‘आपल्याला मराठी शब्द का सापडू नयेत?’ हा ‘लोकसत्ता गप्पां’मधील प्रश्न (२० ऑगस्ट) मार्मिक असून तो प्रत्येकाला विचारावासा वाटतो. ‘मराठी बोलताना इंग्रजी शब्द वापरल्यास शिक्षा केली जायची, हे विख्यात दिग्दर्शिका-लेखिका सई परांजपे यांचे उद्गार मातृभाषेचे संस्कार आणि आग्रही भूमिकेचे द्योतक आहे.

राष्ट्रनिष्ठा आणि भाषेविषयीचे कार्य क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भाषाशुद्धीतून प्रतिबिंबित होते. त्यांनी दिग्दर्शक (डायरेक्टर), चित्रपट (सिनेमा), मध्यंतर (इन्टव्‍‌र्हल), हुतात्मा (शहीद), स्तंभ (कॉलम), दिनांक (तारीख), वेशभूषा (कॉश्च्युम), क्रमांक (नंबर), बोलपट (टॉकी), उपस्थित (हजर), प्रतिवृत्त (रिपोर्ट), पर्यवेक्षक (सुपरवायझर), विश्वस्त (ट्रस्टी), त्वर्य/त्वरित (र्अजट), गणसंख्या (कोरम), मूल्य (किंमत), शुल्क (फी), महापालिका (कॉर्पोरेशन), नगरपालिका (म्युन्सिपाल्टी), महापौर (मेयर), निर्बंध (कायदा), शिरगणती (खानेसुमारी), विशेषांक (खास अंक), सार्वमत (प्लेबिसाइट), झरणी (फाऊंटनपेन), नभोवाणी (रेडिओ), दूरदर्शन (टेलिव्हिजन), दूरध्वनी (टेलिफोन), ध्वनिक्षेपक (लाऊड स्पीकर), विधिमंडळ (असेम्ब्ली), अर्थसंकल्प (बजेट), क्रीडांगण (ग्राऊंड), प्राचार्य/ मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल), प्राध्यापक (प्रोफेसर), परीक्षक (एक्झामिनर), नेतृत्व (लीडरशिप), वेतन (पगार), शस्त्रसंधी (सीझफायर), टपाल (पोस्ट), तारण (मॉग्रेज), संचलन (परेड), सेवानिवृत्त (रिटायर), आदी शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिले. असे असले तरी परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. कोणतीही भाषा शुद्ध असावी, इतकेच त्यांचे म्हणणे होते आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. मराठी भाषेतले त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांना अभिप्रेत असलेली भाषाशुद्धीची आजही आवश्यकता आहे. अनेक शतके मराठी भाषेवर परकीय भाषांचे आक्रमण होत आल्याने अनेक परकीय शब्द मराठी भाषेत समाविष्ट झाले आहेत. वकील, सराफ, मसाला, हवा, जमीन, अत्तर, तवा, गरीब, हलवा, गुलकंद, बर्फी हे शब्द मराठी नाहीत, ते अरबी आणि फारसी भाषेतून आले आहेत. भाषेच्या संकरामुळे आणि इंग्रजी शब्द मराठीत आल्याने मराठी भाषा समृद्ध आणि संपन्न झाली असे काही जण सांगतात, पण आपल्या भाषेत शब्द उपलब्ध करून किंवा असतानाही दुसऱ्या भाषेचा आधार का घ्यावा?

– विनित शंकर मासावकर, नेरळ

मराठी शब्दांकडे दुर्लक्ष करणे चुकीचेच

‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमात बोलताना दिग्दर्शिका-लेखिका सई परांजपे यांनी आपल्याला ‘मराठी शब्द का सापडू नयेत’ अशी खंत व्यक्त केली आहे. आपल्या रोजच्या व्यवहारात आपण सर्रास इंग्रजी शब्दांचा वापर करतो ही वस्तुस्थिती असल्याने मराठी भाषेला अवकळा येत चालली आहे व त्यामुळे मराठी भाषा काही वर्षांतच नष्ट होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत हे मराठी भाषकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. आपण सर्रास आई, बाबा, दादा, ताई, मावशी, काका, काकू या मराठी भाषेतल्या शब्दांकडे दुर्लक्ष करून त्याऐवजी, ‘मम्मी, डॅडी, आंटी, अंकल, सिस्टर, मॅडम वगैरे शब्दांचा वापर मुद्दाम का करतो हे समजण्याच्या पलीकडचे आहे. त्यामुळे भावी पिढी मराठी भाषेपासून दूर जात आहे. इंग्रजी शब्द वापरताना कोणताच भाव निर्माण होत नाही, पण आई, बाबा, ताई, अक्का, काका, काकू, दादा, भाऊ हे शब्द वापरताना निश्चितच एक आदरभाव निर्माण होतो, याचा विचार व्हावा व इंग्रजी शब्दांऐवजी मराठी शब्दांचा वापर करावा.

