श्री गणरायाचा विसर्जन सोहळा महाराष्ट्रभरात पार पडला; पण ‘निर्विघ्नपणे पार पडला’ असे म्हणता येत नाही.. कारण मुंबईसह महाराष्ट्रात २६ व्यक्तींनी आपले प्राण गमावले. आज त्यांची कुटुंबे कोणत्या दु:खात असतील याची एक वाचक म्हणून कल्पना करू शकतो.  लालबागच्या गणपती विसर्जनावेळी एक बोट समुद्रात उलटली, प्राणहानी झाली नाही ही बाब निश्चित सुखावह आहे. गोराई येथे विसर्जनावेळी गणेशमूर्ती कलंडली व त्या खाली काही जण जखमी झाल्याचे वाचनात आले. या सर्वाचा विचार करता असे वाटते की श्री गणेशमूर्तीची भव्य दिव्य अशी २२/२४ फुटांची उंची खरोखरच आवश्यक आहे का?  ज्या २५ जणांचे प्राण गेले त्यांची कुटुंबे आज पोरकी झाली. मंडळे किंवा संबंधित लोकप्रतिनिधी आता तात्पुरती मलमपट्टी करतीलही. पण त्या मृत व्यक्तींवर अवलंबून असणाऱ्या कच्च्याबच्च्यांनी पुढील आयुष्य कसे काढावे याचा विचार संबंधित करतील का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– विनोद जोशी, जोगेश्वरी पश्चिम (मुंबई)

विघ्नहर्ता तरी काय करणार?

‘विसर्जनादरम्यान राज्यात २६ जणांचा मृत्यू’ ही बातमी (लोकसत्ता २५ सप्टें.) वाचून वाईट वाटले. या घटनेमुळे, ज्या कुटुंबातील व्यक्ती दगावल्या आहेत, त्यांच्यावर दु:खाचे सावट पडणे स्वाभाविक आहे. गणपती बाप्पा हा सुखकर्ता, दु:खहर्ता, विघ्नहर्ता असला तरी, शेवटी माणसेच अतिउत्साहाच्या भरात, नको त्या चुका करत असतील, त्याला गणपती बाप्पा काय करणार?

–  गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली पूर्व (मुंबई)

दरवर्षी आणखी, आणखी..

दरवर्षी उंच मूर्ती, जास्तीत जास्त वर्गणी, निधी गोळा करणे, मोठ-मोठे मंडप उभारणे.. जणू दरवर्षी गणपती बाप्पालाच सर्व काही चढत्या क्रमाने पाहिजे. आठ-दहा भक्तांना पूर्वी सोबत घेऊन जायचा, दरवर्षी त्यातही वाढ होऊ लागली आणि यावर्षी २६ भक्तांना सोबत घेऊन गेला. हे मात्र फारच झाले. आता हे सर्व बंद करा अशी बुद्धी, बुद्धिदेवता श्रीगणराय कधी देणार?

–  डॉ. हिरालाल खैरनार, खारघर

न्यायालयाचा आदेश मंडळांकडून पायदळी

मुंबई उच्च न्यायालयाच्या डीजे बंदीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात पारंपरिक वाद्यांच्या तालावर गणरायाला निरोप देण्यात आला. पण डीजे, डॉल्बी यांच्या कर्कश आवाजामुळे होणारे परिणाम माहीत असतानासुद्धा सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये न्यायालयाच्या निकालाला पायदळी तुडवणाऱ्या ९८ मंडळांवर गुन्हे दाखल करण्याची वेळ येत असेल, तर याला काय म्हणावे?

– संकेत राजेभोसले, शेवगाव (अहमदनगर)

समाज सुदृढ नसल्याचे लक्षण

‘पिंडीवरचे विंचू’ हा अग्रलेख (२५ सप्टें.) वाचला. केरळातील ख्रिश्चन बिशपांनी जोगिणींवर केलेले अत्याचार केवळ माध्यमांमुळेच पुढे येऊ शकले, हे पटले. तथाकथित पुरोगामी लोकसुद्धा धर्मातील गैरप्रकारांमध्ये बोलायला, हस्तक्षेप करायला तयार नसतात हे केरळातील प्रकरणातून सिद्धच झाले. समाजोपयोगी भूमिका घेणे लोकशाहीतील कोणत्याच पक्षाला/ समूहाला सध्याच्या राजकीय दृष्टिकोनातून परवडणारे नाही. राजकीय पक्षांची ही हतबलता म्हणजे समाज सुदृढ नसल्याचे लक्षण.

