दुर्मीळ आजारांच्या निर्मूलनासाठीही मोहीम हाती घ्यावी

‘धोरणरोग टाळा’ हे संपादकीय (७ एप्रिल) वाचले. सध्या अवघे विश्व करोनामय झालेले असल्यामुळे कोविड गंभीर आजारांच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे ही बाब खरी आहे. सरकारी मदतीपासून खासगी वैद्यकीय विम्यापर्यंत सर्व प्रकारचे लाभ करोनावर अगदी मेहेरबान आहेत. झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैली व वातावरणामुळे नवनवे आजार उद्भवत आहेत. नवा आजार आला की जुने व दुर्मीळ आजार दुर्लक्षित होतात. त्यामुळे त्या रुग्णांना लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होतात. जगात एकूण सात ते आठ हजार दुर्मीळ आजार अस्तित्वात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. या आजारांच्या एकूण ३० कोटी रुग्णांपैकी आठ कोटी रुग्ण केवळ भारतात असतील, तर देशासाठी ते चिंताजनक आहे. दुर्लक्षित असलेल्या आजारांच्या रुग्णांना सरकारी आरोग्य सेवा मिळण्यातील अडथळे दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी सरकारी धोरणात बदल करणे इष्ट आहे. सरकारी धोरणानुसार तीन गटांमध्ये विभागल्या गेलेल्या दुर्मीळ आजारांचा तिसरा गट खर्चाच्या बाबतीत काहीसा दुर्लक्षित असून या गटातील रुग्णांना उपचारांच्या व लाभाच्या प्रवाहात आणण्याची गरज आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा ठरावीक हिस्सा आरोग्यावर खर्च करण्याची काही प्रमाणके असताना आपल्या देशात मात्र आरोग्यावर अपेक्षित खर्च दिसून येत नाही. करोनामुळे अर्थव्यवस्थेला खीळ लागली असे म्हटले जाते. मात्र त्याच कोविड आजाराच्या निर्मूलनासाठी केंद्र व राज्य सरकारांना आज मोठा वाटा खर्च करावा लागत आहे. या सर्वांमध्ये दुर्मीळ आजार काहीसे दुर्लक्षित झाल्याचे वास्तव नाकारता येणार नाही. कोविड निर्मूलनासाठी ज्या पद्धतीने मोहीम हाती घेण्यात आली, त्याच पद्धतीने या दुर्मीळ आजारांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर समाजातील एक मोठा गट सुरक्षित व संरक्षित होईल. केंद्र शासनाने आपले आरोग्य धोरण दरवर्षीच्या अर्थसंकल्पात ठळकपणे अधोरेखित करावे. ज्यामध्ये वर्षभरात उद्भवणाऱ्या संभाव्य आजारांच्या साथी तसेच जुने गंभीर व दुर्मीळ आजारांचादेखील प्राधान्याने विचार करण्यात यावा.

– वैभव मोहन पाटील, घणसोली (नवी मुंबई)

अशा भूमिकेने सवंग लोकप्रियता मिळेलही; पण…

‘आसाममधून करोना केव्हाच गेला!’ ही बातमी (लोकसत्ता, ६ एप्रिल) वाचली. आसामच्या लोकांनी कोविड विषाणूपासून बचाव करण्यासाठी मुखपट्टी वापरण्याची गरज नाही, कारण आता राज्यात करोनाची साथ उरलेली नाही, असे वक्तव्य आसामचे आरोग्यमंत्री आणि भाजपचे नेते हिमंत बिस्वा सरमा यांनी केले आहे. एकीकडे देशात कोविड-१९ विषाणूची दुसरी लाट जोरात असताना, आसामच्या आरोग्यमंत्र्यांनीच मुखपट्टी वापरण्याची गरज नसल्याचे सांगणे म्हणजे आसामच्या लोकांनाच नाही तर देशातील इतर राज्यांतील लोकांनादेखील चुकीच्या दिशेने नेण्यासारखे आहे. केंद्राने सगळ्या राज्यांना मार्गदर्शक तत्त्वे सांगू नयेत, ज्या राज्यात जास्त रुग्ण आहेत त्यांनाच मार्गदर्शक तत्त्वे सांगावीत, असेदेखील विधान आरोग्यमंत्री सरमा यांनी केले आहे. याच आठवड्यात एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत ‘आयसीएमआर’चे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ९६ टक्के लोकांनी मुखपट्टी वापरण्याच्या नियमाचे पालन कटाक्षाने केले तरी राज्यातील करोनाबाधितांची संख्या येत्या १५/२० दिवसांत कमी होऊ शकते. म्हणजेच मुखपट्टी वापरणे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आणि हिताचे आहे, याचा पडताळा वरिष्ठ डॉक्टर मंडळींकडून होत असताना, आसामचे आरोग्यमंत्री असलेले भाजपचे नेते मात्र जनतेची दिशाभूल करत आहेत. महाराष्ट्रातदेखील एका प्रमुख राजकीय पक्षाचे लोकप्रिय नेते राज ठाकरे यांचेही मत मुखपट्टी वापरण्याच्या बाजूने नाही. राज ठाकरेदेखील हेच सांगतात की, ‘‘मी मुखपट्टी वापरणार नाही व लोकांनीही मुखपट्टी वापरू नये.’’ अशा प्रकारच्या अट्टहासाच्या भूमिकेमुळे कदाचित सवंग लोकप्रियता मिळेल; परंतु त्यामुळे राज्यातील जनतेच्या आरोग्याचे किती मोठे आणि भरून न निघणारे नुकसान होईल, याचा सद्य:स्थितीत विचार करणे आवश्यक.

