आता अध्ययन-अध्यापन अभियानही सुरू करा!

‘महाविद्यालयांच्या माथी अजून एक अभियान’ ही बातमी (लोकसत्ता, १३ नोव्हेंबर) वाचली. देशातल्या महाविद्यालयांवर नि विद्यापीठांवर नियंत्रण ठेवणारी शिखर संस्था असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतेच एका अभियानाचे परिपत्रक काढले आहे. यानुसार आता ‘एक भारत – श्रेष्ठ भारत क्लब’ स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बातमीत उल्लेख केल्याप्रमाणे सध्या जलशक्ती अभियान, स्वच्छता अभियान, उन्नत भारत अभियान, वित्तीय साक्षरता अभियान, योग दिवस, एकता अभियान, एकता दौड,  सशस्त्र सेना दिवस, तंबाखूमुक्ती जनजागृती दिवस, हेपेटायटिस जागृती दिवस, मातृभाषा दिवस, सर्जिकल स्ट्राइक डे, दहशतवादमुक्ती दिवस, पर्यावरण दिवस, सु-शासन दिवस, हँडलूम डे.. यांसारखे अनेक अभियान व दिवसांचे उपक्रम महाविद्यालयांमध्ये राबवण्यात येतात. या पार्श्वभूमीवर आणखी एका उपक्रमाची भर आयोगाने घातलीये. याशिवाय पूर्वापार चालत आलेले जयंती/पुण्यतिथी, अमुक सप्ताह- तमुक आठवडा किंवा पंधरवडा, जागतिक दिन, प्रादेशिक आणि स्थानिक महत्त्व व औचित्य असलेले उपक्रम आहेतच! अशा परिस्थितीत नवनवे अभियान राबवणे, त्यासाठी तयारी करणे, विद्यार्थ्यांना त्याची माहिती देऊन त्यांचा सहभाग मिळवणे, त्याचे फोटो काढणे, अहवाल लिहिणे, तो निर्धारित वेळेत वर (विद्यापीठ, यूजीसीकडे) पाठवणे यात सर्वाची (प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी) किती शक्ती खर्च होते याचा विचारच धोरणकर्त्यांनी केलेला दिसत नाहीये. या सर्व धबडग्यात अध्ययन आणि अध्यापनाचे काय होते याचे कोणालाही काहीच भान राहिले नसल्याचे जाणवते.

– प्रा. प्रवीण घोडेस्वार, नाशिक

..तर तुमचे स्वागत करू!

‘..तो माणूस असतो!’ हा ‘अन्यथा’ या सदरातील लेख वाचला. लेखातील ‘कुत्रा कधीच वाईट नसतो, वाईट असतो तो मालक.. आणि वाईट भाग हा की, तो माणूस असतो!’ ही शेवटची दोन वाक्ये वाचल्यावर ‘चिकन सूप फॉर द सोल’ या पुस्तकातील ‘चतुरंग’ पुरवणीत आलेली अनुवादित गोष्ट आठवली.. एका माणसाला हॉटेलमध्ये त्यांच्या पाळीव कुत्र्याला घेऊन राहायचे असते. तो हॉटेल मालकाला परवानगी विचारतो. हॉटेल मालक सांगतो, आतापर्यंत ग्राहकाबरोबर आलेल्या एकाही कुत्र्याने कधीही टॉवेल्स, चादरी, चमचे, सुऱ्या लंपास केले नाहीत, किंवा दारू पिऊन अपरात्री धिंगाणा घातला अथवा बिल न भरता एखादा कुत्रा पळून गेला असे कधी झालेले नाहीये. तेव्हा कुत्र्याला खुशाल घेऊन या. जर त्याने तुमची हमी दिली, तर मग तुमचे जरूर स्वागत करू!

– श्रीनिवास स. डोंगरे, दादर (मुंबई)

विरोधाभासी कडय़ावरून दिसलेले अमेरिकनांचे श्वानप्रेम..

