खांडेकरांच्या ‘ययाति’बद्दल काही प्रश्न..

एकदा पुन्हा ‘ययाति’ वाचण्याचा योग आला आणि वि. स. खांडेकरांच्या लालित्यपूर्ण निरूपणाचा आस्वाद घेता आला. या वेळेस मात्र वाचताना काही प्रश्न उभे राहिले :

खांडेकरांनी प्रारंभीच ययातिची ओळख हस्तिनापूरचे सम्राट नहुषचे पुत्र अशी करून दिली आहे. देवयानी ही राजा ययातिला रथात बसवून ‘यमुनातीरी’ फिरायला म्हणून घेऊन जाते, असा उल्लेख चार-पाच ठिकाणी आला आहे. ययातिच्या कामपिपासेची बळी एक युवतीही आपला जीव जवळच्या यमुनेतच देते! कादंबरीत ययातिला देवयानीपासून यदु हा एक आणि शर्मिष्ठेपासून एक पुरू, या दोनच मुलांचा जन्म दाखवला आहे.

या संदर्भातील पहिली वस्तुस्थिती अशी की ययातिच्या काळात हस्तिनापूर हे अस्तित्वातच नव्हते. त्याची स्थापना नहुषच्या नंतरच्या चोविसाव्या पिढीत झालेल्या राजा हस्तीने केली होती! ययातीचे पणजोबा पुरुरवा हे प्रयाग राज्याचे राजा म्हणून गंगा-यमुनेच्या संगमाकाठी, गंगेच्या पूर्व अंगाला असलेल्या प्रतिष्ठानपूर या राजधानीच्या ठिकाणी राहात. (आज त्या ठिकाणी भग्नावशेषी ‘झूँसी’ नावाचे गाव आहे, जे संगमापासून चार-पाच कि.मी. अंतरावर आहे, मध्ये गंगेचे अफाट पात्र आहे.)

माझी पहिली शंका अशी की पौराणिक संदर्भ सुस्पष्ट असताना खांडेकरांनी त्या काळी अस्तित्वात नसलेल्या हस्तिनापूरला ययातिची राजधानी, तीही यमुनेकाठी का म्हणून दाखवली असेल? हस्तिनापूरपासून यमुना १८० कि.मी. लांब आहे, तर गंगा फक्त अकरा कि.मी.वर आहे! दुसरं असं की, मूळ आख्यानाप्रमाणे ययातिला देवयानीपासून दोन आणि शर्मिष्ठेपासून तीन मुलगे होतात, त्यातही पुरु सर्वात धाकटा असतो, मग कादंबरीत फक्त यदू आणि पुरुचाच उल्लेख का?

सुज्ञ विद्वज्जनांकडून माझ्या जिज्ञासेचे समाधान अपेक्षित आहे.

– डॉ. शिवशंकर मिश्रा (प्रोफेसर एमेरिटस), औरंगाबाद</p>

मग २५ हजार कोटी रुपये गेले कोठे?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ६९ जणांविरोधात ठोस पुरावे सापडलेले नाहीत; त्यामुळे त्यांचा तपास थांबवून हे प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने (ईओडब्ल्यू) सत्र न्यायालयात सादर केला आहे, अशी बातमी वाचली. त्याच बातमीत असे नमूद आहे की, शिखर बँकेतील २५ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्यासह ६९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने वर्षभरापूर्वी दिले होते.

न्यायालयाने त्यांच्या समोर आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून सकृद्दर्शनी तथ्य आढळल्याशिवाय तसे आदेश दिले नसणारच. आता संबंधित विभाग सत्र न्यायालयात अहवाल सादर करून सांगतो की, या सर्वाविरोधात ठोस पुरावे सापडले नाहीत. आता प्रश्न पडतो की, उच्च न्यायालयाने आदेश देताना काय पाहिले? तसेच पुरावे सापडले नाहीत म्हणजे काय? ते समजत नाही. मग २५ हजार कोटी रुपये गेले कोठे? आणि कोणी नेले?

– मनोहर तारे, पुणे

अविश्वासार्ह ‘टीआरपी’; तर्कहीन वार्ताकन!

