वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने चुकलेली मांडणी..

‘शेती कायद्यांना पाठिंबाच! अपेक्षाही..’ हा गोविंद जोशी यांचा लेख (३० सप्टेंबर) वाचला. लेखात हमीभावाने होणाऱ्या धान्य खरेदीबद्दल केलेली विधाने वस्तुस्थितीला धरून नाहीत. लेखकाच्या मते, या धान्य खरेदीचा फायदा फक्त सहा टक्के शेतकऱ्यांनाच होतो. मात्र लेखकाने हे ध्यानात घेतलेले दिसत नाही, की या सहा टक्के शेतकऱ्यांकडून सरकार देशाच्या बाजारात येणाऱ्या धान्यांपैकी सुमारे ३५ टक्के धान्याची खरेदी करते. त्यामुळे सगळ्या देशातील धान्याचे बाजारपेठेतील भाव वाढतात. त्याचा फायदा देशातील सर्व धान्य उत्पादक शेतकऱ्यांना मिळतो. आज जर ही खरेदी सरकारने बंद केली, तर सबंध देशातील धान्याचे भाव कोसळतील. सरकार जर फक्त रेशनला लागेल इतकेच धान्य खरेदी करत असते, तर देशातील धान्याच्या भावावर कोणताच परिणाम झाला नसता. पण सरकार रेशनसाठी आवश्यक धान्यापेक्षा किती तरी जास्त धान्य खरेदी करते. म्हणजे ते धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थव्यवस्थेत नसलेली जास्तीची मागणी तयार करते. म्हणून धान्याच्या किमती वाढतात. ही गोष्ट लक्षात न घेतल्याने किंवा आल्याने शेतकरी संघटना- ‘अन्न महामंडळाकडील साठे हे रेशनव्यवस्थेसाठी सरकारने धान्योत्पादक शेतकऱ्यांवर लादलेली उणे सबसिडी आहे’ अशी चुकीची मांडणी करत राहिली. प्रत्यक्षात गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव पडलेले असताना सरकारने हमीभावाद्वारे धान्याची खरेदी करून धान्योत्पादक शेतकऱ्यांना मोठी सबसिडी दिली आहे.

– मिलिंद मुरुगकर, नाशिक

महाराष्ट्रातील ‘राजकारणा’ला आणखी एक निमित्त..

‘मराठा आरक्षणाचे आव्हानच!’ हा उमाकांत देशपांडे यांचा लेख (‘सह्य़ाद्रीचे वारे’, ५ ऑक्टोबर) वाचला. मराठा आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा होत चालला आहे. मराठा समाजातील उपेक्षित आणि गोरगरीब घटकाला शिक्षण व नोकऱ्यांत चांगली संधी मिळाली पाहिजे, समाजाची प्रगती होण्यासाठी आरक्षणाची गरज आहे, अशी भूमिका घेऊन राज्यातील मराठा समाजाने आक्रमकता दाखवली होती. यामुळे राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागला. मात्र, राज्य शासनाने घेतलेल्या मराठा आरक्षण निर्णयाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे आरक्षणाचा गुंता निर्माण झाला आहे. अर्थात, आरक्षण अंमलबजावणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला न्यायालयात प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. तूर्तास, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे निर्माण झालेला हा गुंता राज्यातील राजकारणाला आणखी एक निमित्त ठरला आहे!

– प्रा. मधुकर चुटे, नागपूर

‘समर्थकां’ची आक्रमकता दहशत वाटण्याजोगी

‘बलात्काराचे गुन्हे मुलींवर संस्कार करून रोखता येतील’ अशा अर्थाचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांचे विधान (वृत्त : लोकसत्ता, ५ ऑक्टोबर) संतापजनक आहे. याचा गर्भितार्थ असा की, मुले सुसंस्कारित असतात आणि हे गुन्हे मुलींमुळे घडतात. आपण काय बोलतोय, कसले समर्थन करतोय याचे भानही या आमदार महाशयांना राहिलेले दिसत नाही. मुळात ज्या राज्यात हे घडले, तिथली सर्वसाधारण मानसिकता स्त्रियांना बरोबरीची वागणूक देणारी नाही. योगी सरकारच्या बचावासाठी भाजप समर्थक ज्या पद्धतीने आक्रमक झाले आहेत ते पाहता, सारासार विचार करणाऱ्यांना दहशत वाटेल असे वातावरण आहे. आज अटलबिहारी वाजपेयी असते तर त्यांनी योगींना सांगितले असते, ‘राजधर्म का पालन करो’!

