‘दापोलीवर  शोककळा!’ ही भीषण अपघाताची बातमी (२९ जुलै) वाचून खूप वाईट वाटले. अपघातात ३० जणांना नाहक जीव गमवावा लागला.  तो घाटरस्ता खूपच अरुंद, दोन गाडय़ा एकावेळी आमनेसामने पार जाऊ  शकत नाहीत असा, त्यातच डोंगरावरून घसरणाऱ्या मातीचा ढीग साचणे, त्यात पावसाची ओल या सगळ्या पाश्र्वभूमीवर चालकानं रहदारीच्या नियमांचं काटेकोर पालन करत, रस्त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून, अडथळे पार करत वाहन चालवण्याची शिकस्त करण्याचं कौशल्य पणाला लावून बस चालवणं अपेक्षित असतं.

बातम्यांतील तपशिलानुसार, सहलीतील सहभागी कर्मचाऱ्यांच्या हास्यविनोदाला दाद देण्यासाठी मागं वळून पाहणाऱ्या चालकाचं लक्ष विचलित होऊन मातीच्या ढिगाऱ्यावरून बस दरीत कोसळली. या एका क्षणानं ३० कुटुंबांचे कर्ते हरपले. खासगी बसचालकांचा बेदरकारपणा व फाजील आत्मविश्वास प्रवाशांच्या जिवावर उठू शकतो हा अनुभव हल्ली अनेकदा येऊ  लागला आहे. मध्यंतरी कोल्हापूरजवळ दारू पिऊन बस चालवणाऱ्या चालकानं नदीपुलावरून एकदम गाडी उजवीकडे घेऊन नदीत कोसळवली होती. तेव्हा चालकाच्या निवडीबाबत, प्रशिक्षणाबाबत आणि वाहतूक नियमांच्या दक्षतेबाबत तडजोड नकोच.

– श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे</strong>

आपत्कालीन यंत्रणेवर नव्याने विचार व्हावा

आंबेनळी घाटात बस खोल दरीत पडून भीषण अपघात झाला. अशा वेळी आठवण येते ती आपत्कालीन व्यवस्थेची. एरवी तेथे किती कर्मचारी काम करतात, पदे रिक्त आहेत का, ती का भरली नाहीत, त्या व्यवस्थेला काय साधनसामग्री लागते, मागणीप्रमाणे आणि तात्काळ ती पुरवली जाते का, आपत्कालीन समितीच्या बैठका वेळच्या वेळी घेतल्या जातात का, त्याची फलनिष्पत्ती काय, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. बहुतेक प्रश्नांची उत्तरं नकारार्थी मिळतील. घाटात धुक्यामुळे दरवर्षी अपघात होतात. तेथे पावसाळ्यात विशेष प्रकाशझोताचे दिवे लावले पाहिजेत. वैद्यकीय पथक तात्काळ पोचले पाहिजे. साधे दोरखंड, बांबू, बॅटऱ्या अशा किरकोळ वस्तूसुद्धा उपलब्ध होत नाहीत, हे म्हणजे या यंत्रणेची थट्टाच आहे. त्यामुळे यावर नव्याने विचार करायची आवश्यकता आहे. अग्निशमन दलाची अशा वेळी मदत घेतली पाहिजे. त्यांच्याकडील चपळ मनुष्यबळ, शिडय़ा, दोरखंड, वाहने उपलब्ध झाली तर चांगला उपयोग करून घेता येईल.

– डॉ. हिरालाल खैरनार, खारघर (नवी मुंबई)

गिर्यारोहकांना शासनाने प्रोत्साहन देण्याची गरज

संततधार पाऊस तसेच दाट धुक्यामुळे आंबेनळी घाटात बस खोल दरीत कोसळली. दरीतून मृतदेह बाहेर काढण्याच्या कठीण कामात गिर्यारोहकांनी मदत केली. दाट धुकं, निसरडी वाट, आपत्कालीन उपकरणांची कमतरता आणि त्यात अधूनमधून बरसणारा पाऊस अशा असंख्य अडचणींमुळे बचावकार्यात आलेल्या अडथळ्यांवर मात करीत गिर्यारोहकांनी आपले काम चोख पार पाडले. या ट्रेकर्सच्या कार्याची शासनाने दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच राज्यात गिर्यारोहण व प्रस्तरारोहणाचे अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी गिर्यारोहकांची संस्था स्थापन करावी.

