News Flash

हेटाळणीने तात्कालिक फायदा होईलही; पण..

उलट ‘पुरस्कारवापसी गँग’चे पुढचे पाऊल असे म्हणत त्यांना हिणवण्याचे काम मात्र हिरिरीने चालू झाले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

चित्रपट व कला क्षेत्रांतील काही मान्यवरांनी देशात वाढत असलेल्या असहिष्णू घटनांबद्दल चिंता व्यक्त करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले. या पत्राला संवेदनशील प्रतिसाद ना पंतप्रधानांनी दिला, ना त्यांच्या सरकारमधील कोणी सहकाऱ्यांनी. उलट ‘पुरस्कारवापसी गँग’चे पुढचे पाऊल असे म्हणत त्यांना हिणवण्याचे काम मात्र हिरिरीने चालू झाले आहे. सर्वसामान्यांचा बुद्धिभेद करण्याचे तंत्र भाजपला उत्तम अवगत झाले आहे, इतकाच त्याचा अर्थ! हे पत्र लिहिणारी माणसे काही साधीसुधी नव्हेत. यातील प्रत्येकाने कलेच्या माध्यमातून समाजमन घडवण्याचे, त्याला पुरोगामी विचार देण्याचे, सामाजिक प्रश्न मांडण्याचे काम गांभीर्यपूर्वक केले आहे. अशा ‘ओपिनियन मेकर्स’ची हेटाळणी करून तात्कालिक फायदा होईलही; पण समाज म्हणून आपण पुन्हा चार पावले खाली उतरू, हे निश्चित. लोकांनी सत्ताधारी वर्गाचा हा उद्दाम पवित्रा ओळखून या बुद्धिवादी कलाकारांच्या विचारांचा नीट विचार करून त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे.

– राजश्री बिराजदार, दौंड (जि. पुणे)

हिंसाचाराकडे डोळेझाक करणे म्हणजे राष्ट्रप्रेम?

४९ नामवंत प्रतिभावंतांना स्वतची कामे बाजूला सारून पंतप्रधानांना पत्र लिहून झुंडशाही थांबविण्यासाठी आवाहन करावे लागते, यातूनच देशातील असहिष्णुतेचे चित्र स्पष्ट उभे राहिले आहे. दररोज ‘जय श्रीराम’ गजराच्या जबरदस्तीवरून, गोरक्षकांनी केलेल्या हैदोसावरून आणि दलितांच्या नाहक हत्यांवरून होत असलेले थमान थांबण्याचे नावच घेत नाही. अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी मात्र सारे आलबेल असल्याचा दावा करतात; तर मोदींनी अशा घटनांवरील संसदेत प्रकट केलेल्या नाराजीला कट्टरवादी भीक घालत नाहीत हे उघड दिसत आहे. मतभिन्नता आणि असहमती यांच्याशिवाय लोकशाही असूच शकत नाही; तेव्हा सरकारच्या मताच्या विरोधी बोलणे म्हणजे राष्ट्रद्रोह आणि कट्टरवाद्यांच्या हिंसाचाराकडे डोळेझाक करणे म्हणजे राष्ट्रप्रेम, हे समीकरण बदलायला हवे. कारण सर्वधर्मसमभाव हे भारताचे ब्रीद आहे. अटलबिहारी वाजपेयींनी सांगितलेल्या राजधर्माचे पालन पंतप्रधानांनी करायलाच हवे, असेच या धुरीणांना सुचवायचे आहे. ही मंडळी कुठल्याही पक्षाशी, संघटनेशी वा धर्माशी संबंधित नसून त्यांचे कार्यक्षेत्रही विभिन्न आहे. तरीही त्यांना वाढत चाललेल्या झुंडशाहीचा निषेध करत सत्ताधाऱ्यांचे कान टोचावेसे वाटतात, ही गोष्ट पुरेशी बोलकी आहे.

– नितीन गांगल, रसायनी

‘उद्या’चे साहित्य लिहिणाऱ्यांचीही दखल घ्यावी

सध्या आपल्याकडे उस्मानाबाद येथे होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात विपुल प्रमाणात विज्ञान साहित्य निर्माण होत आहे. डॉ. जयंत नारळीकर, डॉ. बाळ फोंडके, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, डॉ. अरुण मांडे, प्रा. माधुरी शानभाग.. यांसारखी दिग्गज मंडळी विज्ञान साहित्याला मायबोलीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हिरिरीने प्रयत्न करत आहेत; पण त्याची फारशी दखल घेतली जात नाही.