– श्रीनिवास जोशी, डोंबिवली

अतिउत्साह की आततायीपणा?

‘आलिंगन मुत्सद्देगिरी’ हा अन्वयार्थ (२० ऑगस्ट) वाचला. भाजपने सिद्धू यांच्या भेटीवर- आणि गळाभेटीवर- टीका केली आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीही शरीफ यांच्या वाढदिवसाला गेले होते, हे बहुधा भाजप विसरला! अर्थात, देशात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या निधनानिमित्त देशात सात दिवसांचा दुखवटा असताना एका राज्याच्या मंत्रिपदावर असणाऱ्या सिद्धू यांना राजकीय शिष्टाचार पाळणे आवश्यक वाटले नाही? इम्रान खान यांनी पाक निवडणुकीच्या वेळी काश्मीरबाबत काय भाष्य केले होते, हे सिद्धू यांना ज्ञात नाही का? सिद्धू यांना देशप्रेमापेक्षाही मित्रप्रेम अधिक वाटले का? जर सुनील गावसकर आणि कपिलदेव पाकमध्ये जाण्याचे टाळू शकतात, तर सिद्धू टाळू शकत नव्हते का? असे प्रश्न उपस्थित होतात. तेव्हा सिद्धू यांचा हा अतिउत्साह म्हणावे की आततायीपणा?

– सुनील कुवरे, शिवडी (मुंबई)

दहशतवादाविषयी आश्वासन का नाही मिळवले?

कर्तारपूर येथील सीमा खुली करण्याचे आश्वासन आपण मिळवले आणि त्यामुळे  गुरुनानक यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्ताने पाकिस्तानात कर्तारपूर येथील दरबार साहिब गुरुद्वारात शीख भाविकांना जायला मिळेल असा सिद्धू यांनी खुलासा केला आहे. यानिमित्ताने का होईना जर शेजारी राष्ट्रांचे संबंध सलोख्याचे राहण्यास जर बळ मिळत असेल तर सिद्धू यांची ही कृती निश्चितच अभिनंदनीय म्हणावी लागेल; पण अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या उदारमतवादी, मुत्सद्दी पंतप्रधानाने दोन्ही देशांचे संबंध सलोख्याचे राहावेत म्हणून समझोता एक्स्प्रेससारखे प्रयत्न केले होते पण तेसुद्धा निष्फळ ठरले, नरेंद्र मोदी यांनी वाट वाकडी करून तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची वाढदिवसानिमित्ताने अचानक भेट घेतली तरीसुद्धा पाकिस्तान दहशतवादासारखी आगळीक करतच आहे. या पाश्र्वभूमीवर सिद्धू यांनी जर पाकिस्तानी लष्करप्रमुखांकडून सीमेवरील दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईचे आश्वासन मिळवले असते तर हे आिलगन स्वागतार्ह ठरले असते!

– अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण</strong>

संवादाची अपरिहार्यता..

‘आलिंगन मुत्सद्देगिरी’ हा अन्वयार्थ वाचला. नवज्योतसिंग सिद्धूने पाक लष्करप्रमुखांना आलिंगन दिल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे. या पाश्र्वभूमीवर वाजपेयींच्या सुप्रसिद्ध लाहोर भेटीतील एका घटनेची आठवण करून देणे उचित ठरेल. वाजपेयींनी त्या वेळी मिनार-ए-पाकिस्तान या वास्तूला आवर्जून भेट दिली. मुस्लीम लीगने २३ मार्च १९४० या दिवशी मुस्लिमांसाठी स्वतंत्र देशाच्या निर्मितीसाठी केलेल्या ठरावाच्या स्मृत्यर्थ हा मनोरा उभारला गेला आहे. वाजपेयी तेथे गेलेच पण तेथील टिपणवहीत शुभेच्छा संदेशही लिहिला तो असा, ‘स्थिर, सुरक्षित आणि समृद्ध पाकिस्तान हा भारताच्या हिताचा आहे.’ त्यानंतरच्या छोटेखानी समारंभात ते असेही म्हणाले, ‘‘मी भारतात परतेन तेव्हा लोक प्रश्न विचारतील की, मिनारला भेट देण्याची काय आवश्यकता होती? पाकिस्तानच्या संकल्पनेवर शिक्कामोर्तब करायला तिथे गेला होतात का? असं विचारलं जाईल. पण पाकिस्तानला कोणाच्या संमतिपत्राची किंवा शिक्क्याची गरज नाही.’’ वाजपेयींच्या विधानावर लोकांनी उभे राहून अक्षरश: पाच मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला.

