‘पेरिले ते उगवते’ हे संपादकीय (१७ मे ) वाचले. ‘करोनाशी मुकाबला करताना विज्ञानाची कास धरणे हाच योग्य मार्ग आहे,’ या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाशी सहमत होतानाच विज्ञानाची कास धरणे हे फक्त करोनाशी मुकाबला करण्यापुरतेच मर्यादित का असावे? ती समग्र जीवनदृष्टी का नसावी? आपल्या रूढी, परंपरा इत्यादीबाबतही विज्ञानाची कास धरण्याचा आग्रह का असू नये? याबाबत संघाने विज्ञाननिष्ठ सावरकर हे आदर्शच न मानता अनुकरणीयही का मानू नयेत? व्यक्तिगतरीत्या सरसंघचालकांपाशी वैज्ञानिक दृष्टिकोन असेलही पण संघ-संस्कार आणि शिकवण यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतर्भाव कितपत आहे, इत्यादी प्रश्न पडल्यावाचून राहात नाहीत. म्हणून तर करोनावर लस शोधल्याबद्दल इंग्लंडचे पंतप्रधान वैज्ञानिक आणि विज्ञान यांचे आभार आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करीत होते त्याच वेळी संघाच्या तालमीत तयार झालेले भाजपचे एक मुख्यमंत्री, ‘अमुक देवीच्या कृपेमुळे करोना आटोक्यात आला,’ असे वक्तव्य करत होते (तेव्हा पहिली लाट ओसरू लागली होती).

‘औषध हे ‘सातत्यपूर्ण प्रयोग आणि वैज्ञानिक निकष’ यांवर तपासले जाणे आवश्यक आहे,’ हे सरसंघचालकांचे विधान संपादकीयात म्हटल्याप्रमाणे विज्ञानाधिष्ठित वैद्यकाचा गाभा आहेच. पण आपल्या परंपरेचा जो जो म्हणून भाग आहे (त्यात आयुर्वेद आलेच) त्याचे सतत गौरवीकरण आणि टोकाचा अभिमान हीच सर्रास वृत्ती अलीकडच्या काळात फोफावल्यामुळेच आयुर्वेदाच्या नावे काहीही सेवन/लेपन करणाऱ्यांची आणि त्याचा पुरस्कार करणाऱ्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे औषधे सातत्यपूर्ण प्रयोग आणि वैज्ञानिक निकष यांवर तपासली जाण्याच्या शास्त्रीय संकल्पनेकडे पूर्ण दुर्लक्ष करण्याची वृत्तीही बळावली आहे. म्हणूनच याचा फायदा उचलत मग कुठलाही ‘बाबा’ त्याचे आयुर्वेदीय औषध साम्राज्य अगदी अल्पावधीत उभारू शकतो (येथे साम्राज्य उभारण्यास आक्षेप किंवा पोटदुखी नसून औषधे पुरेशा आणि खात्रीशीर शास्त्रीय चाचण्यांविनाच, रोगनिवारणाचे मोठमोठे दावे करत केवळ जाहिरातबाजीने औषधे बाजारात आणण्याबाबत आक्षेप आहे).

तेव्हा विज्ञानाची कास धरण्याचे महत्त्व केवळ एखाद्या व्याख्यानमालेतून देणे पुरेसे नाही तर तो संस्काराचा आणि शिकवणुकीचा भाग बनवणे अत्यंत आवश्यक आहे.

– अनिल मुसळे, ठाणे पश्चिम

सकारात्मकतेपायी वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष नको..

