15 July 2020

News Flash

विश्वासार्हतेसाठी वैज्ञानिक दिव्यातून जावेच लागेल

योग्य उपचार न मिळाल्याने स्वत:चे नुकसानही करून घेतील. परंतु सदासर्वदा सर्व लोकांना मूर्ख बनवले जाऊ शकत नाही.

संग्रहित छायाचित्र

 

विश्वासार्हतेसाठी वैज्ञानिक दिव्यातून जावेच लागेल

अवैज्ञानिक वैदू मंडळींना खडे बोल सुनावणे अत्यंत गरजेचे होते, ते काम ‘आयुर्वेद वाचवा!’ या अग्रलेखाने (२६ जून) केले. आयुर्वेदाचे नुकसान हे त्याच्या शिक्षणाला आणि वापराला शतकानुशतके एका विशिष्ट वर्णापुरतेच मर्यादित ठेवल्याने सुरू झाले आहे. दुसरे म्हणजे, त्याला विज्ञान न मानता धार्मिक श्रद्धेशी जोडले गेले. धार्मिक श्रद्धांना धर्ममरतडांचा विरोध असतोच. त्यामुळे ग्रंथप्रामाण्यात अडकल्याने त्यात कालानुरूप सुधारणा होऊ शकल्या नाहीत आणि आयुर्वेद हजारो वर्षांपूर्वीच्या अवस्थेतच कुंठित झाला. त्याउलट अ‍ॅलोपॅथिक औषधाने वेळोवेळी आपल्यात सुधारणा केल्या, नवनवीन शोध लावले. तसेच अ‍ॅलोपॅथीने ‘जुने ते सोने’ हा आग्रह अजिबात धरला नाही. उलट सुधारणा करून नवनवी औषधे बाजारात आणली. हे करताना ज्या कठोर चाचण्या कराव्या लागतात, अभ्यास-संशोधन करावे लागते, तसे करताना हे वैदू दिसत नाहीत. आयुर्वेदाला धार्मिक श्रद्धेतून बाहेर काढून आधुनिक विज्ञानाकडे ते आणू शकले नाहीत. आंतरराष्ट्रीय औषध बाजारात विश्वासार्हता, उपयुक्तता सिद्ध करायची असेल, त्याला आरोग्य विज्ञान म्हणून जगासमोर आणायचे असेल, तर या साऱ्या वैज्ञानिक दिव्यातून आयुर्वेदाला जावेच लागेल. ते न करता आयुर्वेदावरील श्रद्धेचा बुरखा पांघरल्यामुळे काही लोक काही काळ भुलतील. योग्य उपचार न मिळाल्याने स्वत:चे नुकसानही करून घेतील. परंतु सदासर्वदा सर्व लोकांना मूर्ख बनवले जाऊ शकत नाही.

– उत्तम जोगदंड, कल्याण (जि. ठाणे)

‘आयुर्वेद वाचवा’ हे खरे; पण कोणापासून?

‘आयुर्वेद वाचवा!’ हा अग्रलेख (२६ जून) वाचला. बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषद घेऊन कोविड-१९ करिता औषधांचा संच बाजारात आणला. त्या वेळी त्यांनी काही अतिशयोक्त वाटणारी विधाने केली. त्यावर रामदेव यांनी चाचण्या न घेता कशी औषधे आणली, असा प्रश्न विचारला गेला. यापूर्वी रेमडेसिवीरसारखी इतर आजारांकरिता मान्यताप्राप्त औषधे कोविडसाठी म्हणून बाजारात आली, तेव्हा कोणीही त्यांच्या चाचण्या कशा, कुठे झाल्या याबद्दल अवाक्षरदेखील काढले नाही. परंतु आयुर्वेदाचे औषध आले म्हणून फुकाचा टाहो कशासाठी? औषधे बाजारात आणण्यापूर्वी त्यांना मान्यता देणारी एक परिपूर्ण कार्यकारी व्यवस्था अस्तित्वात असताना, आयुष विभागाने अनावश्यक काढलेल्या फतव्यामुळे हा वाद ओढवला आहे. त्यांनी फक्त जाहिरातीस मनाई केली आहे, औषध उत्पादन, वितरण आणि विक्रीस कुठलीही बंदी नाही. बाबा रामदेव हे एक व्यावसायिक आहेत. त्यांनी प्रशिक्षित वैद्यामार्फत जर हे औषधोपचार प्रमाणित केले असतील, तर त्यावर आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. ‘आयुर्वेद वाचवा’ हे खरे; पण कोणापासून? तर न कर्त्यां वैद्यापासून, अनाकलनीय निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांपासून आयुर्वेद वाचवणे आवश्यक आहे.

