‘आले ‘बाबू’जींच्या मना..’ हा अग्रलेख वाचला. कठीण काळात शांत राहून समयसूचकता दाखवून काम करणे सोपे नसते. त्यासाठी दूरदृष्टी लागते व संयमदेखील. दंडुकेशाही फार काळ चालत नाही.

आजच्या घटकेला परप्रांतीय मजुरांना स्वगृही पाठवायच्या प्रश्नाने असेच अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. किती लोक किती किलोमीटर चालत गेले त्यांचे त्यांना माहीत. २४ मार्चला (संध्याकाळी ८ ते रात्री १२) चार तासांत आणीबाणीसदृश टाळेबंदी जारी करताना (आप जहाँ है वहाँ सुरक्षित रहिए) त्यांचा विचार अजिबात केला गेला नाही. किंबहुना हे असे टाळेबंदी १, २, ३ (आणि ४ देखील) असे वाढत जाईल, हे कुणी अपेक्षिले नाही. तेव्हा बहुधा अर्थव्यवस्था लवकर कशी रुळावर आणायची, हेच बघितले गेले असावे.

लहानपणी शाळेत असताना सर्वात द्वाड, व्रात्य, खोडकर मुलाला मॉनिटर करायची पद्धत होती, जेणेकरून इतर मुले त्याचे ऐकतील.

सध्या शहरांत- गावांत- जिल्ह्यांत- वस्त्यांत असे मॉनिटर धुमाकूळ घालत आहेत.

— मोहन नारायण जोशी, ठाणे</strong>

‘मिशन’ मजुरांसाठीही का नाही?

‘अडकलेल्या मजुरांच्या हालात वाढ’ हे वृत्त (लोकसत्ता, ८ मे) वाचले. स्थलांतरित मजुरांची आजची अवस्था ही आगीतून फुफाटय़ात पडल्यासारखी आहे. त्यामुळे करोना संसर्गाची पर्वा न करता ते त्यांच्या गावी जाण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले हे लोक शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करत आहेत. कोणाच्या खांद्यावर सामानाच्या बॅगा, तर कोणाच्या खांद्यावर चिमुरडी! परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांना देशात परत आणण्यासाठी ‘वंदे भारत मिशन’ आखले जाते. मग या असहाय मजुरांसाठी कोणते मिशन का नाही आखले जात? की त्यांच्यासाठी केवळ मजूर मृत्यू मिशन आहे?

– अमित प्रफुल्ल तांबडे, बारामती (जि. पुणे)

तहसीलदारांचे थोडेसे चुकलेच..

‘प्राध्यापकांचा ‘तास’ मद्यालयांजवळ’ ही बातमी (लोकसत्ता, ८ मे) वाचली. विद्यार्थ्यांना शिस्त लावणारे, त्यांना दोन चांगल्या गोष्टी शिकविणारे प्राध्यापक रांगेतल्या मद्यपींनाही शिस्त लावतील, त्यांनाही दोन चांगल्या गोष्टी शिकवतील, त्यामुळे निदान रांगेतल्या दोन-चार मद्यपींचे तरी मतपरिवर्तन घडेल आणि ते व्यसनमुक्त होतील अशा उदात्त हेतूने मूर्तिजापूरच्या तहसीलदारांनी काही प्राध्यापकांची मद्यालयांजवळ नेमणूक केली असेल तर त्यात इतका ओरडा करण्याचे कारणच काय? वास्तविक गुरुजनांबद्दल इतका आदर बाळगणारे, इतकी खात्री बाळगणारे  तहसीलदार आपल्याला लाभले म्हणून समस्त मूर्तिजापूरकरांनी, त्यातही शिक्षक आणि प्राध्यापक मंडळींनी त्यांचा जाहीर सत्कार करावयास हवा होता; पण दुर्दैव त्या तहसीलदारांचे दुसरे काय? नाही म्हटले तरी त्या तहसीलदारांचे थोडेसे चुकलेच. यांना जर प्राध्यापकांची मद्यालयांजवळ नेमणूक करावयाचीच होती, तर आधी थोडी माहिती काढून ‘आनंदद्रव्या’ची आवड असलेल्या ‘आनंदयात्री’ प्राध्यापकांची या कामी नेमणूक केली असती तर रांगेतल्या मद्यपींना शिस्त लावता लावता त्यांनीही आपला ‘कोटा’ विनासायास प्राप्त करून घेतला असता. परमार्थ साधताना स्वार्थही साधला गेला असता. मग अशी बोंबाबोंब झालीच नसती. तहसीलदार, तुम्हारा थोडा चुक्याच!

