ट्रम्प-प्रवृत्तीचा पराभव गरजेचा

‘बुडाला ट्रम्पुल्या पापी’ हा संपादकीय लेख (९ नोव्हेंबर) वाचला. संकुचित राजकीय भूमिका आणि आक्रमकता यांसाठीच ओळखले जाणारे ट्रम्प यांचा पराभव आणि सहिष्णु व व्यापक राजकीय भूमिकेचे समर्थन करणारे जो बायडन यांचा विजय यामुळे लोकशाहीला निश्चितच दिलासा मिळाला. तसेच जगातील इतर देशांतही विशेषत: भारतात लोकशाहीप्रेमींच्या आशा पल्लवित होतील. ब्राझील, तुर्कस्तान व इतर काही देशांमध्येही अशा उपटसुंभ नेतृत्वाच्या विरोधातील पक्षांना बळ मिळेल. अमेरिकेत सत्तांतर होण्यामध्ये तेथील घटनात्मक संस्था आणि माध्यमे यांची भूमिका अधोरेखित करणे आवश्यक ठरते. भारतात मात्र अशा संस्था आणि माध्यमे निखळ लोकशाहीच्या समर्थनार्थ सत्तेविरुद्ध ठाम भूमिका घेतील असे दिसत नाही.

कमला हॅरिस यांची ‘भारतीय’ म्हणून आरती करणाऱ्यांपैकी अनेकांना सोनिया गांधी यांचे भारतीयत्व मात्र पचनी पडत नाही. जगभरातील ट्रम्प-प्रवृत्तीचा पराभव होणे ही काळाची गरज आहे.

– अ‍ॅड. वसंत नलावडे, सातारा

गुजराती मतांसाठी केलेले प्रयत्न हास्यास्पद कसे?

‘बुडाला ट्रम्पुल्या पापी’ (९ नोव्हें.) या संपादकीयातील बरेचसे विचार पटण्यासारखे असले तरी, काही बाबतीत, अमेरिकेच्या दृष्टीने ट्रम्प महाशयांनी घेतलेले निर्णय योग्यच म्हणावे लागतील. मेक्सिकोतून अमेरिकेत स्थलांतर करणाऱ्यांवर बंधने आणणे, दहशतवादी कारवायांच्या भीतीने काही विशिष्ट देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाकारणे, अमेरिकन नागरिकांना नोकरीत अधिक प्राधान्य मिळावे म्हणून अन्य देशीयांच्या (त्यात भारतही) ‘एच-वन बी’ व्हिसावर बंधने, इत्यादी.

मूळ भारतीय वंशाच्या लोकांची मते, अटीतटीच्या निवडणुकीत निश्चितच उपयोगी पडली असती.  दोन-तीन पिढय़ांपूर्वी अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या नागरिकांत ख्रिस्ती धर्मीयांचे प्रमाण थोडे जास्त असेलही, परंतु गेल्या काही दशकांत, हिंदू व जैन धर्मीय गुजराती लोकांचे अमेरिकेचे नागरिकत्व घ्यायचे प्रमाण खूपच वाढले आहे. थोडक्यात मोदींच्या लोकप्रियतेचा भारतीयांची मते ट्रम्प यांना मिळावीत म्हणून केलेले प्रयत्न, पोरकट व हास्यास्पद म्हणणे योग्य नाही.

याशिवाय, ट्रम्प व बायडेन यांपैकी कोणाचे परराष्ट्र धोरण भारताला अधिक झुकते माप देईल याचा विचार भारतीयांनी करणे महत्त्वाचे आहे.

– डॉ. विराग गोखले, भांडुप पूर्व (मुंबई)

एकाधिकार, चुकीची धोरणे यामुळेच पराभव..

‘बुडाला ट्रम्पुल्या पापी’ हे संपादकीय वाचले. लोकशाही महासत्ता असलेल्या अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पसारखा एक वाचाळवीर हुकूमशाही प्रवृत्तीचा माणूस २०१६ साली अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. त्यानंतर त्यांनी मुस्लीमविरोधी धोरणे, भारतीय व्हिसा प्रकरण इ. अनेक बाबतीत चुकीचे धोरण राबविले असल्याचे दिसून येते. डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतीय सख्खा मित्र व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही त्यांच्या विचाराने प्रवृत्त झालेले. या दोघांनीही आपापल्या देशात दोघा मित्रांचे निवडणूकपूर्व कार्यक्रम आयोजित केले. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव हा त्यांच्या अहंकारामुळे, एकाधिकारामुळे, चुकीच्या धोरणांमुळे झाला हे मोदी समर्थकांनाही आता मान्य करावेच लागेल.

– बळीराम शेषेराव चव्हाण, जहागीरदारवाडी तांडा, उस्मानाबाद</p>

चीनबद्दल बायडेन यांचे धोरण काय असेल?

‘बुडाला ट्रम्पुल्या पापी’ हा अग्रलेख वाचला. ट्रम्प यांच्यासारख्या लहरी, अविवेकी नेत्यास विचारी अमेरिकन नागरिकांनी घरचा रस्ता दाखवला हे सामंजस्याचे लक्षण आहे. करोना हाताळता आला नाही, महिलांबदल अनादर, कृष्णवर्णीय  इसमाच्या गळ्यावर पाय देऊन गोऱ्या पोलीस अधिकाऱ्याने त्याचा केलेला खून, त्यामुळे उसळलेल्या दंगली, स्थलांतरितांबाबत अनास्था, अशी अनेक कारणे त्यांच्या पराभवास देता येतात. तथापि अग्रलेखात चीनचा उल्लेख नाही हे खटकले. भारत-अमेरिका संबंधांत चीन हा कळीचा मुद्दा ठरतो आहे. सध्याच्या लडाख सीमेवरील परिस्थितीमुळे तर जास्तच. त्यामुळे बायडेन यांचे चीनबाबत व बेकाबाबत काय धोरण राहील याचा उल्लेख अग्रलेखात हवा होता.

