गांधी जयंतीपासून भाजपची स्वच्छता – संवाद वारी हे वृत्त (लोकसत्ता, ३० सप्टेंबर) वाचले. महात्मा गांधी यांची १५०वी जयंती साजरी करण्याची अहमहमिका राष्ट्रीय पातळीवर सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहे. यात भाजपने गांधीजींच्या स्वच्छता-संवाद वारीचे आयोजन आणि जगातील सर्वात मोठा चरखा बनवण्याची घोषणा करून आघाडी घेतली आहे. पंतप्रधान मोदींना गांधी नावाचा जप जळी-स्थळी करावासा वाटतो. गो-रक्षकांच्या उन्मादी झुंडबळीवर साबरमती येथे बोलताना, हे ‘गांधीजींनाही’ आवडले नसते, असे म्हणत गांधी नावाचाच आसरा मोदी घेताना दिसतात. अर्थात, गांधीजींप्रति आपली भक्ती दाखवण्यासाठी मोदी कोणत्याही थराला जाऊ शकतात. मग तो खादी पेहराव असो, भाषणात गांधीजींचा जयघोष असो, खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर सूत कातणाऱ्या गांधीजींची छबी हटवून त्या जागी स्वत:ची चरखा चालवतानाच्या (यावर भाजपच्या एका नेत्याने भविष्यात गांधीजींची छबी चरख्यावरूनच काय तर नोटांवरूनही गायब होईल, असे विधान केले होते.) छबीतील नाटकी पोझ देणे असो. गुजरातमधील नरसंहाराबद्दल २०१४च्या प्रचारादरम्यान एका मुलाखतीत मोदी म्हणाले होते की, गाडीखाली कुत्र्याचे पिल्लू आले तरी मला वाईट वाटते. जातिभेदातून होणाऱ्या अत्याचारांवर ते अगदी मौन धारण करतात, पण रोहित वेमुलासारख्याप्रकरणी भावुक होताना आढळतात. त्यामुळे गांधीजींचे आवडते आणि नरसी मेहता यांनी लिहिलेले भजन, ‘वैष्णव जन तो तेणे कहिये जे पिड परायी जाणे रे’ याचा मथितार्थ मोदींना किती समजला हे जरी कळायला काही मार्ग नसला तरीही ते गांधीजींचे परमभक्त म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मिरवणारच!

दुसरीकडे रा. स्व. संघाशी जवळीक सांगणाऱ्या कट्टर हिंदुत्ववादी संघटना गांधीजींच्या खुन्याला पंडित, शहीद असे संबोधतात. नथुरामाचे स्मारक-मंदिर बांधण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. नथुरामचा फाशी दिवस ‘शहीद दिन’ म्हणून साजरा करत असतात. अहमदाबादमध्ये महात्मा गांधींनी १ फेब्रुवारी १९२१ रोजी राष्ट्रनिर्मितीचा विचार विद्यार्थाच्या मनात रुजावा या हेतूने राष्ट्रीय शाळेची स्थापना केली. ती शाळा दस्तुरखुद्द मोदींच्या व्हायब्रंट गुजरातमध्ये- मोदी देशाचे पंतप्रधान असतानादेखील निधीअभावी बंद करण्यात आली आहे.अहिंसा, स्वदेशी, सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता निवारण आणि सहिष्णुता ही गांधीजींची पंचसूत्रे होती आणि हीच त्यांची जीवनपद्धती देखील होती. ही मूल्ये पायदळी तुडवत गांधीजींच्या हाती झाडू देऊन त्यांना फक्त ‘स्वच्छ भारत’पुरतेच मर्यादित करून ठेवले आहे. महात्मा गांधी यांची गरज भाजप आणि मोदी यांना गांधी हत्येनंतर इतक्या वर्षांनीही वाटते यातच गांधी नावाचा महिमा अधोरेखित होत आहे.

– बाळकृष्ण शिंदे, पुणे.

आपण नक्की गांधींच्या भारतात आहोत?

