जाहिरातींचे अर्थकारण कसे शक्य झाले?

सतराव्या लोकसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता लागू झाल्यामुळे राजकीय पक्षांच्या जाहिरातींवर निर्बंध आले आहेत. निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता नियमावलीनुसार राजकीय पक्षांचे फलक तसेच सरकारी योजनांची जाहिरात नेत्यांच्या छबीसह करणारे फलक, जाहिराती हटवल्या जात आहेत. राजकीय नेत्यांचे पुतळे झाकले जात आहेत. राजकीय नेत्यांची सार्वजनिक ठिकाणी असलेली नावेही झाकली जात आहेत. पुढील काही दिवसांत राजकीय पक्षांचा प्रचार होऊ शकेल अशा सर्वच बाबी हटवल्या तरी जातील किंवा झाकल्या जातील. हे नियमांनुसार आणि योग्य असले तरी निवडणूक कार्यक्रम जाहीर व्हायच्या अगोदर काही दिवस दररोज ‘अशक्य आता आहे शक्य’ या शीर्षकाखाली पान-पानभर जाहिराती देशभरातील सर्वच भाषांतील वर्तमानपत्रांमध्ये विद्यमान भाजप सरकारने देण्याचा जो सपाटा लावला होता त्याचे काय? आचारसंहितेपूर्वीच्या या जाहिराती असल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचा खर्च निवडणूक खर्चात समाविष्ट होणार नाही आणि तोच उद्देश जाहिराती प्रसिद्ध करण्यामागे होता हे सर्वश्रुत आहे. परंतु तरीही प्रश्न उरतोच, या जाहिरातींमागचे अर्थकारण कसे सांभाळले गेले?

– दीपक काशिराम गुंडये, वरळी.

‘रमजान’ची ओरड विनाकारण!

‘धार्मिक आधारावर विभाजनाचा डाव!’ (१२ मार्च २०१९) ही बातमी वाचली. लोकसभा निवडणूक आणि रमजान महिन्याचे उपवास एकत्र आल्याने ‘आप’ आणि तृणमूलसारखे विरोधी पक्ष यावर टीका करीत आहेत याहून जास्त मूर्खपणा काय असू शकतो असा प्रश्न पडतो. रमजान महिना आणि उपवास आले म्हणजे आम्ही सर्व कामे सोडून घरी बसतो असा प्रकार नव्हेच, उलट रमजान महिन्यात आम्ही अधिक जोमाने काम करतो आणि उपवास हा आमच्या दैनंदिन जीवनाचा भागच बनतो मग अशा वेळेस यावर राजकारण करणे म्हणजे मूर्खपणाच म्हणता येईल. विरोधी पक्षांच्या अशा क्षुल्लक राजकारणावरूनच ते ४०० वरून ४४ वर आले. म्हणून विरोधी पक्षांना माझी विनंती आहे की मुद्दय़ाचे राजकारण करावे. विनाकारण, धार्मिक तेढ निर्माण होईल अशी ओरड करणारे मुद्दे राजकारणात घेऊ नये.

-मोईन अब्दुलरहेमान शेख, दापचरी ( पालघर ).

पवारांच्या माघारीची संभाव्य कारणे..

अखेर शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले. त्याची काही कारणे असावीत : (१) देशातील हवा कोणत्या दिशेने वाहत आहे याचा अंदाज  पवारांना आधीच येतो असे अनेक जाणकारांचे मत आहे. त्यानुसार आतापर्यंत लढवलेल्या १३ निवडणुका जिंकणाऱ्या पवारांचा या निवडणुकीत पराभव झाल्यास तो या वयात सहन करता येणार नाही हे नक्की (२) मुळात माढा मतदारसंघातले वातावरण त्यांना अनुकूल राहिलेले नाही, हेही त्यांच्या लक्षात आले आहे. (३) नाराज मोहिते व त्यांचे अनुयायी दगा देण्याची शक्यताही त्यांच्या चाणाक्ष नजरेने टिपली असेल. (४) घरातही पार्थ यांच्या उमेदवारीमुळे गंभीर मतभेद निर्माण झाले असतील त्यात अजितदादांचा आग्रह या वेळी मोडता येणे अशक्य झाले असेल. (५) ही निवडणूक न लढवल्याने झाकली मूठ सव्वालाखाची राहील. (६) महाआघाडीत त्यांच्या उमेदवारीसाठी कोणी आग्रह धरलेला दिसत नाही. एवंच त्यांनी आपली चलाखी पुन्हा एकदा दाखवली आहे!

-श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व).

महाराष्ट्रातही ‘मार्गदर्शक मंडळा’ची चाहूल?

शरद पवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची बातमी वाचली. पवारांनी एखाद्या घेतलेल्या निर्णयावर ‘पलटी’ मारणे ही काही महाराष्ट्रासाठी आता नवीन बाब नाही. परंतु या वेळी या निर्णयामागे त्यांची अगतिकताच जास्त दिसून येते. राजकारणामध्ये ‘पुत्र’हट्ट काही नवीन नाही. शरद पवार मात्र ‘पुतण्या’हट्टाला बळी पडले. पवारांची पक्षावरील पकड सल होत असल्याची आणि राष्ट्रवादीत नवीन पर्व सुरू होत असल्याची ही लक्षणे दिसतात. पवारांच्या ‘राष्ट्रीय’ शिष्याचा आदर्श घेऊन त्यांच्या ‘महाराष्ट्रीय’ शिष्याने पक्षात येत्या काही काळात ‘मार्गदर्शक मंडळ’ सुरू केले तर आश्चर्य वाटायला नको.

