X

भाजपने कोणती पावले उचलली होती?

आसाम गण परिषद ही भाजपप्रणीत ‘रालोआ’ (राष्ट्रीय लोकशाही आघाडी)ची सहयोगी सदस्य होती.

‘विकासाचे राजकारण’ या विनय सहस्रबुद्धे यांच्या सदरातील ‘स्वातंत्र्याची सुरक्षा, सुरक्षेचे स्वातंत्र्य!’ हा लेख (१५ ऑगस्ट) वाचला. आसाममधील बेकायदा स्थलांतरितांच्या प्रश्नाची त्यांनी दिलेली विस्तृत माहिती आणि एनआरसी प्रक्रियेचे त्यांनी केलेले समर्थन अगदी बिनतोड आहेत. त्यांच्या संपूर्ण विवेचनात, ते ज्याचे प्रतिनिधित्व करतात, त्या भाजपच्या दृष्टीने फक्त एकच कच्चा दुवा (चुकून?) राहून गेलेला दिसतो, तो दाखवण्यासाठी हा पत्रप्रपंच :

‘‘१९८५ च्या आसाम करारात स्थलांतरितांबाबत ‘हुडकून काढणे, मतदारयाद्यांतून वगळणे व परत पाठवणी करणे,’ या उभयपक्षी मान्य मुद्दय़ांबाबत केंद्र सरकारने कोणतीही पावले का उचलली नाहीत?’’ हा प्रश्न उपस्थित करताना लेखक एका गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहेत की, आसामात प्रफुल्लकुमार महंत (आसाम गण परिषद) यांच्या नेतृत्वाखालील सरकार दोनदा सत्तेवर होते. प्रथम २४ डिसेंबर १९८६ ते २८ नोव्हेंबर १९९० व नंतर पुन्हा एकदा १५ मे १९९६ ते १७ मे २००१! आसाम गण परिषद ही भाजपप्रणीत ‘रालोआ’ (राष्ट्रीय लोकशाही आघाडी)ची सहयोगी सदस्य होती. शिवाय यामधील १४ मार्च १९९८ ते २२ मे २००४ या सुमारे सहा वर्षांच्या काळात केंद्रातही भाजपच्या नेतृत्वाखाली रालोआचे सरकार सत्तेवर होते. त्यामुळे यामधील – विशेषत: १४ मार्च १९९८ ते १७ मे २००१, जेव्हा केंद्र आणि आसाम राज्य, दोन्हींत भाजप व सहयोगी पक्ष सत्तेवर होते, – तेव्हा या घुसखोरांच्या समस्येबाबत (हुडकणे, मतदार यादीतून नावे गाळणे, आणि परत पाठवणे, याबाबत) नेमके काय केले गेले (किंवा केले नाही) याची उत्तरे भाजपला द्यावी लागतील!

हे मान्यच, की १९८५चा आसाम करार करताना, किंवा त्यानंतरही बराच काळ, केंद्रात तसेच आसाम राज्यात काँग्रेसची सत्ता होती, त्यामुळे त्या कराराच्या अंमलबजावणीची जबाबदारी मुख्यत्वे काँग्रेसवर येते. पण तरीसुद्धा या मधल्या तीन वर्षांच्या (१४ मार्च १९९८ ते १७ मे २००१) कालावधीत त्या दिशेने नेमके काय केले, ते दाखवावेच लागेल.

प्रतिपक्षाला अवघड प्रश्न विचारताना, पुढेमागे कदाचित त्या प्रश्नांना आपल्यालाही उत्तरे द्यावी लागतील, याचे भान ठेवणे गरजेचे असते.

– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली (मुंबई)

बिले पाठवण्यातही विलंब नको!

वीज ग्राहकाला त्याच्या मोबाइलवर वीज बिलाचा भरणा करण्यासाठी मोबाइल कॉल सेवा विशेष वसुली मोहीम सुरू केली आहे, थकबाकी अधिकाधिक वसूल व्हावी हा यामागचा विचार. म्हणजे उपक्रम स्तुत्यच.

विशिष्ट तारखेच्या आत वीज ग्राहकाने वीज बिल भरले तर त्याला अल्प का होईना सूट मिळते, सवलत मिळते परंतु कित्येकदा ग्रामीण भागात सवलतीच्या तारखेनंतर वीज बिल ग्राहकाच्या हातात पडते. साहजिकच सवलतीच्या तारखेनंतर वीज बिल मिळाल्यामुळे ग्राहक सवलतीला मुकतो आणि हा प्रकार ग्रामीण भागात वारंवार आढळतो. यावर वीज महामंडळाकडे काय उपाययोजना आहे याचाही खुलासा मंडळाने करणे गरजेचे आहे. बिले वेळेवर मिळाली तर सवलत मिळते म्हणून लोक वेळेवर बिले भरतील. सवलतीचा फायदा घेतील. मग ते दहा रुपये का असेनात, गरिबाला ते मोलाचे असतात.

