25 January 2021

News Flash

दोन्ही बाजूंकडील अतिरेकामुळेच संघर्ष

संघर्ष अतिरेकी अभिव्यक्तिस्वातंत्र्य व पराकोटीची असहिष्णुता यांच्यातील आहे.

(संग्रहित छायाचित्र)

‘नुकसान कोणाचे?’ हे संपादकीय (३१ ऑक्टोबर) वाचले. ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य’ या गोंडस नावाखाली अन्य धर्मीयांच्या श्रद्धास्थानांवर व्यंगचित्रे काढून टिंगलटवाळी करणे योग्य वाटत नाही. नुकसान नेहमी एकतर्फी होत नाही. फ्रान्सने ते ओढवून घेतले आहे असे वाटते. ‘देअर कॅनॉट बी स्मोक विदाऊट फायर’ या उक्तीनुसार जाणूनबुजून धार्मिक भावना भडकवण्याचे काम फ्रेंच मंडळी करत असतील तर तो कपाळमोक्षच ठरतो. आपण नास्तिक असू तर ते स्वातंत्र्य जसे आपल्याला आहे, तसेच अन्य व्यक्तींनी श्रद्धा बाळगण्याचे स्वातंत्र्य त्यांनाही आहे, असा उदारमतवाद का जोपासू नये? आधीच करोना विषाणूने जग ग्रासलेले असताना धार्मिक वितंडवाद करून एकमेकांची डोकी फोडण्यात शहाणपण नाही. संघर्ष अतिरेकी अभिव्यक्तिस्वातंत्र्य व पराकोटीची असहिष्णुता यांच्यातील आहे. पण दोन्ही बाजूंनी संयम राखला तरच तो टाळता येण्यासारखा आहे.

– डॉ. विकास इनामदार, पुणे

भलामण कशाची करत आहोत, याचे भान हवे

‘नुकसान कोणाचे?’ हा अग्रलेख (३१ ऑक्टोबर) वाचला. फ्रान्समध्ये पैगंबरांवरील एका व्यंगचित्रामुळे मुस्लीम हिंसक झाले. पैगंबरांचे व्यंगचित्र काढणे हे द्वेषमूलक आहे असे म्हणून जगभरातील बव्हंशी मुस्लीम त्या दहशतवाद्यांचे समर्थन करू लागले. वास्तविक जे मुस्लीम धर्माची चिकित्सा करणाऱ्यांची हत्या करतात, त्यांना कुराणाचे पढतमुर्खच म्हटले पाहिजे. एका तोंडाने म्हणायचे की इस्लाम शांती सांगणारा धर्म आहे आणि दुसऱ्या बाजूने त्याच धर्माच्या नावाने अशांतता वाढवणारा आतंकवाद माजवायचा. हाच कट्टरपणा जगाच्या विनाशाला कारणीभूत ठरणार हे नक्की. पैगंबरांच्या एका व्यंगचित्रामुळे त्यांचा अपमान होईल एवढे पैगंबर-विचार तकलादू आहेत काय? तसे वाटणे हे धर्माधतेचे लक्षण नाही काय?

पण बऱ्याचदा प्रकरण अंगाशी आले की, तथाकथित धार्मिक सावाचा आव आणून तत्त्वज्ञ बनत इस्लाम कसा शांतीचा पुरस्कार करणारा आहे म्हणत कातडीबाचाऊपणा केला जातो. मग जगभर दहशतवाद मुस्लिमांनी माजवायचे कारण काय? पुढारपण करणाऱ्या आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या किती भारतीय मुस्लिमांनी या दहशतवाद्यांचा निषेध केलाय? जवळजवळ नाहीच. उलट आज भारतातील काही मुस्लीम फ्रान्सच्या अध्यक्षांविरुद्ध मोर्चे काढून दहशतवाद्यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर आले. या काही मुसलमानांना दहशतवाद्यांची तळी उचलताना आपण चुकीच्या घटनांची भलामण करत आहोत हे लक्षात कसे येत नाही? याचे एक कारण असू शकते की, कट्टर धर्माधांना व्यंग, विडंबन, उपहास समजण्याएवढी त्यांच्या बुद्धीची वाढ झालेली नसते. कारण त्यांचा मेंदू स्वातंत्र्य, समता, बंधुता हे विचार समजण्याएवढा प्रगल्भ झालेला नसतो. म्हणून ते सगळे धर्माधतेची झापडे लावलेली मेंढरे झालेली असतात. त्याउलट अहिंसेच्या अनुयायांचा लोकांच्या चांगुलपणावर विश्वास असतो. विरोधी मतांच्या लोकांचा आदर करणारी त्यांची वृत्ती असते; आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांना द्वेषाने द्वेष वाढतो हे माहीत असते. यालाच वैचारिक प्रगल्भता म्हणतात.

– जगदीश काबरे, सीबीडी (नवी मुंबई)

आपल्याच संभाव्य कायद्यावर विश्वास नाही?

