स्थलांतरित, गोरेतरांनासुद्धा महत्त्वाचे स्थान

‘कमलाची ओळख!’ हे संपादकीय (१४ ऑगस्ट) वाचले. कमला हॅरिस या मूळ भारतीय वंशाच्या असणे, एवढेच नव्हे तर त्यांच्या नावात ‘कमल’ असणे एवढय़ानेसुद्धा आपल्याकडे अनेकांना धुंदी चढू शकते! त्यामुळे कमला हॅरिस यांनी काश्मीर प्रश्नाविषयी, काश्मिरी जनतेच्या स्थितीविषयी व एकूण मानवतावादाविषयी केलेली विधाने मात्र अशांच्या विस्मरणात जातील. दुसरे म्हणजे, जगभरात- विशेषत: अमेरिकेत उजव्या विचारसरणीकडील द्वेषमूलक व संकुचित राजकारणाकडे झुकत असलेला कल बघता सहिष्णुता, सहअस्तित्व आणि साहचर्य या मूल्यांना जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या कमला हॅरिस यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाला (युवा) मतदारांची कितपत साथ मिळेल, याबद्दल अजूनही शंका आहेत. तरीसुद्धा आक्रमकपणाने मते मांडण्याचे प्राथमिक धडे मिळालेल्या व अमेरिकेच्या राजकीय पटावर स्थलांतरित, गोरेतरांनासुद्धा महत्त्वाचे स्थान मिळू शकते या आशादायी विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कमला हॅरिस यांना अमेरिकेतील डेमोकॅट्रिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाची उमेदवारी मिळेपर्यंतचा प्रवास हा निश्चितच कौतुकास्पद आहे. अमेरिकेतील ‘अभिमानी’ भारतीय आणि आपल्या येथील आंदोलकांनासुद्धा कमला हॅरिस यांची ही उमेदवारीसाठीची निवड नक्कीच प्रेरणादायी ठरू शकेल.

– प्रभाकर नानावटी, पुणे</p>

प्रगल्भ भारतीयांनी हा तोल सांभाळावा..

मूळ भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना अमेरिकेतील डेमोकॅट्रिक पक्षाची उपाध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली, ही बातमी वाचून आनंद झाला. दुसऱ्या देशाचे  नागरिकत्व मिळवून निरनिराळ्या क्षेत्रांत नाव, पैसा, कीर्ती, ज्ञान-कौशल्य मिळविणारे आता असंख्य लोक आहेत. त्याची नवलाई आता नाही. ज्यो बायडेन अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यांनी कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्नियात उत्तम काम केले आहे, याची नोंद केली आहे. हे अधिक महत्त्वाचे आहे. अनेकांनी त्यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या भारतीय वंशाचा उल्लेख केला नाही. ही गोष्ट भारतीयांनी, विशेषत: परदेशातील भारतीयांनी लक्षात घेतली पाहिजे. नोबेल पारितोषिक विजेते डॉ. वेंकटरामन रामकृष्णन यांनी ‘आपण भारतीय नाही’ हे आवर्जून लक्षात आणून दिले होते. मूळ भारतीय असलेल्या लोकांनी आपल्या नवीन देशाशी, तेथील वातावरणात मिसळून गेले पाहिजे, तेथील इतिहास-संस्कृतीशी समरस झाले पाहिजे. कमला हॅरिस किंवा डॉ. वेंकी रामकृष्णन यांच्यासारखे प्रगल्भ अभिजन हा तोल सांभाळतात. इंग्लंड, अमेरिका, कॅनडा आदी देशांत मूळ भारतीय वंशाच्या काही व्यक्ती अशी राजकीयदृष्टय़ा महत्त्वाची पदे सांभाळत आहेत. स्थानिकांनी त्यांना विरोध केल्याचे किंवा तो एक जीवनमरणाचा/ इभ्रतीचा विषय केल्याचे दिसले नाही. पण भारतात मात्र सोनिया गांधी यांचे नावही जाहीर झालेले नसताना, त्यांच्या काँग्रेस पक्षाने बहुमत मिळविल्याचे दिसताच आकांडतांडव झाले होते, हे स्मरते. एक देश म्हणून आणि अशा देशाचे नागरिक म्हणून आपली वाढ १५ वर्षांपूर्वीही खुंटलेली होती. आतापर्यंत परिस्थिती अधिकच खालावलेली आहे. राज्यघटनेप्रमाणे भारतात बहुसांस्कृतिक आणि निधर्मी लोकशाही आहे. नागरिकत्वाचा संबंध वंश किंवा धर्माशी नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला कोणतेही राजकीय पद, स्थान मिळू शकते. हेच आपल्याला अमेरिकी कमला हॅरिस यांच्या उमेदवारीतून शिकायला हवे.

