News Flash

‘मतदार राजा’सुद्धा उत्सवातच मग्न!

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वारे वाहत असताना कोणताही राजकीय पक्ष दुष्काळासारख्या गंभीर समस्यांवर बोलताना दिसला नाही

(संग्रहित छायाचित्र)

‘मतदार राजा’सुद्धा उत्सवातच मग्न!

‘उत्सवी मग्न ‘राजा’!’ हा अग्रलेख २९ एप्रिल रोजी वाचला. भारतामध्ये दुष्काळ ही एक गंभीर समस्या म्हणून गेली अनेक दशके त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या आणि तसेच ग्रामीण भागात एका घागरीसाठी कित्येक मल चालत जाणारे पायाला चटके सोसणारे अंगाची लाहीलाही होणाऱ्या उन्हात ‘कोणी पाणी देते का पाणी’ अशी हाक मारणारा ग्रामीण भागातील दुर्बल समाज ज्याचा या घडीला कोणी कैवारी म्हणून पुढे येण्यास तयार नाही आणि दुसरीकडे दोन वेळा आपले शरीर खंगाळणारा आणि हजारो लाखो लिटर पाणी असलेल्या तरणतलावामध्ये दिवसभर डुबकी मारणारा असा दुसरा वर्ग आहे, आजघडीला शहरी आणि ग्रामीण समाज यामधील दरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ‘काही भागांत सरासरी पाऊस पडलेला असूनही दुष्काळ आणि काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस म्हणूनही दुष्काळ’ – यातील फरक सर्वप्रथम स्पष्ट करणे गरजेचे आहे आणि यामागील महत्त्वाचे कारण, पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनाची वानवा आणि पर्जन्याचे अचूक अंदाज देणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभाव हेच म्हणावे लागेल.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वारे वाहत असताना कोणताही राजकीय पक्ष दुष्काळासारख्या गंभीर समस्यांवर बोलताना दिसला नाही. परंतु जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये एक जागरूक मतदार म्हणून दुष्काळासारख्या असो किंवा इतर काही गंभीर समस्या असो, आपण तरी किती बोललो? हा मतदार राजाच अग्रलेखाच्या शीर्षकाप्रमाणे ‘उत्सवी मग्न राजा’ झाल्यासारखे वाटते.

– सूरज जगताप, नंदगौळ (ता. परळी, बीड)

विकासाच्या हव्यासापेक्षा सुसंस्कृततेची गरज

दुष्काळ किंवा अवर्षण ही नसर्गिक; परंतु मानवी वाटा अधिक असणारी आणि मानवालाच भेडसावत असणारी समस्या असून तिच्या निरसनासाठी मानवी प्रयत्नांचीच आवश्यकता असते यात कोणत्याही विचारी जनांचे दुमत असणार नाही. समस्या निवारण्याच्या या पटलावर कोणाकडून, किती आणि कसे प्रयत्न होत आहेत हे सर्वश्रुत आहे. परंतु हे प्रयत्न ‘पुरेसे आणि योग्य दिशेने’ होत आहेत का? – याचे नकारार्थी उत्तर मिळण्याचीच शक्यता अधिक. म्हणजेच सध्या सुरू असलेले उपाय हे समस्यारूपी वृक्षाच्या फक्त फांद्या कापणारेच आहेत. त्या वृक्षाच्या कचाटय़ातून मुक्त होण्याकरिता त्याचे समूळ उच्चाटन होणेच गरजेचे आहे. यासाठी केवळ एकाचेच नव्हे तर सर्वाचे म्हणजे सरकारचे आणि ग्रामीण, शहरी, गरीब, श्रीमंत अशा सर्व पातळीवरील नागरिकांनी एकजुटीने प्रयत्न करणे अगत्याचे आहे.

परंतु धर्म, जात, वर्ग, ग्रामीण व शहरी अशा विविध गटांत विखुरलेल्या आणि आपल्याच ‘गट-राज्या’त मश्गुल असलेल्या या लोकांकडून असे सर्वागीण प्रयत्न होणे किती शक्य आहे हे ज्याचे त्यानेच ठरवावे.

त्यामुळेच, जर खरोखरच या समस्येचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर ‘समता, बंधुत्व आणि जगता जगता इतरानाही जगविणे’, तत्त्वे पाचवीला पुजलेली असणाऱ्या ‘विकासवादी’ नव्हे तर सुसंस्कृत अशा देशाची म्हणजेच नागरिकांची नितांत आवश्यकता आहे.

