‘किमान सुधार कार्यक्रम’ या अग्रलेखात (१९ फेब्रुवारी) म्हटल्याप्रमाणे आपल्याकडील सगळ्या सुधारणा या एकतर परिस्थितीच्या रेटय़ामुळे घडल्या आहेत किंवा कायद्याच्या बडग्यामुळे झाल्यासारख्या दिसत आहेत. त्यामुळे कायदा झाला असला तरीही समाजाची मानसिकता बदलली नसल्यामुळे अजूनही धार्मिक पगडय़ामुळे हुंडा घेणे, वंशाला दिवा हवा म्हणून स्त्रीभ्रूण हत्या करणे, मुलीच्या संरक्षणाची ब्याद नको म्हणून बालविवाह करणे, असे जुने कालबाह्य़ रीतिरिवाज बेकायदेशीर ठरलेले असले तरी मोठय़ा प्रमाणात पाळले जात आहेत. त्याचेच ताजे उदाहरण म्हणजे लष्करातील महिलांना अधिकारपदाच्या नेमणुका कायमस्वरूपी देण्यास टाळाटाळ करणे. कारण काय तर म्हणे, पुरुषांना महिलांचे आदेश पाळणे कमीपणाचे वाटते!! तसेच शबरीमलाच्या देवळात न्यायालयाच्या निर्णयानंतरही स्त्रियांना प्रवेश देण्यास मज्जाव करणे, हेदेखील त्याचेच उदाहरण.

यावरून असे लक्षात येते की, आजपर्यंतचा इतिहास पाहता हिंदू धर्मात झालेल्या सुधारणा या कट्टर विचारांच्या सनातन्यांनी केलेल्या नसून त्या वारंवार धर्माला आव्हान देऊन त्यात सुधारणा घडवून आणणाऱ्या समाजसुधारकांनीच केलेल्या आहेत. चार्वाक, संत तुकाराम, बसवेश्वर, स्वामी विवेकानंद, ‘सुधारक’कार आगरकर, फुले, शाहू, आंबेडकर, विज्ञाननिष्ठ सावरकर, प्रबोधनकार ठाकरे अशांच्या घणाघाती आघातामुळेच हिंदू धर्म व्यापक बनला आहे. या सुधारणावाद्यांना छळण्याचे काम मात्र सनातन्यांनी सातत्याने इमानेइतबारे केलेले आहे. एवंच हिंदूंनी बदल लगेच स्वीकारला असे म्हणणे हे स्वत:शीच प्रतारणा करण्यासारखे आहे. जो काही बदल स्वीकारला तो नाइलाजाने वरवरचा वा सुधारकांच्या वैचारिक लढय़ामुळे.

कारण भारतीय मानसिकतेचा सगळ्यात मोठा दोष वाईट चालीरीती, परंपरांनाच चांगले समजून त्या मनोभावे पाळण्यात धन्यता मानणे, हा आहे. त्यासाठी समाजसुधारकांना सतत रूढी-परंपरेतील दोषच दाखवून प्रबोधन करावे लागले. कारण आपले दोष काय आहेत हे विचारांती कळले तर माणूस आत्मपरीक्षणाला उद्युक्त होईल, असा त्यांचा दुर्दम्य आशावाद होता. त्यासाठी आगरकरांचे तर ब्रिदवाक्यच होते की, ‘इष्ट तेच बोलणार आणि स्पष्टपणे लिहिणार.’ म्हणून अग्रलेखात लिहिल्याप्रमाणे कोणतीही सुधारणा प्रस्थापितांना दुखावल्याखेरीज कधीही झालेली नाही आणि होणार नाही. हे आपण लक्षात घेतले तर ‘आमच्या श्रद्धांना नावे ठेवण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला?’ असा कांगावखोर प्रश्न विचारत ‘आमच्या धार्मिक भावना दुखावतात’ म्हणून पुरोगामी विचारांच्या सुधारकांना धर्मद्वेषी म्हणण्याचे कोणीही धाडस करणार नाही.

– जगदीश काबरे, सीबीडी (नवी मुंबई)

कुटुंबात समानता रुजली तरच समाजात बदल

‘किमान सुधार कार्यक्रम’ या अग्रलेखात ज्या सुधारणा अपेक्षिल्या आहेत, त्या न्यायालयीन वा प्रशासकीय पातळीवर कायदे करून होणाऱ्या सुधारणा नाहीत. तशी अपेक्षाही आजच्या राजकीय प्रतिनिधींकडून करणे व्यर्थ आहे. समानता आणणाऱ्या सुधारणा घडवायच्या असतील, तर त्या जनतेच्या मानसिकतेत बदल होऊनच घडतील. त्यासाठी फक्त नियम अथवा कायदे बदलणे पुरेसे नाही, तर कुटुंबव्यवस्थेत बदल होणे आवश्यक आहे. स्त्री-पुरुष समानता ही बाब लहानपणापासूनच मुलांच्या मनात रुजवली गेली पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक कुटुंबात समानतेचा विचार रुजवला तर व्यापक अर्थाने समाजात बदल घडेल.

