‘पुतळा प्रजासत्ताक’ हे संपादकीय (२६ ऑक्टो.)वाचले.आपल्या देशामध्ये ज्या गतीने या पुतळ्यांच्या आणि स्मारकांच्या उभारणीच्या घोषणा होत आहेत आणि जिवाचीही पर्वा न करता जसे यांचे काम पुढे सरकते आहे हे पाहून असे वाटते की, देशातील इतर समस्या (दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिला सुरक्षा आदी) सोडवण्यापेक्षा ही पुतळ्यांची आणि स्मारकांची कमतरता भरून काढणे अतिमहत्त्वाचे झाले आहे. पण वास्तव काय आहे हे सर्वाना ज्ञात आहे. असे असूनही कशाचाही विचार करताना विवेकाला बाजूला ठेवून, भावनिक होऊन विचार करण्यातच आपण धन्यता मानतो. भारतासारख्या प्रगतिशील देशामध्ये धनाचा आणि संसाधनांचा असा गैरवापर योग्य नव्हे, याची जाण नेतेमंडळींसोबतच प्रत्येक नागरिकालासुद्धा असणे आवश्यक आहे. अंतत: एवढेच वाटते की, देशातील क्रांतिकारी आणि महापुरुषांबद्दलचा आपल्या मनातील आदरभाव दर्शवण्यासाठी त्यांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा अवलंब आपल्या जीवनात केला तर त्याचा आनंद त्यांनाही होईल.

– अनिकेत अनिल माळगे, कोल्हापूर</strong>

पुतळे म्हणजे निवडणुकांची रसद!

‘पुतळा प्रजासत्ताक’ हे संपादकीय धर्माच्या ओझ्याखाली रुतलेल्या अविचारी मनांना प्रश्न करायला लावणारे आहे. बरं, मन विचारी झाले आणि त्यांनी प्रश्न केले तर राज्यकर्त्यांना ते झेपणारं नाही. मग पुतळा नावाची निर्जीव वस्तू उभी करायची व लोकांना खूश करायचे. लोकांना काहीतरी भव्य-दिव्य आवडतं. महाराजांची खरी स्मारकं त्यांचे गड-किल्ले आहेत. ही स्मारकं जपणं आवश्यक आहे. पण मग निवडणुका कोणाच्या नावाने जिंकायच्या, हा प्रश्न राज्यकर्त्यांना सतावत असणार. बाबासाहेबांच्या स्मारकाऐवजी त्यांच्या प्रगल्भ बुद्धिवैभवाप्रमाणे भव्य वाचनालय निर्माण केलं तर महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला जाईल. पण त्यातील पुस्तकं वाचून लोकांनी प्रश्न केले तर, ही भीती राज्यकर्त्यांना असणार. पुतळ्यापेक्षा युगपुरुषांचे समाजाला पुढे नेणारे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. कारण हेच पुतळे राज्यकर्त्यांची निवडणुकीची रसद असणार आहेत हे जनतेने आपला भावनिक व धर्माधतेचा बुरखा बाजूला करून ओळखावे.

 – विशाल चांगदेव कोल्हे, पेमगिरी, ता. संगमनेर (अहमदनगर)

पुतळ्यांपेक्षा मूलभूत गरजा पूर्ण होणे महत्त्वाचे

‘पुतळा प्रजासत्ताक’ हे संपादकीय वाचले. एवढे भव्य आणि खर्चीक पुतळे उभारून काही फायदा होणार नाही. ज्यांचे पुतळे उभारले जात आहे त्यांना असली कशाचीच अपेक्षा नव्हती. सरदार वल्लभभाई पटेल हे हयात असताना म्हणाले होते की, माझ्या मृत्यूनंतर देशाची एक इंच भूमीसुद्धा माझ्यासाठी वापरू नये. हे त्यांचे विचार आणि आज मात्र जातीच्या नावाखाली पुतळे उभारले जात असून ते गैरच आहे. राजकारणी मंडळी काहीही निर्णय घेतील, पण जनतेने विचार करावा की त्यांना रस्ते, आरोग्य सेवा, शिक्षण, रोजगार, महागाई हे पाहिजे की दगडी पुतळे? जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नसताना पुतळ्यांवर कोटय़वधी रुपये खर्च करावेत का, याचा आता विचार करावा.

