स्वयंसेवकांनी अशाही प्रसंगी मदतीस उतरावे..

एका देशव्यापी संघटनेच्या चालकांनी हिंदुत्वाची नवी व्याख्या, अहिंसेचे तत्व आणि नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका या शेजारी राष्ट्रांशी सलोखा अशा ध्येयधोरणाची वाच्यता विजयादशमीच्या त्या संघटनेच्या कार्यक्रमात केली. ‘विजयादशमीचे विचार!’ या संपादकीयात ( २६ ऑक्टोबर) याची भलामण ‘सकारात्मक बदल’ म्हणून केली आहे. त्यावर, ‘थांबा आणि निरीक्षण करा’ असे सुचवावेसे वाटते. देशातील भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्तीत संघटनेचे स्वयंसेवक हिरीरीने मदतकार्य करताना दिसतात. त्याचप्रमाणे ‘गोहत्या’, ‘लव्हजिहाद’ वा ‘मुले पळविणारी टोळी’ अशा घटनांत होणारी झुंडशाही आणि नाहक हिंसा या विरोधात स्वयंसेवक मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले दिसतील तेव्हाच विजयादशमीच्या विचारांतील हे बदल आश्वासक वाटतील. बऱ्याचदा खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात हे सांगणे नलगे. कट्टर हिंदुत्वाला होणारा विरोध बघून येणाऱ्या निवडणुकांसाठी घेतलेला सर्वसमावेशक हिंदुत्वाचा हा सोयीचा चेहरा तर नव्हे ना अशी कुशंका मनात येते.

हजारो सैनिकांचा पाठिंबा असलेल्या आणखी एक नेत्याचे भाषण पण दादरच्या सावरकर भवनात  विजयादशमीला झाले. या भाषणातही अपयशी ठरलेल्या जीएसटी करप्रणालीचा पुनर्विचार, मतपेटीतून सत्तेवर आलेल्या सरकारला निर्वेधपणे काम करून देणे, आणि शासनकर्त्यांनी जंगलांच्या जीवावर न उठणाऱ्या पर्यायांना पसंती देणे असे महत्त्वाचे सकारात्मक उल्लेख होते. त्यातील नेहमीचे ‘तू तू मैं मैं’ आणि शिवराळ भाषा सोडून या सकारात्मक उल्लेखांचे स्वागत करता आले असते.

– प्रभा पुरोहित, जोगेश्वरी (मुंबई)

वागण्या-बोलण्यातला विरोधाभास कसा?

‘विजयादशमीचे विचार’ हे संपादकीय ( २७ ऑक्टोबर) वाचले. हिंदुत्व ही कल्पना विशाल आहे आणि तीस ‘पूजासे जोडकर’ संकुचित करण्याचे कारण नाही या सरसंघचालकांच्या म्हणण्याला जे स्वागतार्ह ठरविले गेले आहे ते पटण्यासारखे नाही. एखाद्याचे ‘म्हणणे’ म्हणजे त्याचे प्रामाणिक मत असेलच असे नाही : तेही जर पडद्यामागून राजकारण करणाऱ्या एखाद्या संघटनेच्या प्रमुखाचे असेल तर नक्कीच नाही. संघाच्या ‘ऑल टाईम गॅरंटीड’ मुशीतून निघालेले पंतप्रधान किती देवळांमध्ये दर्शनासाठी, पूजेसाठी जातात हे तर सर्वश्रुतच आहे. मग वागण्या बोलण्यातला हा विरोधाभास कसा? भाजपच्या मतदारांमध्ये वाढ करण्याच्या हेतूने केलेले विधान म्हणून या विधानाकडे पाहण्याची गरज आहे, अन्यथा सामान्य मतदारांची गत ‘ हुरळली मेंढी..’ अशी व्हायची!

परराष्ट्र संबंधांबाबत संघ प्रमुखांनी केलेले ‘सलोखा वाढवा’ हे मार्गदर्शन मात्र नक्कीच देशहिताचे आहे. अर्थात संघ प्रमुखांनी देशहित जपता जपता थोडे भाजपहित जपणे स्वाभाविकच म्हणायला हवे.

– मुकुंद परदेशी, धुळे

शिवसैनिकही मुख्यमंत्र्यांशी सहमत असावेत!

‘मंदिर, पूजाअर्चा हेच म्हणजे हिंदुत्व नव्हे, याकडे लक्ष वेधत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि कोश्यारी यांना लक्ष्य केले.’ असे शिवसेना दसरा मेळाव्याच्या बातमीत (लोकसत्ता, २६ ऑक्टोबर) वाचले. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर त्यांची काही वक्तव्ये आणि काही निर्णय याची प्रचीती देणारे नक्कीच आहेत.

