‘बोले तैसा चाले’ बाण्याचे साहित्यिक

‘‘धार्मिक’ लेखक’ हे संपादकीय (२४ सप्टेंबर) वाचले. त्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याचा अनेकांगी वेध घेतला आहे. ‘जैसे पुष्पामाजी पुष्प मोगरी, परिमळामाजी कस्तुरी, तैसी भाषांमाजी साजिरी मराठिया’ असे मराठी भाषेचे कौतुक करणाऱ्या फादर स्टिफन्स यांच्यापासून रेव्हरंड ना. वा. टिळक, पंडिता रमाबाई यांच्यापर्यंतचा वारसा फादर दिब्रिटो यांनी प्रयत्नपूर्वक जपला आहे. त्याचे फलित त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडीने मिळाले आहे. साहित्यात प्रकट केलेले विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजे ‘बोले तैसा चाले’ याची प्रचीती आणणारा आहे.

– बॅप्टिस्ट वाझ, वसई

हे तर ‘मी-तू’ची बंडाळी थांबल्याचे संकेत

‘‘धार्मिक’ लेखक’ हे संपादकीय (२४ सप्टेंबर) वाचले. अ. भा. मराठी साहित्य संमेलन हे अध्यक्षपदाच्या खुर्चीवरून गाजणार हे ठरलेलेच असे; परंतु मागील वर्षी अरुणा ढेरे आणि आताची फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड ही कोणतीही बंडाळी न होता झाली, ही समाधानाची गोष्ट आहे. साहित्यिकांनी हीच परंपरा पुढील काळातही सुरू ठेवावी, अशी अपेक्षा आहे. संमेलनाचे अध्यक्षपद निवडताना अनेकदा त्या व्यक्तीची साहित्य क्षेत्रातील वाटचाल एवढाच निकष असे आणि ‘मग तू मोठा की मी’ यातून गटागटांत बंडाळी होई. ती संमेलन संपले तरी चालूच राही. या दोन वर्षांतील निवडीने हे कुठे तरी थांबले आहे, असे संकेत मिळताहेत, ही समाधानाची आहे. फादर दिब्रिटो यांच्या निवडीने ते कदाचित या पदाचा वापर साहित्यापेक्षा धर्मप्रचारासाठी अधिक करतील, अशीही काहींना शंका आहे; परंतु त्यांच्या धर्मगुरू पदापेक्षा, त्यांच्या साहित्यापेक्षा अधिक श्रेष्ठ दर्जाचे त्यांचे कार्य हे निसर्ग, सामाजिक व राजकीय पर्यावरणामध्ये आहे- जे आज अत्यावश्यक झाले आहे. संमेलनातून त्यांनी या गोष्टींवर भर देणे गरजेचे आहे.

– मुरलीधर हरिश्चंद्र धंबा, डोंबिवली पश्चिम

तोपर्यंत भुवया उंचावलेल्याच राहतील!

‘‘धार्मिक’ लेखक’ हा अग्रलेख वाचला. प्रथमत: फादर दिब्रिटो यांचे अभिनंदन. परंतु स्वत:च्या साहित्यातून धर्माचा प्रसार दिब्रिटो यांनी केला आहे; त्यांच्या धार्मिक साहित्याचा समाचार अग्रलेखातून घेतलेला नाही. तसेच त्यांच्यातला धर्मगुरू हा त्यांच्यातील साहित्यिकावर मात करतो का, हेदेखील तपासायला हवे होते. २००९ साली महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या आनंद यादव यांच्यावर काही संघटनांनी चिखलफेक केली, त्यांना पुस्तक मागे घ्या, अशा धमक्या दिल्या आणि संमेलन उधळून लावले, तेव्हा दिब्रिटो यांनी काय भूमिका घेतली होती?

१९९९ साली ‘नवभारत’मधून मे. पुं. रेगे यांनी दिब्रिटो यांच्या साहित्याचे व त्यांच्या धर्मगुरूपणाचे अक्षरश: वाभाडे काढले होते, त्याचा उल्लेख अग्रलेखात आला आहे. रेगे यांच्या लेखाच्या पाश्र्वभूमीवर दिब्रिटो यांचे साहित्य आणि त्यांचे धर्मगुरू असणे या दोन्ही अंगांनी पुन्हा एकदा कठोर विश्लेषण होणे आवश्यक आहे. त्यास त्यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून व एक साहित्यिक म्हणूनही उत्तर देणे अपेक्षित आहे. तसेच पुरोगामी महाराष्ट्रातील साहित्यिक म्हणून दिब्रिटो यांची चर्चमधून पाळल्या जाणाऱ्या अंधश्रद्धांबद्दल, दिशाभूल करून, आमिष दाखवून केल्या जाणाऱ्या धर्मातराबद्दल काय भूमिका आहे, हेही कळणे आवश्यक आहे. थोडक्यात, वर उल्लेख केलेल्या अनेक बाबतींत दिब्रिटो यांचे विचार जोवर ते स्पष्टपणे लोकांसमोर मांडणार नाहीत, तोवर भुवया उंचावलेल्याच राहतील.

