‘विकासासाठी सकारात्मक कौल’ (लोकसत्ता, २५ ऑक्टो.) या लेखात निवडणूक निकालांचे विश्लेषण करताना, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उभे केलेले उमेदवार व निवडून आलेले उमेदवार यांच्या आकडेवारीतून काढलेली टक्केवारी आणि ताज्या निवडणुकीतील तीच टक्केवारी, यांची तुलना करून भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी ताज्या निवडणुकीतील ‘ती टक्केवारी अधिक असल्याने भाजपची ताकद वाढली आहे’ असा सोईस्कर निष्कर्ष काढून आपली पाठ थोपटून घेतली आहे. पण २०१४ मध्ये युती नसल्याने ती भाजपची एकटय़ाची उपलब्धी होती, तर ताज्या निवडणुकीत युती असल्यामुळे ती संयुक्त उपलब्धी आहे, याचे सोयिस्कर विस्मरण त्यांना झाले असावे!

– श्याम कुलकर्णी, पुणे

सकारात्मक कौल नव्हे, सूचक तंबी

राज्यात विरोधी पक्ष दिसणार नाही, अशी भविष्यवाणी महायुतीतील अनेक मातब्बरांनी प्रचारसभांतून केली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या प्रचारातील झंझावातामुळे राष्ट्रवादीचे विधानसभेतील सदस्य तर वाढलेच, त्याचबरोबर निवडणुकीत अस्तित्वच गमावलेल्या काँग्रेसलाही मोठा फायदा होऊन आघाडीची सदस्यसंख्या शंभर पार होऊन एक प्रबळ विरोधी पक्ष तयार झाला आहे. महायुतीच्या आठ मंत्र्यांना पराभव स्वीकारावा लागला. पवार यांनी राज्यात आता तरुण कार्यकर्त्यांची फळी उभारणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे आता राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, पवारांचे नातू रोहित पवार आणि बीडचे संदीप क्षीरसागर हे तरुण उमेदवार विधिमंडळात गेल्याने शरद पवारांचे शब्द खरे ठरले आहेत. आता आघाडीची ही तरुण मंडळी आणि अनुभवी मातब्बर मंडळी आगामी सरकारला कशी धारेवर धरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. परंतु हा निकाल पाहता जनतेने ‘विकासाला सकारात्मक कौल’ नव्हे, तर ‘महायुतीच्या सरकारला आगामी काळात मनमानी करता येणार नाही,’ अशी सूचक तंबी दिली आहे.

– वैभव विक्रम पुरी, मुरुड (जि. लातूर)

अतिआत्मविश्वासाने केलेले दावे फोल

‘जमिनीवर या..’ हा अग्रलेख (२५ ऑक्टो.) वाचला. भाजप नेते लोकसभा निवडणुकीच्या प्रचंड यशाच्या नशेतच जणू राहिले व ‘आमच्यासमोर कोणी विरोधकच नाही’ आणि ‘आम्हाला कोणाचे आव्हानच नाही’ असे अति-आत्मविश्वासपूर्ण व गर्विष्ठ दावे करू लागले. परंतु मतदारांनी या दाव्यांस फोल ठरवून, लोकशाहीत ‘प्रजा’ हीच ‘राजा’ असते हे पुन्हा एकदा दाखवून दिले. ‘अब की बार २२० पार’चा जनादेश धुडकावून मतदारांनी, ‘हवेतून जमिनीवर या’ हा जनादेश मात्र नक्की दिला!