-रोहित गोपाळ व्यवहारे, भूम (जि. उस्मानाबाद)

मोदींना हवा असलेला संदेश..

‘मला पंतप्रधान होण्यासाठी कमी मते असतील, तर राष्ट्रवादीचे खासदार मला मत देतील असे आश्वासन मला शरद पवारांनी दिले होते आणि त्यांचे बोट धरून मी राजकारण करतो’ अशी विधाने नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत केली होती. त्यापूर्वी, विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना, काँग्रेस, राष्टवादी अशी युती करून भाजपला महाराष्ट्रात- किमान मुंबई महापालिकेत- रोखण्याची संधी असताना, पवारांनी मुंबई व महाराष्ट्र मोदींना बहाल केले. आता आपली उमेदवारी मागे घेऊन, ‘आजही मोदींची लाट आहे आणि पवारसुद्धा निवडणूक लढवायला घाबरताहेत,’ हा मोदींना हवा असलेला संदेश पवार यांनी दिला आहे.

-दत्तप्रसाद दाभोळकर, सातारा

प्रचाराचेही कीर्तन ‘ओघाने’ लष्कराविषयी ..

निवडणूक प्रचारादरम्यान कुठल्याच राजकीय पक्षांनी लष्करी कारवाईचा मुद्दा प्रचारात  आणू नये असे सर्व संबंधितांचे म्हणणे आहे. त्यावरून मागील जमान्यातील एका लोकप्रिय कीर्तनकारबुवांची आठवण झाली. ते आपल्या कीर्तनात त्या काळातील राजकारणाचा संदर्भ हमखास देत असत. तो लोकांना आवडत असे आणि पटतदेखील असे. पण कीर्तनात राजकारण असू नये, असाही एक मतप्रवाह आहे/होता. म्हणून ते कीर्तनकार समारोप करताना म्हणत- ‘ मी ठरवले आहे यापुढे कीर्तनात राजकारण आणायचं नाही. ओघात आलं तर सांगायचं.’ पण प्रत्येक कीर्तनात राजकारणही ओघाने यायचेच! यापुढे लष्करी कारवाईचा मुद्दा/विषय सर्व राजकीय पक्ष ‘ओघात आला’ या सबबीखाली प्रचारात आणत राहतील, असे वाटते.

-मोहन गद्रे, कांदिवली

‘योग्य पटला’वर पंतप्रधान अनुपस्थित!

मोदीद्वेषाची पुराव्याची भाषा हा शिवराय कुळकर्णी यांचा लेख वाचला. लेखक भाजपचे प्रवक्ते असल्यामुळे त्यांनी पक्षाची भलामण करण्यात काहीही वावगे नाही. मात्र काही आक्षेप नोंदवणे आवश्यक आहे :

(१) सबंध लेखाचा सूर जसा आहे तशी खरेच परिस्थिती होती का? पुलवामाचा हल्ला घडल्याबरोबर सर्व विरोधी पक्षांनी एकमुखाने, ‘आम्ही सरकारसोबत आहोत ’असे निवेदन केले होते. त्याचबरोबर कोणतीही प्रतिक्रिया न देता वाखाणण्याजोगा संयम विरोधी पक्षाने पहिल्यांदाच दाखवला होता. याउलट, २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर लगेच पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या ‘पौरुषत्वावर’ शंका घेणारे विधान कोणी केले होते हे जनतेला सांगायची गरज नाही. लेखक म्हणतात की ‘योग्य त्या पटलावर विषय मांडून विरोधी पक्षांनी सरकारला प्रश्न विचारावा’ मात्र त्याच वेळी ते हे विसरतात की ‘योग्य पटल’ असलेल्या व स्वतच बोलावलेल्या सर्वपक्षीय बठकीस पंतप्रधान उपस्थित नव्हते. मग विरोधकांनी प्रश्न कोणाला विचारायचे?

(२) लेखकाला बहुधा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती नसावी. त्यामुळेच, पुरावा म्हणून उपग्रहाद्वारे काढलेल्या छायाचित्रांचा वापर करता येतो- तेथे जाण्याची गरज नसते हे त्यांना माहीत नसावे.

(३) लेखकाला सन्याच्या मनोबलाची प्रचंड काळजी आहे असे एकंदरीत लेखावरून दिसून येते. मग ज्यावेळी हल्ला घडत होता, त्या संबंधीच्या बातम्या प्रसारित होत होत्या त्याच दिवशी शहा यांनी घेतलेल्या राजकीय सभा, मोदी यांचा जिम कॉब्रेट अभयारण्यातील फोटोशूट, धुळ्यात झालेली सभा, त्याच रात्री मनोज तिवारी यांनी आयोजित केलेला ‘रंगारंग’ कार्यक्रम, महाराष्ट्रात युतीसाठी चालेल्या मातोश्री -वर्षां भेटी यामुळे जवानांचे मनोधर्य वाढण्यास कशी मदत झाली याचेही उत्तर लेखकाने द्यावे.

पुलवामा हल्ल्यानंतर त्याचा राजकीय वापर करून घेण्याची सुरुवात कोणी केली हे सांगण्याची गरज नाही. चुरु (राजस्थान) येथील व्यासपीठावर शहीद जवानांचे फोटो व त्याच व्यासपीठावरून पंतप्रधानांचे भाषण, पाकिस्तानात झालेल्या मनुष्यहानीचा आकडा अधिकृतपणे जाहीर झालेला नसताना भाजपच्या अध्यक्षांनी परस्पर तो सांगणे या गोष्टी पुरेशा बोलक्या आहेत.

-कौस्तुभ तिलोत्तमा सोमकांत, लातूर.