– धनंजय रघुनाथ सप्रे, पुणे</p>

संमेलनाध्यक्ष निवडीत साहित्यबाह्य़ निकष नकोत

‘साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर दिब्रिटो’ ही बातमी (२३ सप्टेंबर) वाचून आश्चर्य वाटले. या निवडीचे निकष काय होते, ते कळायला मार्ग नाही. पण ते काहीही असले, तरी ही निवड निव्वळ ‘साहित्यिक’ निकषांवर मात्र मुळीच योग्य वाटत नाही.

शुद्ध साहित्यिक निकषांबाबत बोलायचे झाले, तर प्रवीण दवणे यांचे जुलै, २०१५ पर्यंत प्रकाशित साहित्य थोडक्यात असे होते : बालसाहित्य प्रकारात मोडतील अशी १२ पुस्तके, एकांकिका तीन, नाटके पाच, ललित वैचारिक ग्रंथ ३३, काव्यसंग्रह ११, कथासंग्रह पाच आणि कादंबऱ्या तीन! हे सर्व साहित्य विविधांगी, सर्वस्पर्शी म्हणता येईल असे निश्चितच आहे. कवी ना. धों. महानोर यांची साहित्यिक कामगिरीसुद्धा- शुद्ध साहित्यिक निकषांवर दिब्रिटो यांच्यापेक्षा निश्चितच सरस ठरेल. त्यांचे सात काव्यसंग्रह प्रसिद्ध असून, त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. याउलट, फादर दिब्रिटो यांची मुख्य कामगिरी म्हणायची झाली, तर मराठी भाषक ख्रिश्चन समाजाचे मुखपत्र म्हणावे अशा ‘सुवार्ता’ मासिकाचे संपादन. याखेरीज साधारण पाच-सहा पुस्तके, ज्यातील निदान दोन ख्रिश्चन धर्माशी निगडित म्हणता येतील अशी आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी केलेला ‘बायबल : द न्यू टेस्टामेंट’चा मराठी अनुवाद ‘सुबोध बायबल : नवा करार’ हे तर उघड धार्मिक साहित्यच म्हणावे लागेल. अर्थात, फादर दिब्रिटो यांची साहित्यिक कामगिरी मुख्यत: ख्रिश्चन धर्माशी संबंधित आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. निदान साहित्याच्या क्षेत्रात तरी कुठलेही ‘साहित्यबाह्य़ निकष’ विचारात घेऊन ‘साहित्य संमेलनाध्यक्ष’ यासारख्या प्रतिष्ठेच्या पदावरील निवडी केल्या जाऊ  नयेत, असे वाटते.

– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली, मुंबई

‘बायबल’इतकेच ज्ञानोबा-तुकोबांचेही अभ्यासक

‘‘धार्मिक’ लेखक’ हा अग्रलेख वाचला. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर दिब्रिटो यांची झालेली अविरोध निवड हा खरे तर साहित्यप्रेमींसाठी सुखद धक्काच आहे. परंतु फादर दिब्रिटो यांची निवड म्हणजे एका समाजचिंतकाचा सन्मान आहे. ख्रिस्ती धर्मप्रसारक असले तरी त्यांनी कधीही वैचारिक भिंती उभ्या केल्या नाहीत. ‘बायबल’इतकाच संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांचाही त्यांचा अभ्यास आहे. केवळ ख्रिस्ती धर्मगुरू हीच त्यांची ओळख नाही. त्यांनी सतत सामाजिक भान ठेवले आहे. पर्यावरण हा दिब्रिटो यांच्या आस्थेचा विषय. वसईत त्यांनी पर्यावरण चळवळ उभी केली. पर्यावरणाचे संरक्षण आणि जतन यासाठी अविरत कष्ट घेतले. या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली होऊ घातलेले उस्मानाबादचे मराठी साहित्य संमेलन नक्कीच यशस्वी होईल आणि ते साहित्य क्षेत्रास नवी उभारी देणारे ठरेल.

