अशा पालकांचे शुल्क शासनाने भरावे..

‘शाळांकडून शुल्क वसुली; पालकांची न्यायालयात धाव’ हे वृत्त (लोकसत्ता, ११ ऑगस्ट) अत्यंत क्लेशकारक आहे. याआधीही ‘कर्ज काढून शाळेचे शुल्क भरा’ असा सल्ला एका शाळेच्या व्यवस्थापनाने दिल्याचे वृत्त वाचनात आले होते. अर्थात, ‘खर्चाधारित शुल्क’ असे धोरण ठरवल्यावर आणि पालकांनीही ते मान्य केल्यावर याहून वेगळी अपेक्षा करता येणार नाही. कारण विनाअनुदानाचे धोरण ठरविले गेल्यानंतर शिक्षणक्षेत्रात आलेल्या बहुतेक संस्था शिक्षणप्रेम आणि शिक्षणप्रसार याव्यतिरिक्त अन्य हेतूंनी आल्या आहेत. म्हणूनच करोनासारख्या कठीण काळातही शुल्क वसुलीसाठी पालकांकडे तगादे लावले जात आहेत, मुलांना शाळांतून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हे शिक्षणक्षेत्राला केवळ अशोभनीय नाही, तर कलंकित करणारे आहे.

याबाबतीत अन्य काही करण्याची कुवत वा इच्छा नसल्याने पालक वारंवार न्यायालयात जातात. आजवर तरी त्याने फार काही साध्य झालेले दिसत नाही. हे पाहता, ज्या पालकांच्या करोनाकाळात नोकऱ्या गेल्या आहेत वा उत्पन्नाचे साधन हिरावले गेले आहे, त्यांचे शुल्क शासनाने भरायला हवे. २००९ च्या शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे सहा ते १४ या वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि आता तर नव्या शैक्षणिक धोरणात या अधिकाराची व्याप्ती वाढवून ती तीन ते १८ अशी करण्याचे ठरवले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी ही योग्य वेळ आहे.

– डॉ. विवेक कोरडे (शिक्षण व्यापारीकरणविरोधी मंच), मुंबई</p>

राममंदिराप्रमाणे सीमाप्रश्नावरही तोडगा निघेल का?

‘पुतळ्याचे पडसाद’ हा अन्वयार्थ (११ ऑगस्ट) वाचला. बेळगाव-कारवार सीमाप्रश्न गेली ६० वर्षे अनिर्णित अवस्थेत आहे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे यांनी सीमाप्रश्न सर्वप्रथम ऐरणीवर आणला. १९६९ मध्ये शिवसेनेने मुंबईत आंदोलन केले होते. त्यामध्ये ६७ जण प्राणास मुकले होते. केंद्रामध्ये आणि महाराष्ट्र व कर्नाटकात सत्ताबदल झाले, परंतु कुठल्याही सरकारने सीमाप्रश्न सोडवण्यासाठी विशेष आस्था दाखविली नाही. महाराष्ट्रात अशांतता निर्माण व्हावी म्हणून कर्नाटकातील नेते हेतुपुरस्सर वादग्रस्त विधाने करतात. मणगुत्तीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हटविल्यामुळे त्याची संतप्त प्रतिक्रिया साहजिकच महाराष्ट्रात उमटली. मुद्दा इतकाच की, जर इतकी वर्षे प्रलंबित असलेल्या रामजन्मभूमीच्या भावनिक प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, तर मग गेली ६० वर्षे प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नावर तोडगा निघेल का?

– प्रवीण हिर्लेकर, डोंगरी (मुंबई)

कर्नाटकात भाजपच सत्तेत आहे म्हणून..

‘पुतळ्याचे पडसाद’ हा लेख (‘अन्वयार्थ’, ११ ऑगस्ट) वाचला. देशात जरा कुठे शांतता प्रस्थापित होत असताना, काही जणांना त्यात मिठाचा खडा टाकण्याची सवय असते. हे करण्यात त्यांना कसला आनंद मिळतो, तेच समजत नाही. बेळगावमधील मणगुत्ती या गावातील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हटविल्यानंतर शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच आहे. परंतु खरी कोंडी झाली आहे ती भाजपची. नाही तर त्यावरूनसुद्धा भाजपने राजकारण सुरू केले असते! सध्या करोनावरूनही ‘महाविकास आघाडी सरकार हा रोग नियंत्रणात आणण्यात अयशस्वी ठरले आहे’ अशी टीका भाजपकडून करून झाली. त्यानंतर ‘महाड, रायगड येथील वादळग्रस्त भागांना अजून मदत मिळालेली नाही’ असा कंठशोष करून झाला. परंतु भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक सरकारने शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला आहे; त्यामुळे भाजपला आता बोलायला जागा उरलेली नाही.

– गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली पूर्व (मुंबई)

सत्कार्याचा सैलावलेला पाया..

