गावस्करांच्या गुगलीतील मेख

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी एक गुगली टाकला आहे. विश्वचषक सामन्यांमध्ये भारताने जर पाकिस्तानबरोबर सामना नाही खेळला तर त्यात भारताचेच नुकसान आहे, कारण त्यामुळे पाकिस्तानला २ गुण मिळतील.

आयसीसी सामन्यांत आयोजक, खेळाडू, समालोचक, दूरचित्रवाहिन्या व सट्टेबाज या सर्वाना भरपूर पैसे मिळतात. त्यात भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये तर पाचपटीने उखळ पांढरे होते. मग भारत-पाकिस्तान सामना झाला नाही तर केवढे नुकसान! गावस्करांच्या गुगलीतील मेख हीच आहे. ४२ मरोत, पण दोन वाचले पाहिजेत. राष्ट्राभिमान, बलिदान, त्याग हे शब्द फक्त बोलायच्या गोष्टी आहेत व क्रिकेट, पैसे धंदा या करायच्या गोष्टी आहेत. मराठीत एक म्हण आहे- ‘लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा राहिला पाहिजे’; पण सुनील गावस्कर यांनी आता असे ‘तारे’ तोडले आहेत की, त्या मराठी म्हणीचा नवा अर्थ असा केला- ‘लाख मरोत पण ‘लाख’ राहिले पाहिजेत’.

– मंदार तांबे, ताडदेव (मुंबई)

भारताने संधी गमावली

‘राजपुत्र आणि डार्लिग’ हा अग्रलेख (२२ फेब्रु.) वाचला. १४ फेब्रुवारीच्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचे निमित्त करून सौदीचे राजपुत्र सलमान यांची भारतभेट आपण रद्द करायला हवी होती. असे केले असते तर लोकशाही देश मानणारा देश सौदी राजपुत्रासोबत नाही, असा संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असता. मलेशिया आणि इंडोनेशिया या इस्लामी देशांनी हे धाडस दाखवले होते. ही संधी आपण गमावली. तसेही सौदीला भारतापेक्षा पाकिस्तान हा जवळचा मित्र वाटतो, हे काही लपून राहिलेले नाही. दहशतवादी विचारसरणीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांसाठी भारताने पायघडय़ा घालण्याची गरजच नाही.

– अनिल चव्हाण, चिखली (बुलढाणा)

घरांसंबंधीच्या दाव्यांसाठी कालमर्यादा असावी

‘परांजपे कन्स्ट्रक्शनच्या ८०० ग्राहकांना दिलासा’ ही बातमी (२२ फेब्रु.) वाचली. न्यायालयाने कोणत्या मुद्दय़ांचा विचार करून हा निर्णय दिला ते समजून घेतले. साध्या वादावर न्यायालयाचा निर्णय यायला  सहा वर्षे लागली. त्या आधी १९९९ पासून ग्राहक पंचायतीने या कंपनी विरोधात ग्राहक मंचात तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली होती. ८०० ग्राहकांपैकी बहुतेकांनी ऐन उमेदीच्या वयात हे पैसे गुंतवले होते. न्यायालयाचा निर्णय आज लागेल, उद्या लागेल, या आशेवर जगणारे अनेक ग्राहक आता वृद्ध झाले असतील. काही निवर्तले असण्याचीही शक्यता आहे. आता पैसे परत मिळतील, पण एका घराचे, निवाऱ्याचे जे स्वप्न त्यांनी पाहिले होते, त्याचे काय? शिवाय तहसीलदाराकडे जमा झालेले हे पैसे सहा वर्षांनी परत मिळणार. ते वाढीव व्याजासह मिळणार का, अपील केले गेल्यास आणखी किती वर्षे जातील, अशा रास्त शंकाही या ग्राहकांच्या मनात उपस्थित झाल्या असतील.  ” Justice delayed is justice denied’’ या इंग्रजी वाक्प्रचाराची आठवण झाली. त्यामुळे सुनावणीला किती वेळ लागावा, त्यांची जास्तीत जास्त संख्या किती असावी यावर निर्बंध घालणे जरुरीचे वाटते.

