लातूर पॅटर्न हे जरी निमित्त असले तरी खरा शिक्षणाचा ‘बाजार’ स्वयंघोषित शिक्षणसम्राटांनी, राजकीय पुढाऱ्यांनी केला आहे. आपले राजकीय वर्चस्व टिकविण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आपापले ‘गड’ तयार केले, म्हणजेच कॉलेजेस; मग ते मेडिकल असोत किंवा इंजिनीयरिंग कॉलेजेस असोत. निव्वळ नफेखोरी किंवा पैसा कमाविण्याच्या हेतूने चालविलेल्या संस्थांमधून ‘सकस’ शिक्षणाची काय अपेक्षा ठेवणार? मग जन्म झाला ‘इंटीग्रेटेड’ पॅटर्नचा. कॉलेजप्रवेश फक्त नावापुरते. बाकी शिक्षण कॉलेजशी संलग्न झालेल्या, मोठय़ा फीस आकारणाऱ्या टय़ूशनमध्ये होते. कॉलेज हे फक्त नावापुरते उरले. तिथे कुणीही तुमची उपस्थिती विचारणार नाही, कारण ‘इंटीग्रेटेड’ पॅटर्नमुळे टय़ूशनचालकांनी सर्व काही मॅनेज केलेले असते. हे सर्व व्यवस्थित सरकारच्या डोळ्यादेखत तसेच सरकारमध्ये असलेल्या पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने अगदी सुलभतेने चालू आहे. यांना जाब कोण विचारणार?

– दत्तप्रसाद शिरोडकर, मुलुंड (मुंबई)

दौऱ्याचा खर्च ३५५ कोटी, उपयोग मात्र शून्य!

‘दोन अधिक दोन’ हा अग्रलेख आणि ‘मोदींच्या परदेश दौऱ्यांवर ४ वर्षांत ३५५ कोटी रुपये खर्च’ ही बातमी (२९ जून) वाचून, महागडे कोचिंग क्लासेस लावून, चारचाकीतून फिरणाऱ्या लाडावलेल्या बाळाची परीक्षेत दांडी गुल व्हावी असे वाटले! चीन आणि अमेरिकेसारखी दोन बलाढय़ राष्ट्रे ज्यांच्या सहकार्याशिवाय आपले पानही हलू शकत नाही, पैकी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी, वर्चस्ववादी नेतृत्वाच्या हाती, दुसरे एका अत्यंत विक्षिप्त आणि आततायी नेतृत्वाच्या हाती आहे. त्याहूनही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आमचे नेतृत्व फक्त ‘चमकोगिरी’ करणारे आहे!

सुषमा स्वराज आणि निर्मला सीतारामन यांची नियोजित अमेरिकाभेट त्या देशाने कोणतेही कारण न देता परस्पर रद्द करून टाकणे हे तो देश भारताला कवडीचीही किंमत देत नाही हेच दर्शवतो. अमेरिकेशी संबंध ठेवायचे असतील तर, ‘अमेरिकेचा शत्रू तो आपला शत्रू!’ असे धोरण ठेवावे लागेल. म्हणजे इराण, रशिया यांसारख्या देशांशी आपण संबंधच ठेवू नयेत, अशी ट्रम्प यांची अपेक्षा असावी. तिकडे चीनही नेपाळ, श्रीलंका, पाकसारख्या आपल्या शेजारी देशांना जवळ करून आपल्याभवतीचा विळखा घट्ट करतोय. एकंदरीत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मुत्सद्देगिरी कमी पडतेय आणि ‘चमकोगिरी’ काही कामी येत नाहीये.

या सर्व पाश्र्वभूमीवर आमच्या पंतप्रधानांनी गेल्या ४ वर्षांत परदेश दौऱ्यांवर खर्ची घातलेले ३५५ कोटी रुपये व्यर्थ गेले की काय असे वाटते. एखादा उत्साही कार्यकर्ता न बोलावता प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावतो आणि मंत्र्यांसोबत फोटो काढून घेतो. ते फोटो फक्त त्याच्या दिवाणखान्याची शोभा वाढवितात, त्याव्यतिरिक्त त्यांचा उपयोग शून्य. आमच्या पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांचेही तसेच झालेले दिसते. देशातील परिस्थिती पंतप्रधानांनी ‘बळी तो कान पिळी’ अशी करून ठेवलेली आहे; तोच अनुभव त्यांना जागतिक पातळीवर घ्यावा लागतो आहे!

– मुकुंद परदेशी, धुळे</strong>

मदायत्तं तु पौरुषम्..

