तत्कालीन महसूलमंत्र्यांनी आता बोलावे..

‘मोठे बालकलाकार!’ हा संपादकीय लेख (६ नोव्हेंबर) वाचला. नरेंद्र मोदी सरकारचे हे वागणे बालिश वाटते. वास्तविक जागेच्या वादाबद्दल तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केल्यास बरे होईल. सध्या त्यांची स्मरणशक्ती कमजोर झाली असावी म्हणून ते या प्रकरणावर काही बोलत नसावेत असे वाटते. एकीकडे निवडणुका विकासाच्या नावावर जिंकायच्या आणि विकासकामात अडथळा आणायचा हे धोरण योग्य वाटत नाही.

– मनोहर दहिफळे, मोहटे (ता.पाथर्डी, अहमदनगर)

हीन राजकारणाची परंपरा

‘मोठे बालकलाकार’ हा अग्रलेख (६ नोव्हेंबर) वाचला. ‘आपले आयुष्य केवळ जनहितासाठी’ असल्याचा आभास निर्माण करण्यात या राजकारण्यांएवढे कोणीही पारंगत नसेल. सत्तेचे कुरण राखण्यासाठी किंवा काबीज करण्यासाठी काहीतरी वादग्रस्त मुद्दे उपस्थित करून किंवा कुरापती काढून सतत प्रकाशात असणे आणि आपले अस्तित्व दाखवून देणे हे जणू राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यच असावे. कोणताही पक्ष सत्तेत असो किंवा विरोधात असो, त्यांचा एक समान कार्यक्रम म्हणजे अन्य पक्षांच्या योजनेत किंवा प्रकल्पात अडथळा निर्माण करणे. समुद्रात बुडविल्या जाणाऱ्या एन्रॉनपासून महाराष्ट्र हे अनुभवीत आहे. कांजूरमार्गाची कारशेड हा पुन्हा एक नवीन अध्याय एवढेच. अग्रलेख संबंधितांनी मनाचा मोठेपणा दाखविण्याची अपेक्षा मांडतो..  पण इंदिरा गांधींच्या धाडसाचा गौरव करणारे वाजपेयी हे एखादेच विरळ उदाहरण!

– शरद बापट, पुणे

नाडलेल्यांचा आवाज सरकापर्यंत पोहोचेल?

‘महिला शेतकऱ्यांना नवी धडकी’ (४ नोव्हेंबर २०२०) हा लेख शेती क्षेत्रातील महिलांचे हलाखीचे विदारक वास्तव मांडतो. आज गोदामांत धान्य पडून आहे. तरी उपासमारीची वेळ आल्याने पाच वर्षांखालील ३८ टक्के बालके कुपोषित आणि खुंटलेली आहेत. तसेच ५० टक्के गरोदर महिलांना अ‍ॅनिमिया आहे. अन्नसुरक्षा वाढविण्यासाठी वितरण व्यवस्था भक्कम करायला हवी. पण तेथे सरकारी व्यवस्थेचा उलटा प्रवास सुरू दिसतो. एकूण शेतकऱ्यांपैकी ८६ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. केवळ १४ टक्के महिला शेतकरी असून त्या अल्पभूधारक आहेत. नव्याने झालेल्या कायद्यांनी त्यांची परिस्थिती बदलणार तर नाहीच, पण त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. शहरात राहणाऱ्या आपल्यासारख्यांना या वास्तवाची अंधूकशीसुद्धा कल्पना येत नाही. महिला किसान अधिकार मंच – मकामसारख्या संस्थांचे काम समाजातील नाडलेल्यांचा आवाज बनते. तो वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम या लेखाने केले. पण सरकारला हा आवाज ऐकू येईल? की, हिरद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्या कवितेतील ‘देश दयालु नही है नारी, केवल अंधा बहरा’ या ओळी सत्य ठरत राहणार?

– अरुणा बुरटे, पुणे

फटाके पुन्हा टाळेबंदीकडे नेतील..

‘फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा- आरोग्यमंत्री’  हे वृत्त (लोकसत्ता- ६ नोव्हेंबर) वाचले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे आरोग्यमंत्र्यांनी राज्यात फटाकेबंदीचा  प्रस्ताव मांडला, पण मंत्रिमंडळात त्याला सहमती मिळू  शकलेली नाही.