– सुनील कुवरे, शिवडी, मुंबई

‘आधार कार्डा’तच आवश्यक बदल व्हावेत!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्वच नागरिकांना बहुउद्देशीय, बहुपयोगी असे एकच ओळखपत्र असायला हवे, अशी संकल्पना मांडल्याची बातमी (२४ सप्टेंबर) वाचली. ही संकल्पना चांगलीच आहे; परंतु तसेही सध्या अस्तित्वात असलेल्या ‘आधार ओळखपत्रा’च्या माध्यमातून बरीचशी कामे होत आहेत. हे आधार कार्ड आर्थिक व्यवहारांनाही जोडले गेले आहे. विविध नोंदणी, अर्जामध्ये आधार क्रमांक नोंदविणे अनिवार्य झाले आहे. सरकारी ओळखपत्र म्हणूनही त्याचा वापर होतो आहे. आधार कार्ड मतदान प्रक्रियेशी जोडले जाण्याची मागणीही होत आहे. संपूर्ण देशातील आधार नोंदणीसाठी मनुष्यबळ व पैसा वापरला गेलेला आहे. त्यामुळे नव्या ओळखपत्राऐवजी आधार कार्डातच सुधारणा करून त्यात विविध दस्तावेज समाविष्ट करणे इष्ट ठरेल. त्यासोबतच ही सर्व माहिती गोपनीय कशी राहील, या दृष्टीने उपाययोजना आखण्यावर भर द्यायला हवा. कारण मागे आधार कार्डाशी संबंधित तपशील ‘लीक’ झाल्याचे प्रकरण उघडकीस आलेले होते.

– दीपक काशिराम गुंडये, वरळी

नवा मोटार वाहन कायदा जनहितासाठीच; तरी..

‘पहिली बाजू’ सदरातील नितीन गडकरी यांचा ‘वाढीव दंडाची तरतूद जनहितासाठीच!’ हा लेख (२४ सप्टेंबर) वाचला. नवीन मोटार वाहन कायद्यामागच्या हेतूवर दुमत असण्याचे कारणच नाही. पण असे असले तरी रोगाचे निदान बरोबर आहे का आणि अर्थातच उपचार योग्य दिशेने चालू आहेत का, हे प्रश्न मनात येतातच. लेखातच म्हटले आहे की, पोलिसाने शिट्टी वाजवली तरी लोक सिग्नल तोडून पुढे निघून जातात. ते तसे करतात याचे कारण दंडाची रक्कम कमी हे आहे की तसे करूनही काही बिघडत नाही हा ‘व्यवस्थेवरील विश्वास’ (!) आहे? वाहतूक नियम मोडला तर पोलिसाने हटकणे, थांबवणे, चौकशी करणे, वेळेचा खोळंबा होणे, चारचौघांत खजील होणे या साऱ्याचा कायद्याचा धाक असण्यात मोठा वाटा असतो. दंडाची रक्कम कमी की जास्त, हा तिथे मुद्दा नसतो. (अमेरिकेसारख्या देशात नियम मोडल्यास रहदारीविषयक शिकवणी वर्गात जाऊन बसावे लागते. तिथे काही राज्यांमध्ये तर रस्त्यावर पोलिसांना मदत करण्याची ‘डय़ुटी’ लावली जाते. असे उपाय दंडापेक्षा जास्त परिणामकारक ठरतात.) आपल्याकडे काही प्रसंगी उलट पोलिसांनाच बदडून काढले जाते. हे बदलत नाही तोवर दंडाच्या रकमेला अर्थ नाही.

दुसरा मुद्दा- गुन्ह्यचे स्वरूप. वेगमर्यादा न पाळणे वगैरे यंत्राने मोजता येते आणि पोलीस नसतानाही परस्पर दंड करता येतो. परंतु त्याहीपेक्षा धोकादायक गोष्टी (एका दुचाकीवर तीन-चार जण बसणे, रस्त्याच्या उलट बाजूने जाणे, गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे/ संदेश पाठवणे, इत्यादी) केवळ कॅमेरा वगैरे वापरून ओळखता येतील का, हा प्रश्नच आहे. तिसरा मुद्दा- रहदारी म्हणजे केवळ वाहनचालक नव्हेत. पादचाऱ्यांच्या शिस्तीचे काय? रस्ता कुठेही ओलांडणे, मोबाइलवर बोलत निष्काळजीपणे चालणे हेसुद्धा गुन्हेच असायला हवेत. अनधिकृत फेरीवाल्यांमुळे पदपथ न मिळाल्याने रस्त्यावर चालावे लागणे, खड्डे, अनधिकृत होर्डिग यांमुळे होणारे अपघात, कुठेही उभारलेले अनधिकृत गतिरोधक, तोडून ठेवलेले रस्तेदुभाजक, उघडी गटारे, अपूर्ण स्थितीत सोडलेली रस्त्याची कामे.. या साऱ्याला जबाबदार कोण? हे सारे तसेच ठेवून इतर उपाय योजणे म्हणजे फक्त सोपा पेपर सोडवायला घेण्यासारखे आहे.

– प्रसाद दीक्षित, ठाणे</p>