– डॉ. संजय छाजेड, मुंबई

आयुर्वेदिक उत्पादनांची मानके विज्ञाननिष्ठ हवीत

‘आयुर्वेद वाचवा!’ हा अग्रलेख वाचला. भारत हा जगात सर्वाधिक आयुर्वेदिक उत्पादने वापरणारा देश आहे. मात्र आपल्याकडे आयुर्वेदिक उत्पादनांबाबत औषधविज्ञाननिष्ठतेपेक्षा खालील मानकेच जास्त लागू पडतात : (१) परंपरा : भारतीय परंपरा श्रेष्ठच आहे, पण एखाद्या औषधाला परंपरेच्या मानकात बसवणे कधीही चुकीचेच. (२) संस्कृती : आयुर्वेदाची संस्कृती भारताचे भूषणच, पण संस्कृतीच्या मानकाचा एखाद्या आयुर्वेदिक औषधाला आधार असावा हे पटणारे नाही. (३) बाबा/भोंदू : यांचा आधार कमी होतोय की वाढतोय, तेच समजायला मार्ग नाही. अंधश्रद्धा आयुर्वेदासाठी कधीही शापच. दुर्दैवाने त्याचाही आधार घेतला जातो हे वेगळे सांगायला नको.

ही मानके (?) अस्वीकारार्ह आहेत. चिकित्सकता व सचोटीच्या पातळीवर विज्ञाननिष्ठतेच्या सर्व कसोटय़ा पार पडल्यानंतर जे आयुर्वेद आपल्या हातात पडेल, ते अमृतच!

– भीमाशंकर बाबुराव शेतसंदी, राजूर (जि. सोलापूर)

स्वयंघोषित तज्ज्ञांमुळे आयुर्वेदाचे अतोनात नुकसान

‘आयुर्वेद वाचवा!’ हे संपादकीय (२६ जून) नेमके आणि सुस्पष्ट आहे. स्वयंघोषित तज्ज्ञांमुळे आयुर्वेद या औषधी शाखेचे अतोनात नुकसान होत आहे. या बुवांकडे ना कोणते परिमाण, ना निकष! संत तुकारामांच्या भाषेत ‘ऐशा नरा मोजून हाणावे पैजारा’ हेच खरे! आपल्याकडे करोनाचा प्रवेश झाला त्या सुमारास बाबा रामदेवांनी एका वृत्तवाहिनीवर- ‘भारतात करोनाचा प्रकोप फारसा जाणवणार नाही, ३५-३६ अंश सेल्सियसपुढे तापमान गेल्यावर करोना विषाणू टिकाव धरणार नाहीत,’ असे विधान केले होते. प्रत्यक्ष स्थिती काय आहे? शिवाय भारतात प्रारंभी काही जण दुबईहून करोनाची लागण घेऊन आले. तिथले तापमान नेहमीच ४० अंशांच्या पुढे असते, याची जाणीव बाबा रामदेवांना नाही का? अशा मंडळींनी लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत टाळीबाज वाक्ये पेरणे बंद करून जगण्यात आणि वागण्यात नेमस्तपणा ठेवला तरच आयुर्वेदासारखी औषधप्रणाली भविष्यात कायम राहील.

– सुबोध गद्रे, कोल्हापूर

भारतीय श्रमशक्ती अमेरिकेला स्वीकारावीच लागेल!

‘आत्मनिर्भर अमेरिका’ (२५ जून) या अग्रलेखावरील ‘चिप्स.. संगणकातील की बटाटय़ाच्या?’ हे वाचकपत्र (लोकमानस, २६ जून) वाचले. पत्रलेखकाच्या मते, भारतातील शेअर बाजारापासून शीतपेयांपर्यंत प्रत्येक उद्योगधंद्यात अमेरिकी भांडवल मुक्तपणे वावरत असते आणि हे एक प्रकारे अमेरिकेकडून होणारे  ‘एकतर्फी जागतिकीकरण’ असून त्यावर टीका व्हावी. पण पत्रलेखकानेच म्हटल्याप्रमाणे भारत एक वर्धिष्णू बाजारपेठ असलेला प्रगतशील (प्रगत नव्हे!) असा तिसऱ्या जगतात मोडणारा देश आहे; त्यामुळे साहजिकच सर्वच प्रगत आणि प्रगतशील देशांची पालनकर्ती असणाऱ्या अमेरिका या जागतिक आर्थिक महासत्तेची मदत आपल्याला घ्यावीच लागते. जागतिक मुक्त अर्थव्यवस्था राबवणाऱ्या जागतिक व्यापार संघटनेचे आपण सभासद असल्याने जागतिक बाजाराशी एकरूप होणे, तेथील मागणी-पुरवठा तत्त्वानुसार उद्योगधंदे वाढवून आपली आर्थिक व्यवस्था बळकट करणे हेच शहाणपणाचे धोरण आहे. अन्यथा आपलेच आर्थिक नुकसान होऊ शकते; जसे की, चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याची भाषा करून सध्या आपणच आपली आर्थिक व्यवस्था आणि उद्योगधंदे अडचणीत आणू पाहात आहोत. याखेरीज याच मागणी-पुरवठा तत्त्वानुसार भारतीय श्रमशक्तीचा स्वीकार किंवा अंतर्भाव अमेरिकी अर्थव्यवस्थेला एक ना एक दिवस करावाच लागणार, हे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्पदेखील जाणून असतील!

– चित्रा वैद्य, औंध (जि. पुणे)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 12:00 am

Web Title: loksatta readers response email letter abn 97 27
Next Stories
1 अपयश झाकण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न
2 आधीच्या निर्णयात कोणत्या गंभीर उणिवा राहिल्या?
3 संजीवनी मिळाली, आता अधिकारांचे केंद्रीकरण टाळा
Just Now!
X