– मुकुंद परदेशी, धुळे.

दिलेल्या जबाबदारीचे श्रेष्ठत्व ठरविण्याची ही वेळ नव्हे

‘प्राध्यापकांचा ‘तास’ मद्यालयांजवळ’ ही बातमी (लोकसत्ता, ८ मे) वाचली. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मद्यविक्रीतून मिळणारा महसूल लक्षणीय आहे. करोनाच्या अरिष्टामुळे खिळखिळी झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी दारूविक्री सुरू करणे हा कितीही अप्रिय गणला जाणारा प्रकार असला, तरीही त्याशिवाय पर्याय नाही हे प्रकर्षांने समोर आले आहे. मूर्तिजापूर येथील तहसीलदारांनी प्राध्यापकांची नियुक्ती दारूविक्रीच्या प्रचारासाठी केलेली नव्हती. करोनाच्या संकटातील महसुलवाढीसाठी शासनमान्य दारूविक्रीच्या निर्णयाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते की नाही, यावर देखरेख करण्यासाठी केली होती. प्राध्यापक हा समाजातील जबाबदार घटक आहे. विविध प्रवृत्तींच्या विद्यार्थ्यांना कुशलतेने हाताळण्याची त्यांच्याकडे क्षमता असते. गर्दीचे नियोजन हा त्यांच्या दैनंदिन परिपाठाचा भाग आहे. भ्रष्टाचारापासून कोसो दूर असलेला हा घटक या दुकानात गैरप्रकार होऊ नयेत व अटी-शर्तीचे पालन होते की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी योग्य निवड आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत शासनाने दिलेली जबाबदारी पूर्णपणे निभावणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. प्राध्यापक हा तर समाजातील एक बुद्धिवान घटक आहे. आर्थिक आघाडीवर शासनाला किती अवघड परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, याची या वर्गाला पूर्ण जाण आहे. करोनाचे युद्ध यशस्वी करण्यासाठी शासनाने निर्देशित केलेली कुठलीही जबाबदारी श्रेष्ठ की कनिष्ठ हे ठरविण्याची ही वेळ नाही. हजारो मैल उपाशीपोटी अनवाणी रस्ते तुडवीत जाणारे तांडे पाहून सुखासीन जीवन जगणाऱ्यांनी या अवघड परिस्थितीचे जरूर अवलोकन करावे.

– सतीश कुलकर्णी मालेगावकर, नांदेड</strong>

लसीला/ लशीला.. दोन्हीही ग्रा!

‘मूस- मुशीत, कूस- कुशीत.. मग लस-लशीत का नाही?’ या शीर्षकाचे वाचकपत्र (लोकमानस, ७ मे) वाचले. त्यात ‘लस’ या शब्दाच्या सामान्य रूपांबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. अशा प्रश्नांची उत्तरे नियमानुसार मिळतातच असे नाही. प्रा. यास्मिन शेख यांच्या ‘मराठी शब्दलेखनकोश’ या पुस्तकात या शब्दाची पुढीलप्रमाणे रूपे दिली आहेत :

लसीला/ लशीला (दोन्ही ग्राह्य़), लसी/ लशी (अनेकवचन), लसींना/ लशींना.

‘नस’ या शब्दाची मात्र ‘नसेला, नसा, नसांना’ अशी रूपे दिली आहेत. त्यांना पर्यायी रूपे नाहीत. ‘घूस’, ‘मूस’ या शब्दांत ‘ऊ’ आल्याने त्यांची रूपे ‘घुशीला’, ‘मुशीतून’ अशी होतात. ‘कीस’ या शब्दाचा कीस काढायची संधी नाही! ‘किसाला, कीस (अ.व.) किसांचे’ ही रूपे नियमाने सिद्ध होतात.

– मनोहर राजर्षी, पुणे