‘अगदीच ‘बाल’भारती..’ हा अग्रलेख (१९ जून) वाचून आश्चर्य वाटले. ते अशासाठी की, निदान ‘लोकसत्ता’ने तरी शिक्षण मंडळाने गणिती संकल्पना समजण्यासाठी केलेला बदल काय आहे यामागची कारणमीमांसा समजून घ्यायला हवी होती.

कोणताही बदल होताना, रेल्वे रूळ बदलताना होतो तसा प्रत्यक्ष व्यवहारातही खडखडाट तर होणारच. म्हणून त्याची खिल्ली उडवणे कितपत योग्य आहे? असे बदल जर लहानपणीच केले तर पुढच्या पिढीला त्यात अवघड असे काहीच वाटणार नाही. म्हणून गतवर्षी पहिलीपासून, तर यंदा दुसरीपासून त्याची सुरुवात केली आहे. आपली अंकपद्धती ही ‘१०’च्या पायावर उभी असल्यामुळे तिला दशमान पद्धत म्हणतात. मग अंकही त्या पद्धतीशी सुसंगतपणे का उच्चारले जाऊ नयेत? मान्य आहे ओठी रुळलेले शब्द बदलणे मोठय़ांना कठीण जाईल, पण लहानग्यांना ते गणित समजायला सोपे होईल. त्याला आपण जास्त महत्त्व दिले पाहिजे, असे मला वाटते.

Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
faculty and non-teaching staff have not been paid since two months in Department of Higher Education in West Vidarbha
प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतनच नाही; तब्बल साडेपाच हजारांवर…
Barty, Sarathi
बार्टी, सारथी, महाज्योतीची स्वायत्तता धोक्यात! प्रशिक्षणासाठी आठ खासगी संस्थांची निवड होणार
Exam fee waiver for students of class 10th 12th Pune news
मोठी बातमी: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी, परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती ऑनलाइन पद्धतीने

पूर्वी फक्त ठरावीक वर्णच शिक्षण घेत, पण आता दुर्गम भागातील आदिवासी मुलेही शिकतात. त्यांची बोली आणि शिक्षणातील प्रमाण मराठी भाषा यांत खूपच फरक असतो. जशी तुम्हा-आम्हाला अजूनही इंग्रजी परदेशी वाटते, तशीच मराठी भाषा त्या मुलांसाठी परदेशी भाषाच ठरते. अशा वेळेस एकदम जोडाक्षरे लक्षात ठेवणे त्यांना कठीण जाते. मी स्वत: गणित विषयाचा शिक्षक असल्यामुळे आणि ‘अंनिस’च्या चळवळीतून महाराष्ट्रभर दुर्गम भागातही काम केल्यामुळे हे मी अनुभवाने बोलतोय. त्यामुळे या वर्षी दुसरीच्या मुलांचे नवीन संकल्पनेने गणिताचे पुस्तक तयार केले गेले आहे, यात काहीही वावगे वाटण्याचे कारण नाही.

आपल्या स्थितिशील समाजात अजूनही लांबीचे एकक ‘मीटर’ रुळले नाही म्हणून व्यवहारात ‘फूट’ हे एककच वापरतो; हे लक्षात घेतले म्हणजे खळखळ करत खिल्ली उडवून बदल वा पर्यायांवर तोंडसुख घेणाऱ्यांसाठी कालच्याच ‘लोकसत्ता’त इतरत्र गणितज्ञ मंगला नारळीकरांनी दिलेले स्पष्टीकरण नक्कीच डोक्यात आणि डोळ्यांत अंजन घालणारे आहे.

– जगदीश काबरे, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई</strong>

बदलामुळे गणित अवघड होईल!

‘संख्यानाम बदल संकल्पना आकलनासाठीच’ ही गणिताच्या पाठय़पुस्तकातील संख्यानामाच्या बदलामुळे झालेल्या संभ्रमाची आणि त्यावरल्या खुलाशाची बातमी वाचली. खरं तर मुलांचं पाठांतर चांगलं असतं, त्यामुळे लहानपणापासून कानावर पडलेली, पाढे पाठ करून रुजलेली संख्यानामं लक्षात ठेवणंच सोपं जाईल. पालकही त्याला सरावलेले असल्यानं पाल्याचा गणिताचा अभ्यास घरी घेताना त्यांना अवघड जात नाही. असं असताना नवीन पर्यायाची, केवळ आकडय़ांच्या संख्यानामामध्ये जोडाक्षरं नकोत म्हणून ती सुटय़ा सुटय़ा आकडय़ांनी बोलणे, वाचणे म्हणजे गणित विषय अधिक अवघड करण्यासारखेच वाटते.