सरसंघचालकांनी सकारात्मकतेविषयी जे वक्तव्य केले आहे त्याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करणे (‘पेरिले ते उगवते’ या संपादकीय लेखात म्हटल्याप्रमाणे) गरजेचेच आहे. खरे पाहता सकारात्मकता व नकारात्मकता या दोहोंचेही मानवी जीवनात योग्य ते स्थान आहे. कारण त्या परिस्थितीनुरूप योग्य ती कृती करायला उद्युक्त करतात आणि जोवर या दोन्ही भावना वस्तुस्थितीशी आपली नाळ जोडून ठेवतात तोवर त्या मानवाच्या प्रगतीसाठी उपयुक्तच ठरतात. इतिहासात ‘डंकर्कची यशस्वी माघार’ ही माघार असूनही यशस्वी मानली जाते. कारण त्या कृतीमागे (माघार घेणाऱ्या दोस्तराष्ट्रांसाठीची) ‘तत्कालीन युद्धस्थितीची नकारात्मकता’ या वस्तुस्थितीशी प्रामाणिकता होती. याउलट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ही शौर्यगाथा असली तरी ती शोकांतिका आहे. कारण कितीही शूर व सकारात्मक असले तरी मोजके वीर हजारोंच्या शक्तिशाली सैन्यावर तुटून पडणे ही वस्तुस्थितीशी प्रतारणा होते. सकारात्मकता वा नकारात्मकता तोवरच उपयोगी असतात जोवर त्या वस्तुस्थितीशी प्रामाणिकतेच्या परिघात फिरतात. ‘भारतीय समाजाच्या प्रतिकारशक्तीपुढे करोनाची काय बिशाद,’ ही पहिल्या लाटेच्या सुरुवातीला पसरलेली सकारात्मकता भारतीयांना त्या लाटेत पुरती भिजवून गेली व दुसऱ्या लाटेपूर्वीच्या ‘करोना तर आता संपलाच (आपण कसा संपवला), पण जगाला लशी पुरवण्यापर्यंत आपण कसे आत्मनिर्भर झालो आहोत’ इत्यादी सकारात्मकता तर भारतीयांना दुसऱ्या लाटेत अक्षरश: बुडवत आहे. तथाकथित सकारात्मकता कशी घातक ठरू शकते याची ही उदाहरणे अगदी अलीकडचीच आहेत. खरे पाहता अप्रामाणिक सकारात्मकता म्हणजे निव्वळ स्वप्नरंजन असते. तेव्हा वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करण्याचा गलथानपणा आता आपल्याला परवडणार नाही हे सूचित करून सरसंघचालकांनी नेमकी नाडीपरीक्षा केली आहे.

– प्रवीण नेरुरकर, माहीम (मुंबई)

संदेश आणि सभा यांतील फरक!

‘पेरिले ते उगवले’ हा अग्रलेख (१७ मे) वाचला. नेहमीप्रमाणे चुका करायच्या आणि जास्त गवगवा झाला की त्याबाबत अशी कानउघाडणी करायची ही सोयीचेच झाले आहे. हात कसे धुवायचे? दोन व्यक्तींमध्ये अंतर किती ठेवायचे? मास्क कसा वापरायचा? हे सारे जाहिरातीमधून, चित्रवाणी संदेशांतून आणि ‘मन की बात’मधून सांगायचे. तर दुसरीकडे निवडणुकांसाठी मोठमोठय़ा प्रचारसभा घ्यायच्या! त्या वेळी हा धोका समजला नाही का? ‘पाहा माझ्या सभेला किती गर्दी’ असे जाहीरपणे सांगून आम्ही किती लोकप्रिय आहोत हेच दाखवून देण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात करोना प्रसार दिसला नाही, कुंभमेळ्याला परवानगी नाकारली नाही. आता वेळ निघून गेल्यानंतर मलमपट्टी काय कामाची?

– संतोष ह. राऊत, लोणंद (जि. सातारा)

खरी विवंचना निराळीच..

‘पेरिले ते उगवते’ (१७ मे) मध्ये काय म्हटले गेले तसेच काय म्हणायचे राहिले याची योग्य दखल घेतली आहे. परंतु याही पुढे जाऊन मातृसंघटनेने आपल्या खऱ्या विवंचनेला वाचा फोडण्याचे धारिष्टय़ दाखविणे अपेक्षित होते असेही  म्हणायला हरकत नव्हती. मातृसंघटनेने विश्व जिंकून घेण्याच्या महत्त्वाकांक्षेने बाटली घासून बाहेर काढलेली जेनी (ऊर्फ राक्षस) आता इतकी स्वप्रतिमामग्न होऊन नियंत्रणाबाहेर गेल्यावर तिला परत बाटलीत भरून बूच कसे लावायचे ही ती विवंचना होय. ती दूर झाली तरच आपली जबाबदारी जाणणारे सरकार, शासन आणि त्याबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रतिष्ठा व संपादकीयातून अभिप्रेत असलेली विरोधासाठी विरोध न करणारी सकारात्मकता हे सर्वच विचारवंतांचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे.

– प्रभा पुरोहित, मुंबई</strong>

राजकीय पेरणीत आता तरी वाण बदला..

