‘गाय महत्त्वाची की माणूस ते ठरवू या’ ही बातमी वाचली. यात ठरवायचे काय? यजुर्वेदाचा भाग असलेल्या रुद्रध्यायात सर्वशक्तिमान, जगन्नियंत्या शक्तीकडे मागणी करताना मानवाच्या कल्याणासाठी वासरे, खोंड, कालवड, बल, वळू गाय, पाडस ई. प्राणीशक्तीबरोबर अनुकूल मनुष्य जीवनासाठी विविध वस्तू ऋषींनी मागितल्या आहेत. म्हणजेच मानवाचे जीवन हे प्राणीसृष्टी किंवा जीवसृष्टी यांच्याशी सांगड-ताळमेळ घालूनच पुढे सरकले पाहिजे असे वेदांचे स्पष्ट कथन आहे. जगा आणि जगू द्या ही मानवाची संस्कृतीच आहे. परंतु उन्माद, अतिरेक आला की विनाश अटळच. सध्या असेच अतिरेकी वर्तन समाजात पाहायला मिळते. गेल्या अडीच दशकापासून भांडवलीकरणाचा राक्षस गणंग उपटसुंभांना हाताशी धरून एकीकडे आपल्या ‘समृद्धी’साठी निसर्ग ओरबाडत आहे तर दुसरीकडे गाईच्या नावाखाली मनुष्याच्या कत्तली साधत आहे. तेव्हा ‘काहीही करा सत्तेसाठी – आणि तेही समष्टीला खड्डय़ात घालून केवळ स्व-कल्याणासाठी’ या एकमात्र उद्देशासाठी सध्याचे जग संबंध पृथ्वीतलावर नंगानाच करत आहेत. त्यात अग्रलेखात व बातमीत नमूद आशाळभूत विचारवंत हे पाशवी सत्तेपुढे औटघटकेच्या स्वार्थासाठी आपले विचार म्यान करून बसलेले आहेत. हिंदू धर्म जगाला ‘उदारमतवादी आणि सहिष्णुतेची शिकवण देतो’ ती शिकवण आज केवळ पुस्तकात राहिलेली आहे. प्रत्यक्षात काही अपवाद वगळता माणसाचे माणसाशी वागणे हे काही दैवी वा आपुलकीचे दिसत नाही त्यात सामाजिक बांधिलकीचा अभावच दिसतो. म्हणूनच मौका मिळताच दंगली, जाळपोळ करण्यासाठी मनुष्यातील हैवान हा तापलेला असतो. त्याला जेरबंद करण्यासाठी भाषणे ठोकून टाळ्या मिळवणे नव्हे तर तळागाळात मूल्याधिष्ठित विचार पेरणे गरजेचे आहे. प्रशिक्षण म्हणून प्रथम मानवामानवातील भेद नष्ट झाला पाहिजे या दृष्टीने धर्मात सुधारणा करणे नितांत गरजेचे आहे. तसेच माझा धर्म श्रेष्ठ की तुझा धर्म श्रेष्ठ ही धार्मिक तेढदेखील समाजातून नष्ट करण्यासाठी समाजात प्रयत्न झाले पाहिजे.

– अ‍ॅड. किशोर रमेश सामंत, भाईंदर पूर्व

बोलणारा दुतोंडी, ढोंगी.. गृहीतच राजकीय! 

बहुमताचे बौद्धिक (२४ डिसें) हा अग्रलेख वाचला. नसीरुद्दीन शहा यांनी माणसाच्या जिवापेक्षा गायीचा जीव महत्त्वाचा आहे का, हे केलेले विधान चुकीचे आहे का, असा एक साधा प्रश्न या अग्रलेखात प्रामुख्याने समोर आणला आहे आणि त्याचे उत्तर ‘नाही’ हे आहे. पण नसीरुद्दीनचा पूर्वेतिहास/ तो जे म्हणाला, जेव्हा आणि ज्या पद्धतीने म्हणाला या ‘बिटवीन द लाइन्स’ गोष्टी या लेखात दुर्लक्षित करण्यात आल्याचे दिसते. ‘माझ्या मुलांना धर्मच नाही मग एखाद्या दंगलीत त्यांचे काय होईल’ ही काळजीही त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त करून एखाद्या सिनेमासारखा स्क्रीन प्ले त्यांनी आपल्या समोर उभा केला आहे त्या कौशल्याबद्दल त्याचे कौतुक करायला हवे. मुळात अशा तुरळक घटना म्हणजे या देशाचे चारित्र्य नव्हे की परंपरा नव्हे हे न कळण्याइतका तो भोळा नाही. या देशात धर्माच्या नावावर िहसाचार होतो आहे आणि तो सद्य राजवटीत वाढतो आहे हे त्याचे गृहीतकच मानवतावादी नसून राजकीय आहे. याकूब मेमनला फाशी देऊ नका अशी मागणी करणाऱ्यांत या नसीरुद्दीनचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. त्या मागणीत केवळ अिहसकता होती, मानव धर्म होता असा कोणी अर्थ काढला तर ती आत्मवंचना होईल. निर्बुद्ध भक्तांना चाप लावायलाच हवा, पण दुतोंडी, ढोंगी पूर्वग्रहदूषित विधानांचाही समाचार घ्यायला हवा.