‘अन्यथा’मधील ‘..तो माणूस असतो!’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (९ नोव्हेंबर) खूप आवडला. महिन्याभरापूर्वीच अमेरिकेतल्या हिल्सबोरो मुक्कामात जाणवलेल्या अमेरिकी लोकांच्या कुत्रवत प्रेमाचे प्रसंग आठवले.. लहान मुलांना कौतुक म्हणूनही हात लावायचा नाही, हाय-हॅलोपलीकडे संवाद न्यायचा नाही, अशा सूचनांच्या दडपणाखाली अमेरिका बघताना कुत्र्यांच्या बाबतीत मात्र अमेरिकी लोक कसे लगेच पाघळतात, याचे आश्चर्यकारक अनुभवसुद्धा घेतले. कुत्र्याला फिरायला घेऊन जाणाऱ्या व्यक्तीऐवजी आपण कुत्र्याकडे कौतुकाने पाहिले की त्या व्यक्तीचा ऊर आनंदाने भरून यायचा. एरवी फिरायला जाताना जवळ येताच अस्पष्टपणे फक्त ‘गुड मॉर्निग’ म्हणणारे अमेरिकी जरा थांबून त्यांच्याबरोबरच्या कुत्र्याबद्दल चौकशी केली की एकदम मोकळेपणाने बोलायला सुरुवात करतात, हा अनुभव मी अनेकदा घेतला. कुत्र्याला हात लावू का किंवा त्याचा फोटो काढू का, म्हटल्यावर तर त्यांना अगदी धन्य वाटते आणि त्या कुत्र्यांची देखभालही तेवढीच निगुतीने केलेली असते, की आपले लक्ष त्याच्या देखणेपणाकडे वेधले जातेच!

सुंदर झाडांनी सुशोभित रस्त्यांवर माणसे कमीच दिसत, पण दिसली तर वेगवेगळ्या जातींची कुत्री हमखास बरोबर असत. हिल्सबोरोच्या महापालिकेलासुद्धा कुत्री ही शहराची नागरिक वाटत असणार. कारण सार्वजनिक बागा, क्रीडांगणे, रस्ते इथे कुत्र्यांनी निसर्गधर्माने घाण केलीच, तर ती उचलण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या कागदी पिशव्यांचे स्टॅण्ड्स ठेवलेले पाहिले. त्यातील पिशवी उपसायची, त्यात आपल्या कुत्ररूपी पुत्राची घाण गोळा करायची आणि तिथेच असलेल्या खास विष्ठाकुंडीत समर्पित करायची. ती पिशवी कशी वापरायची, म्हणजे हाताला घाण न लागता विष्ठा उचलता येईल याची सचित्र नोटीस त्या पिशव्यांच्या स्टॅण्डवर पाहिली. कुत्र्यांसाठी सोयी करून आपले शहर स्वच्छ ठेवणारी ती महापालिका पाहून डोळे भरून येणेच बाकी होते. अर्थात नागरिकही तेवढेच जागृत. ते बाहेर पडताना डिस्पोजेबल हातमोजा आणि पिशवी खिशात घेऊन हिंडतातच.

भुंकणे हा ज्यांचा जन्मजात हक्क आहे अशी कुत्री अमेरिकेत आपल्या मालकांप्रमाणे अबोल होती, हे विशेष. जसे अमेरिकी लोकांना फार ‘सोशल’ संवाद हवाहवासा वाटत नाही, रस्त्यावरच्या चारचाकींना हॉर्नची गरज वाटत नाही, तशीच या कुत्र्यांना भुंकायची गरज वाटत नसावी. कारण इतकी कुत्री पाहूनही एकाही कुत्र्याचा गळा कसा लागतो ते मला ऐकायला मिळाले नाही. अगदी ग्रे हाऊंडसारखा आक्रमक शिकारी कुत्राही आपल्या मालकिणीबरोबर एखाद्या जंटलमनसारखा गर्दीतून जाताना पाहून गंमत वाटली. घरात चोर आल्यावरही हे असेच सभ्यपणे त्याच्याशी वागत असणार!

अमेरिकी विरोधाभासाच्या कडय़ावरून चालतात. सॅनफ्रान्सिस्कोमधील माझ्या भावाने सांगितले की, एकदा अत्यंत व्यग्र, पण कायम मोकळ्या असणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होता. कारण एक बदक माता आपल्या पिल्लांना घेऊन रस्ता ओलांडत होती आणि पिल्ले जरा जास्तच वेळ लावत होतीच; पण त्यांनी सर्वानी रस्ता ओलांडल्यावरच गाडय़ा सुरू झाल्या.

त्यामुळे इतके शिस्तप्रिय, इमानी कुत्रे पाळणाऱ्या अमेरिकी लोकांना obedient हा शब्द अपशब्द वाटत असला, तर त्यात काहीच आश्चर्य नाही.

– उमेश जोशी, पुणे

वेदनांना कारणीभूत कोण?

मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या चार महिन्यांच्या प्रिन्स या बालकावर वैद्यकीय उपचार सुरू असताना ईसीजी यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने ठिणगी उडून गादीने पेट घेतला आणि त्यात प्रिन्स २२ टक्के भाजला, त्यात इजा झाल्याने त्याचा हातही काढावा लागला. या प्रकारातून, सरकारी आणि महापालिका रुग्णालये काय सुविधा पुरवतात, हे कळते. लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरवण्याचे काम सरकारचे आहे. रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा, उपकरणे यांवर लक्ष ठेवणे हे प्रशासनाचे काम आहे. या मुलाला नुकसानभरपाई मिळेल, पण लहानग्या मुलाला होणाऱ्या वेदनांना कारणीभूत कोण? सर्वसामान्य रुग्णांनी आजारांवर उपचार करण्यासाठी कुठे जावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

– विक्रम ब्रह्माजी गावडे, भांडुप (मुंबई)

व्यवस्थेत शिरण्याच्या मार्गातच अडथळे..

मागच्या वर्षी या महापोर्टलमार्फत झालेल्या सर्व परीक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या. राज्य गुप्तवार्ता असो, वन सेवा असो, नगरपालिका असो किंवा तलाठी असो, सगळ्या परीक्षांत गडबड झाली. नगरपालिकेच्या मुख्य परीक्षेत तर सीसीटीव्ही फुटेजसहित पुरावे होते. परीक्षार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांनासुद्धा कित्येक वेळा या संदर्भात निवेदने दिली, पण तरीही काहीच कार्यवाही न करता हे पोर्टल सुरूच राहिले. खरे तर या सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घेणे शक्य आहे; परंतु या बाबतीत सरकारी उदासीनता आडवी येते. सरकारने वेळीच लक्ष दिले नाही तर यातून भविष्यात मोठे धोके संभवतात. ग्रामीण भागातून आलेला तरुण अधिकारी होऊन व्यवस्था बदलण्याचे स्वप्न पाहत असतो; पण व्यवस्थेत जाण्याच्या मार्गातच असे वाईट अनुभव आले तर त्या मुलांवर त्याचे काय परिणाम होत असतील, याचा विचार व्हावा.

– सज्जन यादव, उस्मानाबाद</p>

बेरोजगार युवकांना कुणीही वाली राहिलेला नाही

‘अस्वस्थ तरुणाईची ‘महापरीक्षा’!’ हा सुहास सरदेशमुख यांचा लेख (‘युवा स्पंदने’, १४ नोव्हेंबर) वाचला. अखेर कुणी तरी हजारो बेरोजगार युवकांच्या व्यथा मांडल्या! आज स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची काय अवस्था आहे, याविषयी कोणीही बोलायला तयार नाही. सरकारने फेब्रुवारी महिन्यात मोठा गाजावाजा करून मेगाभरती काढली होती; परंतु आजपर्यंत एक-दोन पदे सोडली तर बाकीच्या पदांसाठी परीक्षाच झालेली नाही. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्या होतीलच, याची शाश्वती नाही. राष्ट्रपती राजवटीमुळे भरती प्रक्रियाही रखडू शकते, अशी चर्चा आहे. हे या मुलांच्या भविष्यासोबत खेळण्यासारखे आहे. मुळात ही भरती प्रक्रिया ज्या ‘पोर्टल’द्वारे घेण्यात येत आहे, त्याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड रोष आहे. त्यासाठी अनेक जिल्ह्य़ांत मोर्चेसुद्धा निघाले; पण कुणीही याची दखल घेतली नाही किंवा साधे आश्वासनसुद्धा मिळाले नाही. त्याने आज विद्यार्थी हवालदिल झाले आहेत, त्यांना कुणीही वाली राहिलेला नाही. त्यामुळे आता काय ती उपाययोजना करून ही भरती प्रक्रिया तातडीने आणि पारदर्शकपणे राबवावी. अन्यथा या राज्यात शेतकरी आत्महत्या होत आहेत, त्याप्रमाणे बेरोजगार युवकांच्या आत्महत्याही दिसतील.

– राजू केशवराव सावके, तोरनाळा (जि. वाशीम)

लोकसेवा आयोग सक्षम असताना खासगी पोर्टल का?

महापरीक्षा पोर्टलविरोधी अनेक पुरावे स्पष्ट असताना का कारवाई होत नाही, हा कळीचा मुद्दा आहे. लोकसेवा आयोग सक्षम असताना खासगी पोर्टलला भरती प्रक्रियेचे कंत्राट का दिले आहे? या परिस्थितीवर लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे; अन्यथा हे तरुण नक्कीच बंड केल्याशिवाय राहणार नाहीत.

