News Flash

‘निवडणूकजीवीं’नी आता करोनाकडे पाहावे..

या अट्टहासापायी होरपळलेल्या कित्येक जिवांचे बलिदान व्यर्थ गेले असेच म्हणावे लागेल.

(संग्रहित छायाचित्र)

जनतेचे आयुष्य दावणीला बांधून, देशाच्या उच्चपदस्थांनी दिवसाचे १८-१८ तास ‘श्रमदान’ करून देखील बंगाल जिंकता आले नाही. या अट्टहासापायी होरपळलेल्या कित्येक जिवांचे बलिदान व्यर्थ गेले असेच म्हणावे लागेल. अर्थात, हिंदूंना चुचकारल्याशिवाय भाजप सत्तेत येऊ शकत नाही हे नव्याने अधोरेखित झाले. (उदा.- बंगाल आणि इतर राज्यांमध्ये झालेल्या भाषणांतील मुद्दे) मात्र मीडियाकर्मी तसेच निवडणूक आयोगाचे पितळदेखील या ‘खेळा’त उघडे पडले.

आता निदान विषयांतर म्हणून तरी केंद्राने करोना महामारीकडे लक्ष द्यावे अशी प्रार्थना करू या. ‘निवडणूकजीवी’ नेतृत्वाकडून येत्या काळात उत्तर प्रदेश आदी निवडणुकांना समोर ठेवून धर्म आणि जातीचे विवाद निर्माण केले जातील; तसल्या जाळ्याला भेदण्याची तयारी सर्व ‘भारतीयां’नी केली पाहिजे.

भूषण रमेश पाटील, धुळे

वेळ नव्हता’.. तरीसुद्धा हरले?

‘मदांधांचा मुखभंग’ हा अग्रलेख (३ मे) वाचला. भाजपने देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, केंद्र व विविध राज्यांच्या पातळीवरील सत्तरपेक्षा जास्त मंत्री एकटय़ा पश्चिम बंगालच्या प्रचारात उतरवले होते. ‘गोदी मीडिया’ची साथ होतीच आणि ईडी, सीबीआय, प्राप्तिकर खाते आदी छापे घालण्याचे अधिकार असलेल्या यंत्रणा, निवडणूक आयोगासारखी ‘स्वायत्त’ (?) संस्था एकीकडे; तर दुसऱ्या बाजूला एकटय़ा ममता दीदी, अशीच ही लढत होती. तरीही त्या जिंकल्या हा विजय नक्कीच खूप मोठा विजय आहे आणि मोदी, शहा यांना चपराक आहे.

करोना आपत्तीमुळे लोक ऑक्सिजनअभावी तडफडून मरत असताना, रेमडेसिविरच्या तुटवडय़ावरही पक्षीय राजकारण होत असताना, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे फोन उचलायलासुद्धा मोदींना ‘पश्चिम बंगाल निवडणुकीमुळे’ वेळ नव्हता! तरीही ते अशा प्रकारे हरले?

याचे विपरीत राजकीय परिणाम दिसू लागतील आणि मोदींची प्रतिमा येत्या काळात निश्चितच चांगली राहणार नाही.

नितीन महानवर, औरंगाबाद

भाजपचाच नव्हे, त्यांचाही प्रचार चुकीचाच!

तृणमूल काँग्रेसच्या यशापेक्षा भाजपला तेथे अपेक्षित यश मिळाले नाही याचा आनंद झाल्याचे ‘मदांधांचा मुखभंग’ या अग्रलेखातून सूचित होते, असे मला वाटले. तेथील निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या आणि इतर नेते यांच्या प्रचाराला अग्रलेखात ‘मदांध’ असे संबोधले आहे, हेही माझ्या लक्षात आले. परंतु त्याचबरोबर दस्तुरखुद्द ममता बॅनर्जी यांचा प्रचारात दिसून आलेला आक्रस्ताळेपणा, आक्रमकता, जोरजोरात ओरडून केलेली भाषणे ही सभ्यता आणि सुसंस्कृतपणाच्या कोणत्या व्याख्येत बसणारी होती?

पावसात भिजून केलेल्या भाषणासारखा व्हीलचेअरवर फिरून प्रचार करण्याचा प्रकार तेथे देखील झाला. बंगालबरोबरच झालेल्या आसाम, पुद्दुचेरी येथील निवडणुका तसेच पंढरपूर व बेळगाव येथील पोटनिवडणूक येथे भाजपला मिळालेल्या यशाबद्दल मात्र अग्रलेखात हातचे राखून ठेवले आहे.

अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण

पराभवच, पण लढवय्याचा!  

‘मदांधांचा मुखभंग’ या संपादकीयातील (३ मे) ममता बॅनर्जीच्या निवडणुकीतील पराभवाच्या संदर्भात लिहिलेले ‘‘काव्यात्म न्याय असा की तृणमूलला दोन तृतीयांश बहुमत मिळवून देणाऱ्या ममता मात्र पराभूत झाल्या’’ हे विधान पटले नाही. काव्यात्म किंवा काव्यात्मक न्याय (पोएटिक जस्टिस) ही पाश्चात्त्य संकल्पना असून वेब्स्टर शब्दकोशात ‘दुष्कृत्यांना शिक्षा आणि सुष्टांना योग्य पारिश्रमिक मिळणे कितीही अशक्य भासले तरी घडणे’ अशा अर्थाची त्याची व्याख्या सापडते. या पराभवात ममता बॅनर्जी यांना शिक्षा झाली असे वाटण्याचे कारण काय? त्यांचा गुन्हा कोणता? सध्या ममता बॅनर्जीच्या पराभवाची भाजपसमर्थकांकडून खिल्ली उडवली जाते आहे. ‘मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही,’ असेही म्हटले जातेय. नरेंद्र मोदींसारखे (पहिली लोकसभा निवडणूक) सावधगिरी म्हणून दोन मतदारसंघातून उभे न राहता, राहुल गांधींसारखा पळ न काढता, भवानीपूर हा स्वत:चा हक्काचा सुरक्षित मतदार संघ सोडून एकेकाळच्या ज्या भरवशाच्या सहकाऱ्याने (सुवेंदू अधिकारी) पाठीत खंजीर खुपसला त्याला त्याच्या सुरक्षित मतदारसंघात जाऊन आव्हान देणे याला हिम्मत लागते. त्यामुळे त्यांचा पराभवही लढवय्याचा पराभव आहे. अशी हिम्मत किती राजकारणी दाखवतात. काँग्रेसच्या या पडत्या काळात नरेंद्र मोदी तरी रायबरेलीतून निवडणूक लढण्याची हिम्मत दाखवतील?

शरद रामचंद्र गोखले, ठाणे

फक्त चढाई केली, म्हणून मदांध’?

दहा वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी व त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने ‘मां, माटी, मानुष’ म्हणत  प्रस्थापित सरकारवर चढाई करून डाव्यांना सत्तेतून बाजूला केले होते, आज भाजपने तसेच चढाईचे धोरण स्वीकारल्यावर त्यांना ‘मदांध’ म्हणणे फारसे पटत नाही.

माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

मदांधांचाम्हणजेच गर्वाचा मुखभंग !

‘मदांधांचा मुखभंग’ हा अग्रलेख (३ मे) वाचला. गर्व असलेल्यांचा मुखभंग असा सुटसुटीत अर्थ सहजपणे पोहचला. राजकारण व्यक्तिकेंद्रित झाले, अंधभक्त त्यांना दैवी अवतार मानू लागले की त्यांचे काय नुकसान होते हे भारतीय राजकारणात अनेकदा अनुभवास आले आहे. निवडणूकपूर्व तृणमूलच्या राजकरणाविषयी टिकाटिप्पणी खूप होत होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी तृणमूल काँग्रेस ओरबडून भाजपचे उमेदवार निश्चित करण्यासाठी केलेले हीन प्रयत्न,  पैशांचा पाऊस ,  निवडणुक आयुक्तांची डोळेझाक,  एका मान्यवर व निष्ठावंत महिला नेतृत्वाची केलेली निर्भत्सना हे सारे पश्चिम बंगालने पाहिले. करोना महामारीमुळे उपचारांअभावी नागरिक मरत असताना अख्खे जग धास्तावले परंतु पंतप्रधान व भाजपवाल्यांना सत्तेपुढे कशाचीही पर्वा नाही हेही स्पष्ट दिसत होते. अशा परिस्थितीत  दीदी यांच्या पेक्षा शतपटीने आपली आहे असे समजून भाजप व पंतप्रधान यांच्यासारख्यांचा मुखभंग सुबुध्द मतदारांनी केला आहे.