वाहिन्यांच्या टीआरपी घोटाळ्यासंदर्भातील बातमी वाचली. वृत्तपत्रे, पुस्तके यांच्या विक्रीसंख्येवरून तसेच गुणवत्तेवरून त्या संदर्भातील लोकप्रियता वा वाचकवर्गाबाबत केलेला निष्कर्ष हा बराचसा विश्वसनीय असतो. परंतु दूरचित्रवाणीच्या लोकप्रियतेबाबत काढलेले निष्कर्ष हे त्यांच्या गुणवत्तेचे निदर्शक असतात का? भारतातील घरांमधील २० कोटी टीव्ही संचांद्वारे जवळपास ८० कोटी लोकांकडून टीव्हीचे कार्यक्रम पाहिले जातात. त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज हा देशभरातील विविध घरांमध्ये बसविलेल्या २२ हजार पीपल मीटर्सद्वारे वर्तविला जातो. तो कितपत विश्वसनीय असतो, याविषयी ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.

खरे म्हणजे टीआरपी विकत घेणाऱ्या वाहिन्यांवर केल्या जाऊ शकणाऱ्या कारवाईबरोबरच तो टीआरपी मिळविण्यासाठी अतिरेकी, अवास्तव व तर्कहीन वार्ताकन आणि कार्यक्रमनिर्मिती करणाऱ्या वाहिन्यादेखील तितक्याच जबाबदार आहेत. त्यांच्यावर कधी कारवाई होणार, हा मूळ प्रश्न आहे. बाकी आपल्या देशात निवडणुकांमध्ये कोटय़वधी रुपये खर्च करून मते विकत घेणाऱ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह कुणा कुणावर कारवाई करणार हाही एक प्रश्नच आहे!

– रविराज गंधे, गोरेगाव (मुंबई)

कौशल्य, सातत्य यांचा स्पर्धाहीन काळ..

‘कौशल्याचा चांदोबा’ हे संपादकीय (३ ऑक्टो.) ‘चांदोबा’च्या काळाच्या आठवणी जाग्या करणारे आहे. ‘समीक्षकाच्या कठोरपणाने पाहिले तर शिवशंकर हे थोर कलावंत, ज्येष्ठ चित्रकार होते असे म्हणता येत नाही’ असे मत त्यात व्यक्त केले आहे; ते त्या काळातल्या किती तरी क्षेत्रांतील किती तरी ‘कलाकारांना’ लागू पडेल असे आहे. आजच्या काळाच्या तुलनेत स्पर्धा जवळजवळ नसण्याचाच तो काळ होता असे म्हटले तरी ते वावगे ठरू नये. अग्रलेखात उल्लेख केलेला ‘संथपणा’ हा त्यातूनच येतो. साठ-सत्तरच्या दशकांतील चित्रपट, त्यातील प्रसिद्ध ‘कलाकारां’चा अभिनय, संगीत, त्यापूर्वीच्या काळातील नाटय़‘कला’ हे सारे आज पाहिले तर आश्चर्याचा धक्का बसतो. एकेक काळ गाजवणारे त्या वेळचे ‘ज्युबिली स्टार्स’ व त्यांच्या ‘अभिनया’चे गारूड आपल्यावरही कसे काय पडले होते, असा प्रश्नही पडतो. ‘कौशल्य हीच कला मानण्याची वृत्ती होती,’ हे या लेखातील निरीक्षण त्यामुळेच पटते.

मात्र त्याचबरोबर ‘सातत्य हेच सौंदर्य मानण्याची वृत्ती’सुद्धा असावी असे वाटते. तेच मोजके चेहरे सतत पडद्यांवर झळकत राहणार, कथानकाची वा व्यक्तिरेखेची गरज काहीही असो, ते सतत त्याच विशिष्ट प्रकारचा अभिनय, संवादफेक आणि तसेच हेल काढून सतत बोलणार, असा प्रकार सर्रास असायचा. सतत तेच तेच पाहून लोकांनाही तेच सुंदर वाटू लागले होते की काय अशी शंका येते. त्याच्या तुलनेत किती तरी जास्त सकस, नैसर्गिक आणि व्यक्तिरेखेला न्याय देणारा अभिनय करणारे अनेक तरुण कलाकार आज दिसतात; पण त्यांची कारकीर्द पराकोटीच्या स्पर्धेमुळे चार-सहा चित्रपटांमध्येच संपते. हेच संगीत, नृत्य, चित्रकला अशा अनेक क्षेत्रांत घडताना दिसते. त्या त्या काळाचा महिमा असतो, आणि स्वत:च्या कौशल्याच्या जोरावर काही जण त्या काळावर स्वत:चा अमीट ठसा उमटवून जातात हे मात्र खरे.

– विनिता दीक्षित, ठाणे</p>