तंत्र : छपाईचे आणि सत्तेचे!

‘पुनश्च हरि ॐ’ हे (१ एप्रिल ) संपादकीय, मंडालेहून परत आल्यावर काही दिवसांनी लोकमान्यांनी पुन्हा ‘केसरी’ची सूत्रे हाती घेतल्यावर लिहिलेल्या पहिल्या ‘अग्र’लेखाचे शीर्षक घेऊन अवतरलेले आहे हे अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण आहे. आजच्या तंत्रप्रगत काळातल्या पत्रकारांनाही लोकमान्यांचे स्मरण स्फूर्तिदायी म्हणून अवश्य करावेसे वाटावे यात मुळीच आश्चर्य नाही. परतंत्र राष्ट्र स्वतंत्र झाले आणि छपाईचे, प्रसाराचे प्रगत तंत्र आले तरी सत्ता हाती घेण्याचे वा ती टिकवण्याचे तंत्र फारसे बदलत नसते. कालपर्यंत जे परक्यांनी केले तेच आपले समजलेले केव्हा करू लागतील याचा नेम नसतो. त्यामुळे लेखणीच्या अग्राने लिहून लोकांना जागे करण्याचे/ ठेवण्याचे आणि त्याच अग्राने सत्ताधारी लोकांवर अंकुश ठेवण्याचे  काम ही ‘अत्यावश्यक सेवा’ पत्रकारांना करावीच लागेल. ती करताना लोकमान्यांचेच स्मरण प्रेरणादायी ठरेल. दिक्कालाची बंधने तोडण्याची शक्ती इतर माध्यमांकडे आहे हे खरे, पण ‘खाविंदचरणारविंदी मिलिंदायमान’ होऊन मधुपान करण्याचा मोह होण्याची शक्यतादेखील तितकीच अमर्याद आहे. त्यामुळे छापील वृत्तपत्रांची समाजाला गरज आहे, यात शंका नाही.

– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर पश्चिम (मुंबई.)

वर्तमानपत्रांचे शैक्षणिक महत्त्व

वर्तमानपत्र हातात घेऊन वाचण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कुटुंबातील आबालवृद्धांना एकत्रित आणतात ती वर्तमानपत्राची विविध सदरे. एकाच वेळी अनेकांना आकृष्ट करण्याचे सामर्थ्य केवळ शारीर वर्तमानपत्रातच आहे हे नि:संशय खरे आहे. वर्तमानपत्रे एकाच वेळी समाजातील विविध अंगांना स्पर्श करतात हेच त्यांचे सामर्थ्य आहे. अनेक कुटुंबांत लहान मुलांना लिहायला-वाचायला यायला लागले की रोजच्या वर्तमानपत्रातील मोठय़ा अक्षरातील बातम्या वाचायला आजही सांगितले जाते. शालेय स्तरावर मराठी व इंग्रजी विषय चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी रोजच्या वर्तमानपत्राइतके हुकमी साधन दुसरे कोणतेही नाही. तरुणांच्या व्यक्तिमत्त्व विकासात वर्तमानपत्रांचा सिंहाचा वाटा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सर्वच वर्तमानपत्रांची शारीर भेट सर्व वाचकांना होवो आणि चरितार्थाचे साधन असलेल्यांना पुन्हा लवकर चांगले दिवस येवोत, यासाठी शुभेच्छा!

– श्रीनिवास पुराणिक, ठाणे.

रामनाथजी गोएंकांची परंपरा..

ऑनलाइन माध्यमांतून दैनंदिन घटनांची माहिती मिळत असेल, पण वर्तमानपत्राचे वाचन वैचारिकदृष्टय़ा प्रगल्भ करते. समाज ज्या वेळी भावनेच्या लाटेवर स्वार होतो, तेव्हा त्या फुग्यांना टाचणी लावून जमिनीवर आणणे हे संपादकाचे काम आहे आणि ते ‘लोकसत्ता’ चोखपणे पार पाडत असल्याचे अनेक वेळा दिसून आलेले आहे. इंडियन एक्स्प्रेसचे मालक रामनाथजी गोएंका यांना आणीबाणीच्या काळात त्यांच्या समूहातील वृत्तपत्रांच्या कठोर टीकेमुळे किती तरी वेळा छळले गेले. त्यांची वीज बंद केली, पाणी बंद केले, जाहिरातीही बंद केल्या. तरीही गोएंकांनी पत्रकार-कर्मचाऱ्यांना सांभाळले. त्यांची ही परंपरा अशीच कायमस्वरूपी टिकून राहावी.

– विजय देशमुख, दिल्ली.

