‘आणीबाणीचा ढेकर’ हा अग्रलेख (२७ जून) वाचला. आणीबाणीच्या ४३व्या  स्मृतिदिनी? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधी घराण्यावर, काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवला, त्यांना हुकूमशहा ठरवले. फक्त एकाच हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच राज्ये हातात असलेल्या, इतर पक्षांच्या कुबडय़ा घेतल्याशिवाय एक पाऊलही उचलू न शकणाऱ्या काँग्रेसचा, ५६ इंची छातीच्या पंतप्रधानांनी एवढा धसका का घ्यावा?  निवडणुका तोंडावर असताना आपण केलेल्या कामांचा पाढा पंतप्रधानांनी वाचणे अपेक्षित असताना ४३ वर्षे जुनी जखम परत भळभळती करून सहानुभूती मिळविण्याची त्यांना गरज का भासावी? बरे, समोरच्याची उणी-दुणी काढताना आपणही त्याच मार्गाने जात आहोत हे मात्र ते सोयीस्करपणे विसरतात! अग्रलेखाच्या पहिल्या परिच्छेदतले वर्णन जितके इंदिरा गांधींना लागू पडते तितकेच ते नरेंद्र मोदींनासुद्धा तंतोतंत लागू पडते!

या बाबतीत तुलनाच करावयाची ठरवली तर, इंदिरा गांधींच्या अंगी सत्ता मुरल्यावर त्यांना विरोध सहन होईनासा झाला, त्यातूनच त्या एकाधिकारशाहीकडे वळल्या. पुढे संजय गांधींवरच्या आंधळ्या पुत्रप्रेमापोटी त्यांच्या हातून आणीबाणीचा प्रमाद घडला; पण नरेंद्र मोदींनी तर सत्ता मिळाल्या क्षणापासूनच एकाधिकारशाही राबवायला सुरुवात केली. ज्या लालकृष्ण अडवणींनी पक्षाला ‘इन – मीन दोनपासून २८२’पर्यंत पोहोचविले त्यांनाच खडय़ासारखे दूर केले! त्याविरोधात ब्र काढण्याची पक्षात एकाचीही हिंमत झाली नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी हुकूमशाहीच्या मुद्दय़ावर काँग्रेसवर टीका करणे हे, ‘उघडं हसतंय नागडय़ाला! ’ या उक्तीला शोभणारे आहे, पंतप्रधानांना नाही!

मुकुंद परदेशी, धुळे</strong>

विभूतिपूजेविरुद्ध डॉ. आंबेडकरांचा इशारा..

‘आणीबाणीचा ढेकर’ हा अग्रलेख वाचला. विभूतिपूजा हा आपल्याला मिळालेला शाप आहे. आध्यात्मिक क्षेत्रातही त्याचा धोका असतो. ‘गुरु: साक्षात परब्रह्म’ असे सांगून गुरूमंडळीना देवपदाला पोहोचविले जाते, पण अनेक गुरूंचे प्रताप आपण पाहत आहोत. वास्तविक, ‘राजा तू चुकत आहेस’ असे सांगण्याचे धैर्य व त्याची शिक्षा भोगण्याची तयारी असावी लागते. इंग्लंडच्या इतिहासात थॉमस मोर व जॉन फिशर नावाची व्यक्तिमत्त्वे होऊन गेली. त्यांनी राजाला चार शब्द सुनावले व त्या बदल्यात देहदंडाची शिक्षा स्वीकारली. आपल्याकडे सी. डी. देशमुखांसारखे राजकारणी होऊन गेले. ‘मला मंत्री करा’, ‘माझी फाइल क्लीअर करा’, म्हणून देव पाण्यात बसविणाऱ्यांकडून काय अपेक्षा करावी?

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटनासमितीत केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला सावध केलेच आहे. ते त्यांचे क्रांतदर्शी भाषण होते. त्या भाषणात त्यांनी जॉन स्टुअर्ट मिल यांची साक्ष काढली आहे. मिल यांनी सांगितले आहे, ‘माणूस कितीही मोठा असला तरी लोकांनी आपले स्वातंत्र्य त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून प्राप्त अधिकाराचा वापर तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी करील.’ बाबासाहेब पुढे म्हणतात की, इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक आवश्यक आहे, कारण भक्ती किंवा विभूतिपूजा ही जगातील इतर कोणत्याही देशात दिसणार नाही इतक्या मोठय़ा प्रमाणात भारतात आणि या देशातील राजकारणात दिसते .