हे मतदार मोदींच्या भाषणात गुरफटले नाहीत. याचा अर्थ विद्यमान पंतप्रधान वा गृहमंत्री यांच्या कथनी व करणीतील फरक लोकांनी  पडताळून पाहिला आहे. त्यामुळे यापुढे मोदींनी कितीही मोठी सभा घेतली वा करून दाखवली तरी मते ट्रान्सफर होतील याची खात्री नाही. भाजपवाले मनातून खरे भांबावले असतील असा विजय व पराभव बंगाली जनतेने करून दाखविला आहे !

मधु मोहिते, ठाणे

नुसते नाव असून चालत नाही..!

‘मदांधांचा मुखभंग’ हे संपादकीय (३ मे) वाचले. एकीकडे संपूर्ण देश करोनाच्या उद्रेकाने होरपळत असताना देशाच्या सिंहासनावर (पंतप्रधानपदी) बसलेल्या प्रमुखाला विधानसभा निवडणूक महत्त्वाची वाटते, येथेच या नेतृत्वाचा पराजय अंधूक दिसत होता आणि आताच्या निकालाने तो ठळक केला. प्रचाराकडे आणि एकूणच निवडणुकीला दुय्यम स्थान देऊन  देशातील करोना उद्रेकाला प्राथमिकता दिली असती, तर कदाचित सध्या ज्या राज्यांत  निवडणुका झाल्या तेथील जनतेच्या मनात आणि विशेषत: जेथे प्रतिष्ठा पणाला लावली त्या बंगाली जनतेत आपल्याविषयीचा जनाधार आणखी वाढला असता आणि या निकालापेक्षा काहीसे वेगळे चित्र समोर आले असते. ‘नुसते नाव असून चालत नाही, तर त्यासोबत (लोकोपयोगी) कामही असावे लागते’ हे या मतदारांनीअधोरेखित केले.

यातूनही भाजपला धडा घेता आला नाही; तर येणाऱ्या काळात जनाधार अगदी तळाला जाऊन पोहचल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की.

आकाश सानप, नाशिक

दीदी ओ दीदीयात असभ्य काय?

‘मदांधांचा मुखभंग’ हा अग्रलेख वाचून असे वाटते की केवळ भाजपवर टीका करणे एवढाच उद्देश त्यामागे असावा.  निवडणुकीच्या सभा फक्त पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यानीच घेतल्या व त्यामुळे करोना वाढला अशी टीका त्यात दिसते.  पण राहुल गांधी, ममता बॅनर्जी, स्टालीन व इतर अनेक नेत्यांनी मोठमोठय़ा सभा घेतल्या; त्यामुळे करोना वाढत नाही?

‘दीदी ओ दीदी’ यात असभ्य काय आहे? मात्र ‘नड्डा फड्डा’ व पंतप्रधान मोदींवर ताळतंत्र सोडून केलेली खालच्या पातळीवरील टीका सोयीस्कररीत्या विसरली जाते.

दत्तात्रय निंभोरकर, पुणे

भाजपला जाग नाहीच आली, तर..

‘मदांधांचा मुखभंग’ हे संपादकीय (३ मे) वाचले. भाजपने किमान आता तरी कुंभकर्णाच्या झोपेतून जागे होऊन ‘आत्म’परीक्षण करावयास हवे. प्रत्येक ठिकाणी ‘इस्पिकचा एक्का’ चालत नाही याचे भान ठेवायला हवे. नाहीतर सत्तेच्या लालसेपोटी साम—दाम—दंड—भेद वापरता वापरता जी दशा काँग्रेसची झाली तीच वाट तुडवीत अधोपतनाकडे नेणारा दिवस दूर नाही. काँग्रेसला घराणेशाही जपण्यात बऱ्याच ठिकाणी हार पत्करावी लागली; तर भाजपचे राजकारण हे फक्त मोदी + शहा या समीकरणाने ओढत किती काळ चालणार? भाजपची हीच वेळ आहे ती पक्षातील इतर नेत्यांना पुढे आणण्याची, अन्यथा पुढची लोकसभा निवडणूक ही एक दिवास्वप्नच राहून जाईल.

रामचंद्र सूर्यवंशी, सांगली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 3:16 am

Web Title: loksatta readers opinion on current affairs loksatta readers letters zws 70
Next Stories
1 लस मिळवण्यासाठी कोणती ‘कामगिरी’ करायची?
2 राज्यांना अधिक दरामागे कारण काय?
3 दंतकथा कशासाठी तयार होतात?
Just Now!
X