जीवनदायी विचार-जिवाणू

‘पुनश्च हरि ॐ!’ (१ एप्रिल) या संपादकीयात विचाराचा जंतू/ ‘विषाणू’ असा उल्लेख आहे. हा जंतू म्हणजे शरीराला हानीकारक नसलेले काही जिवाणूच (बॅक्टेरिया). उदा.-  विरजणाने दही करणारे  जिवाणू. पण करोना हा थेट जीवनावर घाला घालणारा विषाणू आहे. हाच फरक आहे वर्तमानपत्रांमधून मिळणाऱ्या सत्याधारित रोखठोक बातम्या/ विचार यांतून वितरित होणाऱ्या, जीवनाधार वाटणाऱ्या, जिवाणूंत आणि संपर्क/ प्रसारमाध्यमांतून फैलावणाऱ्या वैफल्यग्रस्त करणाऱ्या विखारी/ काही वेळा निखालस खोटय़ा बातम्यांच्या रूपाने पसरणाऱ्या विषाणूंत. उदाहरणार्थ, योगायोगाने, छापील वृत्तपत्रे येणे बंद होण्याच्या आदल्या दिवशीच काही संपर्क/ प्रसारमाध्यमांवरून ‘करोनाबाधित मृतांची संख्या गुणाकार  पद्धतीने वाढण्याच्या भीतीने सामुदायिक अंत्यसंस्कारांचं लष्कराला प्रशिक्षण देण्यात येत असल्याची’ बातमी कुठल्याशा छायाचित्रासह दिली गेली आणि आयुष्य अधिकच वैराण अन् भयाण वाटू लागले. अर्थात वृत्तपत्रांनी त्या बातमीतला फोलपणा यथावकाश चव्हाटय़ावर आणलाच. पण तोपर्यंत जो विचारांचा विषाणू पसरला त्याने कित्येक जीव अर्थमेले झाले असतील त्याचे काय?

– श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे</p>

कागदी वृत्तपत्रांचा पर्यावरणनिष्ठ फेरविचार हवा

‘पुनश्च हरी ॐ’ हासंपादकीय लेख वाचला.. ‘वर्तमानपत्राद्वारे.. विचारजंतू मात्र पसरतो’ अशा अर्थाचे त्यातील वाक्य हे मार्मिक आणि मनाला भिडणारेच. विकतचा कागदी पेपर किंवा सॉफ्टवेअर-आधारित ई-पेपरऐवजी ‘हार्ड’ पेपर घेऊन वाचण्याची आणि बरोबरीने चहा घेण्याची मज्जाच निराळी असते हे खरेच.

पण तरीदेखील एक विचार मनात येतो तो म्हणजे निसर्गाप्रती आपली कृतज्ञता. आपण वाटेल तसे निसर्गाला ओरबाडत सुटलो आहोत त्यात वृक्षतोड आली, प्रदूषण आले, जागतिक तापमान वाढ आली. या गोष्टींची आपली प्रसारमाध्यमे म्हणावी तशी नोंद घेत नाही. शेवटी निसर्गाचा उद्रेक होतो. कोरोना विषाणू हेही, वेळीच आपण संवेदनशील व्हावे असे तर निसर्गाचे संकेत तर नसतील ना? अमेरिकेसारखी ‘महासत्ता’ पर्यावरण-रक्षणाच्या करारातून माघार घेते. पण खरी महासत्ता निसर्गच आहे. निसर्गाला सांभाळणे ही संपूर्ण मानवजातीचे कर्तव्य आहे. वृत्तपत्र चालू झाले ही आनंदाची बातमी आहे. पण सगळे जग डिजिटल होत आहे तर वृत्तपत्रांसाठी कागद कशाला? योग्य ती यंत्रणा उभी करून ई पेपर डिजिटल स्वरूपात वितरित केले पाहिजेत.

– निखिल धिवर , पुणे.

विचार ‘लोकमानस’मधले, वाचकांचेही!

‘पुनश्च हरि ॐ’ (१ एप्रिल) या संपादकीयातून, युद्धकाळात वा आणीबाणीच्या काळातदेखील वृत्तपत्रे हातात पडत होती हेदेखील आजच्या पिढीला यानिमित्ताने समजले. मोबाइल युगात वाचनाची आवड विशेषत: तरुणाईमध्ये कमी झाली असेलही, पण आजदेखील वृत्तपत्रे आपले स्थान अबाधित राखून आहेत. संपादकीयात दिलेली अनेक उदाहरणे आजच्या काळातदेखील चपखलपणे बसणारी आहेत. वर्तमानपत्रे हे आजही समाजप्रबोधन, विचारांची देवाणघेवाण, यांचे एक मोठे साधन आहे. ‘लोकमानस’ सदरातून वाचकदेखील आपली मत-मतांतरे मांडून व्यक्त होत असतात. वृत्तपत्रांमुळे ‘करोना’चा प्रसार होत नाही यावर शिक्कामोर्तब झाल्याने अनेकांची सकाळची बचनी दूर झाली. आता परत नित्यनियमाने ‘लोकसत्ता’ हातात घेऊन वाचायला मिळणार हा मोठाच दिलासा आहे.

