नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘काळा पैसा विरोधी दिवस’ साजरा करण्याची तयारी केंद्र सरकारने केली असतानाच शोध-पत्रकारांच्या जागतिक संघटनेने ‘पॅराडाईज पेपर्स’ उजेडात आणल्याने नवा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. (‘लोकसत्ता’चे भावंड वृत्तपत्र ‘इंडियन एक्स्प्रेस’ हेही या शोधात सहभागी होते, त्याचा उल्लेख ‘लोकसत्ता ऑनलाइन’वर आहे.)

‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये बोगस कंपन्यांचे करचुकवे काळे व्यवहार उघड करण्यात आले असून या कंपन्यांचा वापर जगातील व भारतातील सर्वपक्षीय श्रीमंत मंडळी परदेशात पैसे पाठवण्यासाठी करत असल्याने देशात खळबळ उडणार, हे नक्की. ‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये भारतातील ७१४ जणांचा समावेश असलेल्यांची चौकशी होणार का? उद्योगपती, व्यावसायिक, चित्रपट कलावंतांनी आपली मालमत्ता लपवली आणि कर चुकवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर कोणती कारवाई होणार? ‘पॅराडाईज पेपर्स’मधील १८० देशांच्या यादीत भारत १९ व्या स्थानी असल्याने जगात नामुष्की झाली आहेच.

– विवेक तवटे, कळवा, ठाणे</strong>

समाजमाध्यमी झुंडीसमोर उभे ठाकले पाहिजे

‘पप्पू नापास का झाला?’ हे संपादकीय (६ नोव्हें.) वाचले. पारंपरिक माध्यमांवर दर्दीचे वर्चस्व आहे, तर समाजमाध्यमे ही ‘यूजर फ्रेंडली’ असणे या त्यांच्या अंगभूत वैशिष्टय़ामुळे गर्दीने व्यापली आहेत. बहुसंख्या आणि गुणवत्ता यांचे प्रमाण नेहमीच व्यस्त असते. गर्दी आणि दर्दी यांच्यातली ही दरी मिटवण्याची गरज आहे. बुद्धिमान आणि विवेकी व्यक्तींनी आपल्या अभिजनी डबक्यात रमण्यात आनंद मानण्यापेक्षा अधिक समाजाभिमुख व्हायला हवे. आपला विवेकावयव शाबूत असलेल्या, पारंपरिक मुद्रित माध्यमांवर कार्यरत असणाऱ्या गुणवंतांनी समाजमाध्यमांचा विटाळ मानणे सोडायला हवे. घाण साफ करण्यासाठी त्यात उतरावे लागते. काही गुणवंतांनी यापूर्वीच हे सुरू केले आहे. मात्र ते समाजमाध्यमांवर अत्यल्पसंख्य आहेत. लोकशाही ही राज्यपद्धती ‘बहुमत’ या निकषावर आधारलेली असते. यातल्या निर्णयप्रक्रियेच्या मुळाशी बहुमताचा कौल हाच मूलाधार असतो. यात आपल्या बहुसंख्येच्या बळावर वर्चस्व गाजवणारा मतदाता हा विवेकी आणि सुजाण असतो हे गृहीत धरलेले असते. हे गृहीतकच चुकीचे ठरले तर पुढचे सगळे गणित चुकण्याची खात्री असते. समाजमाध्यमांमुळे हे गणित चुकण्याची शक्यता बळावते.

समाजमाध्यमांवरील निर्बुद्धांना तोंड देण्यासाठी आपल्या हस्तिदंती मनोऱ्यातून खाली उतरून या बहुसंख्याकांच्या झुंडीसमोर उभे ठाकले पाहिजे. विवेकाचा आवाज बुलंद करणे ही जबाबदारी विवेकनिष्ठांनी पेलायला हवी. समाजमाध्यमांवर नियंत्रणे घालून हा धुमाकूळ रोखणे अविवेकीच ठरेल. लोकशाहीला निर्माण झालेला धोका लोकशाही मार्गानेच रोखावा लागेल. आपला पप्पू होऊ नये याकरिता या उपायानेच चाचणी परीक्षेतील अपयश अंतिम निर्णायक परीक्षेत यशात परावर्तित होऊ शकेल.

– प्रमोद तावडे, डोंबिवली

आघातांकडून हाहाकाराकडे?

‘पप्पू नापास का झाला?’ या अग्रलेखाने समाजमाध्यमांचे भीषण वास्तव रेखाटले आहे. याचा अनुभव सर्वच लोक कधी ना कधी घेत असतात. सामान्य वाटणाऱ्या कौटुंबिक गोष्टींपासून ते सर्व जगावर परिणाम करणाऱ्या अनेक घटनांवर ही समाजमाध्यमे राज्य करू लागली आहेत. जो किंचितही विरोधी मत प्रदर्शित करेल किंवा तसा नुसता संशय जरी आला तरी त्याच्यावर इतके आघात होतात, की त्याला स्वत:लाच आपण चुकून देशद्रोही झालो की काय असे वाटू लागते!