‘‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कायदा : योगी आदित्यनाथ’ ही बातमी (लोकसत्ता, १ नोव्हेंबर) वाचून पुन्हा एकदा आपल्याकडच्या राजकारण्यांची प्रवृत्ती आणि पातळी कळली. मुळातच ‘लव्ह जिहाद’ हा धर्मवेडय़ा राजकारण्यांनी आपली मतपेटी मोठी आणि मजबूत करण्यासाठी उभा केलेला बागुलबुवा वाटतो. कोणत्याही सज्ञान युवक-युवतीला आपल्या इच्छेनुसार जाती-धर्माचे बंधन न पाळता कोणाशीही विवाह करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांना त्यासाठी आडकाठी करणारा कोणताही कायदा आजतरी अस्तित्वात नाही. याउपरही अल्पवयीन मुलींना फूस लावणे, धर्मातराची आणि विवाहाची जबरदस्ती करणे असले प्रकार थांबविण्यासाठी जर योगी सरकार कायदा करणार असेल, तर त्यांच्या या निर्णयाचे स्वागतच करावयास हवे.

पण मग योगींनी ‘..तर त्यांचा ‘राम नाम सत्य है’चा प्रवास सुरू होईल’ अशी भाषा का वापरावी? एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अशी भाषा शोभते का? आपणच करणार असणाऱ्या कायद्यावर योगींचा विश्वास नाही? की कोणत्याही कायद्यापेक्षा आपली मनगटशाही जास्त प्रभावी आहे असे ते दाखवू इच्छितात? जिवंत राहण्यासाठी आपल्या राज्यातील नागरिकांना इतर राज्यांच्या दारात जावे लागते याबद्दल काही वाटणे राहिले दूर, हे निघाले ‘राम नाम सत्य है’ करायला!

– मुकुंद परदेशी, धुळे

या आव्हानाकडे लक्ष देणे दूरदृष्टीचे ठरेल

‘थायलंडचे अस्वस्थ वर्तमान..’ हा निरंजन ओक यांचा लेख (१ नोव्हेंबर) वाचला. अनियंत्रित राजेशाही आणि लष्करपुरस्कर्ते शासन असेल तर निर्दोष जनता कशा पद्धतीने भरडली जाते, हे दिसून आले. भारताच्या दृष्टीने पाहिल्यास संरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा. १५ ऑक्टोबरला चिनी परराष्ट्रमंत्र्यांनी थायी जनतेला दिलेली भेट, थायलंडने चीनकडून खरेदी केलेली संरक्षण सामग्री हे भारताला इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आव्हान निर्माण होण्याची शक्यता अधोरेखित करते. त्यामुळे विद्यमान सरकारने फुकटच्या लसी वाटण्याचे आश्वासन देणे आणि पाकिस्तानातील मंत्री काय म्हणतात यावरून बिहार विधानसभा निवडणुकीत दंग राहण्यापेक्षा इंडो-पॅसिफिक क्षेत्रात लक्ष घातले तर ते दूरदृष्टीचे ठरेल.

– सुभाष रंगनाथ मोहिते पाटील, गोशेगाव (जि. जालना)

शिक्षणातील ‘सब घोडे बारा टके’!

‘शिक्षणाचा खर्च सोसवेना?’ हा ‘अन्वयार्थ’ (२९ ऑक्टोबर) वाचला. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांत ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (पीजीआय)’च्या आधारे एक हजारपैकी आठशे प्राप्तांक मिळवून देशात अव्वल शिक्षण निर्देशांक पटकावण्याची ख्याती असलेल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ‘शिक्षणाचा खर्च सोसवेना’ असे म्हणणे निश्चितच खजील करणारे आहे. राज्यातील गत सरकारने ८० हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. प्रचंड विरोधानंतर तो मागे घेतला. तत्पूर्वी बोगस विद्यार्थी आणि शिक्षक मान्यता प्रकरण गाजले. त्याचे फलित काय, तर आजतागायत न होऊ शकलेली शिक्षक भरती. सद्य:स्थितीत हजारो शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर पुन्हा कधीही भरल्या न जाणाऱ्या रिक्त जागा असोत की २०१३ सालापासून शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊनही नव्याने शिक्षक होऊ पाहणारे हजारो नवतरुण (शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण

उमेदवार : ८६,२९८) असोत; करोडो रुपयांची वेतनावरील खर्चाला घातलेली ही वेसण कुठेही दिसून न येणारी अशीच आहे. ‘वेतनेतर अनुदान’ हा शब्द फक्त शालेय दप्तरातील प्राचीन दस्तावेज मानला जातो. आता त्याला ‘लोकसहभागातून’ हे गोंडस नाव मिळाले आहे.

२० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या सुमारे १५ हजार शाळा बंद करण्याचे विद्यमान सरकारचे मनसुबे आणि मागील सरकारचे तसेच प्रयोजन याचा लघुत्तम सामायिक विभाजक (लसावी) एकच दिसतो; तो म्हणजे- काहीही करा आणि शाळा संपवा! हे डोईजड पालुपद कोणत्याही सरकारला नकोच वाटू लागले आहे. ज्या शाळा संपत नाहीत, त्यांना आणि तेथील शिक्षकांना भरमसाट अशैक्षणिक कामांमध्ये गुरफटून टाका. या ना त्या कारणाने शिक्षकांना शिकवूच न देण्याचा चंग सोयीस्करपणे कोणत्याही राजकीय पक्षाच्या सरकारला सुचणारा अग्रक्रमाचा भाग वाटतो. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात शिक्षणाला ‘अनुत्पादित सेवे’चा भाग ठरवून वारंवार ही दुर्गती प्राप्त होण्यामागे कोणत्या वाईट प्रवृत्ती कार्यरत आहेत? याचा सांगोपांग विचार न झाल्यास, कितीही नवनवीन शैक्षणिक धोरणे बदलली तरी त्यातून गुणात्मक दर्जाच्या फक्त पोकळ वल्गनाच हाती येतील. खेडय़ापाडय़ांतील विद्यार्थ्यांची शिक्षणाशी असलेली नाळच कापली जाणार असेल तर विंदा करंदीकरांचे बोल आठवतात आणि दुर्दैवाने ते शिक्षणक्षेत्राला तंतोतंत लागू पडतात. सरकारे कोणत्याही राजकीय पक्षाची येवोत-जावोत ‘सब घोडे बारा टके’ हेच खरे!

– जयवंत कुलकर्णी, नेरुळ (नवी मुंबई)

कलांच्या रसग्रहण कार्यशाळांची गरज

‘‘स्वरानंद’ची पन्नाशी..’ हा अरुण नूलकर यांचा लेख (‘रविवार विशेष’, १ नोव्हेंबर) वाचला. त्यातील गायकांचे, गाण्यांचे उल्लेख, विविध प्रसंगांची वर्णने, छायाचित्रे, आदी पाहून तो काळ अनुभवलेल्या रसिकांच्या मनात स्मरणरंजनाचा आनंद आणि असे दर्जेदार कार्यक्रम आता फारसे अनुभवता येत नाहीत अशी रुखरुख, अशा दोन्ही भावना दाटून आल्या असतील. अनेक वाहिन्यांवर ‘रिअ‍ॅलिटी शोज्’मधून अनेक तरुण कलाकार त्या काळातील गाजलेली भावगीते आजही गाताना दिसतात; पण त्यांचे रसिक प्रेक्षक/ श्रोते हे प्रामुख्याने सत्तरच्या दशकाचा काळ अनुभवलेलेच असतील. गजाननराव वाटवे यांनी म्हटल्याप्रमाणे अभिजात भावगीतांची पताका भविष्यात उंचच राहायची असेल, तर फक्त ती गाणी गाणारे तरुण गायक/ गायिका असून चालणार नाही. त्या गाण्यांचा पुरेपूर आस्वाद घेऊ शकतील असे तरुण रसिक श्रोतेही मोठय़ा संख्येने असणे अधिक गरजेचे आहे. तसा आस्वाद घेता येण्याकरिता गाण्यांचे शब्द, त्यांचा अर्थ, त्यातील काव्य, त्या अर्थाला न्याय देणारी साजेशी सुरावट/ चाल आणि या साऱ्यावर कळस चढवणारी गायकांची ‘तयारी’, या साऱ्याची जाण निर्माण होणे गरजेचे आहे. सत्तरच्या दशकाचा काळ, आकाशवाणी/ दूरदर्शन यांचा प्रभाव आणि एकूणच परिस्थिती, यांतून असे ‘कानसेन’ निर्माण होणे त्या वेळी सध्याच्या मानाने सोपे होते असे वाटते. आत्ताच्या काळात ते प्रयत्नपूर्वक करावे लागेल. सुट्टीचा हंगाम सुरू झाला रे झाला, की विविध ‘कार्यशाळां’च्या जाहिरातींचे पेव फुटलेले वर्तमानपत्रांतून दिसते. यांत अभिनय, नृत्य, बालनाटय़, बंदिश गायकी, आवाजाचा संवादाकरता वापर (व्हॉइस कल्चर), इथपासून अगदी दिग्दर्शन, पटकथालेखन, सूत्रसंचालन, निवेदन इथपर्यंत सर्व काही दिसते! एखाद्या गोष्टीला पूर्ण वेळ देऊन त्याची लज्जत कशी अनुभवावी हेच शिकवण्याची खरे तर आज गरज आहे. गाणे आणि इतरही कलांचे ‘रसग्रहण कसे करावे’ याचीच एखादी कार्यशाळा आधी निघायला हवी. दर्दी रसिकांचा आश्रय असेल तरच भावगीतांची वा अन्य दर्जेदार कलांची पताका उंच राहू शकेल!

– विनिता दीक्षित, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 1:52 am

Web Title: loksatta readers mail letters from loksatta readers zws 70
Next Stories
1 परीक्षार्थीवर ‘आरोग्यसेतु’चे बंधन नको!
2 एकाच नाण्याच्या दोन बाजू?
3 आता ‘अलिप्तता’ राखता येईल काय?
Just Now!
X