रचार व प्रसार करणारी आणि मुसलमानांना पैगंबरकालीन आचारशैलीचा अंगीकार करण्यास प्रवृत्त करणारी संघटना’ असा या संघटनेचा उल्लेख इंटरनेटवर आढळतो. अशी संघटना प्रसिद्धीपासून दूर कशी राहिली, हे अनाकलनीय आहे. करोनाचा प्रादुर्भाव झाला नसता तर कदाचित या संघटनेच्या अस्तित्वाचे भान अनेकांना झाले नसते. अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे यानिमित्ताने कुजबुज आघाडीला सक्रिय होण्यास वाव मिळणे साहजिकच आहे. त्यामुळे खरी जबाबदारी येते ती प्रसारमाध्यमांवर. कुजबुज आघाडीद्वारे प्रसृत होणाऱ्या कहाण्या रोखण्यात त्यांनी पुढाकार घ्यायला हवा.

– रवींद्र भागवत, कल्याण (जि. ठाणे)

वर्तमानपत्रे, लोकमान्य टिळक व एम. एन. रॉय

‘पुनश्च हरि ॐ!’ हे अग्रलेखाचे (१ एप्रिल) चपखल शीर्षक  लोकमान्य टिळकांच्या मंडालेतून सुटकेनंतर पुन्हा वर्तमानपत्र सुरू केलेल्या घटनेची आठवण करून देते. विचारजंतू पसरविण्याचे वर्तमानपत्र हे प्रभावी माध्यम आहे. अर्थात चांगल्या विचारांचे जसे जंतू पसरविले जातात, तसेच ‘धर्मास धोका आहे’ हा अंधविश्वास पुनर्जागृत करणाऱ्या जंतूंचादेखील प्रचार करता येऊ शकतो. शेवटी कुठल्या प्रकारचे जंतू पसरविले जातात, त्यावर या माध्यमाचा समाजात परिणाम दिसून येतो. प्रसारित होणारा कुठलाही विचार ही एक ‘विचारसरणी’ (आयडियॉलॉजी) असते. कार्ल मार्क्‍सच्या दृष्टीने विचार हा ‘आर्थिक पायावर रचलेला इमला’ असतो. या ठिकाणी केवळ एकाचाच विचार ही ‘आयडियॉलॉजी’  असू शकते. पण ‘आयडियॉलॉजी’च्या भूमिकेसंदर्भात एम. एन. रॉय म्हणतात : एकाने सांगितलेला विचार हा त्याच्या कल्पनेचा भाग असेल; परंतु त्या विचारांमुळे जेव्हा एखादा पूर्ण समाज कार्यरत होतो, तेव्हा तो विचार ही केवळ ‘आयडियॉलॉजी’ नसते, ती एक भौतिक शक्ती होते. हा विचार एखाद्या समाजाला, राष्ट्राला जागृत करतो, तेव्हा क्रांतीची ठिणगी निर्माण होते.’ इतिहासात निर्माण झालेल्या अनेक ‘आयडियॉलॉजीं’ना कालप्रवाहात मर्यादा आल्या, अपयश आले खरे; परंतु त्या काळापुरता ते विचार मुक्ततेचा महामंत्र देणारे होते. वर्तमानपत्रेही असेच समाजजागृतीचा, प्रबोधनाचा विचार देणारे प्रभावी माध्यम आहे.

– डॉ. आर. पी. बारिबड, नांदेड</p>

पाऊस व क्रिकेट यांची पत्रिका जुळवणारा गणितज्ञ

‘डकवर्थ-लुईस नियमाचे जनक टोनी लुईस यांचे निधन’ ही बातमी (लोकसत्ता, ३ एप्रिल) वाचली. ‘क्रिकेटच्या खेळात पावसाचा व्यत्यय आला आणि डकवर्थ-लुईस नियम लावून अमक्या संघाने तमका सामना जिंकला’ अशा स्वरूपाच्या बातम्या आता आपल्या अंगवळणी पडल्या आहेत. पण हे डकवर्थ-लुईस कोण, हे अनेकांना माहीत नसते. डकवर्थ-लुईस जोडीतील लुईस यांचे निधन झाले आणि प्रकर्षांने त्यांची आठवण झाली. लुईस गणितज्ञ होते. क्रिकेट आणि पाऊस यांची पत्रिका जुळवून खेळाच्या निकालाचे सूत्र त्यांनी तयार केले, जे आजतागायत वापरले जाते. बॅट आणि बॉल यांना हात न लावताही क्रिकेट जगतात लुईस ‘सुपरहिरो’ झाले. जोपर्यंत पाऊस आणि क्रिकेट आहे, तोवर लुईस यांचे स्मरण कायम राहील!

– शिवलिंग राजमाने, औंध (जि. पुणे)