09 August 2020

News Flash

मद्यमुक्तीमुळे चंद्रपूरचा मृत्यूदर देशापेक्षा कमी!

दारूबंदीनंतरच्या पाच वर्षांत दारूमुळे झालेले हे मृत्यू, वस्तुत: खूप कमी झालेले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

‘मद्यमुक्त चंद्रपूरमध्ये ९६ जणांचा दारूने मृत्यू!’ अशा धक्कादायक शीर्षकाने १२ मार्च रोजी लोकसत्तेत प्रकाशित झालेली बातमी गैरसमज पसरवू शकते. दारूबंदीनंतरच्या पाच वर्षांत दारूमुळे झालेले हे मृत्यू, वस्तुत: खूप कमी झालेले आहेत. ‘९६ मृत्यू’ ही ताजी दुर्घटना नसून पाच वर्षांची आकडेवारी आहे.  जगप्रसिद्ध ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीझ’ या अहवालानुसार (लॅन्सेट, २०१८) भारतात दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंचा वार्षिक दर हा एक लाख लोकसंख्येमागे ३१.६ इतका आहे. या हिशेबाने, दारूबंदी नसती तर, २४ लाख लोकसंख्येच्या चंद्रपूर जिल्ह्यात वर्षांला ७५८ म्हणजे पाच वर्षांत ३,७९२ मृत्यू दारूमुळे अपेक्षित आहेत. त्याऐवजी ९६ म्हणजे ९७.५ टक्के कमी झाले! तेव्हा पाच वर्षांत ९६ मृत्यू (अर्थात आरोग्य खात्याची आकडेवारी बरोबर असल्यास) हे प्रमाण धक्कादायक नसून भारताच्या सरासरी दारूमुळे होणाऱ्या मृत्युदरापेक्षा ९७.५ टक्क्याने कमी आहे. हे दारूबंदीचे अपयश नव्हे यश आहे.

– डॉ. अभय बंग, गडचिरोली

घाबरून सैरभैर होण्यापेक्षा..

‘भयाच्या भयी काय..’ या अग्रलेखात (१३ मार्च) म्हटल्याप्रमाणे भारतीय मानसिकता विचार न करता अफवांना बळी पडणारी आहे असे दिसते. खरे तर करोनामध्ये मृत्युदर हा ३.४ टक्के आहे. म्हणजे हा आजार १००० माणसांना झाला तर त्यापैकी ३४ माणसांचा मृत्यू होऊ शकतो. वय ८० पेक्षा अधिक असणारे, त्यामुळे प्रतिकारशक्ती मंदावलेले, अशांमध्ये हा दर १५ टक्के आहे. ‘सार्स’ या आजाराचा मृत्युदर हा १० टक्के, तर ‘मर्स’चा ३४ टक्केहोता. तरीही आपण वेडय़ासारखे करोनाला घाबरून समाजमाध्यमातून अफवा पसरवण्यास का हातभार लावतो? विषाणूंमुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारांचा एक ढोबळ नियम असा आहे की, जो आजार जास्त पसरतो त्याचा मृत्युदर कमी असतो आणि जो कमी पसरतो त्याचा मृत्युदर जास्त असतो.

एकुणात काय, तर स्वच्छता राखणे, लक्षणे दिसणाऱ्या माणसांपासून दूर राहणे, खोकताना व शिकताना नाक-तोंड रुमालाने वा हाताच्या कोपराने झाकणे, संक्रमण झालेल्या शहरात न जाणे, संक्रमित माणसाच्या संपर्कात न येणे, जिवंत प्राण्यांस स्पर्श न करणे अशी काळजी घेतली की, आपण करोनापासून वाचू शकतो. पण हे तर साथीचे आजार असो वा नसो, नियमितपणे पाळावयाचे स्वच्छतेचे नियम झाले. हेही आपल्याला सांगावे लागते यावरून आपण स्वच्छतेचे किती भोक्ते आहोत हे दिसून येते. म्हणूनच आपल्याकडे शहरे काय की खेडे, रस्तोरस्ती कचऱ्याचे ढीग दिसून येतात. तर नद्यांचे घाणीने भरलेल्या नाल्यात रूपांतर झालेले दिसते. घाबरून सरभर होण्यापेक्षा मूलभूत स्वच्छतेची शिस्त पाळली, साथीच्या काळात आरोग्याविषयी अधिकृतपणे दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन केले, तर कोणत्याही साथीच्या आजाराला आपण बळी पडू शकत नाही, हे लक्षात यावे.