-दत्ता पवार, धानोरी (पुणे)

हजारो कोटींची लूट कशाला?

‘पुतळा प्रजासत्ताक’ हे संपादकीय वाचले. आज माणसात आणि पुतळ्यांत काहीच फरक उरलेला नाही. ज्याप्रमाणे पुतळ्याचे बरे-वाईट केले तरी तो त्यावर कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाही, माणूसही तसाच झालेला आहे . कोणत्याही नामवंत व्यक्तिमत्त्वाची प्रतिष्ठा, कीर्ती पुतळ्याद्वारे जगजाहीर करता येत नाही. कारण त्यांचे कार्यच त्यासाठी पुरेसे असते. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य आणि त्यांचे कार्य विश्वविख्यात आहे. मग ही हजारो कोटींची लूट कशाला? यातून काय साध्य होणार? फक्त सामान्य ज्ञानाच्या पुस्तकात त्या पुतळ्याची उंची लिहिली जाईल. बस एवढंच.

– सुजित बागाईतकर, निमखेडा (नागपूर)

आधी उभारलेल्या पुतळ्यांची निगा नीट ठेवा

राज्यात भाजपचे सरकार स्थापन होऊन चार वर्षे झाली. सरकार अंतिम टप्प्यात असताना पुतळा वा मंदिर उभारणीच्या हालचाली होत असतील तर या मागची राजकारणी लोकांची मानसिकता समजून घेतली पाहिजे. सरदार पटेल यांचा अतिशय महाकाय पुतळा गुजरातमध्ये उभारण्यात आला. पुतळा उभारून तरुणांना रोजगार उपलब्ध झालेत का? महागाई कमी होत आहे का? हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक यामध्ये होत आहे. हा नेमका आटापिटा कशासाठी? दुसरीकडे आहे त्या पुतळ्यांची अवस्था काय आहे? उद्या संबंधित महापुरुषाची जयंती असेल नगरपालिका किंवा महानगरपालिका टँकरने पुतळा धुऊन काढतात. बाकीच्या दिवशी पुतळ्याची परिस्थिती काय असते ते सर्वाना चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणून आहे तेच पुतळे चांगल्या स्थितीत व सुरक्षित ठेवले तर ते बरे होईल.

– शशांक सुरेशराव कुलकर्णी, जालना</strong>

विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षणापासून वंचित ठेवू नये!

शिक्षण उपसंचालकांनी शाळांना पर्यटन, मनोरंजनस्थळी सहली काढण्यास मनाई केल्याची बातमी (२५ ऑक्टो.) वाचली. शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना पक्षी, प्राणी, फुले, झाडे-वनस्पती, सागरी जैवविविधता आदींची ओळख होणे गरजेचे आहे. त्यासाठी अभयारण्ये, समुद्रकिनारे येथे सहली आयोजित करणे अनिवार्य आहे. इतिहास, संस्कृती समजून घेण्यासाठी गड-किल्ले मुलांना दाखवायला हवेत. ही सारी शैक्षणिक ठिकाणेच आहेत. शैक्षणिक, अभ्यासात्मक, संशोधनात्मक सहलींच्या ठिकाणाची शिक्षण खाते नेमकी व्याख्या सांगू शकेल काय? अशा सहलींमध्ये अपघात घडतात ते सहलीचे नियोजन काळजीपूर्वक आणि जबाबदारीने न केल्याने. विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनी अतिरेकी उत्साह टाळून सहलींचा आनंद घेतल्यास संभाव्य अपघात टळू शकतात. शिक्षण खात्याचा हा निर्णय म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असा आहे. विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षणापासून वंचित ठेवू नये असे वाटते.

– रविराज गंधे, गोरेगाव (मुंबई)