‘साहित्यिकांनी याचेही भान ठेवावे’ हे १० जानेवारीच्या ‘लोकमानस’मधील पत्र वाचून अजिबात आश्चर्य वाटलं नाही. देशातील सध्याच्या आणि गेल्या काही काळात घडत असलेल्या आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक घटनांवर साहित्यिकांनी आणि कलावंतांनी आपल्या विरोधी प्रतिक्रिया देताच त्यांना त्यांच्या जबाबदारीचं भान देणारे महाभाग तत्परतेने पुढे येताना दिसतात. ‘साहित्यिकांनी याचेही भान ठेवावे’ या पत्राचे लेखक हे त्यांपैकीच एक. त्यांच्यासारखे अनेक तटस्थतावादी नागरिक सध्याच्या अशांततेच्या काळात वाढलेले दिसतात. मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी ‘देशात भेदाचे वातावरण’ निर्माण झाल्याचं आणि ‘सामान्यांच्या पायाखालचा विश्वास हिरावून घेण्यात आला आहे’ असं म्हणत आपला उद्वेग आणि हतबलता व्यक्त केली आहे. त्यांचं भाष्य समाजमानसातील खळबळ आणि त्याविषयी लेखक-कलावंतांना वाटणारी चिंता याचंच निदर्शक आहे. ते पूर्णतया समर्थनीय आहे. त्याविषयीच्या या पत्रात ‘समाजातील वातावरण गढूळ होईल असे विधान साहित्यिकांनी करू नये’ असा सल्ला देण्यात आला आहे. सांप्रत उस्मानाबादमध्ये चालू असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करायला ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी जाऊ  नये, असं पत्र त्यांना ब्राह्मण महासंघाने दिलं, हे समाजात नितळता असल्याचं लक्षण आहे काय? त्यावर साहित्यिकांनी काहीच न बोलता तटस्थ राहावं काय? समाजातील गढुळता दाखवून देणं, त्यातल्या दोषमूलक गोष्टींवर टीका करणं, प्रहार करणं हे साहित्यिकांचं कामच आहे. ते ते लेखणीने करतील किंवा वाणीने करतील. त्यांना आगाऊ  सल्ले देण्यापेक्षा ते असं का बोलतात, याचा जाणकारांनी विचार करावा.

परंतु आपल्या विरोधातली कुठलीच गोष्ट ऐकून न घेण्याची संस्कृती सध्या वाढीस लागली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला येऊन संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि लक्ष्मीकांत देशमुख यांचं भाषण न ऐकताच कार्यबाहुल्याचं कारण देऊन संमेलनाच्या मांडवातून आधीच काढता पाय घेतला. गतवर्षी तर यवतमाळ संमेलनात नयनतारा सहगल यांना आधी उद्घाटक म्हणून बोलावून नंतर त्यांना येऊच न देण्याची लज्जास्पद कृती आयोजकांनी केली. अशा या लाजिरवाण्या नव्या संस्कृतीचा धिक्कार समाजातील जाणकारांनी सर्वप्रथम करावा. – जयंत पवार (लेखक), बोरिवली (मुंबई)

तळागाळतला समाज अभिरुचीसंपन्न असावा..

‘देशात भेदाचे वातावरण; साहित्यिकही हतबल’ हे लेखिका अरुणा ढेरे यांचे परखड भाष्य (लोकसत्ता, ९ जानेवारी) वाचले. ढेरे यांच्या परखडपणाचे स्वागत करताना, साहित्यातून अभिजाततेची पेरणी समाजात खोलवर झाली नाही, हेही सांगायलाच हवे. सबब अभिजातता संपन्न, अभिरुची संपन्न अशा तळागाळातल्या समाजाचा कोणताच दबाव राज्यकर्त्यांवर नाही, हे स्पष्ट आहे. कुठल्याही साहित्य संमेलनात या विषयावर चर्चा झाल्याच्या प्रसंगांचा इतिहासही सापडत नाही. आणि अभिजन-बहुजनांपासून सारा समाजच अभिजाततेपासून दूर होताना फक्त भेदालाच जागा उरते. आज अभिजाततेचा निकष न वापरताच आम्ही संप्रदाय-जमातवाद्यांना धार्मिक मूलतत्त्ववादी म्हणतो. सेक्युलॅरिझमला धर्मनिरपेक्षता म्हणतो. परंपरा आणि रूढी यांना एकाच कंसात ठेवतो. यात पाठीमागे पडत जाते ते अभिजातताशोधक सिंहावलोकनी पुरोगामित्व! या सिंहावलोकनी पुरोगामित्वाने युरोपला ‘काळ्या युगा’पासून मुक्त केले. खऱ्या आधुनिकतेच्या पायऱ्या चढावयास उद्युक्त केले. समाजाभिमुख दृश्यकलांना अभिजातता समाजात पेरण्याचे साधन मानले. अशा दृश्यकला विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वाढीस कारणीभूत ठरतात, हे दाखवले. याचा अभ्यास एका तरी साहित्यिकाने केला का?