‘आनंदवनातील दुभंगावर लवकरच तोडगा : डॉ. प्रकाश आमटे’ हे वृत्त (लोकसत्ता, ९ ऑगस्ट) वाचले. बाबा आमटे यांचे दोन प्रकल्प म्हणजे जणू त्यांचे दोन पुत्र! हेमलकसा आणि प्रकाश, आनंदवन आणि विकास! कुठलेही काम म्हटले की, सर्वप्रथम समाजाकडून टीकाटिप्पणीच होत असते. ते समाजमान्य होईपर्यंत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आमटे कुटुंबीयांनाही यातून जावेच लागले. पण कशाचीही पर्वा न करता ते त्यांचे कार्य करीत राहिले आणि हे महान कार्य जगप्रसिद्धच आहे. ‘लोकसत्ता’तील (२५ व २६ जुलै) ‘दुभंगलेले आनंदवन’ या दोन भागांतील वृत्तमालिकेची दखल घेत डॉ. प्रकाश आमटेंनी ‘‘लवकरच सर्व काही सुरळीत होईल’’ असे आश्वासन देऊन आनंदवनबद्दल कळकळ असलेल्यांना आश्वस्त केले आहे.

दुसरीकडे, पुण्याचे शेखर नाईक यांनी ‘सरकारने आनंदवन वादात हस्तक्षेप करणे गरजेचे आहे, अन्यथा उपोषण करू’ असे म्हटले आहे. यावरून असे दिसून येते की, कुटुंबकलहाचा फायदा घेत काही राजकीय पक्षांशी संबंधित घटक या पवित्र स्थानी शिरकाव करून आयती मलाई ओरपू पाहात आहेत. प्रत्येक कुटुंबात कलह हा असतोच. तो येथेही आहेच. तो निर्माण होतो तो आपापसांतील मतभेदामुळे. प्रत्येकाची मते उत्कर्षांसाठीच असतील तर या मतभेदांतून चांगलेच निर्माण होते. पण येथे आनंदवनाचा डोलारा ज्या पायावर उभा आहे, तो पायाच सैलावत आहे. तेव्हा याकडे विशेष लक्ष देऊन, या पायाची मुळे वरोऱ्याच्या मातीत जास्तीतजास्त घट्टपणे रोवली जातील अशी अपेक्षा महारोगी सेवा समितीच्या विश्वस्त मंडळींकडून केली जात आहे. आशा आहे की, ही अपेक्षा पूर्णत्वास येईल.

– दीपक य. कारखानीस, पुणे</p>

स्वत:चा वारसा जपणे स्वातंत्र्यलढय़ापेक्षा कमी नाही!

‘मुद्दा मूलभूत फरकाचा..’ हे वाचकपत्र (‘लोकमानस’, ७ ऑगस्ट) वाचले. राम मंदिर निर्माण आंदोलनाची तुलना स्वांतत्र्यलढय़ाशी का करू शकत नाही, याबद्दल पत्रात मत प्रदर्शित केले आहे. ‘कारसेवा धार्मिक उन्मादाचा परमोच्च बिंदू..’, ‘कारसेवा-राम मंदिर आंदोलन धार्मिक कट्टरतावादाची बीजे पेरणारा काळ होता..’ ही विधाने पत्रात आहेत.

या विधानांवरून असा अर्थ निघतो की, राम मंदिर आंदोलन हे १९९० च्या आसपास सुरू झाले आणि तेवढेच केल्याने तिथे मंदिर उभारले जात आहे. पण हे नीट समजून घेण्यासाठी थोडा इतिहासाचा मागोवा घ्यावा लागेल : (१) हा लढा ४९२ वर्षांचा होता, जो मुघल साम्राज्यात सुरू झाला आणि भारतीय स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षांनी तो संपुष्टात आला. (२) १५२८ मध्ये बाबरचा सुभेदार मीरबाकीने अयोध्येत मंदिर पाडून तिथे मशिदीची बांधणी केली. (३) १८८५ मध्ये न्यायिक लढा सुरू झाला. काळ पुढे गेला तसतसे या प्रकरणाला वेगळे वळण मिळत गेले आणि त्याचा निकाल लांबत गेला.

थोडक्यात, १३५ वर्षांचा प्रदीर्घ न्यायिक लढा द्यावा लागला. कारसेवा झाली तो काळ (१९९० च्या पुढे) मूळ दावा सुरू झाला त्याच्या १०० वर्षांनंतरचा. त्यामुळे या संपूर्ण घटनेकडे पाहताना इ.स. १५२८ ते २०२० असा ४९२ वर्षांचा कालावधी लक्षात घेणे क्रमप्राप्त आहे. दुसरे म्हणजे, राम मंदिर उन्मादाने नाही तर सर्व दावे न्यायालयात सप्रमाण मांडून, खटला जिंकून, मगच उभे राहत आहे. एखादी गोष्ट परकीय आक्रमकांनी बिघडवली असेल तर ती परत घडवणे म्हणजे गुलामगिरीतून मुक्त होणे असाच अर्थ निघतो. फक्त भौगोलिक भाग मुक्त करणे म्हणजेच स्वातंत्र्य मिळवणे असे नसते, तर स्वत:ची परंपरागत ओळख, वारसा जपणे हेसुद्धा एखाद्या स्वातंत्र्यलढय़ापेक्षा कमी नक्कीच नाही.