‘आकाशातले खड्डे’ या संपादकीयाबाबत (३० जून) काही मुद्दे. आपला जन्म कुठे, कोणत्या कुटुंबात किंवा परिस्थितीत होतो हे आपल्या हातात नसते, त्यामुळे त्याचे स्पष्टीकरण देता येत नसल्याने त्याला नियती म्हटले असावे. गणितातल्या दिलेल्या गोष्टीप्रमाणे हे असते, पण ‘दैवायत्तम् कुले जन्म’ याचा उत्तरार्ध ‘मदायत्तं तु पौरुषम्..’ आपण (सोयीस्करपणे की काय कोण जाणे!) विसरतो हे नियतीवर भर देणाऱ्या लोकांचे चुकते. दिलेल्या गोष्टी घेऊन आपल्याला पुरुषप्रयत्नांची पराकाष्ठा करून काही साध्य करणे हे केवळ वैयक्तिक जीवनापुरते नव्हे तर समाजानेही अंगी भिनवले पाहिजे.  भारतीयांचे ‘ना अरत्र ना परत्र’ असे झाले आहे. त्यांना ना रस्त्यावरचे खड्डे बुजवता येतात, ना आकाशातले; पण अध्यात्माची आणि बोधवचनांची पोपटपंची करण्यात इथला अगदी सामान्यातला सामान्य माणूसही कोणाला हार जाणार नाही. अध्यात्माप्रमाणेच इतिहासाचे – तेसुद्धा फक्त आत्मगौरवाचे पोषण करणाऱ्या इतिहासाचेच वेड (ऑब्सेशन) हेसुद्धा एक काळजी करण्यासारखे लक्षण आहे यात शंका नाही. दोन्ही गोष्टींचा परिणाम एकच, तो म्हणजे वर्तमानाबाबत उदासीनता, नैराश्य किंवा सिनिसिझम. ज्यांनी हे बदलायचा प्रयत्न केला त्या दाभोलकर, पानसरे यांचा खून करण्यात आला हेही बोलके आहे. प्रत्येकाने यावर गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे.

– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)

स्वच्छता शिकायलाही किती काळ लागणार?

‘सेवा हाच धर्म?’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (अन्यथा, ३० जून) वाचला. मी आणि माझे पाच सहकारी जून १९९७ ला कंपनीतर्फे ट्रेनिंगसाठी जपानला गेलो होतो, त्या वेळचा अनुभव सांगावासा वाटतो. आम्ही सहा जण टोकियो येथील टेपको (ळ‘८ ए’ीू३१्र्रू३८ ंल्ल िढ६ी१ र४स्र्स्र्’८ उ.) कंपनीच्या ४२ मजली इमारतीच्या आवारात उभे होतो. कोणाची तरी वाट पाहत होतो. इतक्यात आमच्यतल्या एकाला सिगारेट ओढण्याची तलफ आली. तो सिगारेट लाइट करून सिगारेटच्या टोकाची राख बोटाने रस्त्यावर झटकणार, इतक्यात टेपको कंपनीचे ट्रेनिंग को-ऑर्डिनेटर झटकन पुढे आले. आपल्या कोटातून पॉकेट अ‍ॅश ट्रे बाहेर काढून, कमरेत झुकून त्या सहकाऱ्याच्या पुढे तो उघडून अदबीने त्याला म्हणाले, ‘‘प्लीज.’’ सहकारी लाजला. म्हणाला, ‘‘ओह, यू डोंट थ्रो अ‍ॅश अल्सो ऑन द रोड.’’  ‘‘नो सर, प्लीज डोंट मिसअंडरस्टॅण्ड.’’ आम्ही खरंच स्तिमित झालो होतो.

सन १८९७ साली स्वामी विवेकानंद जपानला आले होते. तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘हा देश भारत देशाच्या शंभर वर्षे पुढे आहे. आपण यांच्याकडून खूप काही शिकू शकतो.’’ आम्ही बरोबर शंभर वर्षांनी जपानला भेट देत होतो आणि अनुभवत होतो स्वामींचे बोल.या लेखाने आठवण झाली आणि रस्त्यावर प्लास्टिक टाकल्यानंतर अनुष्काचा विषाद व त्यावरील मल्लिनाथी पाहून हळहळ वाटते की, आम्हाला साधी स्वच्छता शिकायला किती शतकं लागणार? की आम्ही फक्त स्वच्छतेची गाणीच नुसती गाणार?

– उज्ज्वल मोहोळे, ठाणे</strong>

अन्य देशांच्या तुलनेत जपान हा वेगळाच ठरतो..