– विश्वनाथ पंडित, कोंडमळा (ता. चिपळूण, रत्नागिरी)

सूर्यनमस्कार मात्र पूर्णपणे वैज्ञानिक!

‘सूर्यसूक्त’ हा अग्रलेख (१४ ऑगस्ट ) वाचला. खगोलशास्त्रात सूर्याचा इतका अभ्यास झाला आहे की सौर-भौतिकशास्त्र अशी स्वतंत्र शाखाच फार पूर्वी अस्तित्वात आली आहे. सूर्य हा आपल्या विराट विश्वातला एक अगदी सामान्य आणि कोणतेही खास वैशिष्टय़ नसलेला असा तारा आहे. त्याच्यापेक्षा प्रचंड मोठे आणि प्रचंड तेजस्वी असे अनेक तारे या विश्वात आहेत. त्यामुळे प्राचीन काळी सूर्याला जे देवाचे स्थान दिले होते ते आता नक्कीच कालबाह्य झाले आहे. परंतु मानवाचे पृथ्वीवरचे जीवन ज्या अनेक कारणांनी शक्य झाले आहे त्यात सूर्याचे अस्तित्व हे एक प्रमुख कारण आहे. त्या अर्थाने तो आपला जीवनदाताच आहे. त्यामुळे सूर्य हा अगदी मर्यादित अर्थाने देव आहे असे आपण म्हणू शकतो. सूर्यनमस्कार मात्र पूर्णपणे वैज्ञानिक म्हटले पाहिजेत. याची दोन कारणे आहेत : एक म्हणजे कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्या त्वचेखाली ड जीवनसत्त्व तयार होते हे आधुनिक वैद्यकाने मान्य केलेले आहेच. दुसरे कारण म्हणजे सूर्यनमस्कार हा अनेक योगासनांचा एक संच आहे आणि त्याचे उपयोग सिद्ध झालेले आहेत.

पारकर या शास्त्रज्ञाने मांडलेली कल्पना इतरांनी फेटाळली, पण एस. चंद्रशेखर यांनी उचलून धरली याचा उल्लेख अग्रलेखात आहे. ६० वर्षे आधी मांडलेली ती  कल्पना आज प्रत्यक्षात येत आहे. गंमत म्हणजे खुद्द एस. चंद्रशेखर यांच्या बाबतीतही असेच घडले आहे. त्यांच्या संशोधनाला सुमारे ५० वर्षांनी मान्यता मिळाली आणि ते संशोधन इतके मूलभूत ठरले की त्यांना भौतिकशास्त्र विषयाचे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. नासाने १९९९ मध्ये अंतराळात सोडलेल्या क्ष-तरंग वेधशाळेला त्यांचे नाव देऊन त्यांचा अगदी योग्य असा सन्मान केला आहे.

आजपावेतो फक्त दोन मोहिमांना व्यक्तींची नावे दिली गेली आहेत असा उल्लेख अग्रलेखात आहे; तो बरोबर नाही*. केप्लर (पृथ्वीसारख्या ग्रहांचा वेध), गॅलिलिओ (गुरू ग्रहाचा अभ्यास), कासिनी- ह्यूगेन (शनी आणि त्याच्या टायटन या उपग्रहाचा अभ्यास) अशा अनेक मोहिमांना त्या त्या शास्त्रज्ञांची नावे दिली गेली आहेत.

– डॉ. गिरीश पिंपळे, नाशिक.

* ‘नासा’मध्ये कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञांची नावे त्या अंतराळ संस्थेच्या मोहिमांना वा तळांना दिली गेल्याची उदाहरणे, पार्कर वा चंद्रशेखर (चंद्रा) खेरीज दुसरी नाहीत.