टाळेबंदीकाळात रस्त्यांवर वाहने नसल्याकारणाने प्रदूषणाचे प्रमाण झपाटय़ाने खाली येऊन, लोकांना मोकळा श्वास घेता येत होता. पण आता वाहने पुन्हा पूर्ववत रत्यावर धावू लागल्याने धूळ, धूर तसेच वाहनांनी सोडलेला विषारी वायू यांमुळे आधीच लोकांना श्वसनसंस्थेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात मुखपट्टीमुळे, लोकांची अवस्था जीव घुसमटल्यासारखी झाली आहे (त्याला नाइलाज आहे). तेव्हा लोकांनी फटाके उडवून दिवाळी साजरी न करण्यात सर्वाचे हित आहे. नाहीतर लोकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे फ्रान्स, ब्रिटन या देशांत करोनाची पुन्हा दुसरी लाट आल्यामुळे त्यांना परत टाळेबंदी जाहीर करावी लागली; तशी वेळ आपल्या देशावर येऊ नये.

– गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली पूर्व (मुंबई)

हे यश नदी-खोलीकरणाचेच असणार!

‘लुप्त अग्रणीनदी पुन्हा प्रवाहित’ झाल्याची बातमी (लोकसत्ता, ६ नोव्हेंबर) वाचली. अत्यंत कौतुकास्पद अशी या बातमीचे वार्तांकनही वाचनीय आहे. मात्र, मागील सरकारने ‘जलयुक्त शिवार’ तसेच ‘नद्यांच्या गाळाचा उपसा करून खोली वाढविणे’ यासारखे चांगले उपक्रम राबविले. वृत्तपत्र माध्यमांनी त्याची म्हणावी इतकी दखल घेतली नाही. या बातमीत तत्कालीन सरकारचे दोन गोड शब्दांत कौतुक केले असते तरी चालले असते.

– सुबोध गद्रे, कोल्हापूर</p>

‘मुंबई आय’मधून दाखवणार काय?

‘‘मुंबई आय’ प्रकल्प रखडला’ ही बातमी (लोकसत्ता ५ नोव्हें )वाचली. सद्य परिस्थितीत प्रकल्प राबविणारे कंत्राटदार अनुत्सुक आहेत याचे कारण सर्वश्रुत आहे. पण मूळ मुद्दा हा आहे की हा मोठा आकाशपाळणा बांधून त्यातून आम्ही मुंबईचे कोणते दृश्य दाखविणार आहोत? दुर्बीण वापरल्यास प्रदूषित वांद्रे खाडी, मेट्रोसाठी मुंबईभर खोदलेले रस्ते आणि त्यामुळे झालेला ट्राफिक जॅम आणि रस्त्यातून वाट काढत चाललेली बेशिस्त जनता दिसेल.. ‘लंडन आय’ असो नाही तर आयफेल टॉवर असो; त्यांतून लंडन व पॅरिस ही आखणीबद्ध, शिस्तबद्ध, स्वच्छ  शहरे बघायला मिळतात!

– सुधीर ब. देशपांडे, विलेपार्ले पूर्व (मुंबई)

‘नवनित्य’ की ‘नवा पायंडा/ शिरस्ता / वहिवाट’?

‘ये क्या हाल बना रखा है?’ (५ नोव्हेंबर) या अग्रलेखात ‘नवनित्य’ हा शब्द वापरलेला पाहिला. संदर्भानुसार ‘न्यू नॉर्मल’ या इंग्रजी शब्दसमूहाला चपखल मराठी प्रतिशब्द योजण्याचा संपादकांचा हेतू दिसला. मात्र, मराठीत पूर्वापार चालत आलेले पायंडा, शिरस्ता, वहिवाट हे शब्द न्यू नॉर्मलमधून व्यक्त होणारा आशय पुरेशा समाधानकारकरीत्या व्यक्त करतात. एखाद्या गोष्टीच्या परिणामस्वरूप मूलभूत स्वरूपाचे आर्थिक, सामाजिक बदल घडून येऊन ते रुळणे म्हणजे न्यू नॉर्मल असा अर्थ नवा पायंडा किंवा नवी वहिवाट या शब्दसमूहातून अधिक सहजगत्या व्यक्त होतो. नवनित्य हा शब्द जनमानसात रुळवण्यापेक्षा यथोचित अर्थवहन करणारे व मराठी बोलीत आधीपासून रुजलेले शब्द वापरले तर अधिक श्रेयस्कर ठरेल असे वाटते.

– सौरभ महाजन, पुणे