– सोपान ढोमसे, पुणे

डिजिटलायझेशनच्या नादात चुकीचे पाऊल

मोठय़ा आशा-आकांक्षांनी अभ्यास करून, घरच्या परिस्थितीला सामोरे जात, खस्ता खात तसेच खच्चीकरण करणाऱ्यांना डावलून गेल्या बऱ्याच दिवसांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माथी महापरीक्षा पोर्टलने निराशाच मारली. तलाठी, वनरक्षक आदी पदांसाठीच्या परीक्षांतील घोळ पाहता डिजिटलायझेशनच्या नादात कुठे तरी चुकीचे पाऊल प्रशासनाच्या माध्यमातून टाकले गेले असे वाटते. काही परीक्षा केंद्रांवरील गैरकारभार पाहता केंद्रप्रमुखांच्या लाचखोर कारभारामुळे पशाने श्रीमंत असणाऱ्या विद्यार्थ्यांची भाकरी भाजली गेली; पण बुद्धिवान विद्यार्थ्यांचे काय? त्यामुळे या भरती प्रक्रियेतील ढिसाळ नियोजन आणि लाचखोर कारभार पाहता हे महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्व परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नियंत्रणातून घेण्यात याव्यात, असे वाटते.

– कृष्णा अशोक जावळे, औरंगाबाद</p>

शंकांना उडवाउडवीची, असमाधानकारक उत्तरे

महापोर्टल म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांच्या भवितव्यशी, भावनांशी खेळला जाणारा खेळ आहे. महापोर्टलद्वारे आजवर घेतलेल्या परीक्षांसाठी अर्ज प्रक्रियेपासून निवड यादीपर्यंत सारा सावळागोंधळच दिसून आला आहे. महापोर्टलची परीक्षा पद्धती, महिनाभर चालणारे पेपर, प्रश्नांचे स्वरूप, निकाल लागल्यानंतर काही मुलांचे अचंबित करणारे गुण यामुळे मनात शंका येते. ही शंका विचारण्यासाठी साहाय्यता केंद्राशी संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. त्यांच्या ई-मेलने मिळणाऱ्या उत्तराने पुरेसे समाधान होत नाही. याविरोधात विविध आंदोलने, उपोषणे, निवेदने, मोच्रे या सर्व गोष्टी केल्या, पण त्या निर्थक ठरल्या. महापोर्टलचे हे विद्यार्थ्यांमागे लागलेले दुष्टचक्र कधी संपणार, याची वाट पाहण्याशिवाय तूर्त पर्याय नाही.

– सुरेंद्र बनसोडे, नेवासा (जि. अहमदनगर)

‘मधुमेहाची राजधानी’ नेमकी कोणती?

१४ नोव्हेंबर ‘जागतिक मधुमेह दिन’ म्हणून पाळला जातो. भारत मधुमेहाची जागतिक राजधानी आहे, असे सांगितले जाते. त्यात तथ्यही असून या रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या रोज वाढत आहे. चिंता, नैराश्य, वैफल्य, कौटुंबिक कलह, अतिमहत्त्वाकांक्षा व ती पूर्ण झाली नाही तर येणारे मानसिक दडपण, आदी आहेत. औषधाने काही दिवस बरे वाटते; पण रोज औषधे खाऊन औषधाची मात्रा वाढवली जाते. यासंबंधात माझा अंदाजे १० वर्षांपूर्वीचा अनुभव सांगावा असे वाटले. मी इंडोनेशिया देशात व्याख्यानांनिमित्त गेलो होतो. तेव्हा तेथे संध्याकाळी जेवणाच्या वेळी तेथील साथीदार सांगायचे की, इंडोनेशिया ही जागतिक मधुमेह राजधानी आहे आणि येथे मधुमेह रोगी रोज वाढत आहेत. सरकार यामुळे चिंतित आहे. असाच अनुभव मला चीन या देशात आला. तेव्हा मी १४ नोव्हेंबर रोजीच चीनमध्ये होतो! ‘पीपल्स डेली’ या तेथील सर्वाधिक खप असलेल्या दैनिकाची इंग्रजी आवृत्ती वाचत होतो. तर, चीन हा जागतिक मधुमेह राजधानी आहे आणि येथे हा रोग झपाटय़ाने पसरत आहे, अशी बातमी! चीनमधील एक भूकंपशास्त्रज्ञ रुग्णालयात होता, त्याला भेटायला गेलो होतो. त्या दवाखान्यात एक मधुमेह वॉर्ड होता. अशा प्रकारचा वॉर्ड मी प्रथमच बघत होतो. अशा प्रकारचा अनुभव ढाका येथीलही आहे. तेथेही ‘बांगलादेश मधुमेहींची राजधानी’ असे म्हणणारे होतेच.

जागतिक मधुमेह संख्या-शास्त्रज्ञ यांच्या मते, मधुमेहाची जागतिक राजधानी कोणती आहे? अथवा मधुमेहाची राजधानी याचा उपयोग केवळ मधुमेह रोगाची तीव्रता दाखविण्यासाठी अनेक देश उपमा म्हणून करीत आहेत?

– डॉ. अरुण बापट, पुणे