– विवेक तवटे, कळवा

गोली मार भेजे में!

‘देशाचे दुश्मन’ हा अग्रलेख तसेच ‘आणि दगडफेक झाली.. नाही!’ हा गिरीश कुबेर यांचा लेख ( २८ जुलै) वाचला. दोन्हीतून आपले राजकारणी आणि अमेरिकेतले राजकारणी यांच्या वृत्तीतला फरक स्पष्टपणे जाणवला. अर्थात असा फरक असण्यामागे जनतेतली जागरूकताच कारणीभूत असल्याचे ‘अन्यथा’मधून उलगडले. आपल्याकडे स्वत:चा काही स्वार्थ असल्याशिवाय सरकारी धोरणांना कधीच विरोध केला जात नाही. एरवी देशाचे काहीही होऊ दे, मला काय त्याचे अशीच वृत्ती असते. आमची देशभक्ती फक्त २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टलाच व तीही मनोजकुमारच्या फिल्मी गाण्यातच दिसते. लोकांच्या अशा स्वार्थी वृत्तीची आणि नेभळटपणाची खात्री पटल्यामुळेच मग बसनगौडांसारख्या बुद्धिजीवींना आणि उदारमतवाद्यांना गोळ्या घालाव्याशा वाटतात. अर्थात बसनगौडांना बुद्धी थोडी कमीच असावी म्हणूनच ते असे जाहीरपणे बोलून गेले असावेत, अन्यथा अशी कामे न बोलताही बिनबोभाट पार पाडता येतात.

बुद्धिवादी तसे नेहमीच अल्पसंख्यच असतात. लोकाश्रय तर त्यांना कधीच मिळत नसतो, मिळाला तर फक्त राजाश्रयच मिळू शकतो. तोही बुद्धी गहाण टाकण्याची तयारी असेल तरच. नाही तर मग राजकारण्यांना अशांची अडचण वाटू लागते. मग अशीच गोळ्या घालण्याची भाषा वापरली जाते आणि प्रसंगी ती प्रत्यक्षातही आणली जाते. त्यानंतरही आम्ही फार तर मेणबत्ती मोर्चा काढतो. कारण आम्ही भारतीय आहोत, अमेरिकन नाही. अमेरिकेत तीन हॉटेलांनी सत्ताधाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतरही ती तीनही हॉटेल्स सुरू असणे ही झाली खरी लोकशाही. नाही तर आठवा आपल्या उद्धव ठाकरेंचा महाबळेश्वर दौरा! साहेबांना आवाजाचा त्रास झाला म्हणून हॉटेलला ताबडतोब सील ठोकण्यात आले! हॉटेलवालाही गप्प, जनताही गप्प. शेवटी, आवाज कोणाचा? अशी ही आपली लोकशाही. असेच चालत राहिले तर कालांतराने असे अग्रलेख लिहिणेही धारिष्टय़ाचे ठरेल. समाजात जे घडते ते चित्रपटांमध्ये दाखविले जाते की चित्रपटांमध्ये जे दाखविले जाते तसे समाजाचे वर्तन होत असते हा संशोधनाचा विषय ठरावा; पण, ‘गोली मार भेजे में!’ हे चित्रपटातही आहे आणि वास्तवातही!

– मुकुंद परदेशी, धुळे</strong>

सर्वानी बोध घेण्यासारखी घटना

‘आणि दगडफेक झाली.. नाही!’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (अन्यथा, २८ जुलै)वाचला. त्यात अमेरिकेतील माध्यममंत्री असलेल्या सारा हकबी सँडर्स यांच्या तेथील एका हॉटेलमधील अनुभव वर्णन केलेला आहे. त्या हॉटेलमधून त्यांना स्वच्छ शब्दात सांगायचे झाल्यास हाकलून दिले. पण त्यांनी आपल्या अधिकारपदाची ओळख सांगून धाक दाखविला नाही. त्याचप्रमाणे सरकारी खात्यांच्या धाडी घालण्यात आल्या नाहीत आणि ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या हॉटेलवर दगडफेक करून ती बंद पाडली नाहीत. उलट त्यांनी ट्वीट करून विरोधी मताचा योग्य आदर केला. हे आपण सर्वानी बोध घेण्यासारखे आहे. आपण आपल्या देशातील लोकशाही किती प्रगल्भ झाली म्हणून आपलीच पाठ थोपटून घेत असतो, पण ही घटना वाचल्यावर वाटते की आपल्याला अजून खूप पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी नेते व कार्यकर्ते यांच्यासाठी प्रशिक्षणाची नितांत गरज आहे. तसेच प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना काय सांगायचे, दाखवायचे याचेही शिक्षण हवे. त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणातही आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे वाटते.