महात्मा गांधी यांनी संपूर्ण आयुष्यभर सत्य व अहिंसेच्या तत्त्वांचा अवलंब केला. संपूर्ण जगाला अिहसेचा मार्ग दाखविला. पण जगाला अिहसेचा संदेश देणाऱ्या गांधींच्या देशात मात्र त्यांच्या विचाराचे पालन होताना दिसत नाही. कारण आधुनिक भारतात आजही किरकोळ कारणावरून दोन समाजांमध्ये हिंसक वाद निर्माण होऊन निरपराध लोकांचे जीव घेतले जातात. पण दुख तेव्हा वाटते, जेव्हा गांधींचे नाव घेऊन मते मागणारे राजकीय नेते वाद मिटवण्याऐवजी ते वाढवून आपली राजकीय पोळी भाजू पाहतात. आजचे राजकीय नेते बघितले तर आपण नक्की गांधींच्या भारतात आहोत का, असा प्रश्न निर्माण होतो. आजच्या सर्वच पक्षांतील राजकीय नेत्यांना गांधी समजावून घेण्याची गरज आहे.

– संकेत राजेभोसले, शेवगाव (अहमदनगर)

विज्ञाननिष्ठा वादातीत, पण..

‘विज्ञानभान’ या रवींद्र रु. पं. यांच्या सदरातील ‘विज्ञानप्रेमी गांधी’ (२९ सप्टें.) हा गांधीजींचा वैज्ञानिक दृष्टिकोन विशद करणारा लेख वाचला. महात्माजींची कल्पकता व विज्ञाननिष्ठा वादातीत आहे, पण एक स्पष्टीकरण आवश्यक वाटते. गांधीजींच्या चरखा स्पर्धेसाठी माझ्या आईचे काका गणेश विष्णू काळे यांनी सर्व निकष पूर्ण करणारे सुंदर डिझाइन केले होते. गांधीजींनी त्याची परीक्षा केली होती, पण ते नाकारताना शास्त्रशुद्ध कारण न देता ‘माझ्या मनात जे आहे तसे हे नाही झाले’ असे भावनात्मक कारण दिले होते. काका त्यामुळे नाउमेद झाले. वेगवेगळी यंत्रे बनविण्यात ते वाकबगार होते. ‘शास्त्र कसोटीवर विश्वास हा गांधीजींच्या स्वभावातला एक पलू होता’ हे वादातीत; पण कदाचित अपवाद म्हणून हे घडले असेल.

– श्रीरंग गोखले, पुणे

वणवा वेळीच शमवा..

‘नव्या दुभंगरेषा’ हा संपादकीय लेख (१ ऑक्टोबर) वाचला. कार्ल मार्क्‍स यांनी सांगितलेली ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गातली सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दरी ही पूर्वापार चालत आली असून आजही तिची पाळेमुळे तितकीच खोलवर रुजलेली पाहावयास मिळतात. परंतु इथे संघर्ष वैचारिक संघर्ष नसून प्रत्यक्ष रक्त सांडून एकमेकांचे जीवन संपवणारा आहे. म्हणूनच हळूच पडणाऱ्या ठिणगीतून भविष्यात निर्माण होणारा वणवा शमविण्यासाठी लवकरात लवकर सरकारी उपाययोजना न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, असे वाटते.

– गणेश गदादे (श्रीगोंदा)

‘समृद्धी’बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐका..

समृद्धी महामार्गाबाबत ‘तक्रार केल्यास मोबदला कमी’ अशा आशयाची बातमी (लोकसत्ता, १ ऑक्टो.) ही संपूर्ण समृद्धी महामार्गाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. समृद्धीबाधित संपूर्ण ७२० किलोमीटरमध्ये अशीच परिस्थिती होती व आहे; फक्त या बातमीने त्याला वाचा फोडली. शेतकरी काही प्रमाणात मोबदल्यात खूश झाले असले तरी मोठय़ा प्रमाणावर शेतकरी वैतागले आहेत. शेतकऱ्यांना एवढे पैसे मिळणार म्हणून प्रत्येक अधिकारी अडवणूक करू पाहत आहेत व आपल्या हाताला काय लागेल याची चाचपणी अनेक ठिकाणचे अधिकारी करताहेत, हेच शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून दिसून आले आहे.