– डॉ. अनिल केशव खांडेकर, पुणे

सनद निवडणुकांदरम्यान बोथट होऊ नये!

‘करसुधारणांचे नवे पाऊल!’ हे वृत्त (लोकसत्ता, १४ ऑगस्ट) वाचले. सरकारचे स्तुत्य पाऊल आहे. आपल्या देशात सरकार बरेच काही सुधारण्याचा प्रयत्न करीत असते. फक्त सक्त अंमलबजावणीअभावी त्याची माती होताना आपण पाहतो. दिवाळखोरीची सनद, रेरा ही त्याची बोलकी उदाहरणे. ‘करविषयक कामांमध्ये कमीत कमी मानवी हस्तक्षेप’ हा ‘लायसन्स-अधिकारी राज’ हटवल्यानंतरचा मोठा प्रयत्न असेल. पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे याने भ्रष्टाचाराला आळा बसल्यास उत्तम. फक्त निवडणुकांदरम्यान ही सनद बोथट होऊ नये ही अपेक्षा!

– शैलेश न. पुरोहित, मुलुंड पूर्व (मुंबई)

गुंतागुंत वाढवण्यापेक्षा सद्य:स्थितीकडे पाहा..

‘धार्मिक स्थळांना तूर्त परवानगी नाही!; राज्य सरकारचे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण’ हे वृत्त (लोकसत्ता, १४ ऑगस्ट) वाचले. राज्य सरकारने सद्य:स्थितीचा विचार करूनच धार्मिक स्थळे खुली करण्यास मनाई केली आहे. ते योग्यच आहे. कारण सरकारने मंदिरे अथवा धार्मिक स्थळे खुली केल्यास लोकांच्या देवदर्शनासाठी अक्षरश: रांगा लागणार. त्यामुळे दोन व्यक्तींमध्ये योग्य ते अंतर राखले जाणार नाही. काही लोक तोंडावर मुखपट्टी लावण्याचा साधा नियमदेखील पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे या असल्या प्रकारातूनच संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, ‘पर्युषण काळ हा आमच्यासाठी महत्त्वाचा असतो. तेव्हा शेवटच्या दिवशी तरी मंदिरात जाण्याची परवानगी द्यावी.’ परंतु आज कोणासाठी पर्युषण काळ महत्त्वाचा असेल, उद्या कोणासाठी श्रावण महिना महत्त्वाचा असेल. अशी ही गुंतागुंत वाढतच जाणार. त्यामुळे सध्या करोना संसर्गाची स्थिती पाहता घरीच राहून पूजा करणे रास्त ठरेल. धार्मिक स्थळांवरील बंदीमुळे त्यांचे घसघशीत उत्पन्नदेखील बुडते आहे; परंतु त्याला काहीच इलाज नाही.

– गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली पूर्व (मुंबई)

हे इशारे वास्तवात येतील?

वैद्यकीय क्षेत्रातील जे लोक करोना संकटकाळात रुग्णांकडून अवाजवी पैसे उकळतील त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्र्यांनी नुकताच (वृत्त : लोकसत्ता, १२ ऑगस्ट) दिला आहे. करोना संकटकाळात जे डॉक्टर आपले खासगी दवाखाने बंद ठेवतील त्यांच्याविरुद्ध शासन कडक कारवाई करेल, असाही इशारा खासगी डॉक्टरांना दिलेला होताच. त्या इशाऱ्याचे प्रत्यक्षात काय झाले, हे कळायला मार्ग नाही. अगदी प्रथम वैयक्तिक सुरक्षा साधने (पीपीई संच) सहज उपलब्ध नव्हती म्हणून संसर्गाच्या भीतीचे कारण त्या वेळी पुढे केले जात होते. आज पीपीई संच उपलब्ध असूनही किती खासगी दवाखाने उघडे आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे हा इशारा किती प्रभावी ठरतो हे येणारा काळच ठरवेल. अन्यथा नेहमीसारखच मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असे व्हायचे!

– मोहन गद्रे, कांदिवली (मुंबई)