– अभय दातार, ऑपेरा हाऊस (मुंबई)

न्यायालयाच्या प्रांगणातील मनू..

हाथरस येथील बलात्कार प्रकरणावर- ‘..म्हणून मुलींवर चांगले संस्कार करा,’ हे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांचे विधान (लोकसत्ता, ५ ऑक्टो.) वाचले. आपले नेते आपल्या समाजाचेच प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे हे अपेक्षितच होते. विकृत वासनांधतेबरोबरच बऱ्याचदा बलात्कारामागे बाईला किंवा तिच्याशी संबंधित परिवाराला, तिच्या जातीला धडा शिकवणे, सूड उगवणे अशी कारणे दिसतात. या विचारसरणीचे मूळ आपल्या तथाकथित महान, उच्च सांस्कृतिक परंपरेत आहे. चारित्र्य हा जणू काही फक्त स्त्रीसाठी बनलेला एक अलंकार असून तो हिरावल्यास निव्वळ तिचेच मनोबल खचते असे नाही, तर तिच्या जातीतल्या, घरातल्या, तिच्याशी संबंधित पुरुषांचेही मनोबल संपते, हरल्याची भावना होते, असा समज आपल्याकडे पक्का आहे. आपल्या बहिणीचे- शूर्पणखाचे नाक कापले म्हणून रामाशी युद्ध करण्याऐवजी त्याच्या पत्नीला रावण पळवून नेतो. शंखासुर युद्धात हरत नाही म्हणून कृष्ण त्याच्या पत्नीचे- म्हणजे तुळशीचे चारित्र्यहनन करतो. आपला दांभिक समाज रावणाचे दहन करतो, तर तुळशीचे लग्न दरवर्षी कृष्णाबरोबर लावून देतो. दोन्ही कथांमध्ये स्त्रिया होरपळल्या आहेत, पण समाज सोयीचेच ते धडे घेत राहतो. बरे, स्त्रियांनी अंगभर कपडे घातले, बुरखे घातले, चार भिंतींत स्वत:ला गाडून घेतले तर त्यांच्यावरचे अत्याचार कमी होतात असे म्हणावे, तर चित्र वेगळेच दिसते. आज जगात स्त्रियांवरच्या अत्याचारांत सर्वात जास्त सीरिया, अफगाण अशा दहशतग्रस्त मुस्लीम देशांबरोबरच भारत, पाकिस्तान आघाडीवर आहेत. ज्या पाश्चात्त्य संस्कृतीला आपल्याकडे नावे ठेवली जातात, जिथल्या कुटुंबव्यवस्थेवर सतत टीका केली जाते, त्या ‘आधुनिक’ युरोप-अमेरिकेत मात्र याचे प्रमाण तुलनेत कमी आहे.

भारतात पुरुषसत्ताक व्यवस्थेला धर्माची आणि जातीतून येणाऱ्या उच्च-नीच संकल्पनांची जी कवचकुंडले मिळतात, त्यातूनच असे कृत्य करण्याचे धाडस होते. स्त्रियांनी कायम पुरुषांच्या आज्ञेत राहावे, शूद्र हे फक्त उच्चवर्णीयांच्या सेवेसाठी आहेत, असे सांगणारी ‘मनुस्मृती’ बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीरपणे जाळली. पण त्याच मनूचा पुतळा जयपूर उच्च न्यायालयाच्या प्रांगणात मोठय़ा दिमाखात उभा आहे. जणू तो पुतळा मोठय़ा मग्रुरीने सांगत आहे- या घटना पुन:पुन्हा घडत राहणार!

– डॉ. स्वाती लावंड, मुंबई

गुण नाही, पण वाण लागला!