– राजेश श्रीराम बुदगे, ठाणे</strong>

मेणबत्त्या संपल्या का?

‘पिंडीवरचे विंचू’ (२५ सप्टेंबर) या संपादकीयात तथाकथित पुरोगाम्यांबद्दल योग्य प्रश्न विचारला आहे. त्यांची भूमिका नेहमीच संशयास्पद असते. केरळच्या बिशपसंबंधात गेटवे ऑफ इंडिया किंवा इंडिया गेट येथे लावायला मेणबत्त्या संपल्या होत्या, असे सांगायलाही ते कमी करणार नाहीत.

– सुभाष चिटणीस, अंधेरी, मुंबई</strong>

मेणबत्त्या : प्रार्थनेच्या आणि ढोंगीपणाच्या

समाजातील अन्याय, अत्याचार यांकडे राजकीय अभिनिवेशाच्या बाहेर जाऊन पाहण्यात समाजातील बुद्धिवादी गट कमी पडत असल्याची बाब यानिमित्ताने स्पष्ट झाली. बाबा, संतमहंत यांचे अत्याचार चव्हाटय़ावर आणले गेलेच पाहिजेत, पण मेणबत्ती लावून प्रार्थना करणाऱ्यांच्या दुष्कर्माविरुद्धही आपण मेणबत्त्या घेऊन बाहेर पडलो नाही तर आपला ढोंगीपणा चव्हाटय़ावर येतो याची नोंद आता पुरोगामी चळवळीने घ्यायला हवी.

– गार्गी बनहट्टी, दादर (मुंबई )

लैंगिकतेवरचे दांभिक निर्बंध

धर्म, संस्कृती व विवाहसंस्था इ.द्वारे मानव कितीही सुसंस्कारी केला तरी तो सरतेशेवटी एक प्राणीच, हे आपण आपल्यातील दांभिकता दूर करून सत्य स्वीकारले पाहिजे. लैंगिकता हा मानवाचा (अपवाद वगळता) स्थायिभाव आहे. त्यामुळे सर्वधर्मीय गुरुमंडळी ब्रह्मचर्य आदींचे गोडवे गात असले तरी वास्तव मात्र वेगळे आहे हे सातत्याने सिद्ध होत असते. यातून कोणतेही क्षेत्र सुटले नाही असे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे लैंगिकतेच्या नियमनाचे धोरण आखताना याबाबतीत सगळ्यांनीच नैतिकतेचे मुखवटे काढून याकडे बघितले पाहिजे. पुरातन काळातून आपल्याला बरेच शिकण्यासारखे आहे, अगदी खजुराहोची शिल्पे असोत की महर्षी वात्स्यायनचे कामसूत्र, यांतून एकच सिद्ध होते की, लैंगिकतेवरच्या र्निबधातून गुन्हे वाढणार आहेत. सरकारने व धर्माने याविषयीचे धोरण आखताना पाखंडीपणा सोडला पाहिजे, असे यानिमित्ताने नमूद करावेसे वाटते.

– मनोज वैद्य, बदलापूर (जि. ठाणे)

विकृतीला ‘धर्म’ नसतो..

‘पिंडीवरचे विंचू’ या संपादकीयामधून ‘लोकसत्ता’ने विकृत विंचवांचा योग्य समाचार घेतला आहे. विकृतीला ‘धर्म’ नसतो, हेच खरे!

– उमा आमकर, जेकब सर्कल (मुंबई)