फादर फ्रान्सिस दिब्रिटो, गिरिज (वसई)

भाजप विरोधी पक्षाच्याच मानसिकतेत!

‘काँग्रेस आणीबाणीच्याच मानसिकतेत!’ या पंतप्रधानांनी केलेल्या आरोपाची बातमी आणि ‘आणीबाणीचा ढेकर’ हा अग्रलेख  दोन्ही वाचले. देशाच्या शासकाकडून आणीबाणी मग ती घोषित असो वा अघोषित लादण्याचे काम आटोकाट सुरूच असते. आज देशात आणीबाणी घोषित न करता अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आहे. एनडीटीव्हीवरील ९ नोव्हेंबर २०१६ रोजीची एकदिवसीय बंदी तसेच ‘फेक न्यूज बिल’ हे कशाचे निदर्शक आहे हे सुज्ञांस सांगणे नको.

खरे आकडे, चित्र लोकांपुढे ठेवण्यास आपल्या देशातील सत्ताधारी वर्ग नेहमीच कचरत असतो. आता तर, २०१४ पासून सर्व काही मन की बात, परदेशातील पंतप्रधानांच्या भाषणांचा रतीब लोकांच्या डोक्यात कोंबून एक वेगळेच गुलाबी परंतु विचित्र चित्र कोरण्याचे महत्कार्य सुरू आहे. लोकांसमोर ‘सर्व काही आलबेल’ असल्याचे भासवण्याचे उपक्रम पार पाडून पडद्याआडून सर्व काही यंत्रणा जुलमीपणे राबविण्याचे तंत्र सध्याच्या शासकांना चांगलेच अवगत आहे. त्यातही अग्रलेखात शेवटास नमूद असलेल्या विचारशून्य नागरिक, कणाहीन माध्यमे आणि भक्तटोळ्यांची अभद्र युती हीच सर्व देशाचे वारू भरकटवण्यास कारणीभूत असते हे तंतोतंत बरोबर आहे.

सत्तेचे सोपान चढण्याअगोदर एके काळी विरोध केलेल्या भाजपाने काँग्रेसच्याच योजनांची मागील पानांवरून पुढे या चालीवर अंमलबजावणी पहिल्यापेक्षा जोरात करणारे भाजपचे पुढारी लोकांची फसवणूकच करीत आहे हे चाणाक्ष लोकांना लक्षात आल्याने, आता आणीबाणीची पुंगी वाजवून लोकांची शुद्ध फसवणूक साधली जात आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. भाजपचे धुरीण हे अद्यापही विरोधी पक्षाच्या अपराधी मानसिकतेत वावरत असल्याची प्रचीती आणीबाणीच्या श्राद्धदिनी आलेली आहे हेच पण कटू वास्तव आहे.

अ‍ॅड. किशोर रमेश सामंत, भाईंदर पूर्व

इंदिरा अध्यक्ष, ही नेहरूंची चूक

‘आणीबाणीचा ढेकर’ या अग्रलेखात (२७ जून) नेहरूंनी कधी इंदिरा गांधी यांना पुढे केल्याचे दाखले नाहीत असे विधान केले आहेत. आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांनी नेहरूंचा काळ बघितला आहे. इंदूला पुढे नेण्यात त्यांनी कसर सोडली नव्हती. सन १९५९ मध्ये (नेहरू हयात व पंतप्रधानपदी असताना) इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. इतर अनेक मोठे पुढारी असताना इंदिरा गांधींना अध्यक्ष करणे ही चूकच होती.

 सुभाष चिटणीस, अंधेरी (मुंबई)

आजच्या स्वातंत्र्यात आणीबाणी दिसल्यास.. 

‘आणीबाणीचा ढेकर’ (२७ जून) हे संपादकीय वाचले. खरंच आणीबाणीतून जो बोध घ्यायचा तो घेतला गेला नाही. पण ४३ वर्षांत आणीबाणीबद्दल खूप बोलले गेले हे विधान पटत नाही, कारण हे १९ महिने काँग्रेसने अतिशय हुशारीने जनतेपासून लपवून ठेवले होते. आजच्या मुक्त स्वातंत्र्यात जर विरोधकांना अघोषित आणीबाणी दिसत असेल तर त्यांना १९७५च्या आणीबाणीचे स्मरण करून दिले पाहिजे.

माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

आज आपण काय करतो , हे महत्त्वाचे..

बेरोजगारी, महागाई, जातीय अन्याय, अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आर्थिक अनागोंदी असे देशासमोर अनेक मूलभूत प्रश्न आहेत. १९७५ साली तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचे कोणीही समर्थन करणार नाही. पण, २०१९ सालच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर, ४३ वर्षांनंतर आणीबाणीचे मेलेले मढे उकरून काढायची भाजपाला काहीही गरज नव्हती.  काँग्रेसला दोष देण्यापेक्षा, आपण काय केले आणि काय करीत आहोत हे महत्त्वाचे नाही का? २६ जून रोजी, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती दिनी, आणीबाणी हा काळा दिन पाळणे किती योग्य आहे? भूतकाळात झालेल्या चुका सुधारून पुढे जाणे हेच देशाच्या हिताच्या, विकासाच्या, देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

मिंलद कांबळे चिंचवलकर, मुंबई</strong>

भावनिक राजकारणाला वेसण घालावी

गांधी घराण्याची एकाधिकारशाही तसेच त्यांनी स्वत:च्या अस्तित्वासाठी लादलेली आणीबाणी या विषयावर आजवर भरभरून ऊहापोह झाला आहे. निवडणूक जवळ येऊ लागल्यावर मोदी सरकारने काँग्रेसविरोधी जनमत भडकवण्यासाठी आणीबाणीचा संवेदनशील विषय पुन्हा हाती घेतला आहे. काँग्रेसने ज्याप्रमाणे गांधी हत्येचे हत्यार कायम संघ आणि भाजप यांच्या विरोधी वापरले, तसाच हा प्रकार आहे. आता पुन्हा सोनिया गांधींच्या इटालियन असल्याचा मुद्दा पुढे आणला गेला, तरी नवल नाही. ‘मंदिर वही बनाएंगे’चा नाराही पुन्हा उगळला जाऊ लागला आहे. लोकांना भावनिक आवाहने सर्वच पक्ष करीत आहेत.

पद्म पुरस्कार परत करण्यासारखे निर्णय घेणाऱ्या विचारवंतांनी या दोन्ही बाजूंच्या असल्या दोषांवर प्रसारमाध्यमांतून उघड नाराजी व्यक्त करून आपल्यापरीने त्यास वेसण घालावी.

– नितीन गांगल, रसायनी

काश्मीर अजून किती बळी घेणार?

दिवसेंदिवस काश्मीरमधील दहशतवाद, फुटीरतावाद वाढतच चालला आहे. नागरिकांचे व जवानांचे नाहक बळी चालले आहेत. ७० वर्षे उलटून गेली तरी अजून काश्मीरमधील प्रश्नांवर तोडगा निघाला नाही. युवकांमध्ये अकारण फैलावत जाणारा दहशतवाद हा देशाच्या वर्तमानकालीन व भावी सुरक्षेच्या दृष्टीने मारक ठरणारा आहे. सद्य:स्थितीत काश्मीर-प्रश्नांवर अनेक पक्ष एकमेकांवर टीका करण्यात गुंतले आहेत. काश्मीरमधील स्थानिकांमध्ये अजूनही विश्वासाचे वातावरण सरकारला निर्माण करता आलेले नाही. दहशतवादाला आळा घालण्यासाठी बळाचा नाही तर विश्वासाचा वापर करायला हवा. गांधीजींनी ज्या अिहसेचा वापर करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या अिहसेचा वापर जम्मू-काश्मीर अथवा अन्य राज्यांतील दहशतवादाला आळा घालण्यासाठी सरकारने करायला हवा. शेवटी एकच प्रश्न सतावतो तो म्हणजे काश्मीरचा प्रश्न अजून किती दिवस चालणार व आणखी किती जवानांना व नागरिकांना आपले प्राण गमवावे लागणार?

– विक्रम कालिदास ननवरे, घोटी (ता. करमाळा, जि. सोलापूर)