‘विश्वाचे वृत्तरंग’ या सदरातील (५ ऑक्टोबर) ‘अमेरिकेस पराभूत करणारी चर्चा’ हा लेख आणि ‘आपुली आपण करी स्तुती..’ हा अग्रलेख (१ ऑक्टोबर) यंदाच्या अमेरिकी अध्यक्षीय वाद-विवादांच्या दर्जावर नेमके भाष्य करतात. ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’ असे मानणाऱ्या आपल्या देशात वाद-विवाद म्हटले की दुर्दैवाने संसदेत हमरीतुमरीवर आलेले व एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे सन्माननीय सदस्य, असे चित्र उभे राहते. तसेच वाहिन्यांवरील चर्चेत रागाने थरथर कापणारा ‘अँकर’ आणि एकाच वेळी उच्चरवात आपापले मुद्दे संतापजनक हातवारे करत स्वगत केल्यासारखे बोलत राहणारे ‘पॅनलिस्ट’ असेही चित्र नजरेसमोर येते. अशा पार्श्वभूमीवर अमेरिकी अध्यक्षीय वाद-विवाद व त्याचे ‘अँकर’ने केलेले संयत नियोजन पाहणे / ऐकणे ही पर्वणी वाटायची. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला बिल क्लिंटन यांची ‘देअर इज नथिंग राँग विथ अमेरिका दॅट कॅन नॉट बी क्युअर्ड बाय व्हॉट इज राइट विथ अमेरिका’ अशी आशयगर्भ वाक्ये अशाच वादविवादांत कानी पडायची. त्याच सुमारास भारतात आर्थिक उदारीकरणाचे आणि जागतिकीकरणाचे युग (नाइलाजाने का होईना, पण) अवतरले आणि भारत-अमेरिका संबंध अधिकाधिक दृढ होत गेले. तेव्हापासून प्रचंड प्रमाणात फोफावलेल्या माहिती-तंत्रज्ञान उद्योगामुळे दोन्ही देशांचे असंख्य नागरिक एकमेकांच्या देशात अनेक वेळा येऊ-जाऊ लागले. ‘व्हाइट हाऊस’मध्ये दिवाळीसारखे भारतीय सण साजरे होऊ लागले. या अभिसरणातून अमेरिकेतील अनेक चांगल्या गोष्टी आपल्याकडे येऊ लागतील व आपल्याही चांगल्या गोष्टी अमेरिकेत रुजतील असे वाटत होते. परंतु गेल्या दोन दशकांपासून अमेरिकाच हळूहळू खास भारतीय स्वभावदोष आत्मसात करू लागली आहे की काय, असा प्रश्न अनेक प्रसंगांत पडतो. यंदाची अध्यक्षीय वादविवादाची पहिली फेरी म्हणजे ‘गुण नाही, पण वाण लागला’ असे म्हणण्यासारखी स्थिती आली आहे याची खात्री पटवणारी ठरली.

– प्रसाद दीक्षित, ठाणे

आस्वादक, चिकित्सक प्रबोधनयात्रा..

‘दिवाणखान्याबाहेर..’ हा अग्रलेख (५ ऑक्टोबर) पुष्पा भावे यांच्या वाटचालीकडे डोळसपणे पाहण्याचे भान देतो. त्यांचे ‘माणूस’मधील नाटय़विषयक सदर ही चालतीबोलती कार्यशाळा होती. पाश्चात्त्य नाटकांचा संदर्भ देताना, त्या तो ‘अभ्यास दाखवण्या’साठी देत नसत. संदर्भित नाटय़परीक्षणात तो चपखलपणे बसत असे. ‘काडिश’ या रॉबर्ट काल्फिन यांनी पडद्याचा कलात्मक वापर करून केलेल्या रंगमंचीय आविष्काराबद्दल त्यांनी लिहिले होते आणि हे करताना चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या ‘एक शून्य बाजीराव’ या काव्यात्मक संहितेला सादर करताना नाटक म्हणून कथानकाचा हव्यास धरल्याबद्दल हजेरीही घेतली होती. ‘हिरोशिमा’, ‘बरी द डेड’ या नाटकांवरची त्यांची परीक्षणे ही नाटय़धर्मीसाठी प्रबोधनयात्राच ठरली. पु. भा. भावे यांच्या ‘अकुलीना’वर त्यांनी घेतलेले आक्षेप व गिरीश कार्नाड यांच्या ‘हयवदन’ या नाटकाची त्यांनी केलेली आस्वादक-चिकित्सक समीक्षा हा ‘नाटक या कला प्रकाराकडे समग्रतेने पाहणे’ म्हणजे काय याचा वस्तुपाठच आहे.

– डॉ. श्रीकांत तापीकर, पुणे

पांडित्य आणि साधेपणाच्या स्मृतिखुणा..

प्रा. पुष्पा भावे यांच्या निधनाचे वृत्त वाचून दु:ख वाटले. १९८४-८५ च्या दरम्यान मी रुईया महाविद्यालयात शिकत असताना पुष्पाबाई तिथे मराठी विभागप्रमुख होत्या. वर्गातील त्यांचा सहज व आत्मविश्वासपूर्ण वावर आणि त्यांचा कमालीचा साधेपणा या गोष्टी मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या बाकासमोर येऊन संथ सुरात शिकवणाऱ्या पुष्पाबाई डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्यांचे पांडित्य आणि त्यांचा साधेपणा या त्यांच्या स्मृतिखुणाच आता फक्त उरल्या याची खंत वाटते.

– मनीषा जोशी, कल्याण</p>