– गार्गी बनहट्टी, दादर

सतत अल्पसंख्याकांचेच प्रश्न कशासाठी?

‘बहुमताचे बौद्धिक’ हा बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करणारा एकतर्फी अग्रलेख (दि. २४ डिसेंबर) वाचला. ज्या दिवशी हमीद अन्सारी हा वाट चुकलेला तरुण पाकिस्तानात सहा वर्षे तुरुंगात काढल्यावर ‘बहुमताच्या सरकारच्या’ प्रयत्नाने भारतात परतला, सुरक्षितता म्हणजे काय हे त्याने अनुभवले, त्याच दिवशी नसीरुद्दीन शहा यांना देशात असुरक्षित वाटू लागले. काही लोक जाणीवपूर्वक परिस्थितीचा बाऊ करीत असतात. असे प्रश्न कायम अल्पसंख्याक समाजाचे लोकच का उपस्थित करतात? फादर दिब्रिटो यांनी एका संमेलनात असाच प्रश्न उपस्थित केला (बातमी- लोकसत्ता, २४ डिसेंबर). हिंदू धर्मात गाईला एक विशेष महत्त्व आहे. कायद्याने गोहत्या बंदी या देशातील काही राज्यांमध्ये अनेक वर्षांपासून आहे; तथापि काही प्रवृत्ती बहुसंख्याक समाजाला खिजवण्यासाठी जेव्हा जाणीवपूर्वक गोहत्या घडवून आणतात तेव्हा त्याविरोधात किती अल्पसंख्याक समाजाचे लोक आवाज उठवतात? त्याउलट बहुसंख्याक समाजाचे लोकदेखील कायद्याविरुद्ध झालेल्या कृतीकडे दुर्लक्ष करून ‘गाय महत्त्वाची की माणूस’ असे म्हणत एक प्रकारे गोहत्येचे समर्थन करतात तेव्हा बहुसंख्याक समाजात एक नकारात्मकता जन्म घेते आणि हे सतत होत असल्याने प्रश्न उग्र होत आहे. काही प्रश्न बहुसंख्याक समाजाच्या मनातदेखील सतत येत असतात. जसे मशिदीवरील लाऊडस्पीकर कधी बंद होणार? या देशातील पशाच्या आमिषाने करण्यात येणारे धर्मातर कधी थांबणार? ‘इस्लाम खतरे में’ हे पालुपद कधी थांबणार? ‘वंदेमातरम्’, ‘भारतमाता की जय’ला होणारा विरोध कधी बंद होईल? असे प्रश्न बहुसंख्याक लोकांना पडत असतात. हे प्रश्न संपादकीयातून बौद्धिक दिल्याने पडायचे थांबणार नाहीत. त्यासाठी सगळ्यांनी कायदा, घटना श्रेष्ठ आणि धर्मापेक्षा देश मोठा असे मानावे लागेल.

– उमेश मुंडले, वसई

केवळ संख्या नव्हे, आवाज पोहोचणे महत्त्वाचे

‘बहुमताचे बौद्धिक’ हे संपादकीय वाचले. संख्येप्रमाणे विचार केल्यास जगात ख्रिस्ती धर्माची जनसंख्या सर्वाधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावर इस्लाम धर्मीयांची, तर ‘निधर्मी’ची जनसंख्या जगात तिसऱ्या क्रमांकाची आहे. नंतर कुठे हिंदू धर्मीयांचा चौथा क्रमांक लागतो. यावरून हे लक्षात येते की, जगभरात निधर्मी लोक हिंदूंपेक्षा संख्याबलानुसार जास्त आहेत. तरीही हिंदू धर्मीय निधर्मीवर कुरघोडी करीत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, धर्माध हिंदू धर्मीय एकजूट आहेत, तर निधर्मी विखुरलेले आहेत. एखाद्या कलाकाराने जर धर्माधांच्या हितसंबंधांना घातक ठरणारे विधान केलेच, तर समाजमाध्यमांवर जल्पक अर्थात ट्रोल आणि रस्त्यावर तथाकथित धर्मवादी कार्यकत्रे गोंधळ घालताना आणि शिवीगाळ करताना आढळले त्यात नवल काहीच नाही.

– स्वप्ना अनिल वानखडे, वर्धा</strong>

चिकित्सक बुद्धीने प्रश्न विचारणे, हे आज पाप?