– महेश रा. कुलकर्णी, रावेत (जि. पुणे)

‘अग्रजन्मा’ या शब्दाचा जातीशी संबंध जोडू नये!

‘‘तिसऱ्या मार्गा’तील प्राधान्यक्रम..’ हे वाचकपत्र (‘लोकमानस’, ११ ऑगस्ट) वाचले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भाषणातील एकाच संस्कृत उद्गाराचे विवेचन करताना पत्रलेखिकेने एक भान ठेवले पाहिजे होते की, संस्कृतमध्ये बराच मोठा आशय एकाच श्लोकात (थोडक्यात) सांगायाची पद्धत आहे. त्यामुळे पत्रलेखिकेने डॉ. भागवतांनी उद्धृत केलेल्या उद्गारातील ‘अग्रजन्मन:’ या शब्दाविषयी केलेल्या शब्दच्छलाबरोबरीने मनुस्मृतीतीलच अग्रजन्मा (ब्राह्मण) म्हणजे कोण, हे सांगणाऱ्या पुढील श्लोकाचा उल्लेखही पत्रात करावयास पाहिजे होता : ‘जन्मना जायते शूद्र:। संस्कारात् भवेत् द्विज:। वेदपाठात् भवेत् विप्र:। ब्रह्म जानातीति ब्राह्मण:॥’

या श्लोकाचा भावार्थ असा : प्रत्येक मनुष्य जन्मत: शूद्रच असतो. संस्काराने त्याचे सद्गृहस्थात (द्विज) रूपांतर होते. पूर्वजांनी मिळवलेले/ संपादित केलेले ज्ञान ग्रहण करून तो तज्ज्ञ (विप्र) पदाला पोहोचतो. परंतु या सृष्टीच्या निर्माणाचे भान (आत्मज्ञान) ज्याला होते/ येते तो ब्राह्मण पदाला पोहोचतो.

हा श्लोक लिहिला गेला तेव्हा फक्त वेदच होते. संसाधनांच्या अभावी ज्ञानोपासना मर्यादित होती. बहुजन आपल्या उपजीविकेला आवश्यक असेल तेवढेच कौशल्य/ ज्ञान मिळवीत. आज ज्ञानभंडार सर्वत्र उपलब्ध झालेले असल्यामुळे सर्वच जण आपापल्या कुवतीप्रमाणे त्या त्या विषयातील पुस्तकांतील ज्ञान मिळवून द्विज वा विप्र (सुशिक्षित पदवीधारक वा तज्ज्ञ) पदाला पोहोचले आहेत. परंतु न्युटन, आइनस्टाइन वगैरेंसारखे अज्ञात जगताचे/ विषयाचे ज्ञान मिळवणारे शास्त्रज्ञ, संशोधक (यात सर्वच विषयांतील संशोधक आले) खूपच थोडे आहेत. अशा(च) ज्ञानीजनांना ‘ब्राह्मण’ म्हटलेले आहे. अशा ब्राह्मणांकडून मानवाने आपले चरित्र कसे असावे हे शिकावे असे अपेक्षित आहे. उगीचच ‘अग्रजन्मा’ या श्लोकातील शब्दाचा सध्याच्या प्रचलित असलेल्या ब्राह्मण जातीशी संबंध जोडू नये. भूतकाळात घडलेल्या गोष्टींना, मांडलेल्या विचारांना तत्कालीन परिस्थिती कारणीभूत असते. परिस्थिती सतत बदलत असते. त्यामुळे बादरायणसंबंध जोडताना विप्रांनी विचार करावा!

– नरेन्द्र थत्ते, पुणे

‘अग्रजन्मा’ म्हणजे पवित्र आचरण असलेले विद्वान

‘‘तिसऱ्या मार्गा’तील प्राधान्यक्रम..’ या मथळ्याचे वाचकपत्र (‘लोकमानस’, ११ ऑगस्ट) वाचले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिर पायाभरणी कार्यक्रमात केलेल्या भाषणात उद्धृत केलेल्या श्लोकातील ‘अग्रजन्मा’ या शब्दाच्या अर्थाविषयी वरदानंद भारती यांच्या ‘श्री मनुस्मृती सार्थ संभाष्य’ या पुस्तकातील माहिती अशी : ‘अग्रजन्मा म्हणजे ब्रह्मावर्तात जन्मलेले विद्वान पंडित, ज्यांचे आचरण पवित्र आहे.’ या शब्दाच्या अर्थासाठी ब्राह्मण असा उल्लेख कुठेच नाही.

– श्रीनिवास श्रीकृष्ण काणे, खालापूर (जि. रायगड)