– अनंत बोरसे, शहापूर (जि. ठाणे)

ई-पेपर, वाहिन्यांमुळे समाधान नव्हते..

‘वर्तमानपत्रांद्वारे एकच ‘विषाणू’ पसरतो. तो म्हणजे विचार’- हे ‘पुनश्च हरि ॐ’ या संपादकीयातील (१ एप्रिल) म्हणणे अगदी खरे!  हा विषाणू रोज सकाळी उठल्यावर हाती पडावा, ही अपेक्षा होती; ती १ एप्रिलपासून पुन्हा पूर्ण झाली. तशा विविध वाहिन्यांवर बातम्या पाहण्यास, ऐकण्यास मिळत होत्या. इंटरनेटच्या माध्यमातून ई- पेपर वाचत होतो. पण हाती वर्तमानपत्र घेऊन वाचण्यात जी मजा आहे, ती त्यात मिळत नव्हती. या ‘विचार-विषाणू’मुळे रोजची सकाळ ताजीतवानी होतेच, शिवाय सारा दिवस वर्तमानपत्रातील विविध सदरे, रकाने वाचण्यात जातो. हे समाधान ई-पेपर किंवा विविध वाहिन्यांवरील बातम्या पाहून मिळत नाही.  तसेच वयोवृद्ध लोकांना ई-पेपर वाचताना त्रास होत असतो. अर्थात, करोना या रोगामुळे सर्वानी अधिक दक्षता घेतली पाहिजे.

– प्रा. जयवंत पाटील, भांडूप पूर्व (मुंबई).

दुधाची तहान..

काही दिवस दुधाची तहान ताकावर भागवली गेली. ताक  चवदार असले तरी शारीरिक क्षमता टिकवण्यासाठी दूध हेच  अत्यावश्यक असते हे जसे खरे आहे तसे ताजे वर्तमानपत्र हातात घेऊन वाचणे याला पर्याय नाही. तो पर्याय बुधवारपासून मिळणार, याचे स्वागत!

-श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)

काळ बदलला तरी भारतीय मानसिकता तीच

‘समाजबोध’ या प्रा. उमेश बगाडे यांच्या सदरातील ‘प्लेगची साथ आणि मध्यमवर्ग’ हा लेख (१ एप्रिल) वाचला. हजारोंच्या संख्येने बळी घेणारी प्लेगची साथ किंवा आत्ताची करोना विषाणूची साथ असो; ब्रिटिश काळाच्या तुलनेत आज साक्षरता जास्त प्रमाणात असूनही नागरिकांची मानसिकता बदलायला तयार नाही. जगभरात हजारोंच्या संख्येने बळी घेणारा करोनाला भारतीय जनमानस वेगवेगळ्या दृष्टीने पाहत आहे. पहिला मुद्दा म्हणजे काहीजण करोनाला अजिबात गांभीर्याने घेत नाहीत. संशयित/बाधित रुग्ण पळ काढतात, समाजात मिसळतात, सरकारच्या आवाहनांची पर्वा न करता मोठय़ा संख्येने लोक एकत्र येतात. दुसरा मुद्दा काही नागरिक प्रमाणापेक्षा जास्त भयभीत झाल्याने बाहेरून आलेल्यांना सोसायटीत प्रवेश नाकारत आहेत वा ग्रामीण भागात रस्ते अडवून गावात प्रवेश नाकारत आहेत. लेखात प्लेगविषयी सांगितल्याप्रमाणे करोनालाही धार्मिकतेची लागण झाल्याचे गेल्या दोन-तीन दिवसांत दिसून येत आहे. आज साक्षरतेचे प्रमाण जास्त असूनही सरकार वा प्रशासनाला इतक्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे; तर तत्कालीन अल्पसाक्षर समाजाने प्लेग कमिशनर रॅन्डला कसा प्रतिसाद दिला असेल याची कल्पनाच केलेली बरी.

– सचिन आनंदराव तांबे, पिंपळसुटी (ता.शिरूर, जि. पुणे)