– मीनल मानव, बोंद्रेनगर (जि. कोल्हापूर)

महिला आरक्षणासाठी बहुमत कधी वापरणार?

‘किमान सुधार कार्यक्रम’ हे संपादकीय वाचले. लष्करात महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत! मात्र, जोपर्यंत समाजामध्ये महिलांविषयी आदराची, समानतेची भावना आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये निर्माण होणार नाही, तोपर्यंत महिलांना प्रत्येक टप्प्यावर असेच न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघत बसावे लागणार हे नक्की. त्यामुळे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असे केवळ नारे देऊन भागणार नाही, तर महिला सक्षमीकरणासाठी प्रत्येक स्तरावर प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ लोकसभेत भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. त्या जोरावरच अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला. मग महिलांना संसद आणि राज्य विधिमंडळांमध्ये ५० टक्के आरक्षण देण्यासाठी मोदी सरकारला कोणी अडवले आहे?

– सुरज जनाबाई शेषेराव जगताप, नंदागौळ (ता. परळी, जि. बीड)

फडके, गोळे.. आणि गांधीजी!

‘शिक्षित, ज्ञाननिष्ठ की सनातनी, कर्मकांडी?’ हा उमेश बागडे यांचा ‘समाजबोध’ सदरातला लेख (१९ फेब्रुवारी) निसंशय विचारांना चालना देणारा आहे. त्यात १९ व्या शतकातल्या महाराष्ट्रातल्या विचारविश्वाची केलेली मांडणी विलक्षण चित्तवेधक आहे. महादेव शिवराम गोळे यांनी केलेली ‘ब्राह्मण’ म्हणजे कोण याची व्याख्या तर्क आणि मीमांसेच्या कसोटीवर टिकून राहणारी होती. गंगाधरशास्त्री फडके यांना अभिप्रेत असलेले हिंदूधर्मतत्त्व ‘सुपरस्ट्रक्चर’ची जपणूक करणारे, पर्यायाने धर्म-कर्मकांड-व्रतवैकल्ये-रूढी-परंपरा यांना बळकटी देणारे, अस्पृश्य-अशिक्षित ठरवलेल्यांना कायमस्वरूपी अमानवी पातळीवर ठेवणारे होते.

यात फडकेंच्या विचारांचे पाईक आजही आपल्यात मोठय़ा संख्येने, झुंडीने आणि टोळीने आपला प्रभाव राखून आहेत. त्या तुलनेत गोळे यांच्या विचारांचा स्वीकार आणि व्यवहारातला आचार ठेवणाऱ्यांची संख्या तेव्हाही कमी होती आणि आताही तितकीच अत्यल्प आहे.

फडके यांच्या मांडणीनुसार, ब्राह्मण म्हणजे ज्ञानी, ज्ञानोपासकांची जात. इथे ज्ञान म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच ज्ञान अशी चौकट अपेक्षित आहे. याचाच अर्थ ज्याकडे ज्ञान आहे, तो ब्राह्मण. पण गोळे म्हणतात तसे, असे ज्ञान तर लोहाराकडेही आहे, नदीत मासे पकडणाऱ्या कोळ्यांकडेही आहे, जंगलात गुजराण करणाऱ्या आदिवासी आणि गाई-गुरांची कातडी सोलणाऱ्या दलित वर्गाकडेही आहे. मग त्यांना ‘ब्राह्मण’ का नाही म्हणायचे? पण सनातन्यांनी हाही तिढा मोठय़ा चातुर्याने सोडवला. ‘ज्याकडे धर्माचे, धर्मग्रंथांचे, कर्मकांडांचे ज्ञान तोच ब्राह्मण’ अशी व्याख्या तळागाळात रुजवली गेली. जी पुढे सहजच समाजव्यवहारात झिरपत गेली.

परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात म. शि. गोळेंच्या व्याख्येला अनुसरून महात्मा गांधींनी सनातन्यांना आव्हान दिले. नव्हे, प्रत्यक्ष कृतीची जोड देत संडाससफाई, कातडी कमावणे आदींतून शूद्र, बहुजनांच्या समजल्या जाणाऱ्या कर्माला सन्मान देत- ‘तुम्हीही ब्राह्मण आहात’ असा थेट संदेश देण्याचा प्रयत्न केला. पुढे गांधीजींच्या याच सुधारकी विचार आणि कृतीपासून प्रेरणा घेऊन ब्राह्मण समाजातल्या विजय दिवाण यांसारख्या विचारी प्रभृतींनी मृत गाई-गुरांची कातडी सोलण्यात प्रावीण्य मिळवून ब्राह्मणत्वाची व्याख्या विस्तारली. सर्व कम्रे ज्ञानाधिष्ठित तसेच प्रतिष्ठापात्र आहेत, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. फक्त पढित-लिखित नव्हे, तर आपापल्या वर्णानुसार कर्मात प्रावीण्य राखून असलेले ते सर्व ब्राह्मण, हे समाजाच्या मनावर ठसवले.