– शुभदा गोवर्धन, ठाणे</p>

हे करोनाचे राजकारण नव्हे तर काय?

‘प्राधान्यगटांनाच लस’ हे करोना प्रतिबंधक लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने घेतलेल्या ताठर भूमिकेबद्दलचे वृत्त (लोकसत्ता, ६ एप्रिल) वाचले. तसेच त्याच अंकातील, करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व करोना कृतिगटाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी दिलेला इशारा (‘दुसऱ्या लाटेत आगामी चार आठवडे कळीचे!’) आणि महाराष्ट्रात करोना निर्बंधांविरोधात व समर्थनात चाललेल्या राजकारणाबद्दलच्या बातम्या वाचल्या. करोनामुळे सामान्य जनतेचे हाल होत असतानाच प्रत्येक राजकीय पक्षाची आपलाच हेतू साध्य करण्याकरिता चाललेली धडपड कुठल्याच दृष्टीने योग्य म्हणता येणार नाही. हे विसरता कामा नये की, ज्या निर्बंधांविरोधात भाजपचे आजचे सत्ताच्युत झालेले पुढारी महाराष्ट्रात दंड थोपटत उभे राहू पाहात आहेत, त्या प्रकारचे निर्बंध याच पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने लादले होते आणि याच पुढाऱ्यांनी त्यांचा पुरस्कार केला होता. त्या वेळेस जनतेचे हाल झाले नव्हते काय? आज जर केंद्रीय नेतृत्वाने करोना आटोक्यात आणण्यासाठी असलेच निर्बंध देशभर लावले, तर याच पुढाऱ्यांची भूमिका काय राहील? आज भाजप सत्तेवर नसलेल्या फक्त महाराष्ट्रातच नाही, तर मध्य प्रदेशसारख्या राज्यातही- जेथे काँग्रेसला पायउतार करून भाजप सत्तेवर आहे- करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.  इतकेच काय, पण ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत, तेथेही करोनाची स्थिती काही फारशी चांगली म्हणता येणार नाही. असे असतानाही करोनाबाबतचे धोरण आपल्या सोयीनुसार  ठरवण्याचा कुठल्याही पक्षाचा प्रयत्न काही फारसा स्तुत्य म्हणता येणार नाही. प्रत्येक सत्ताधारी पक्ष करोना आटोक्यात आणण्यासाठी सामान्य जनतेलाच ‘अमुक करू नका, तमुक करू नका’ असे ज्ञानामृत पाजत आहे. पण करोनाच्या निमित्ताने त्यांचे राजकारण मात्र सुरूच आहे. मध्य प्रदेशसारख्या राज्याचे मुख्यमंत्री ‘स्वास्थ्य आग्रह’सारख्या प्रकाशझोतात राहण्याच्या शकला काढतात, तर ज्या राज्यांत निवडणुका आहेत तेथे केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे मोठमोठे पुढारी प्रचारसभांमध्ये गर्दी गोळा करतात… हे देशात चाललेले करोनाचे राजकारण नाही तर काय आहे?

– विनोद द. मुळे, इंदौर (मध्य प्रदेश)