– ज्ञानदीप भास्कर शिंगाडे, कन्हान (नागपूर)

पाणी संगोपनासाठी व्यक्तिगत सहकार्य हवे..

‘उत्सवी मग्न ‘राजा’!’ हा अग्रलेख (२९ एप्रिल) वाचला. ज्या क्षेत्रात पाणीटंचाई निर्माण झाली त्या क्षेत्रातील लोकांना काही अंशी पाण्याची मौलिकता कळली असावी; परंतु ज्या क्षेत्रात पाणी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे, तिथे मात्र आजही पाण्याची किंमत कळली असावी असे तिळमात्र जाणवत नाही. यंदा सरासरी पर्जन्यमान झाले हे जरी खरे असले तरी मान्सून पाण्याची जशी साठवणूक व्हावी, जपवणूक व्हावी, जी व्यवस्था व्हावी ती सध्या तरी भारतासारख्या बहुसंख्य देशांत होत असल्याचे दिसत नाही. अशा परिस्थितीत केवळ समस्याकेंद्री उपाययोजना असून भागणार नाही, तर समस्येवर तोडगा म्हणून सर्वानी पाणी संगोपनासाठी व्यक्तिगतरीत्या सहकार्य करून सहभागी होणे आवश्यक आहे.

– प्रा. किशोर मेंढे, आमगांव (जि. गोंदिया)

पर्जन्यमानात वाढ घडवण्यासाठी..

पाणीसमस्येवर मात करण्यासाठी पर्जन्यमानामध्ये वाढ घडवून आणायची असेल तर सरकारला नदीजोड प्रकल्प हाती घ्यावे लागतील. त्यासाठी आहेत त्या नद्या आधी राखाव्या लागतील. दुसऱ्या बाजूने नागरिकांनी सरकारच्या हाताला हात लावले पाहिजे. त्यासाठी पहिले पाऊल म्हणून स्वत: किमान एक ते दोन झाडे लावली पाहिजेत, तरच पर्जन्यमानामध्ये वाढ घडवून आणता येईल.

– अंकित रामदासजी बगाईतकार, निमखेडा (ता. पारशिवनी, नागपूर)

मातामृत्यू, बालमृत्यू या समस्या तीव्रच! 

‘मेळघाटात वर्षभरात २४७ बालमृत्यू’ ही बातमी (लोकसत्ता, २९ एप्रिल) जिवाला चटका लावणारी आहे. ज्या आपल्या देशात आपण महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत आहोत, त्याच देशातल्या अवघ्या एका राज्यात, एका भागात एवढे मृत्यू! आजही बालमृत्यू दर, मातामृत्यू दर अशा समस्यांशी आपल्या देशाला दोन हात करता आलेले नाहीत. ही बाब देशाला तसेच पुरोगामी महाराष्ट्राला नक्कीच अशोभनीय आहे.

एकीकडे विकासाच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे अशा भीषण समस्या अद्यापही तितक्याच तीव्र आहेत. निवडणुकीच्या नादात कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू या गंभीर विषयांवर बोलण्याची धमक एकाही राजकीय पक्षाकडे नाही किंवा या विषयांवर बोलण्याची गरजही वाटत नाही, ही शरमेची बाब आहे.

– निरंजन युवराज जनवाडे, टाकवडे (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर)

अशी शिकवणूक; तशी राजकीय मानसिकता!

शहीद करकरे खरे सुपरहिरो होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी देशाची सेवाच केली; त्यात त्यांनी कधीच स्वत:च्या परिवाराला अधिक महत्त्वाचे मानले नाही. त्यांच्या जाण्याने देशातील एक निडर, कर्तव्यदक्ष अधिकारी तर आपण गमावलाच, पण त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर झालेला आघातही खूप मोठा होता. ‘पपा म्हणायचे, दहशतवादाला धर्म नसतो’ या शीर्षकाच्या मुलाखतीत (लोकसत्ता, २८ एप्रिल) करकरे यांच्या विवाहित कन्या जुई नवरे यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचे आजोबाही सुपरहिरो होते ते खरेच आहे. एवढे असूनही कोणी तरी त्यांच्याबद्दल काही वक्तव्ये केली आणि त्याला फारसे महत्त्व नाही, असे मुलाखतीत सांगणे, हेच त्यांनी कशी शिकवणूक दिली हे सांगून जाते!