– अभय दातार, ऑपेरा हाऊस (मुंबई)

पगाराचे सोडा, आधी ग्राहकांची मने जिंका!

एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना पगार वेळेत मिळत नसल्याच्या बातम्या हल्ली सतत वाचायला मिळत आहेत. एमटीएनएलशी एकनिष्ठ असलेल्या असंख्य ग्राहकांना प्रश्न पडतो की तुम्हाला खरंच पगार मिळाला पाहिजे की तुमच्याकडून एका मजबूत संस्थेची पद्धतशीर वाट लावल्याबद्दल दंडवसुली केली पाहिजे? भारतात जेव्हा मोबाइल क्रांती झाली तेव्हा तुम्ही त्या शर्यतीत उतरायला काही वर्षे घेतली आणि सेवा ही अतिशय निकृष्ट दर्जाची. कंटाळून लोकांनी तुमच्याकडे पाठ फिरवली.  तेव्हा पगाराचे सोडा आणि ग्राहकांची मने पुन्हा जिंकण्यासाठी धडपड करा.

-दीपक देसाई, ठाणे</p>

भाषेची घुसखोरी

पूर्वीपासून प्रत्येक प्रदेशात तेथील प्रादेशिक भाषांना महत्त्व होते. पण सद्य:स्थितीत मूलत: भाषेची संकल्पनाच स्पष्ट होत नाही. आजच्या युगात एखाद्या प्रदेशातील महाविद्यालयात दूरदूरचे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आलेले असतात. त्यांच्याबरोबर त्यांची भाषाही इथे येत असते. सीमा प्रदेशात मूलत: भाषेमध्ये सीमेपलीकडील शब्दांची  घुसखोरी होते. त्यामुळे भाषा अशुद्ध होण्याचे प्रमाण खूप वाढत आहे. अशुद्ध भाषेमुळे भविष्यात काही तोटे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण प्रत्येक भाषेत काही न काही ठरावीक ज्ञानसाहित्य साठवून ठेवलेले असते. त्यांचा वापर करायचा असेल तर आपल्याला शुद्ध व मूलत: भाषा व त्यातील शब्दसाठा अवगत पाहिजेच. अन्यथा साहित्याचे संदर्भ लावण्यास भावी पिढी अपयशी ठरू शकते.  प्रत्येकाने वेगवेगळ्या भाषा शिकाव्यात याबाबत कोणतेच दुमत नाही; पण मातृभाषेमध्ये इतर भाषेचे शब्द जसेच्या तसे वापरणे म्हणजे मातृभाषा अशुद्ध करणे होय. आपल्या भाषेवर आपणच प्रेम केले पाहिजे व तिची शुद्धता जपणे हे आपले कर्तव्य असले पाहिजे.

-अभिषेक गवळी, वैराग, ता. बार्शी (सोलापूर)

भाषेबाबत अधिक सजग असावे

‘कलेला जनता जनार्दनाचा रेटा हवा’ ही बातमी (२१ फेब्रु.) वाचली. व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या सत्कार समारंभात राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा गोषवारा या बातमीत आहे. जनतेने कलेची, कलाकारांची बूज राखावी, कौतुक करावे, त्यांना महत्त्व द्यावे किंवा पाठिंबा द्यावा असे त्यांना सांगायचे असावे. पण रेटा हवा या शब्दयोजनेतून तर्काला कितीही रेटा दिला तरी तो व्यक्त  होतो असे वाटत नाही. कदाचित शीर्षक म्हणून योजलेले शब्द राज ठाकरे यांचे नसतीलही. माध्यमांनी भाषेबाबत अधिक सजग आणि चोखंदळ असावे एवढाच मुद्दा.

-गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)