‘जळवांचे औदार्य’ हा अग्रलेख (१ एप्रिल) वाचला.  कर्जबुडव्या मल्या यांचा प्रस्ताव स्वीकारला तर देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि बँकिंग क्षेत्र अडचणीत येऊ शकते आणि प्रामाणिकपणे उद्योग करून बँकांची देणी देणाऱ्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत अर्थभर घालणाऱ्या उद्योगपतींवर हा अन्याय होऊ शकतो. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकाला कुठलीही सूट देण्यास सरकार तयार नसते पण करबुडव्या नागरिकाला मात्र सूट! का तर म्हणे रक्कम जास्त आहे म्हणून! हा कुठला न्याय?

सामान्य नागरिकाचा बँकेचा एक हप्ता जरी चुकला तरी बँका त्या नागरिकाला हैराण करतात.  चुकलेल्या महिन्याच्या हप्त्याची रक्कम दंड आणि परत त्यावर व्याज लावून वसूल करतात! प्रसंगी त्याचे राहते घर, वाहन जप्त करण्याची आगळीक करतात, पण मल्यासारख्या जळवेला मात्र जवळ करतात, त्यांना सूट देतात. त्याचे चार लाख कोटीचे कर्ज चार हजार कोटीपर्यंतच घेण्यात धन्यता मानतात! त्याच्या घरी काय त्याच्या आसपासही फिरकण्याची या बँकांची हिंमत होत नाही. जळवा तेथेच फोफावतात जेथे त्यांना पोषक वातावरण असते! जोपर्यंत या अशा जळवांना पोषक वातावरण निर्माण करून त्यांची पदास वाढवणाऱ्यांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत अशा जळवा निर्माण होणारच. फक्त नावे वेगळी असणार एवढेच!

अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण (प.)

गोलंदाजी हीच आपली दुखरी नस

वानखेडेवर गुरुवारी रंगलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पूर्ण बहरातील विराट कोहलीने तुफान टोलेबाजी करीत  नाबाद ८९ धावा काढून िवडीजपुढे १९३ धावांचे कठीण आव्हान उभे केले होते. मात्र जे फलंदाजांनी मिळविले ते गोलंदाजांनी स्वैर आणि दिशाहीन मारा करून गमावल्यामुळे ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पध्रेत विजेतेपद पटकाविण्याचे भारताचे स्वप्न अपुरे राहिले. यानिमित्ताने फलंदाजी आपली नेहमीच ताकद राहिली असून गोलंदाजी हीच आपली दुखरी नस आहे हे अधोरेखित झाले.

प्रा. विजय कोष्टी, कवठे महांकाळ (सांगली)

गुंडगिरीने महाराष्ट्राचे नुकसानच

सध्या स्वतंत्र विदर्भाची मागणी पुन्हा जोर धरत आहे. ही मागणी का होत आहे याचा गांभीर्याने विचार व्हावा. स्वतंत्र विदर्भ ही बाब मराठी माणसाला क्लेशदायकच. पण दिल्लीत नुकतेच घडलेले शाईफेक प्रकरण हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. शाईफेक ही शुद्ध गुंडगिरीच. याच गुंडगिरीने महाराष्ट्राचे नुकसान केले. ही वृत्ती पश्चिम महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्यांनीच रुजविली, वाढविली. विदर्भावर सतत अन्याय करून प्रशासकीय गुंडगिरी केली. हा अन्याय फक्त विदर्भावरच केला असे नव्हे तर प. महाराष्ट्रातील सोलापूरसारख्या शहरावरही केला. स्मार्ट सिटीच्या योजनेत सोलापूरला स्थान कसे मिळाले, असा प्रश्नच पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केला. ही यांची प्रवृत्ती बदलणारी नाही. एकाच कुटुंबात दोन भावांचे पटत नसेल तर ते विभक्त होतात, हा साधा व्यवहार आहे. तो राजकारणालाही लागू आहे. १०५ हुतात्मे वगरे नाटक आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत यांच्यापकी कोणीही नव्हते. ही आणखी एक मोठी लबाडी.

दामोदर वैद्य, सोलापूर

अशोकाचे शास्त्रीय नाव बदलावे

‘कुतूहल’ या सदरात चारुशीला जुईकर यांनी ‘अशोक नव्हे आशुपल्लव’ व ‘सीता अशोक’ या शीर्षकाखालील दोन टिपणे (१४ व १५ मार्च) वाचली.