– जगदीश काबरे, सीबीडी (नवी मुंबई)

स्थानिक अर्थव्यवस्थेलाही भय-धक्का

‘भयाच्या भयी काय..’ हा अग्रलेख (१३ मार्च) वाचला. समाजमाध्यमे आणि काही दृक्श्राव्य प्रसारमाध्यमे करोना आजारामुळे समाजात निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेस मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत आहेत. पुणे-मुंबईसारख्या शहरांत शिक्षणासाठी स्थायिक असलेले विद्यार्थी मोठय़ा संख्येने आहेत. आजाराच्या भीतीमुळे मागील दोन दिवसांत मोठय़ा संख्येने विद्यार्थी शहर सोडून गावी निघून गेले आहेत. त्याचप्रमाणे मांसाहार केल्याने करोना आजार होतो, अशा अफवेमुळे हा बाजारही कोलमडून कोंबडय़ा-चिकन यांचे भाव घसरले आहेत. हे सारे तपशील शेअरबाजाराच्या तुलनेत लहानसहान भासत असले, तरी साहजिकच स्थानिक अर्थव्यवस्थेला याचा जबर धक्का बसणार हे निश्चित.

– ऋषिकेश बबन भगत, पुणे

पर्यवेक्षकच कॉपीखोरांना सामील नको!

‘दिल्लीतील दंगल पूर्वनियोजित होती,’ असे गृहमंत्री संसदेमध्ये म्हणाले. त्यावरून या दंगलीची कल्पना किंवा माहिती केंद्र सरकारला आतापर्यंत नव्हती, असे म्हणणे भाग आहे; कारण तशी ती असती तर दंगल होऊ नये म्हणून उपाययोजना सरकारने केली असतीच. विशेषत: त्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष येणार हे सरकारला माहीत होते. त्यामुळे आपल्या देशाची चांगली प्रतिमा पाहुण्यांसमोर उभी राहावी असे कोणालाही वाटणार; पण सरकारचे गुप्तवार्ता खाते काय करत होते, हा प्रश्न निर्माण होतो.

पर्यवेक्षकाने मुलांना कॉपी करण्याचा मोह होणार नाही अशा दक्षतेने लक्ष ठेवायचे की कॉपी करणारे पकडण्याचे उद्दिष्ट बाळगूनसुद्धा आपले लक्ष नाही असे भासवून कॉपीखोरांना आधी कॉपी करू द्यायची?

– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर पश्चिम (मुंबई)

दैववाद आणि नियततत्त्ववाद यांतील गल्लत

‘मनोवेध’ या सदरातील ‘अस्तित्ववाद’ हा लघुलेख (१२ मार्च) वाचला. ‘सटवाई पाचव्या दिवशी बाळाच्या कपाळावर त्याचे भविष्य लिहिते’ या पारंपरिक समजाची तुलना लेखक स्पिनोझाच्या तत्त्वज्ञानाशी करतो, हे खटकले. यात स्पिनोझाचे म्हणून जे काही मत मांडले आहे तेही चुकीचे आहे.  ‘माणूस जन्माला येतानाच तो काय होणार आहे हे नक्की झालेले असते. तो कोणत्या वेळी कोणता निर्णय घेणार आहे हेदेखील आधीच ठरलेले असते,’ असे ‘मनोवेध’चे लेखक म्हणतात. पण हे तत्त्वज्ञान स्पिनोझाचे नाही. ते दैववाद (प्रारब्धवाद) आणि ‘नियततत्त्ववाद’ यांमध्ये गल्लत करत आहेत.  दैववाद (फॅटॅलिझम) आणि नियततत्त्ववाद (डिटर्मिनिझम) असे दोन वाद तत्त्वज्ञानामध्ये आहेत. यापैकी दैववाद म्हणजे सगळ्या गोष्टी आधीच ठरलेल्या आहेत असे मानणे आणि नियततत्त्ववाद म्हणजे, ‘जे घडेल ते त्या-त्या वेळच्या परिस्थितीनुसार आणि निसर्गनियमानुसार घडेल’ असे मानणे. स्पिनोझा नियततत्त्ववादी होता. तो संकल्पशक्ती (फ्री विल) मानत नव्हता, म्हणजे आपण जाणीवपूर्वक, संकल्प करून निर्णय घेऊ शकत नाही, तसे स्वातंत्र्य मनुष्याला नसते, असे तो म्हणतो; पण ‘निर्णय आधीच ठरलेला असतो,’ असे तो म्हणत नाही. दोन्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. निर्णय हा त्या वेळची परिस्थिती आणि निसर्गनियम यावर अवलंबून असेल, त्या-त्या वेळी त्या-त्या नियमानुसार तो होईल, असे तो म्हणतो. . स्पिनोझा बुद्धिवादी होता, प्रारब्धवादी नव्हता.

– संदीप घडमोडे, हडपसर, पुणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2020 2:20 am

Web Title: loksatta readers letters loksatta readers mail loksatta readers reaction zws 70
Next Stories
1 खबरदारीचे सल्ले अगतिक असतील; पण उद्धट नाहीत
2 शिंदे घराण्यातील पक्षसोडीचे वर्तुळ पूर्ण
3 बडय़ा थकबाकीदारांसमोर सरकार हतबल आहे का?
Just Now!
X