-मनोहर तारे, पुणे

साप सोडण्याच्या कटातील लोकांची नावे सांगा

‘वारीत साप सोडण्याच्या कटाचे संभाषण हाती’ ही बातमी (२८ जुलै) वाचली. त्यात चंद्रकांत पाटील म्हणतात की त्यात मोठय़ा नेत्यांची नावे आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जाणार, असेही ते म्हणतात. जर हे खरे असेल तर त्यांनी ती नावं जाहीर करावीत. त्यांच्यावर कारवाईही करावी. मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी काहीही कारणे देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत. यापूर्वीही अनेक मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, ११ कोटी जनताच त्यांच्यासाठी विठ्ठल आहे.  असं असेल तर त्यांनी मराठा, धनगर, मुस्लीम आणि तमाम जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण का केली नाहीत? ज्या विठ्ठलाची फसवणूक केली, त्या विठ्ठलाची त्यांना पूजा करण्याचा अधिकार काय?

– सोमनाथ जगन्नाथ चटे, टेंभुर्णी (सोलापूर)

कुरघोडी करायला मुत्सद्दीपणा लागतो..

‘पंकजांची मुख्यमंत्र्यांवर कुरघोडी?’  ही बातमी वाचून (२९ जुलै) गंमत वाटली. कुरघोडी करायला मुत्सद्दीपणा लागतो. पंकजाताई प्रत्येक वेळी बालिशपणातून आलेल्या उत्साहाने लोकप्रियतेसाठी काहीबाही बोलत असतात. बोलण्याच्या नादात माझ्या टेबलावर आरक्षणाची फाइल आली असती तर त्वरित मंजुरी दिली असती, असे म्हणून या न्यायप्रविष्ट घटनेची त्यांनी गांभीर्याने दखलच घेतली नाही हे लक्षात येते. चूक लक्षात आल्यावर त्यांनी सारवासारव केली. यापूर्वीही त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा अशाच प्रकारे परिपक्वतेच्या अभावी जाहीर केली होती. महत्त्वाकांक्षा जरूर असावी पण मर्यादांचे भानही ठेवायला हवे.  तेव्हा पंकजाताईंचे बोलणे म्हणजे परिपक्वतेचा अभाव असे फार तर म्हणता येईल. त्यामुळे फडणवीसांवर कुरघोडी होईल असे वाटत नाही.

– नितीन गांगल, रसायनी

प्रश्न सुटणार की नवीन निर्माण होणार?

‘रंगीला रतन’ हे संपादकीय (२७ जुलै) वाचले. नीट विचार केला तर पाकिस्तान काय किंवा काश्मीर काय ही आपणच जन्माला घातलेली बाळे आहेत. त्यामुळे या द्वाड बाळांच्या बाळलीला एक तर सहन करायच्या किंवा चार रट्टे तरी द्यावयाचे. यापैकी चार रट्टे आजपर्यंत देऊन झाले (१९४८, १९६५, १९७२ व कारगिल युद्ध.). या सर्व युद्धांत पाकिस्तानला आपल्या सैन्याने सपाटून मार दिला. पाकिस्तानचा काही प्रदेश आपल्या ताब्यातही होता. बांगलादेश युद्धात तर पाकिस्तानचे ९० हजार सैन्य आपल्याला शरण आले होते, परंतु आपण आपला पाकिस्तानने बळकावलेला प्रदेश सोडवून घेतला नाही किंवा काश्मीरचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून घेऊ  शकलो नाही. आपण युद्धात जिंकलो, पण तहात हरलो. आता इम्रान खानच्या रूपाने नवीनच डोकेदुखी आपल्या शेजारी आली आहे. त्यामुळे प्रश्नाची सोडवणूक होणार की नवीनच प्रश्न निर्माण होणार हे येणारा काळच ठरवेल.

– आनंद चितळे, चिपळूण