शहीद करकरे हे माझ्यासारख्या खूप तरुणांचे, आणखीही अनेकांचे ‘रोल मॉडेल’ होते, आहेत आणि राहतील. त्यांनी केलेली कामे ही न विसरण्यासारखीच आहेत. मुंबई हल्ल्याच्या वेळीही क्षणाचाही विलंब न करता त्यांनी त्यांचे कर्तव्य चोख बजावले, प्राणाची बाजी लावली आणि तरीही त्यांच्यावर कधी कधी काही आक्षेप घेतले जावेत, हे आपल्या देशातील राजकीय मानसिकता दाखवून देते. मात्र कोणी कितीही काही म्हणो, अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांमागे सामान्य जनता नेहमी असते आणि ती असावी, हीच अपेक्षा!

– उमाकांत सदाशिव स्वामी, पालम (जि. परभणी)

नकारात्मक कृत्यांनी ध्येयपूर्ती होत नसते..

‘पपा म्हणायचे, की दहशतवादाला धर्म नसतो..’ ही मुलाखत (२८ एप्रिल) वाचली. व्यापक समाजहितासाठी, देशासाठी, लोकशाहीसाठी स्वातंत्र्योत्तर भारतात ज्या वीराने शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला तो पहिलाच शूर-वीर, आधुनिक वाघ म्हणजे करकरे होय. कुणी काहीही म्हटले तरी त्यांचे नाव मानवजातीच्या इतिहासात सदैव सुवर्णाक्षरांत लिहिले जाईल हे नक्की.

या देशात लोकशाही व्यवस्थेचा सर्वाधिक लाभ ज्या आरक्षित घटकांना झाला त्यांचे हजारो लोक भारतीय पोलीस सेवा (आयपीएस), गुप्तचर विभाग, लष्कर इ. विभागांत असूनही त्यांच्यापैकी कुणालाही हे सर्व दिसलेच नसेल असे शक्य नाही, पण त्याविरुद्ध लढण्यासाठी जे शौर्य, जो प्रामाणिकपणा आणि खाल्लेल्या मिठाला (संविधानाधारित लोकशाहीला) मरेपर्यंत जागण्याची मनीषा या बाबी फक्त करकरे यांच्यातच दिसल्या. करकरेंच्या बलिदानातून जे तथ्य प्रकर्षांने समोर येते ते म्हणजे ‘दहशतवादाला धर्म नसतो तसेच वर्ण व जातही नसते’ हेही सिद्ध होते. कारण करकरे, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गीपासून ते सुनील जोशी आदीपर्यंत ज्यांची ज्यांची हत्या झाली त्यातील संशयित हे एकाच धर्माचे, एकाच वंशाचे, एकाच जातीचे असल्याचे दिसून येते. यातून एकच निष्कर्ष काढता येतो तो म्हणजे ‘दुसऱ्यासाठी खड्डा खोदला तर एक ना एक दिवस आपण स्वत:च त्यात पडतो किंवा स्वत:च्याच माणसाला त्यात ढकलतो’  व ‘नकारात्मक कृत्यांतून सकारात्मक ध्येये कधीही साध्य करता येत नाहीत.’

– सय्यद मारुफ सय्यद महेमूद, नांदेड

इतक्या वर्षांत झाले नाही, ते होत असल्यास..

‘मुस्लिमांची वाटचाल निर्भयतेकडे !’  हा इरीना अकबर यांचा लेख (रविवार विशेष, २८ एप्रिल) वाचला. लेखिकेने मुस्लिम समाजाच्या सक्षमीकरणासाठी काही गट व व्यक्ती झटत असल्याची काही उदाहरणं दिली आहेत. मला वाटत ४०-४५ वर्षांपूर्वी -एकटय़ा दुकटय़ाकडून नव्हे तर सामूहिकरीत्या – हे झाले असते तर आज वेगळे चित्र दिसले असते. जास्तीत जास्त मुस्लिमांनी सन्यदलात जावे, उच्चशिक्षित व्हावे, थोडक्यात त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणावे, यासाठी म्हणावे तसे  प्रयत्न झालेच नाहीत. दोन्हीही समाज एकमेकांपासून दूर रहातील याची काळजी घेतली गेली, असे खेदाने म्हणावेसे वाटते. जे इतक्या वर्षांत झाले नाही, ते होत असल्यास आनंदच.

– शैलेश न. पुरोहित, मुलुंड पूर्व (मुंबई)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 12:02 am

Web Title: loksatta readers reaction readers letter 2
Next Stories
1 महिलेचा पूर्वेतिहास काहीही असला तरी लैंगिक छळ समर्थनीय नाही!
2 दैवतीकरण लोकशाहीला मारकच
3 जातीमुळेच खासदार बनलेल्यांकडून व्यवस्थेत बदल कसा होणार?
Just Now!
X