नुकतेच या संदर्भात एक चर्चासत्र ऐकण्याचा योग्य आला, तेव्हा अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे या समाजमाध्यमांचे कसे भयंकर परिणाम होत आहेत आणि होणार आहेत याचे अत्यंत विदारक सांख्यिकी विवेचन ऐकले. मनात धडकीच भरली, एवढी पाळत?!अमेरिकेसारख्या सर्वशक्तिशाली देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीपर्यंत यांची मजल जाते. तर आपल्यासारख्या अर्धविकसित (सामाजिकदृष्टय़ासुद्धा) देशात किती हाहाकार माजू शकेल याची कल्पनाच केलेली बरी. तरी यात व्हॉट्सअपचा विचार झालेला नाही! शिवाय, ही माध्यमे इथे काहीच प्रभावी कायदे नसल्याने हजारो कोटींचे कर चुकवतात, हे वेगळेच. म्हणूनच विचार आणि उच्चारस्वातंत्र्याचा संकोच न करता या माध्यमांवर कसे नियंत्रण आणावे हे आपल्यासमोर मोठेच आव्हान आहे.

– डॉ. शशांक कुलकर्णी, नाशिक

आत्महत्यांची कारणे तरी शोधा..

‘अन्नदात्यांच्या झारीतील शुक्राचार्य..’ (६ नोव्हें.) या लेखात शेतकऱ्यांचे दुष्टचक्र आणि नष्टचर्य याला कारणीभूत आयात-निर्यातीतील छुपी गडबड यावर विस्तारपूर्ण माहिती दिलेली आहे. प्रचंड गरिबी, अशिक्षितता, सोयी-सुविधांचा अभाव, नापिकी, पिकांना हमी भाव नसणे आणि पर्यायाने वाढलेला कर्जबाजारीपणा, त्यामुळे शेतकरी आत्महत्यांत सतत वाढ झालेली दिसून येते. एका वर्षांत विदर्भातील ६१२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही चिंतेची बाब आहे. सरकार शेतीक्षेत्राकडे रोजगारनिर्मितीचे क्षेत्र म्हणून पाहात नसले तरी भारतीय लोकसंख्येचा ५० टक्क्यांहून अधिक श्रमिकवर्ग मजूर शेतीक्षेत्रात आहे. शेतमालाच्या बाजारपेठा शेतकऱ्यांच्या हातात नाहीत. हे बदलण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या विविध कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

– श्रीराम बनसोड, नागपूर 

..कुठल्या तोंडाने पंतप्रधान सांगणार आहेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील कुलू येथे प्रचारादरम्यान ‘काळा पसा आणि भ्रष्टाचार यांविरुद्धची लढाई सुरूच राहील’ याचा पुनरुच्चार केला कारण अर्थातच त्याला पाश्र्वभूमी नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे ही आहे आणि नोटाबंदी करून काळ्या पशाविरुद्धच्या लढाईला हवे तसे यश आले नाही हेही आहे. ‘काळ्या पशाविरुद्धच्या लढाई’चे नोटाबंदी हे ‘पहिले धाडसी पाऊल’ नागरिकांना वाटले त्यापेक्षा फारच उलटे पडले आहे, हे आता त्या वेळचे या नोटाबंदीचे समर्थकही आता म्हणू लागले आहेत. नोटाबंदीने ना काळ्या पशाला आळा बसला ना भ्रष्टाचाराला, हे सरळसरळ उघड दिसत आहे. लोकांना वाटला तेवढा काळा पसा बाहेरही आला नाही हे रिझव्‍‌र्ह बँकेच्या अहवालावरून स्पष्ट होते.

हा काळा पसा बाहेर आला की महागाई कमी होईल, गृह कर्जे स्वस्त होतील अगदी एक टक्क्यापर्यंत येतील अशी आमिषे दाखवली होती त्यामुळे सामान्य माणूस सुखावला होता, हुरळून गेला होता. त्यामुळेच त्यांनी नोटाबंदीचा त्रास सोसण्याची तयारी दाखवली आणि तो त्रास सोसलाही! पण यापैकी काहीही झाले नाही म्हणून सामान्य माणूस आता कातावला आहे, आपण फसवले गेल्याची त्याची भावना पक्की झाली आहे, नोटाबंदीचा त्रास फक्त सामान्य नागरिकांनीच सोसला, उद्योगपती, बिल्डर, राजकारणी यांपैकी कोणीही बँकेच्या रांगेत नोटाबदलीसाठी आले नाहीत यामागचे वास्तव रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘९८.९६ टक्के (सुमारे ९९ टक्के) पसा परत बँकेत आला’ या अहवालावरून स्पष्ट होते. हे वास्तव नाकारता येत नाही. मग आता कुठल्या तोंडाने पंतप्रधान ‘भ्रष्टाचार आणि काळ्या पशाविरुद्ध लढाई चालूच राहणार’ असे म्हणत आहेत?

– अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण पश्चिम.

अशाने ऐक्य टिकणार कसे?

सोलापूर  विद्यापीठाचे नामांतर करण्यास मुख्यमंत्री अनुकूल असल्याची बातमी (लोकसत्ता, ६ नोव्हेंबर) वाचली. आपण सर्व विविध जाती व धर्मामध्ये विभागलेले आहोत; तरीसुद्धा आपण एक आहोत किंवा आपल्यात एकतेची भावना आहे; पण अशा गोष्टी पाहिल्या तर मला ऐक्य कुठेच दिसत नाही! आपापल्या समाजातील थोरांची किंवा समाजसुधारकांची नावे पुढे घेत आंदोलन करणे, ही विचारधारणाच चुकीची आहे. ज्या ठिकाणी प्रत्येक समाजाची किंवा धर्माची व्यक्ती शिक्षण घेण्यास जाते, त्या पवित्र ठिकाणाच्या नावासाठी असे जाती-जातींचे आंदोलन, मोर्चे करणे चुकीचे आहे, अशा गोष्टींमुळे आपल्यातले ऐक्य कसे टिकून राहील? जर अशी वेळ आलीच तर ऑनलाइन प्रणाली सुरू करा आणि एका विशिष्ट जातीच्या मोर्चा वा आंदोलनाचा विचार न करता सर्वाचे मत विचारात घेऊन निर्णय घ्या!

– किरण बैनाळे, अहमदपूर, जि. लातूर

या विधानाचा अर्थ लाक्षणिकच घ्यायचा.. 

‘मग विवेकानंदही डावे विचारवंत?’ पत्राद्वारे (लोकमानस, ६ नोव्हें.) विवेकानंदांच्या वक्तव्याचा विपर्यास करून विनाकारण दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ‘शंकराचार्यानी कितीतरी बौद्ध श्रमणांना वादात हरवून जाळून मारले’ असे विवेकानंद म्हणाल्याचे विधान करताना विवेकानंदांच्या वक्तव्याचा शब्दश: अर्थ न घेता लाक्षणिक अर्थच घ्यायला हवा कारण  शंकराचार्यानी बौद्ध मतांचे जे खंडन केले ते बौद्धिक आणि चच्रेच्या पातळीवरचे होते. एक नि:शस्त्र तत्त्ववेत्ता ज्याने केवळ बौद्धिक आणि तार्किक आधारावर विवेकचूडामणी सारखे अनेक ग्रंथ लिहिले तो कोणाला जाळून मारील?जाळून मारले ते शरीराला नसून विचारांना.   या अर्थाने विवेकानंदांच्या वक्तव्याचा विचार व्हायला हवा.

– राजीव मुळ्ये, दादर (मुंबई)

विवेकानंदांची पुढली वाक्येही जरूर वाचावीत!

‘मग विवेकानंदही डावे विचारवंत?’ या मथळ्याचे पत्र (लोकमानस, ६ नोव्हेंबर) वाचले. ‘शंकराचार्यानी किती तरी बौद्ध श्रमणांना जाळून मारले’ या विवेकानंद ग्रंथावलीतील उद्धृत केलेल्या वाक्याने वाचकांना शंकराचार्य खुनी आणि श्रमणांना जाळून मारण्याइतके क्रूर होते, असे वाटणार; पण पत्रलेखकाने पृष्ठ ४७ वरचे (ओळ १९) एवढेच वाक्य वाचले. त्यांनी कृपया विवेकानंदांचे त्याच पृष्ठ ४७ वरचे त्याच्या पुढचेच वाक्य वाचावे – ‘आणि त्या बौद्ध श्रमणांच्या अकलेची तरी शर्थच की नाही! वादात हरले म्हणून स्वत:ला जाळून घेतले!’ (विवेकानंद ग्रंथावली, पृष्ठ ४७, ओळ २०, २१).

त्याच्या पुढच्याच पृष्ठ ४८ वरची विवेकानंदांची वाक्ये – (ओळी ४ ते ७) – वाचावीत- ‘बौद्ध धर्माची ही अवदशा झाली त्यांच्या अनुयायांच्या दोषांमुळे. तत्त्वज्ञानाचा अत्याधिक विचार करून करून ते तर्ककर्कश झाले व त्यांची उदार सहृदयता लोपली. नंतर वामाचारातील व्यभिचाराने त्या धर्मात प्रवेश केला व अखेर त्यामुळे बौद्ध धर्म गारद झाला! तसल्या प्रकारचा बीभत्स वामाचार आजच्या कुठल्याही तंत्रातून आढळणार नाही.’ ..वगैरे. रवींद्र साठे यांच्या लेखाला पुरवणी ठरेल, असे बरेच काही विवेकानंद ग्रंथावलीत आहे.

– सुप्रिया सहस्रबुद्धे, पुणे