नुकतेच रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गांधीजींपुढे नतमस्तक होत- ‘गांधी हे सनातनी, कट्टर हिंदू होते,’ असे विधान केले. ते आजच्या परधर्मद्वेषाने पछाडलेल्या झुंडींना बळ देणारे असले तरीही, त्याचा खरा अर्थ गांधीजी ब्राह्मणांमधल्या ब्राह्मण्यवादाविरोधातले कट्टर हिंदू होते, हा होता. गांधीजींचा हा विचार आणि त्यातून स्फुरलेली त्यांची कृती गोळेंच्या विचारांना पुढे नेणारी होती. कर्मकांडी, स्थितीवादी हिंदूंना गांधीजींच्या वर्णश्रेष्ठत्वाला खुले आव्हान देणाऱ्या या कृतीचाच सर्वाधिक राग होता. किंबहुना, आजही उच्चजातीय समाजातल्या गांधीजींबद्दलच्या द्वेषाची मुळे त्यात आपल्याला सहज शोधता येतात. मुस्लीम अनुनय, पाकिस्तानला ५५ कोटी देणे ही सारी भ्रम निर्माण करणारी निमित्ते होती. धर्माने मान्यता दिलेले वर्णश्रेष्ठत्व नाकारले, या रागातूनच ते सनातन्यांच्या गोळीला बळी पडले होते. म. शि. गोळेंच्या ‘सर्वजातीय विद्याव्यासंगी ब्राह्मण’ या मांडणीला प्रत्यक्ष व्यवहारात आणून मोठीच किंमत गांधीजींनी चुकवली होती. सुधारकांच्या परंपरेत म्हणूनही गांधीजींचे श्रेष्ठत्व नजरेत भरणारे होते. एका अर्थाने, चर्चा ही धर्म, जात, समाज, राष्ट्र आदींशी निगडित असेल, तर एखाद्याला पटो वा ना पटो, गांधी नावाचा हा मनुष्यप्राणी पुनपुन्हा आडवा येतच राहतो. त्याला टाळून पुढे जाता येत नाही. ‘समाजबोध’मधील लेख अप्रत्यक्षपणे याही वास्तवाकडेदेखील निर्देश करतो.

– शेखर देशमुख, मुंबई

सरकारचा या यंत्रणेवर दबाव की हस्तक्षेप?

न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांनी निवृत्तीला दोन वर्षे असताना अचानक राजीनामा दिला. न्या. लोया यांचा गूढ मृत्यू, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार आणि जनतेसमोर येऊन दिलेले निवेदन आणि आता न्या. धर्माधिकारी यांनी दिलेला राजीनामा या तीनही घटनांचा अन्वयार्थ काढला पाहिजे.

सत्यरंजन धर्माधिकारी यांनी राजीनाम्यानंतर पत्रकारांसमोर दिलेले निवेदन मोठे सूचक आहे. ते म्हणाले, ‘‘कुठलाही देश न्यायव्यवस्थेवर अवलंबून राहू शकत नाही. सरकार हे बहुतांश प्रकरणांमध्ये प्रतिवादी आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर निर्णयासाठी अवलंबून राहणे चुकीचे आहे.’’ (लोकसत्ता, १५ फेब्रु. २०) बहुतांश प्रकरणांत सरकार प्रतिवादी आहे! याचा स्पष्ट अर्थ हाच निघतो की, सरकारचा या यंत्रणेवर एक तर दबाव असावा अथवा हस्तक्षेप असावा. न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी आणीबाणीत एक भूमिका घेतली. आज अघोषित आणीबाणीत त्यांचे चिरंजीव आणि आचार्य दादा धर्माधिकारी (ज्यांचा आणीबाणीला विरोध होता) यांचे नातू न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांनी एक भूमिका घेतलेली दिसते. १५ मार्च २०१५ रोजी अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनीही आयआयटी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला; मंत्री स्मृती इराणींच्या हस्तक्षेपामुळे!

न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि डॉ. अनिल काकोडकर दोघेही गांधी-विनोबा यांच्या सर्वोदय परिवारातील आहेत. आजच्या अशा राजकीय विपरीत काळात उघड भूमिका घेणारे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी हे आम्हा सामान्य कार्यकर्त्यांना आशेचा किरणच आहेत!

– वि. प्र. दिवाण, विनोबा जन्मस्थान (गागोदे, जि. रायगड)