विकसनशील देशाच्या भौतिक गरजांचे भान…

‘चत:सूत्र’ सदरातील (७ एप्रिल) प्रियदर्शिनी कर्वे यांच्या ‘वसुंधरा दिवसाचा संकल्प’ या लेखात मांडलेली समतोल भूमिका अभिनंदनपात्र आहे. मुख्य म्हणजे, ही भूमिका आपल्यासारख्या विकसनशील देशाच्या भौतिक गरजांचे भान राखणारी आहे. एरवी पर्यावरणवाद्यांचे मुद्दे कितीही पटण्यासारखे असले तरी त्यांनी सुचविलेले उपाय हे कालचक्र उलटे फिरवण्याचा अव्यवहार्य आग्रह धरणारे असतात. त्या तुलनेत कर्वे यांनी केलेले- ‘आपल्या अस्तित्वामुळे पृथ्वीवरील परिस्थिती बदलणे अनिवार्य आहे,’ हे विधान वस्तुस्थितीच्या स्वीकाराचे द्योतक आहे. ‘एखाद्या सजीव प्रजातीमुळे पृथ्वीवर कायमस्वरूपी बदल होण्याची ही पहिली वेळ नाही आणि सगळे बदल अनिष्टच असतात असेही नाही,’ ही त्यांची विधाने तर वरील पार्श्वभूमीवर ठळक अक्षरांत छापावी अशीच आहेत. यासाठीच पारंपरिक पद्धतीने केलेल्या शेतीतील उत्पन्न किती माणसांना पुरेल, याविषयी त्यांनी आधी दिलेल्या सांख्यिकीची उघड्या डोळ्यांनी दखल घेणे आवश्यक आहे. त्यामुळे दहा अब्ज माणसांसाठी चांगले आणि निसर्गस्नेही जीवन कसे निर्माण करायचे याविषयीचा ऊहापोह वसुंधरा दिवसाच्या निमित्ताने व्हावा, ही त्यांची अपेक्षा स्वागतार्ह आहे. नुसतेच विकासाच्या नावे खडे न फोडता समतोल भूमिका मांडलेली पाहून समाधान वाटले.

– मनीषा जोशी, कल्याण (जि. ठाणे)

इथे ‘साक्षात्कार’ म्हणजेच स्मरणात राहिलेली स्वप्ने…

‘कुतूहल’मधील (१ एप्रिल) ‘गणिती तत्त्वज्ञ देकार्त’ या लेखावरील ‘गणित आणि साक्षात्कार(?)’ या मथळ्याखालील वाचकपत्र (‘लोकमानस’, ३ एप्रिल) वाचले. त्यात ‘साक्षात्कार’ या शब्दाविषयी पत्रलेखकांनी विचार मांडले आहेत. ‘साक्षात्कार’ हा संस्कृत शब्द ईश्वराशी जोडला गेला असला, तरी त्याचा शब्दकोशातील मूळ अर्थ ‘प्रत्यक्ष दिसणे, समक्ष’ असा आहे. ‘अक्ष’ हा शब्द समासान्ती येतो तेव्हा त्याचा अर्थ डोळा असा असतो. जसे की, मीनाक्षी, कमलाक्ष हे शब्द. त्यामुळे ‘साक्ष’ म्हणजे डोळ्यांसमोर दिसणारे. ‘साक्ष’ या शब्दाशी जोडलेले अन्य शब्द हाच अर्थ घेऊन तयार झालेले आहेत. उदाहरणार्थ, साक्षीदार, साक्षांकित करणे. हिंदीत ‘साक्षात्कार’ या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष मुलाखत असा आहे. स्वप्नांचा अनुभव सर्वांना कधी ना कधी येतो. काही स्वप्ने आठवत नाहीत, तर काही व्यवस्थित आठवतात आणि त्यांतील प्रसंग डोळ्यांसमोर दिसतात. स्मरणात राहिलेल्या स्वप्नांच्या प्रभावामुळे ईश्वराची अनुभूती न मानताही कधी कधी दिशा सापडते. या स्वप्नांमुळे देकार्त यांचा संभ्रम दूर झाला. विज्ञानाचा पाठपुरावा करणे हाच सत्याचा मार्ग असल्याचे त्यांना जाणवले. आपले जीवन नक्की कोणत्या मार्गाने न्यावे याचे दिग्दर्शन झाले. कित्येकदा स्वप्न पडलेले नसतानाही एखादा विचार अचानक आपल्याला सुचतो व मार्ग सापडतो, तेव्हाही आपण ‘साक्षात्कार झाला’ असे म्हणतो. त्याच अर्थाने पाहिल्यास ‘देकार्त यांना साक्षात्काराचा अनुभव देणारी स्वप्ने पडली’ असे म्हणणे अयोग्य वाटू नये.

पत्रलेखकांनी संदर्भ दिलेली मराठी विश्वकोशातील नोंद ‘धर्म’ या विभागातील आहे. धर्माच्या अनुषंगाने अर्थ तिथे दिलेला आहे. त्याच नोंदीत पुढे म्हटले आहे की, ‘विविध धर्म-संप्रदायांत वर्णिलेले साक्षात्काराचे वर्णन एकसारखे नाही. कारण त्या त्या संप्रदायाच्या सत्ताशास्त्रीय चौकटीनुसार साक्षात्काराचा अर्थ वेगवेगळा लावला गेलेला दिसतो. साक्षात्कारात निखळ अनुभूती आणि कल्पना किंवा भास यांची सरमिसळ झालेली असू शकेल; पण साक्षात्कारात्मक अनुभूतीची अशी चिकित्सा करणे साक्षात्कारवाद्यांना मान्य होत नाही.’ त्यामुळे एखाद्या शब्दाचा मूळ अर्थ आणि रूढ झालेला अर्थ यांबाबत दुमत होऊ शकते.

– डॉ. मेधा लिमये, समन्वयक, मराठी विज्ञान परिषद