उलट, समाजवादी पुरोगामित्वाचा टिळा लावून- ‘सर्वच कलांमधील मर्म कळतं ते फक्त आम्हाला,’ असा थाट ठेवत आले ते साहित्यिकच. कदाचित असे लोक मोजकेच असतील, पण इतरांनीही त्यांचा थाट वेळीच उतरवला नाही, हेही खरेच. ही परिस्थिती नको असेल, तर साहित्यिकांनी प्रामाणिकपणे अभिजातता शोधक पुरोगामित्वाची कास धरावी. सर्वच कला अभिजाततेच्या बाबतीत जाग्या होण्यासाठी आंदोलन उभे करावे. परफॉर्मिग आर्ट्स-नॉन परफॉर्मिग आर्ट्सबद्दलचा दुजाभाव संपवावा आणि ‘कलात्मक उद्यमशील अभिजातता तळागाळातल्यांपर्यंत पोहोचवणारी वाहिनी म्हणजे संस्कृती’ ही व्याख्या बनवावी.. सातत्याने वापरावी! असे झाले तरच ते आज हतबल आहेत हे पटेल.  – रवी परांजपे, पुणे</strong>

सत्ताधाऱ्यांशी सहमती म्हणजे  ‘तटस्थ भूमिका’?

‘देशात भेदाचे वातावरण; साहित्यिकही हतबल’ (लोकसत्ता, ९ जानेवारी) या डॉ. अरुणा ढेरे यांच्या परखड भाष्यावर ‘साहित्यिकांनी तटस्थ भूमिका घ्यायला हवी’ अशी भूमिका मांडणारे पत्र (‘लोकमानस’, १० जाने.) वाचले. ते वाचून, साहित्यिक जेव्हा सत्ताधारी गटांशी सहमती दर्शवतात तेव्हा ती भूमिका तटस्थ की काय, असा प्रश्न पडला. खरे तर ज्यांना व्यक्त होणे शक्य असते, त्यांनी आपली भूमिका गुळमुळीत नव्हे तर स्पष्टपणे मांडण्यात गैर काही दिसत नाही आणि लोकशाहीत तो अधिकार असलाच पाहिजे. म्हणून चित्रकाराने चित्रातून, कवीने काव्यातून आणि वक्त्याने वक्तृत्वातून जसे व्यक्त व्हावे, तसेच साहित्यिकांनी तशी वेळ आल्यावर बघ्याची (तटस्थ) भूमिका सोडणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने डॉ. अरुणा ढेरे यांचे भाष्य विचारप्रवर्तक ठरते. – मुकुंद नवरे, गोरेगाव पूर्व (मुंबई)

संमेलन निर्वेध होण्याची जबाबदारी सर्वाची

उस्मानाबाद येथे होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला जाऊ नका अशी धमकी ब्राह्मण महासंघाने संमेलनाचे उद्घाटक कविवर्य ना.धों.महानोर यांना दिल्यामुळे साहित्य संमेलन आणि वाद ही अलीकडच्या काळातील वाद-परंपरा या संमेलनातही चालू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. साहित्य संमेलन ही साहित्यिक व साहित्यप्रेमी रसिकांना वैचारिक खाद्य देणारी एक पर्वणी. मात्र संमेलनाच्या निमित्ताने येनकेन प्रकारेण वाद उकरून काढले जातात. दरवर्षीच्या निर्थक वादांमुळे साहित्यप्रेमी रसिकांच्या आनंदावर विरजण पडते. खरे तर साहित्य संमेलन निर्वेधपणे व सुरळीतपणे पार पाडणे ही आपल्या सर्वाचीच जबाबदारी आहे व याची जाणीव सर्वानीच ठेवणे आवश्यक आहे.

 – प्रदीप शंकर मोरे, अंधेरी पूर्व (मुंबई)