‘बहुमताचे बौद्धिक’ हे संपादकीय वाचले. हिंदू धर्म हा नेहमी धर्मचिकित्सा करणाऱ्यांचा व विरोधी मतांचा आदर करीत आलेला आहे; परंतु एवढा सहिष्णू असणारा धर्म आजच्या धर्मरक्षक म्हणून घेणाऱ्यांनी असहिष्णू मार्गाकडे चालवला आहे. संख्येने मूठभर असणाऱ्या, विवेकी व चिकित्सक बुद्धी आजही जागी असणाऱ्या लोकांनी प्रश्न विचारणे हेच पाप ठरवले जाणे, हे तर व्यवस्थाशून्यता आणि अराजकतेचे लक्षण आहे! भीती ही आहे की, धर्ममरतडाचा रोष आणि बहुसंख्याकांच्या सांख्यिकी अहंकाराला बळी पडावे लागत असल्याने अगोदरच संख्येने अल्प असणारे विचारीजन ‘अतिअल्प’ होतील आणि आपण कायमची विचारशक्ती हरवून बसू!

– अशोक दिलीप जायभाये, काकडहिरा (बीड)

सुधारणावादी हिंदूंनी आता कार्यरत व्हावे..

‘बहुमताचे बौद्धिक’ हे संपादकीय (२४ डिसें.) वाचले. नसीरुद्दीन या विचारवंत अभिनेत्याने आपली मते व्यक्त करताना वाढता धार्मिक उन्माद यावर चिंता व्यक्त करून काही भाष्य केले. त्यामुळे लागलीच हिंदू धर्माचे स्वयंघोषित मालक चवताळून उठले. त्यांनी त्यावर वेगळेच मुद्दे उपस्थित केले. त्यामुळे नसीरुद्दीन यांच्या मूळ मुद्दय़ाला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे झाला. त्यात नसीरुद्दीन मुसलमान असल्यामुळे या ‘मालकां’ना आणखीनच चेव आला. त्यांना सुधारणावादी हिंदूंची वक्तव्ये चालत नाहीत तर या मुसलमानांचे कसे ऐकून घेणार! परंतु हे असे प्रसंग सातत्याने सुरू आहेत. याचे स्वरूप व्यापकपणे  सुधारणावादी विरुद्ध मूलतत्त्ववादी असे कायम असते. त्यामध्ये हिंदू धर्माला संस्थात्मक स्वरूप नसल्याने, तिचे स्वरूप मालकी नसलेल्या धर्मशाळेसारखे झाले आहे. त्यामुळे त्यावर जहाल प्रवृत्ती सहजपणे ताबा घेऊ शकतात. मवाळ मात्र कायम वैचारिक चच्रेत गुंतलेले असतात. त्यांच्याकडे कृतीवर कधीच एकमत होत नाही. त्यासाठी सुधारणावादी मंडळींनी नेमकेपणाने भूमिका घेतली पाहिजे. जे हिंदू असूनही धर्म मानत नसतील. त्यांनी या विषयावर अधिकारच सोडून दिलाय असे लोकांमध्ये मानले जाईल. त्याकरिता सुधारणावादी हिंदूंनी, समाजाला एखादा धार्मिक सुधारणांचा कार्यक्रम दिला पाहिजे. त्यासाठी योग्य रचनात्मक चळवळ उभी केली पाहिजे. तेव्हाच काही मूठभर मूलतत्त्व-जहाल लोकांचा वरचष्मा कमी होईल. अन्यथा धार्मिक प्रतीकांचे स्वरूप बदलून कधी मंदिर, मूर्ती, तर कधी गाय असे मुद्दे घेऊन हिंसाचार होतच राहील. आधुनिक काळात हा रानटीपणा किती काळ चालवून घ्यायचा हे आपण विवेकबुद्धीने ठरविले पाहिजे.

– मनोज वैद्य, बदलापूर (ठाणे)

शहा, दिब्रिटो एकटे नाहीत..

अभिजात अभिनेता नसीरुद्दीन शाहा यांनी व्यक्त केलेली चिंता, फादर दिब्रिटो यांची उद्विग्नता.. मला समजते; परंतु अनुपम खेरने त्यावर तोडलेले तारे वाचून मात्र ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सांगणाऱ्या गॅलेलिओस फरफटत नेऊन मारणारे’ आपल्या आजूबाजूस आहेत, हेच समजले!  लहानपणीच माझ्या नकळत्या वयात डावे व उजवे हा भेद अनुभवला; परंतु त्या वेळी तो तेवढा गंभीर वाटला नाही. कारण जन्मत:च मी डावखुरा असल्याने आपल्या आजूबाजूला बहुसंख्याकांनी उजव्या हाताने लिहिणारे व त्यानुसार नित्य जीवन जगणारे आहेत त्याचा एवढा त्रास झाला नाही, कारण मी आपसूकच सहिष्णू झालो आणि त्यानुसार जगलो. नसीरुद्दीन शहा व फादर दिब्रिटो तुम्ही एकटे नाहीत, तर माझ्यासारखे असंख्य आहेत आणि ते भारताची लोकशाही नक्कीच टिकवणार.

– रंजन रघुवीर इंदुमती जोशी, ठाणे</strong>