देवधर्म कायद्याच्या चौकटीत साजरे करावेत

‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा’ असे आवाहन करणारे व मंडळे करीत असलेल्या खर्चात काय काय करता येईल हे सांगणारे पत्र (लोकमानस, १४ ऑगस्ट) वाचले. वास्तविक देव, धर्म सर्वानाच प्रिय असतो. पण देव, धर्माच्या नावाखाली रस्ते अडवणे, गोंगाट करणे, पोलीस व्यवस्था दिमतीला लावणे हे कोणत्याही धर्मासाठी अधर्मच. वादविवाद करण्यापेक्षा व रस्त्यावर देव आणण्यापेक्षा सरळ परिसरातील एखादे मैदान, हॉल स्वधर्मीयांकडून सवलतीच्या दराने भाडय़ाने घेऊन आवाजाची मर्यादा पाळून तो तेवढय़ाच उत्साहाने साजरा केला जाऊ  शकतो. तेच दहीहंडी, नवरात्रीबद्दल. हेच पूर्णपणे नमाज, अजान यांनाही लागू पडते. वर्षांनुवर्षे त्याच त्याच विषयावर चर्वितचर्वण करण्यापेक्षा सर्वच धर्मीयांनी एकत्र येऊन या वर्षीपासूनच यावर कायमस्वरूपी तोडगा चालू करावा. एकही रस्ता देवधर्मासाठी अडणार नाही, ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी आता लोकांनीच पुढे यावे. तथाकथित धर्माच्या ठेकेदारांचे लोकांना भडकावण्यास काय जाते? लोकांनीच आता शहाणे व्हावे व लोकमान्य टिळकांनी ज्या उदात्त विचारांनी हा उत्सव चालू केला त्याचे सार्थक करावे.

– नील भोसले, गोरेगाव, मुंबई

चमचा पुरे अभिषेकाला, दूध मिळो गरजूंना

परवाच्या पहिल्या श्रावणी सोमवारी मी सकाळी पावणेबारा वाजता जगन्नाथ शंकरशेट चौक येथील आमच्या कुटुंबाच्या श्री भवानी शंकर मंदिरात गेलो तेव्हा गोमुखातून दूध, पाण्याचा झराच वाहत होता. भक्तगण पुण्य मिळण्यासाठी दुधाच्या पिशव्या शंकराच्या िपडीवर रित्या करीत होते. त्याच वेळी समोरील भाजीगल्लीतील गरीब घरातील मुले, वयस्क माणसे दुधाविना होती. देवळाच्या बाहेर भिकारीसुद्धा होते.

मला जुन्या काळातील एक राजा व म्हातारीची गोष्ट आठवली. दुधाच्या घागरीवर घागरींचा शंकरावर अभिषेक करून गाभारा भरत नव्हता तो म्हातारीच्या पेलाभर दुधाने भरला.

मला प्रश्न पडला की अशी दुधाची नासाडी करून खरोखरी पुण्य मिळते का? की भक्तांनी असे केल्याने पुण्य मिळाल्याची आपली समजूत करून घ्यायची!

सर्व भक्तांना हात जोडून विनंती आहे की पुढील श्रावणी सोमवारी, इतकेच नाही तर सर्व वेळी, पाव, एक लिटर दुधाचा देवावर अभिषेक न करता एक चमचा दुधाचा अभिषेक करून बाकी दूध गरीब मुले, माणसे यांना द्यावे. त्याने त्यांना नक्कीच पुण्य मिळेल.

– अतुल शंकरशेट, मुंबई

..मूळ चाळवासीयांना विचारतो कोण?

देशातील निवडक शहरांमधून पुणे, नवी मुंबईसह  बृहन्मुंबईनेही राहण्यायोग्य शहर म्हणून पहिल्या पाचांमध्ये क्रमांक पटकावला आहे, हे वृत्त समस्त मुंबईकरांसाठी काही काळ तरी ‘खास’च ठरावे. कारण गेले कित्येक दिवस वा महिने खड्डय़ांची, वाहतूककोंडीची, अपघातांची, बेभरवशाची, असुरक्षित, बकाल अशा नानाविध शेलक्या विशेषणांनी सजलेल्या या मुंबापुरीचा कोणी तरी नव्हे तर चक्क केंद्राच्याच मंत्रालयाने ‘राहण्यासाठी चांगलं शहर’ म्हणून पहिल्या पाचांत गौरव करावा, हे मुंबईकरांसाठी खास आणि अधिकृत आहे. खरे तर ही निवड रस्त्यावर न चालणाऱ्या, नोकरा-चाकरांच्या लवाजम्यासह वातानुकूलित वातावरणात वावरणाऱ्या गडगंज पैसेवाल्यांना तसेच, महानगरपालिका चालवणाऱ्यांना भावणारी आहे हे वेगळ्याने सांगायला नको. येथे जुन्या, मोडकळीस आलेल्या किंवा इमारती कोसळून विस्थापित झालेल्या मूळ व सामान्य चाळवासीयांना विचारतो कोण?

 – उल्हास गुहागरकर, गिरगाव (मुंबई)