सेवाग्राम आश्रमाचा खरा चेहरा उघड

‘काँग्रेस कार्यकारिणी बैठकीसाठी सेवाग्राम आश्रमाची जागा देण्यास नकार’ अशी बातमी (लोकसत्ता, २५ सप्टेंबर) वाचली. सत्तर वर्षांपूर्वी, १३ ते १५ मार्च १९४८ या काळात, याच सेवाग्राम आश्रमात आचार्य विनोबा भावे यांच्या मार्गदर्शनाखाली व पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, शंकरराव देव या काँग्रेस पुढाऱ्यांच्या उपस्थितीत ‘सवरेदय समाज’ व ‘सर्व सेवा संघा’ची स्थापना झाली. काँग्रेसचे सरचिटणीस शंकरराव देव हेच ‘सर्व सेवा संघा’चेही चिटणीस झाले. आज याच ‘सर्व सेवा संघ’ व सेवाग्राम आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी, गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त काँग्रेस आपली कार्यकारिणी बैठक सेवाग्राम आश्रमात करू इच्छिते, त्यास विरोध केला आहे. ‘सवरेदय’च्या स्थापनेच्या १५ मार्च १९४८च्या भाषणात विनोबा म्हणाले, ‘‘आरएसएस संघटना अगदी फॅसिस्ट पद्धतीची आहे.. असत्य हे त्यांचे टेक्निक आणि त्यांच्या फिलॉसॉफीचा भाग आहे.. आरएसएस जमात फक्त दंगाधोपा करणारी नाही, ती फक्त उपद्रववाद्यांची जमात नाही, तर ती फॅसिस्ट फिलॉसॉफरांची जमात आहे.’’ आणि आज ‘सवरेदय’ची हीच मंडळी आरएसएसविषयी सहानुभूती ठेवून आहे, शिवसेनेच्या यात्रेत ते सहभागी होतात, आपल्या शांतिवन (पनवेल)ची जागा आरएसएसच्या भागवतांना आठ दिवसांसाठी उघडपणे देतात. मात्र काँग्रेसच्या कार्यकारिणीला आश्रमाची जागा देण्यास विरोध करतात.   सर्व सेवा संघ, सेवाग्राम आश्रम, नई तालीम, सवरेदय समाज यांवरील आजची सर्व मंडळी ही १९७५च्या जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून आलेली आहेत. एवढेच नव्हे तर आरएसएसच्या मुख्यालयात बाळासाहेब देवरस, मा. गो. वैद्य इत्यादींसह उघड हातमिळवणी करणारे जयप्रकाशजींचे खंदे पुरस्कर्ते (व नेहरू-विनोबांचे प्रखर विरोधक) ठाकूरदास बंग, आर. के. पाटील, अण्णासाहेब सहस्रबुद्धे इत्यादी मंडळींच्या पठडीत तयार झालेले हे आजच्या सेवाग्राम आश्रम व सर्व सेवा संघाचे पदाधिकारी आहेत.

महात्मा गांधींनीच नेहरू व विनोबांना आपले वारसदार घोषित केले होते. स्वातंत्र्योत्तर काळात या दोघांनीच देशाची ‘राष्ट्र’ म्हणून बांधणी केली. नेहरू, इंदिराजी व विनोबा असेपर्यंत आरएसएस व जनसंघ-भाजपला डोकेही वर काढता आले नाही; पण नेहरू व विनोबांचे नाव टाकून सेवाग्राम आश्रमाची व तथाकथित सवरेदयी मंडळी गांधीजींच्या १५० व्या जयंतीचा ढोल बडवीत आहेत.

काँग्रेस कार्यकारिणीला सेवाग्राम आश्रमाची जागा देण्यास नकार दिल्याने सेवाग्राम आश्रम व सर्व सेवा संघाचा खरा चेहरा उघड झाला आहे!

– विजय प्र. दिवाण, विनोबा आश्रम, गागोदे (ता. पेण, जि. रायगड)

गलिच्छ कामासाठी वापर नको

‘काँग्रेस कार्यकारिणीस बठकीसाठी सेवाग्राम आश्रमाची जागा देण्यास विरोध’ ही बातमी (लोकसत्ता, २५ सप्टेंबर) वाचली आणि लक्षात आले की, गांधीजींच्या वेळची काँग्रेस आता उरली नसल्याने त्यांना सेवाग्रामची जागा बठकीसाठी उपलब्ध करून देणे सेवाग्राम कार्यकारिणीला योग्य वाटले नसेल तर ते बरोबरच झाले असे म्हणावे लागेल. शिवाय या प्रसंगाच्या निमित्ताने मोदी सरकारला बदनाम करण्याची चाल काँग्रेसने घेतली असल्याची कुणकुण सेवाग्रामला लागली असल्याचीही शक्यता आहे. एका पवित्र स्थानाचा उपयोग दुसऱ्या गलिच्छ कामासाठी होऊ नये, असाही विचार सेवाग्रामवाल्यांनी केला असण्याची शक्यता आहे.

– श्रीनिवास जोशी, डोंबिवली पूव

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers reaction on various current social problem
First published on: 26-09-2018 at 01:33 IST