केवळ ‘भारतीय’ अशी निखळ ओळख असलेल्या,  ‘अशोक’ या सुंदर, सुगंधी फुलांच्या देखण्या वृक्षाची डोलकाठीसारख्या असलेल्या आशुपल्लव (मास्ट ट्री) या वृक्षाबरोबर होणारी गल्लत त्यांनी निदर्शनास आणली आहे. सामान्य नागरिकच अशी चूक करतात असे नव्हे, विद्यापीठातही आशुपल्लवाच्या झाडावर ‘अशोक’ नावाच्या पाटय़ा दिमाखदारपणे मिरवत असतात. आपल्या नावावरील आणि ओळखीवरील या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी मग खऱ्या अशोकाला थोडी माघार घेऊन ‘सीता अशोक’ म्हणून स्वत:चा परिचय करून द्यावा लागतो. दख्खनचे पठार आणि प. घाटातील मध्यभाग हा अशोकाचा नैसर्गिक अधिवास. पण दुर्दैवाने तेथील त्यांची संख्या फार घटली आहे आणि शहर नियोजनात अशी बाहेरच्या वृक्षांची (एक्झाटिक) बेसुमार लागवड झाली, तशीच खऱ्या अशोकाला टाळून या खोटय़ा अशोकाचीही. पुण्यात आजही काही ठिकाणी अशोकाचे ठेंगणे, ठुसके पण देखणे वृक्ष आढळतात.  अशोकाची ओळख ठळक व्हावी यासाठी पुणे महानगरपालिकेने मोठय़ा प्रमाणावर योग्य आसमंत पाहून आणि गृहरचना सोसायटय़ांनी आपल्या आवारात खोटय़ा अशोकाऐवजी खऱ्या अशोकाची लागवड करावी, म्हणजे त्याला ‘सीता’ या पूर्वपदाचा अनावश्यक आधार घ्यावा लागणार नाही. अशोकाच्या सौंदर्याची महती महाकवी वाल्मीकीपासून कालिदासांपर्यंत अनेकांनी गायली आहे.

आणखी एका महत्त्वाच्या मुद्दय़ाचा मला येथे निर्देश करायचा आहे. अशोकाचे सध्याचे शास्त्रीय नाव Saraca asoca (Roxb.) असे आहे. त्यापूर्वी ते Saraca indica (Linn) असे होते. म्हणजे त्याचे शास्त्रीय नाव एकदा बदलले आहेच. मात्र हे नाव अर्थपूर्ण नाही. कारण त्यातील ‘साराका’ या शब्दाचा नेमका अर्थ काय याचे यथार्थ स्पष्टीकरण आतापर्यंत कोणीही करू शकेल नाही. साराका हा कुठल्या तरी शब्दाचा अपभ्रंश असावा असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. केवळ भारतातच आणि काही प्रमाणात श्रीलंकेत आढळ असलेल्या या वृक्षाचे नाव असे संशयास्पद असावे ही गोष्ट भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञांना फारशी भूषणावह नाही. अशोकाचे स्पेलिंगही asoca असे असणे आजच्या काळात योग्य वाटत नाही. म्हणून माझी अशी सूचना आहे की अशोकाचे सध्याचे Saraca asoca हे शास्त्रीय नाव बदलून ‘अशोका इंडिका’ असे करावे. अशोकचे स्पेलिंगही ashok असेच असावे. असा बदल करायचा तर ‘इंटरनॅशनल असोसिएशन फॉर प्लान्ट टॅक्झॉनॉमी’ तर्फे तो करावा लागेल आणि बोटॅनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया किंवा तत्सम वैज्ञानिक संस्थांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. वृक्ष नामांच्या या द्विनामी व्यवस्थेत ‘इंडिका’  ने शेवट होणारे किमान दहा वृक्ष तरी आहेत आणि त्यांचे मूळ निवासस्थान भारत आहे. इंटरनॅशनल प्लान्ट नेम इंडेक्स (आयपीएनआय) मध्ये ते आपण शोधू शकतो. अनेक वृक्षांच्या नावात असे बदल सातत्याने होत असतात आणि हा इंडेक्स रोजच्या रोज अद्ययावत केला जातो. महाराष्ट्राचे राज्यपुष्प असलेल्या ‘तामण’ या वृक्षाचे नाव पूर्वी Lagerstroemia flos-reginae असे होते. ते आता   Lagerstroemia Specios असे झाले आहे. आपला ‘नैसर्गिक वारसा’ जतन करण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहावे, असे नम्रपणे एक वृक्षप्रेमी म्हणून सुचवावेसे वाटते. संबंधित वैज्ञानिक संस्थांनी आणि मराठी विज्ञान परिषदेने यात पुढाकार घ्यावा ही विनंती.

सदा डुम्बरे

loksatta@expressindia.com