– श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे

मराठी संख्यावाचनात बदल गरजेचा

मराठी संख्या वाचनात होणारा बदल अतिशय स्तुत्य आहे. आजकाल बरेच विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकतात. इंग्रजी माध्यमातील दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांला ‘छप्पन’ म्हटल्यावर काय हे समजत नाही. एकोणनव्वद, एकोणऐंशी वगैरे संख्यानामे तर अजबच आहेत. माझे शिक्षण मराठी भाषेत झाले; पण ‘बारोदरसे’ किंवा ‘त्रिहोत्रिदोन’ म्हटल्यावर काय हे चटकन समजत नाही. ‘वीस दोन’, ‘सत्तर नऊ’ वगैरे संख्यावाचन बरोबर आहे. जुनी संख्यानामे हद्दपारच झाली, तरी काही फरक पडणार नाही.

– राजेंद्र साळोखे, सांगली

‘एकोण’चा अर्थ कळल्यास १९ ते ८९ सोपे!

संख्यानामांविषयीच्या संपादकीयात ‘३९’, ‘४९’चे उदाहरण दिले आहे. खरं तर तसा काही गोंधळ अजिबात नाही. मुळात ‘एकोण’ म्हणजे ‘एक+उणा’ असा संधी. एकोणचाळीस म्हणजे एक उणा (वजा) चाळीस असे आहे.

– श्रीनिवास पुराणिक, कल्याण</strong>

सुलभीकरणाऐवजी कौशल्य-शिक्षण हवे

‘अगदीच ‘बाल’भारती..’ हा संपादकीय लेख (१९ जून) वाचला. काही गोष्टींची या ठिकाणी प्रखरतेने जाणीव होते. आजच्या घडीला आपण तंत्रज्ञानाधारित जगाकडे पोहोचलो आहोत. शिक्षण खात्याने घेतलेला निर्णय इयत्ता दुसरीच्या शाळा सुरू झाल्यावर शाळेत पोहोचला. एक तर हा निर्णय घेण्यात उशीर झाला असावा किंवा उशिरा कळवला (पण शेवटी चूक मात्र त्यांचीच). आज मुलांमधील स्पर्धा खूप वाढली आहे. यामुळे शिक्षणाच्या सुलभीकरणाची गरज नसून कौशल्याधारित शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. या शिक्षणाचा पाया लहान वयातच पूर्ण होणे अनिवार्य आहे.

– अविनाश रमेश बोरुडे, श्रीगोंदा

रूढ संबोधात विसंगती आहे, लहेजाही आहे

नवीन पाठय़पुस्तकांमध्ये बदललेला संख्यासंबोध व जोडाक्षरांचे वाचन यांचा जोडलेला संबंध हा चुकीचाच आहे. परंतु संख्यांची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी असा संबोध हा जास्त सोयीचा होईल. जसे इंग्रजीमध्ये ‘थर्टी थ्री’, ‘फॉर्टी थ्री’, ‘सेव्हन्टी थ्री’ अशा संबोधांमुळे दशक किती व एकक किती हे स्पष्टपणे समजते. त्यामुळे संख्यांची नेमकी किंमत व संख्यांची संकल्पना स्पष्ट होण्यास सुलभ जाते. परंतु मराठीमध्ये तीन हा एकक वेगवेगळ्या पद्धतीने संबोधिला जातो, जसे तेह-तीस, त्रे-चाळीस, त्र्या-हत्तर, ते-वीस इ. शिवाय एकोणचाळीस, एकोणपन्नास हे अंक नेहमीच गोंधळाचे ठरतात. कारण एकोण‘पन्नास’ म्हटले तरी ४९ मधील दशक चार असतो आणि एकोण‘चाळीस’ म्हटले तरी ३९ मधील दशक तीन असतो. या कारणामुळे ‘जोडाक्षरांचे वाचन’ यापेक्षा – ‘संख्यासंबोधातील विसंगती दूर करणे’ हे नवीन पाठय़पुस्तकात वापरल्या गेलेल्या संख्यासंबोधामागचे कारण असेल तर ते योग्य आहे असे म्हणावे लागेल. परंतु मराठी भाषेचा लहेजा लक्षात घेता पारंपरिक पद्धतीने संख्यासंबोध शिकवणे हेच जास्त योग्य आहे, असे म्हणावे लागते.

– नीला आपटे, पुणे

भाषेचे अचूक ज्ञान कमी महत्त्वाचे का म्हणून?