गिरीश कुबेर यांचा ‘अन्यथा’ या सदरातील  लेख (३० जून) आवडला. लेखातील दोन घटना जपान काय आहे ते दाखवतात. हा देश दुसऱ्या महायुद्धात मानहानीकारकरीत्या हार पत्करून उभा राहिलेला आहे. आपण सर्वसाधारण बघितले तर आशिया खंडातील संस्कृती बरीचशी एकसारखी आहे. अगदी मध्यपूर्वेतील देशांपासून भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया व चीनपर्यंत ढिसाळपणा, फसवण्याची वृत्ती, शिस्त नाही वगैरे दुर्गुण कमीजास्त प्रमाणात सर्वत्र आढळतात. युरोप वेगळाच दिसतो. अपवाद जपान. मित्राला जपानमध्ये आलेले काही अनुभव वानगीदाखल.

१) पत्ता विचारायचीही सोय नव्हती, कारण आपण पत्ता विचारला तर जपानी माणूस, विशेष करून महिला हातातील काम सोडून पत्ता दाखवायला यायचे की त्यालाच कसे तरी वाटायला लागले. २) त्याच्या लहान मुलीला अनोळखी व्यक्तींकडून इतक्या भेटी मिळाल्या, की त्यासाठी स्वतंत्र बॅग घ्यावी लागली. ३) एकदा छत्री न घेता बाहेर पडले व पाऊस सुरू झाला. आडोशाला उभे राहिले. एका महिलेने दुकानातून छत्र्या विकत घेऊन त्यांना भेट दिली. ४) तो त्याचा महागडा मोबाइल कुठे तरी विसरला. त्या संस्थेने त्याला तो स्वखर्चाने भारतात पाठवला, वर सॉरीचे पत्र व एक छोटीशी भेटवस्तू पाठवली. हे सर्व सांगितल्यावर आम्ही दोघे एकमतावर आलो की, आपला भारत बघून मन विषण्ण होतं. जपान हा एक आशियाई देश वेगळा कसा घडला?

– शिरीष मुळेकर, पुणे</strong>

इतिहास विषयात मोदी फारच कच्चे

उत्तर प्रदेशमधील संत कबीरनगर येथे झालेल्या जाहीर सभेत मोदींनी  नेहमीप्रमाणे इतिहासाची तोडमोड केलीच. मोदी म्हणाले की, संत कबीर, गुरू नानक व बाबा गोरखनाथ हे इथे एकत्र बसले व त्यांनी अध्यात्मावर चर्चा केली; पण हे कसे शक्य आहे? कबीर यांचा जन्म १३९८ साली, तर गुरू नानक यांचा जन्म १४६९ मध्ये झाला; परंतु बाबा गोरखनाथ यांचा जन्म ११ व्या शतकात झाला. अशा परिस्थितीत गोरखनाथ हे कबीर व नानक यांच्यासमवेत बसले असण्याचा प्रश्नच नाही; परंतु इतिहासाच्या बाबतीतील आपले अज्ञान यापूर्वीही पंतप्रधानांनी वेळोवेळी दाखवून दिले आहेच. २०१३ मध्ये पाटणा येथील जाहीर सभेत आता पाकिस्तानात असलेले ऐतिहासिक तक्षशिला बिहारमध्ये असल्याचा जावईशोध मोदींनी लावला होता.  एकदा तर मौर्य साम्राज्यातील चंद्रगुप्त व गुप्तकालीन चंद्रगुप्त २ यांच्या बाबतीतही मोदींनी गल्लत केली होती. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रचार करताना द्वेषापायी सरदार पटेल यांच्या अंत्ययात्रेला पंडितजी नव्हते, अशी लोणकढी थापही मारली होती.

– संजय चिटणीस, मुंबई

पाणीसमस्येचे खरे कारण..

‘जलनियोजनात खासगी नव्हे, लोकांची भागीदारी हवी’ हा मेधा पाटकर यांचा शब्दांकित लेख (रविवार विशेष, १ जुलै) वाचला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘पण अमेरिकेत १९९४ पासून मोठी धरणे का थांबविण्यात आली, त्या देशात गेल्या काही वर्षांत ७६ धरणे तोडून नद्या का खुल्या केल्या आहेत याचा विचार करायला आपल्याला वेळच नाही.’ वस्तुस्थिती अशी आहे की, एरवी अमेरिकाधार्जिण्या व अमेरिकेची तोंड फाटेतो स्तुती करणाऱ्यांना अमेरिका ऊर्जा, पाणी यांसारख्या मानवी जीवनाशी निगडित मूलभूत पैलूंच्या बाबतीत कसा शास्त्रशुद्ध विचार करते याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. त्यामुळेच इथे राजकारणी, नोकरशहा व कंत्राटदारांची अभेद्य साखळी निर्माण झाली असून खरे तर तीच पाणीसमस्येचे कारण आहे. सबब मेधा पाटकर यांनी लेखाच्या शेवटी काढलेला निष्कर्ष अचूक आहे; तो म्हणजे ‘जलनियोजनात खासगी नव्हे, तर लोकांची भागीदारी हवी.’

– जयश्री कारखानीस, मुंबई