– कुणाल विष्णू उमाप, अहमदनगर</strong>

ग्रामीण-शहरी दरी वाढवणारा कौल

सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राष्ट्रीय प्रश्न उपस्थित करून ‘विजय आपलाच आहे’ अशी भावना भाजपची झाली होती. गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, शेतीमालाला भाव नाही, तरुण बेरोजगारीने ग्रस्त आहे, सतत तीन वर्षे दुष्काळावर उपाययोजना नाही, कृषी पंपाची शेतात वीज पोहोचली नाही, पूरग्रस्तांना अपुरी मदत, रु. ३४ हजार कोटींची कर्जमाफी १९ हजार कोटींवरच अडकली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शहरी भागात भाजप-शिवसेना वरचढ आहे व ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला बळ मिळाले आहे. ग्रामीण-शहरी दरी वाढल्याचे या निकालांतून दिसते. जे सर्वसामान्यांचे प्रश्न होते, ते राष्ट्रवादीने आपल्या हातात घेतले आणि त्यांचा फायदा काँग्रेसलाही मिळाला. मात्र, महाराष्ट्रात बिकट परिस्थिती तरुण बेरोजगारांची आहे. पाच वर्षांच्या सत्तेत धोरण आखण्यात भाजप आधीच्या सरकारपेक्षा सरस होती; पण स्थानिक योजना (कर्जमाफी, कृषीपंप) आजही परिपूर्ण झाल्या नसल्याने भाजपला हादरा बसला.

– मारोती बाबाराव डोंगे, कोरपना (जि. चंद्रपूर)

राष्ट्रवाद किंवा मोदी, दरवेळी साथ देतील?

भाजपने ‘२०० पार’चा दावा करत राहणे एकवेळ समजू शकेल; पण माध्यमसमूह आणि वृत्तवाहिन्यांच्या ‘एग्झिट पोल’च्या फोलपणाबद्दल प्रतिप्रश्न कोणी करावा? ‘मी पुन्हा येईन’, ‘समोर कोणी पलवान नाहीच’ अशा प्रचारातून अहंपणाचा गंध जाणवत होता, त्याला मतदाराने योग्य ते उत्तर दिले. वास्तविक भाजपने निवडणुकीत फार काही गमावले असे नाही. परंतु केवळ राष्ट्रवाद किंवा मोदी हे प्रत्येक निवडणुकीत साथ देतील हे शक्य नाही. भाजपमधील ‘मेगाभरती’मुळे पक्षविचारांशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांवर किती मतदारसंघांत अन्याय झाला, याचेही सर्वेक्षण करावे.

– संतोष कानडे, वाशी (नवी मुंबई)

फुगलेला बाजार कधी तरी फुटायचाच!

शेअर बाजार वर वर जाऊ लागला, की त्यात उतरणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या वाढू लागते. बाजार अशा एका टप्प्यावर पोहोचतो, की हौशे, नवशे, गवशे, सगळेच बाजारात घुसतात. ही सूज आहे की निकोप वाढ, हे कळेनासे होते आणि बाजार आणखी वाढतो. मग एका क्षणी बाजाराचा फुगा फुटतो, जसा गर्वाचा फुटतो तसा. आणि आत घुसलेल्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी होऊन बसते, पार वाताहत होते. ‘गर्वाचे घर खाली’, ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या अस्सल मराठी मातीतील म्हणी नंतर आठवतात. आपण तरी काय करणार?

– अभय दातार, ऑपेरा हाऊस (मुंबई)

मतदारांची ‘नोटा’-आघाडी!

लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे विजयी उमेदवार धीरज देशमुख यांची मुख्य लढत ही ‘नोटा’शी झाली असे म्हणावे लागेल. कारण तेथील मतदारांनी देशमुख वगळता अन्य सर्व उमेदवार नाकारून, ‘नोटा’ला दुसऱ्या क्रमांकाची पसंती दाखवली. इतरही अनेक मतदारसंघांतील असेच काहीसे चित्र, हे मतदारांनी मतदानाच्या हक्काचा परिणामकारक वापर करून राजकीय पक्षांच्या उमेदवार निवडीवर जाहीर नापसंती दर्शविण्यासाठी केलेले धाडस होय. मतदान न करण्याचा पळपुटेपणा वा बेजबाबदार आळशीपणा न करता, सत्तास्वार्थामुळे रूढावत चाललेल्या समाज व देशविघातक राजकीय विकृतीवर प्रहार करण्यासाठी ‘नोटा’रूपी शस्त्राच्या साहाय्याने, या जागरूक मतदारांनी जाणीवपूर्वक उघडलेली ही क्रांतिकारी आघाडी आहे.

– अजित कवटकर, अंधेरी (मुंबई)