येथे लक्षात घ्यायचे ते, भारतीयांच्या दृष्टीने निषिद्ध असलेल्या ठिकाणाला वाजपेयींनी नुसती भेटच दिली नाही समृद्ध पाकिस्तानची इच्छाही प्रकट केली. तसेच पाकिस्तानची निर्मिती ही वस्तुस्थिती असून ती कुणीही अमान्य करू नये असेही सूचित केले. त्यांनी प्रकटपणे मांडलेले हे सर्व विचार म्हणजे, पाकिस्तानसह पुन्हा अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या संघ परिवाराच्या विचारांविरोधातील बंडखोरीच होती. पण वाजपेयी असे का वागले हे नीट समजून घेतले तर वाजपेयी समजून घेता येतीलच पण सिद्धू यांच्यावरची टीका हा आक्रस्तळेपणा आहे हेही समजून येईल.

संवादाची अपरिहार्यता समजून देताना ‘रॉ’चे माजी प्रमुख ए. एस. दुलत म्हणतात, ‘‘एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, जगातल्या कुठल्याच सन्याला युद्धावर जायला आवडत नाही. हा सर्वात अखेरचा वाईट पर्याय असतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या ‘ट्रॅक टू’ चर्चामध्ये मी मोठय़ा प्रमाणावर सहभागी असतो. त्यात एक गोष्ट आवर्जून सांगितली जाते की, सर्वात प्रामाणिक चर्चा ही दोन निवृत्त सेनाधिकाऱ्यांमध्येच होऊ शकते.’’ (काश्मीर : वाजपेयी पर्व, पृष्ठ : २९०)

– अनिल मुसळे, ठाणे

मोदी व जेटली हे मान्य कुठे करतात?

‘बोलणाऱ्याची बोरे’ हे संपादकीय (२० ऑगस्ट) वाचले. वास्तविक नोटाबंदीमुळे वाताहत झाली होती, पण ते मान्य करण्याचे साहस ना जेटलींकडे आहे, ना मोदींकडे आहे. मनमोहन सिंग यांची दुसरी कारकीर्द जरी काळवंडली तरी भय वाटत नव्हते. पण मोदी जर पुन्हा एकदा सत्तेवर आले तर काय होईल, हा प्रश्न मात्र अजूनही सतावतोय?

सुनील समडोळीकर, कोल्हापूर</strong>

भारतीय संस्कृतीचे हेच मर्म

‘गटारीची’ ठेच सहन करून श्रावणातल्या निसर्गरम्य वातावरणात चातुर्मासाची सुरुवात होते. याच काळात श्रद्धेची ढाल अंधश्रद्धेचे वार सहन करीत संस्कृती जोपासण्याच्या प्रामाणिक प्रयत्नात मेटाकुटीला येते. गरिबांच्या आणि खरे तर प्रत्येक सर्वसामान्य ग्राहकाच्या तोंडचं दूध गटारीत, रस्त्यावर ओतणारे स्वतला हिरो म्हणवून घेतात, तर शंकराच्या पिंडीवर दूध ओतून दमलेले संस्कृतिरक्षक, आस्तिक हे नास्तिकांच्या रोषाला कारणीभूत ठरतात! या पाश्र्वभूमीवर ‘चिंतनधारा’ दुग्धाभिषेकाद्वारे (१५ऑगस्ट) डोळ्यात अंजन घातल्यासारखे झाले. धार्मिक कथा, प्रथांद्वारे मिळणारा, दिला जाणारा संदेश दुर्लक्षित होऊन केवळ उपचार, कर्मकांडाने माणसाला कसे बुद्धिभ्रष्ट केले जात आहे त्याचा प्रत्यय येतो. जे मंदिर कळशा भरभरून दूध ओतूनही भरत नाही, ते गरिबाघरच्या पोराबाळांच्या ‘भुका’ भागवून उरलेल्या वाटीभर दुधाने ओसंडून वाहायला लागते. यातून काय सुचवायचे आहे, ते सांगण्यासाठी कोणाही तत्त्ववेत्त्याची गरज नाही. भारतीय संस्कृतीचे हेच मर्म आहे. त्याच्यावर घाला घालून श्रद्धावान मंडळीच स्वतच्या पायावर धोंडा पाडून घेत आहेत.

– अनिल ओढेकर, नाशिक