‘पेरिले ते उगवते’ (दि. १७ मे, लोकसत्ता) वाचले. त्यातील ‘सकारात्मकता पेरण्या’चे आवाहन पटले. पण खरे म्हणजे, संघानेच गुजराती प्रयोगशाळेत विकसित केलेल्या ‘विकासपुरुष’ या वाणाची २०१४ साली देशपातळीवर यशस्वी पेरणी केली. आज त्याच वाणाच्या विषवल्लीला आलेली भंपकबाजी, बेरोजगारी, महामारी, बेमुवर्तखोरीची फळे देश चाखतो आहे. करोनाने आज पुन्हा एकदा संघाला आपल्या चुकीची दुरुस्ती करून आपले नागपुरी वाण देशसेवेत पेरण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. संघाने ताबडतोब ‘त्या’ बदनाम जोडीच्या जागी गडकरी-राजनाथ ही जोडी आणली तरच काही सकारात्मक बदल घडू शकतो. पण सरसंघचालकांकडे खरेच हा बदल घडवून आणण्याची इच्छाशक्ती आहे का, हा प्रश्न आहेच.

– दिलीप हरणे, ठाणे

सर्वधर्मीय सुधारणांसाठी संविधानपालन हवेच

मंगला नारळीकर यांचा ‘धर्मनियमांची तपासणी करण्याची वेळ’ हा लेख (रविवार विशेष, १६ मे) सर्व धर्मरक्षकांना आवाहन करणारा आणि धर्मनियम कालसुसंगत करून ऐहिक जीवन मानवकेंद्री करण्यासाठी प्रवृत्त करणारा आहे. भारतात राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, आगरकर ते दलवाई- दाभोलकर यांनी हाच विचार रुजवण्यासाठी आयुष्य वेचले. या लेखावरील प्रतिक्रियेत (लोकमानस १७ मे) पत्रलेखिका, धर्माची ओळख प्रत्येकाला आवश्यक वाटत असल्याने धर्मश्रेष्ठत्वाची भावना जाणे कसे कठीण आहे. याचे विवेचन करतात. मात्र २०० वर्षांपूर्वीचे धर्मवर्तन आणि आजच्या धर्मवर्तनाचे निरीक्षण केल्यास ही प्रक्रिया संथ असली तरी फार कठीण आहे असे समजण्याचे कारण नाही. आपले सार्वजनिक वर्तन भारतीय संविधानाच्या चौकटीत झाले की ही समस्या सैल होण्यास वेळ लागणार नाही.

याच लेखावर ‘कट्टरता ओळखून गृहीतके तपासा’ असे म्हणताना आणखी एक पत्रलेखक कुराण, हादीसचे दाखले देतात. तसेच युरोपात बायबलविरोधी मते मांडल्यामुळे शास्त्रज्ञांना कसा छळ करावा लागला हेही सांगतात. धर्माधिष्ठित कायदे अपरिवर्तनीय असल्याचा कांगावा जुनाच असला तरी अनेक मुस्लीम राष्ट्रात नवे कायदे अस्तित्वात आले आहेत, ही वस्तुस्थिती नजरेआड करता येत नाही.

कट्टरतावाद हे काही ठरावीक धर्माची मक्तेदारी नाही. ही मानसिकता कशी सार्वत्रिक आहे हे भारतातील दाभोलकर, पानसरे, कलबूर्गी यांच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर समजून घ्यावी लागेल. तसेच लोकसंख्या नियंत्रण किंवा समान नागरी कायद्याच्या विरोधास सर्व धर्ममरतड आणि राजकीय पक्ष जबाबदार आहेत. हा विषय घेऊन लोकशिक्षण करण्यापेक्षा त्या विषयावर धार्मिक धृवीकरण करण्यात धन्यता वाटणारे नेते आहेत. ते समाजाला आधुनिकतेकडे घेऊन जाण्याऐवजी तथाकथित धार्मिकतेकडे घेऊन जातात. लोकसंख्या नियंत्रण आणि समान नागरी कायदा हा समाजहितासाठी आवश्यक असल्याने लोकानुनय न करता त्यासाठी कायदे करण्याचे धाडस दाखवण्याची गरज आहेच. समाज प्रबोधनासाठी कायदे हेच सर्वोत्तम साधन असतात. विविध कायद्यांमुळेच आपल्याकडे सुधारणा झाल्या आहेत. नाहीतरी आपल्या केंद्र सरकारच्या अजेंडय़ावर हे विषय असल्याचे निवडणुकीपूर्वी सांगितले जात होते. मात्र हे महत्त्वाचे  कायदे अस्तित्वात आणण्याऐवजी सध्याचे सरकार, दीर्घकाळ चालणारी आंदोलने उभे करणारे कायदे करीत आहे. अर्थात, ‘धर्मनियमांची तपासणी करण्याची वेळ आली आहे..’ हे मंगलाताईचे सर्व धर्मवादी नेत्यांना केलेले आवाहन नक्कीच स्वागतार्ह आहे.

– डॉ. शमसुद्दिन तांबोळी [अध्यक्ष- मुस्लीम सत्यशोधक मंडळ], पुणे</strong>