प्रारंभीच्या काळात मराठी विज्ञान साहित्याची उपेक्षा होण्यामागची तीन कारणे सांगितली जातात. एक म्हणजे, विज्ञान हा अवघड विषय आहे आणि विज्ञान साहित्याच्या समीक्षेचे शिवधनुष्य आपल्याला पेलणार नाही असा गैरसमज समीक्षकांनी करून घेतला होता. दुसरे म्हणजे, मराठीतले सुरुवातीचे विज्ञान साहित्य परभृत होते आणि त्यातील संपूर्ण नावीन्यामुळे प्रकाशक-संपादकांचे त्याकडे लक्ष गेले नाही. तिसरे कारण, विज्ञान साहित्यात अन्य साहित्य प्रवाहांप्रमाणे अवतीभवतीच्या वास्तवाचे चित्रण नसते, तर उद्याचे, परवाचे असते. या कारणास्तव विज्ञान साहित्य वाचकांपर्यंत पोहोचले नाही. हे चित्र आता बदलते आहे. आजघडीला मराठीत विज्ञान साहित्याची निर्मिती करणाऱ्या लेखकांची मांदियाळी कार्यरत आहे. त्यांचा यथोचित सन्मान व्हायला हवा. एखाद्या ज्येष्ठ विज्ञान  साहित्यिकाची अ. भा. मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून निवड करून असा योग साधता येईल. मराठी समीक्षक विज्ञान साहित्याचे विश्लेषण करू लागतील आणि त्यामुळे समाजाला नितांत गरज असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन पसरण्यास हातभार लागेल, असे वाटते.

– जोसेफ तुस्कानो, बोरिवली पश्चिम

.. तर विज्ञान शिकवणेच बंद करा!

चांद्रयान मोहिमेची आवश्यकता नसल्याचे मत व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया ‘लोकमानस’मध्ये वाचल्या. चांद्रयान मोहिमेच्या टीकाकारांचा मुख्य रोख ‘कशाला एवढा खर्च’ याकडे दिसतो. असा रोकडा सवाल करताना प्रश्नकर्ते हे सोयीस्करपणे विसरतात, की इस्रोने चांद्रयान मोहिमेआधी अनेक वर्षे विविध तांत्रिक सेवा पुरवून राष्ट्रासाठी पैसे कमावलेले आहेत. परदेशी उपग्रह अवकाशात पाठवणे, त्यांना तांत्रिक पाठबळ पुरवणे आणि दर्जेदार तंत्रज्ञान स्वस्तात उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांमधून इस्रोने आधी देशाच्या तिजोरीत भर घातली आहे. आता स्वकष्टाने कमावलेल्या निधीतला काही वाटा इस्रो संशोधन मोहिमांसाठी वापरू पाहात असेल, तर त्यात गैर काय? आपल्याकडील बायांना हंडे घेऊन पाणी आणायला जावे लागते हा अंतराळ वैज्ञानिकांचा दोष आहे की भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अपरिपक्व यंत्रणांचा? भलत्याच क्षेत्रातल्या लोकांच्या अकार्यक्षमतेमुळे वैज्ञानिकांनी आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना खीळ घालून क्षमता असतानाही आपली संशोधनशक्ती मारत राहावे काय?

अशाच मोहिमांद्वारे पाठवलेल्या उपग्रहांमुळे आज भारतात स्वस्तात इंटरनेट आणि मोबाइल सेवा पुरवली जात आहे. चांद्रयानासारखी मोहीम यशस्वीपणे राबवली, की इतर क्षेत्रांतल्या शास्त्रज्ञांना सकारात्मक ऊर्जा आणि स्फूर्ती मिळते. आता तरीही देशातल्या गैरव्यवस्थापनाचे खापर वैज्ञानिक संस्थांवर फोडायचे असेल, तर विज्ञान शिकवणेच बंद केलेले बरे!

– सचिन बोरकर, विरार पश्चिम

विधेयके मंजुरीचा झपाटा का आणि कशामुळे?

लोकसभेच्या चालू अधिवेशनात ज्या झपाटय़ाने विधेयके मंजूर होताहेत, तो झपाटा लक्षात घेता हे यश संसदीय कार्यमंत्र्यांचे समजायचे की विधेयकांच्या मसुद्यात कोणतीही पळवाट नसण्याबाबत काळजी घेतल्याची संसदेची खात्री झाली? की आणखी काही कारणांमुळे असे झाले? राहुल गांधींची शस्त्रेही म्यान झाली की काय, समजत नाही!

– शैलेश न. पुरोहित, मुलुंड पूर्व

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 2:20 am

Web Title: loksatta readers mail loksatta readers opinion loksatta readers letters zws 70
Next Stories
1 चंद्रावरील पाण्याच्या शोधाचा खटाटोप का?
2 मेणबत्तीची मशाल होईल ही अंधश्रद्धाच होती
3 यानाचा अभिमान; परंतु ध्यान इथेही हवे..
Just Now!
X