‘संख्यानामे कायमच, पण संकल्पना आकलनासाठी नवी मांडणी’ या बातमीत बालभारती गणित समितीच्या अध्यक्ष मंगला नारळीकर यांच्या स्पष्टीकरणामधून, ‘गणित/ गणिती संकल्पना कळणे महत्त्वाचे; भाषा, भाषेचे अचूक ज्ञान किंवा जाण कमी महत्त्वाची,’ – अशी धारणा अगदी स्पष्ट दिसते! मुळात तेवीस, बत्तीस, चोपन्न यासाठी वीस तीन, तीस दोन, आणि पन्नास चार – असे तथाकथित ‘पर्याय’ उपलब्ध करून देताना त्यांत भाषेकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. ‘वीस खुर्च्या’, ‘तीस चेंडू’ आणि ‘पन्नास पुस्तके’ – याचा अर्थ काय, हे भाषेत मुळातच ठरलेले, निश्चित आहे. खुर्च्या, चेंडू किंवा पुस्तके या वस्तू अमुक इतक्या ‘वेळा’ असाच अर्थ आहे. वीस खुर्च्या म्हणजे वीस (वेळा) खुर्च्या इत्यादी. हे जर खरे तर ‘वीस तीन’ याचा अर्थ ‘वीस अधिक तीन’ असा कसा होऊ शकतो? अर्थात, ‘वीस तीन’ याचा अर्थ (वीस वेळा तीन असल्यामुळे) साठच होतो, तेवीस नव्हे! एक ते नऊ ही एकके या वस्तू कल्पून वीस तीन, तीस दोन, पन्नास चार वगरेंचा अर्थ लावल्यास तो ‘अमुक वेळा’ (गुणाकार) असाच येतो, तो बदलता येत नाही. गणिती संकल्पना नीट समजावण्याच्या नादात, आपण मुलांची भाषाविषयक जाण दुर्लक्षून किंवा बिघडवून टाकणार का?

शिवाय, ‘ज्या मुलांना जी संख्यानामे कळू शकतील, ती शिकवावीत. जेणेकरून गणिती संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल’- हाच न्याय इतर विषयांच्या/ संकल्पनांच्या बाबतीत लावायचा झाल्यास, – ‘ज्या मुलांना जी गोष्ट जशी कळू शकेल, ती तशी(च) शिकवावी, जेणेकरून त्या त्या संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल’ असा अर्थ निघेल, ज्यातून केवळ अनागोंदी, गोंधळ निर्माण होईल.

– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली, मुंबई

भाषाप्रेमापलीकडचे सुसूत्र गणित

‘अगदीच ‘बाल’भारती’ या संपादकीयात निष्कारण उपहास आढळतो. आकडे, गणित यांपुरते बोलायचे झाल्यास, गणित हा जसा पाठांतराचा विषय नाही तसे आकडे तरी का पाठ करावेत? त्यात सुसूत्रता, नियम येत असेल तर त्याचे स्वागत करायला पाहिजे. शब्दसंपत्तीचा आग्रह भाषेच्या अभ्यासात असावा, गणितात असण्याचा हट्ट का?  (१) ‘एकोणीस अधिक बावीस’ऐवजी (२) ‘दहा नऊ अधिक वीस दोन’ यापैकी काय म्हटल्याने उत्तर कमी श्रमात आणि अचूक येणार हे महत्त्वाचे. तर ते पर्याय (२) मध्ये अचूक येण्याची शक्यता जास्त आहे. पारंपरिक म्हणणे खूप दूरचे झाले, अगदी २५ वर्षांपूर्वी माझ्या शाळेत, घरात आणि शेजारी ‘एकोणीस’ हाच शब्द वापरात होता, आता परिस्थिती खूप बदललेली आहे. स्थलांतरितांमुळे मुले शाळेत ‘एकोणीस’ ऐकतात, घरात ‘एकोणावीस’ ऐकतात आणि शेजारी ‘उन्नीस’सुद्धा ऐकतात. अशा वेळी मुलांच्या भूमिकेतून विचार केला तर त्यात सुसूत्रता, नियम येणे आवश्यकच आहे. त्यासाठी भाषाप्रेम, शब्दसंपत्तीपलीकडे जाऊन निर्णय घेतला म्हणून मंडळाचे अभिनंदन करायला हवे.

असाच प्रकार वेळेच्या बाबतीत आहे. एक वाजून ३० मिनिटे झाली असे म्हटल्यावर घडय़ाळाच्या काटय़ांची स्थिती सोप्या नियमाने नक्की होते ती ‘दीड वाजला’ म्हटल्यास सहज होत नाही, त्या विशिष्ट काटय़ांच्या स्थितीला ‘दीड’ असे म्हणतात हे पाठच करावे लागते. त्यामुळे आकडे पाठ करण्याऐवजी त्यात सुसूत्रता, नियम आले आणि ते उच्चारणे, लिहिणे सुलभ झाले तर ते जास्त कालसुसंगत होईल. फोनमध्ये एकाच नावाच्या पाच जणांची नावे सेव्ह करताना त्या नावात फ्रेंड, सोसायटी, ऑफिस इ. जोडून व्यवहार करतो; हेसुद्धा सुलभीकरणच आहे आणि त्याचे स्वागतच होते हे वास्तव आहे.

– शिवप्रसाद महाजन, ठाणे</strong>

लोकमानस loksatta@expressindia.com