बागायती जमिनीला ‘हंगामी बागायती’ दाखवून शेतकऱ्यांना वेठीस धरायचे, ‘नंतर करून देतो’ म्हणून ‘बोलणी’ करायची.. काही अर्थपूर्ण व्यवहार झाला की मगच पुढे जायचे, इथपासूनच शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. परंतु शेतकरी तक्रार करण्यास पुढे धजावत नाही आणि धजावला तर त्याला वरील पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न करायचा. कोणी आवाज उठवला तरच थातुरमातुर कार्यवाही करायची. मग शेतकऱ्यांना पुन:पुन्हा तोच त्रास होतो. ‘समृद्धी’बाधित शेतकरी कोणत्या ना कोणत्या अशाच त्रासाला सामोरे गेले आहेत, पण कोणी बोलून दाखवत नाही. शेतकऱ्यांसोबत स्थानिक पातळीवर चर्चा झाली पाहिजे, त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी स्थानिक पातळीवर उपलब्ध झाले पाहिजेत. एवढे दिवस काम का थांबले, जमिनी का दिल्या नाहीत, त्यांच्या अडचणी नेमक्या काय आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे. महामार्ग होईल, प्रसिद्धी मिळेल, तत्कालीन सरकारला श्रेय मिळेल, पण यामध्ये शेतकरीराजा भरडला गेला नाही पाहिजे. शेतकऱ्यांना अजूनही योग्य मोबदला मिळाला पाहिजे म्हणजे शेतकरीच विश्वास ठेवू लागतील.

महेश कोटकर, लासूरगाव (ता. वैजापूर)

कष्टकरी वर्गाची कुचेष्टा

‘निम्मी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबे मदतीस अपात्र’ ही बातमी (लोकसत्ता, १ ऑक्टोबर) वाचली. सत्ताधारी एखादी योजना, मदत जाहीर करतात आणि शब्दांचा, निकषांचा चलाखीने वापर करून त्या योजनेचा, मदतीचा आत्माच गायब करून टाकतात. मध्यंतरी महाकर्जमाफी, महाभरती या शब्दांनी सर्वाना हुरळून टाकले होते. पण त्यामधील निकषांनी नागरिकांची हवाच काढून टाकली. कष्टकरी वर्गाची ही कुचेष्टा सरकारने थांबवावी.

– ज्ञानेश्वर अजिनाथ अनारसे, कर्जत (जि. अहमदनगर)

भाजपचा खटाटोप.. बघण्याजोगा

भाजपचे भरकटलेले ‘विमान’ हा महेश सरलष्कर यांचा लेख (लालकिल्ला, १ ऑक्टो.) वाचला. यात अनेक मुद्दे राहून गेले आहेत. राफेल प्रकरणात स्वत:ची बाजू मांडताना भाजपने काँग्रेसवर पाकिस्तानशी युती केल्याचा आरोप लाजिरवाणा आणि हास्यास्पद आहे. जर हा आरोप खरा मानला तर २०१४ पूर्वी जेव्हा भाजप सत्तेवर नव्हता तेव्हा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मोदींना पंतप्रधानपदासाठी पािठबा जाहीर केला होता.. इतकेच काय, तर मोदी डिसेंबर २०१५ मध्ये विनानिमंत्रण पाकिस्तानात जाऊन शरीफ यांना भेटलेसुद्धा! मग तेव्हा काय भाजपची पाकिस्तानशी युती होती असे मानायचे काय? किंवा पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान निवडणूक प्रचारात मोदींच्या प्रामाणिकपणाचे गोडवे गात होते, याचा काय अर्थ निघतो? राफेलवर पांघरूण टाकण्यासाठी ऑगुस्ता वेस्टलँड प्रकरणातील एक आरोपी भारताला हस्तांतरित करण्यास इटली तयार आहे ही अफवा पसरवण्यात आली. त्यास काही सरकारी यंत्रणा आणि सरकारधार्जण्यिा पत्रकारांनी हातभार लावला. वास्तविक ऑगुस्ता प्रकरणातील दोन आरोपी इटलीत निर्दोष सुटले असून तिसरा- जामिनावर बाहेर असलेला- आरोपी बेपत्ता आहे. राफेलबाबत फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वां ओलांद यांच्या सखीच्या फ्रेंच चित्रपटात अंबानी यांच्या चित्रपट निर्मिती संस्थेने गुंतवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. ओलांद यांनी आपल्या वक्तव्यावरून घूमजाव केल्याची प्रसिद्धीमाध्यमांतून आलेली बातमी फोल ठरली. आता भाजपचा पुढील खटाटोप बघण्याजोगा ठरेल हे नक्की!

– स्वप्ना अनिल वानखडे, वर्धा</strong>