पण एक शंका अशी येऊ शकते की, त्यांनी हे वक्तव्य या पदाच्या जबाबदारीचे भान राखण्यासाठी म्हणून केवळ केले आहे की शिवसेना पक्षप्रमुख म्हणूनही त्यांची तीच भूमिका आहे? कारण असे की, मंदिर, पूजाअर्चा म्हणजेच हिंदुत्व अशी ठाम धारणा असलेल्यांचीच भाऊगर्दी खुद्द शिवसेनेतच दिसते. सत्यनारायणाची महापूजा आणि अन्य धार्मिक सण रस्त्यावरच मंडप घालून मोठय़ा प्रमाणात साजरे करणे, मुस्लिमांना उत्तर म्हणून भररस्त्यात महाआरत्यांचे आयोजन, पूजेचे प्रतीक असलेला भगवा टिळा भाळी सदैव मिरविणे या आणि अशा अनेक गोष्टी ज्या शिवसेनेत बोकाळल्या आहेत, त्या मंदिर, पूजाअर्चा म्हणजेच हिंदुत्व यावर श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त करणाऱ्याच आहेत.

आषाढी एकादशीची खास पूजा विधिवत केल्यावर किंवा एखाद्या प्रसिद्ध मंदिराला भेट दिल्यावर ‘महाराष्ट्रावरची सर्व संकटे दूर होऊ देत, माझा शेतकरी बांधव सुखी होऊ दे, असं साकडं मी देवाला घातलं आहे,’ अशी पूर्ण अवैज्ञानिक पण पूजाअर्चा यांचे महत्त्व आणि माहात्म्य जनमानसावर ठसविणारी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी आवर्जून देणे, हे वर्तन दसरा मेळाव्यातील वक्तव्याशी विसंगतच असते. ‘‘देव-देवळांविषयी शाब्दिक प्रेमाचा हिंदू जिव्हेचा धबधबा पहावा तो त्याच्या धडधडाटापुढे गिरसप्पा, नायगाराच्या कानठळ्या बसतात.. नवमतवादी सुधारकांना देवदेवळांची गुलामगिरी यापुढे साफ नको आहे.’’ या खुद्द प्रबोधनकारांच्या विचारांची बांधिलकी यापुढील काळात तरी उद्धव ठाकरे दाखवून देतील का? नपेक्षा त्यांचे हे वक्तव्य भाजप व कोश्यारी यांना केवळ प्रत्युत्तर देण्यासाठी केलेली मखलाशी ठरेल.

– अनिल मुसळे, ठाणे पश्चिम

‘टुकडे टुकडे गँग’ ही देशाला लागलेली कीडच..

‘विजयादशमीचे विचार!’  हे संपादकीय (२७ ऑक्टोबर) वाचले. कट्टर हिंदुत्वाबरोबरच ‘राष्ट्र प्रथम’ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खरी ओळख ! यंदाच्या दसरा मेळाव्यात सरसंघचालकांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांपैकी हिंदुत्वाची व्याप्ती, चीन विषयीची भूमिका आणि ‘टुकडे टुकडे गँग’ बद्दल केलेले भाष्य अधिक महत्त्वाचे ठरते. राष्ट्राला खिळखिळे करण्यात, अंतर्गत कलह वाढवण्यात ही ‘टुकडे टुकडे गँग’ नेहमीच अग्रेसर राहिली आहे. या गँगला राष्ट्र एकसंघ राहणे किंवा राष्ट्रभावनेची तशी अ‍ॅलर्जीच. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंसेचा आधार घेऊन उपद्रव माजवण्यात आघाडीवर असणारी ‘टुकडे टुकडे गँग’ ही एक प्रकारे देशाला लागलेली कीडच म्हणावी लागेल. या गँगला इतर कुठल्याही धर्माचे पुरस्कार करणारे सरकार सत्तेवर चालतील पंरतु हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे सरकार मात्र यांच्यासाठी विटाळ! सरकार कोणत्याही विचारांचे असो घटनेची चौकट ओलांडून कार्य करणे अशक्यच. त्यामुळे ‘टुकडे टुकडे गँग’चा गोंधळ अनाठायी ठरतो. सर्वार्थाने सरसंघचालकांचे करोनाकाळातील विजयादशमीचे विचार राष्ट्राला लक्ष वेधून घेण्यास निश्चितच भाग पाडतील.

– श्रीकांत शंकरराव इंगळे, पुणे.

.. होय; पण कोण ते तरी सांगा ना!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संयमित नेतृत्व म्हणून ओळखले जाते परंतु २५ ऑक्टोबर च्या दसरा संमेलनातल्या त्यांच्या भाषणात संयमाचा अभाव दिसून आला. मुख्य मंत्री म्हणतात ‘हिंमत असेल तर विद्यमान सरकार पाडून दाखवा,’ अरे मग सरकार पाडण्याचे उद्योग कोण करत आहे ते जाहीर पणे सांगावे, नुसते हवेत बाण मारणे कशासाठी? या वरून एक मजेशीर घटना आठवली. एका शहरात एका पतपेढी च्या सभासदांचे एकमेकांशी चांगले संबंध होते. काही सभासदांनी असे म्हणण्यास सुरुवात केली की पतपेढीत काही तरी भानगड आहे, शेवटी वैयक्तिक संबंधां मधून पतपेढीचे अध्यक्ष तक्रार करणाऱ्या सभासदांना भेटले आणि आपल्या पतपेढीत काय भानगड तुम्हाला वाटते ते सांगा अशी विनंती केली त्यावर तक्रार करणारे सभासद म्हणू लागले की काय भानगड आहे, ते सांगता येणार नाही पण काहीतरी भानगड नक्की आहे. ‘सरकार पाडून तर दाखवा’ या गर्जनेचे तसेच झाले आहे.

– अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण</p>

अर्धसत्य बोला, तेही रेटून बोला..

‘पहिली बाजू’ सदरातील ‘आकडे सर्व काही सांगतात..’ (२७ ऑक्टोबर) हा लेख वाचला. याच दिवशीच्या ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी दैनिकात राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) २०१९च्या ताज्या अहवालातील भारतातील गुन्हेगारीबद्दलचे विश्लेषण वाचत असताना ‘पहिली बाजू’ मांडणाऱ्या लेखक महाशयांनी आकडय़ांची ज्या प्रकारे कसरत केली आहे, ती पाहून ‘खोटे बोला व तेही रेटून बोला’ या विधानाची आठवण झाली. अर्थात, मंत्र्यांचे म्हणणे अर्धसत्य आहे, अशीही बाजू मांडता येईल. पण खोटे आणि अर्धसत्य यातील सीमारेषा कशी पुसट आहे, ते पाहू.

‘पहिली बाजू’ मांडणारे मंत्री महोदय मुळात, ‘उपलब्ध आकडेवारीनुसार गुन्हेगारीकरणामध्ये उत्तर प्रदेश हा तुलनेने इतर राज्यांपेक्षा फारच कमी आहे’ असा दावा करत असून त्याचे सर्व श्रेय ते त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देत आहेत. त्यांच्या मते ‘योगींच्या मार्गदर्शनाखाली सरकारने महिलांच्या संरक्षणासाठी केवळ उपाययोजनाच केल्या नाहीत तर अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल यासाठी पावले उचलली आहेत. त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला यश मिळाले आणि गुन्हेगारांमध्ये जरब निर्माण झाली.’ आपल्या या विधानाच्या पुष्टय़र्थ मागील वर्षीच्या काही (निवडक) आकडेवारीशी तुलना करत आपली पाठ थोपटून घेत आहेत. परंतु प्रत्यक्षातील आकडेवारी त्यांच्या विधानातील फोलपणा उघड करणारीच ठरते.

‘एनसीआरबी’च्या (राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग) अहवालानुसार २०१८ ते २०१९च्या दरम्यान देशभरात महिलांच्या विरोधातील व दलितांच्या विरोधातील गुन्हेगारीत सुमारे सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ साली प्रति लाख लोकसंख्येमागे ६२.४ महिलांच्या विरोधात गुन्ह्यंची नोंद झाली असून २०१८ साली ती ५८.८ एवढी होती. यात बहुतेक राज्यांचा कमीजास्त प्रमाणात वाटा असला तरी या गुन्हेगारीत उत्तर प्रदेशचा वाटा सर्वात जास्त आहे. महिलांच्या विरोधातील गुन्हेगारीत उत्तर प्रदेशचा वाटा १४.७ टक्के असून स्त्रियांवरील बलात्कारप्रकरणी राजस्थान (५९९७ केसेस) नंतर उत्तर प्रदेशचा (३०६५ केसेस) क्रमांक लागतो. बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्याखालीसुद्धा  (पोस्को) ७४४४ गुन्हे उत्तर प्रदेशात नोंदविले गेले आहेत. दलितांवरील अत्याचारप्रकरणी उत्तर प्रदेशचा वाटा देशभराच्या आकडेवारीपैकी २५.८ टक्के आहे. आकडे कितीही बोलके वाटत असले तरी गुन्ह्यची तीव्रता, त्यातील क्रूरपणा, गुन्हेगारांचा (व प्रशासनाचा) मुर्दाडपणा व बळी पडलेल्यांची (व त्यांच्या कुटुंबीयांची) होत असलेली मानसिक उद्ध्वस्तता या आकडय़ांतून प्रकट होत नाहीत. त्यामुळे केवळ यापूर्वीच्या वर्षांतील गुन्हेगारीच्या व शिक्षा होण्याच्या प्रकरणांची टक्केवारी (तीही निवडक प्रकारच्या गुन्ह्य़ांत) यंदाच्या आकडेवारींत तुलनेने किंचित सुधारल्याचे, घटल्याचे दिसले तरी त्यामुळे ‘..गुन्हेगारांमध्ये जरब निर्माण झाली’ हे विधान हास्यास्पद ठरेल.

– प्रभाकर नानावटी, पुणे