– शिवलिंग राजमाने, पुणे

भावनिक मुद्दय़ांऐवजी जनतेच्या प्रश्नांकडे पाहा..

सत्ता कायमस्वरूपी नसते. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून जो बायडन नवीन राष्ट्राध्यक्ष होत आहेत. तरीही सत्तेचा लोभ सुटत नसल्याने ट्रम्प यांनी मतमोजणीत घोटाळा झाल्याचे आरोप, न्यायालयात जाणे वगैरे गोष्टी केल्या. एककल्ली हट्टीपणा, जनतेला विश्वासात न घेता निर्णय, करोना संकटकाळी झालेली मोठी जीवितहानी, अर्थव्यवस्थेवर झालेला विपरीत परिणाम व इतर अनेक कारणांनी ट्रम्प यांना सत्ता गमवावी लागली. जनता ही शक्तिमान असते. त्यामुळे जनतेच्या हिताचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक असते. अमेरिकेच्या निवडणुकीतून दिसून आले की, जनता विचारपूर्वक मत देत आहे. त्यामुळे महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य असावे. भावनिक मुद्दे उपयोगी ठरतील असे वाटत नाही.

– प्र. मु. काळे, सातपूर (नाशिक)

अमेरिकेतही तिसरा पक्ष उदयास येईल?

लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे कोणतेही नवीन युद्ध ट्रम्प यांनी केलेले नाही. इराणशी युद्ध होता होता थांबवले. उत्तर कोरियासारख्या कट्टर शत्रूशी हातमिळवणी करून तोडगा काढायचा प्रयत्न केला. याउलट जो बायडन, क्लिंटन यांनी इराक युद्ध होण्यासाठी मतदान केले होते. येत्या काळात जो आणि कमला यांची युद्धखोर आणि मूठभर कंपन्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची वृत्ती जगासमोर येईलच. सिनेटमध्ये डेमॉक्रॅटिक पार्टीला बहुमत नसेल. सुप्रीम कोर्टातही जास्त न्यायाधीश रिपब्लिकन असतील. त्यामुळे जो आणि कमला यांची घोडदौड फार होणार नाही. बर्नी सँडर्स, तुलसी गाबार्ड यांच्यामुळे का होईना निदान डेमॉक्रॅटिक पार्टीला व्यवस्थेतील वंशवाद, हेल्थकेअर फॉर ऑल वगैरे मुद्दय़ांची दखल घ्यावी लागली. अन्यथा डेमॉक्रॅट हे ‘मॉडरेट रिपब्लिकन’ असल्यागत वागतात आणि त्याला ‘सेंट्रिस्ट’ म्हणून गोंडस नाव देतात.

या संभाव्य अपयशातच पुढील सत्ताबदलाची बीजे असणार आहेत. कदाचित लोकांच्या आकांक्षांना आकार देणाऱ्या तिसऱ्या पक्षाची स्थापना हा पर्यायसुद्धा असू शकेल. २०२४ पर्यंत बर्नी सँडर्स यांच्याप्रमाणे पक्षीय व्यवस्थेशी जुळवून घेण्यापेक्षा नव पक्ष किंवा व्यवस्थानिर्मितीकडे पुरोगामी अमेरिकी तरुण वर्ग झुकलेला असेल, असे वाटते. कदाचित तो खरा लोकशाहीचा हुंकार असेल.

– नीलेश तेंडुलकर, नवी मुंबई

सदसद्विवेकबुद्धीचा कौल अमेरिकेत दिसला

‘बुडाला ट्रम्पुल्या पापी’  हा अग्रलेख ( ९ नोव्हेंबर ) वाचला.  वास्तविक अमेरिकेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याच्याशी सर्वसामान्य भारतीय माणसाला देणेघेणे नसते; पण ट्रम्प यांचे धोरण मात्र धर्मवादी होते आणि त्यामुळेच भारतीय सत्ताधारी राजकारणी ट्रम्प यांना ‘नमस्ते ट्रम्प’ म्हणून पायघडय़ा घालत होते. अमेरिकेची निवडणूक म्हणजे आपल्या भारतातील एखाद्या राज्यातील निवडणूक नव्हे हे एव्हाना लक्षात आले असेल असे म्हणण्यास हरकत नाही. कारण अमेरिकेत मुसलमान आणि ख्रिस्ती असा भेद अन् भारतात हिंदू आणि मुसलमान असा निर्थक वाद करणारे अनेक आहेत; पण आपला देश अनेक जातीधर्माचा बनलेला आहे याचाच विसर पाडण्याचा प्रयत्न सुरू असताना अमेरिकन मतदारांनी सदसद्विवेकबुद्धीने बायडेन यांना कौल दिला आहे. भविष्यात भारतीयही सुज्ञ कौल देतील, अशी अपेक्षा या घडामोडीनंतर ठेवता येते.

– सुनील समडोळीकर, कोल्हापूर</p>

वाचाळ संस्कृतीला खोडा घालणारे अंदाज

‘सत्ताकेंद्र राजद की भाजप?’ हा महेश सरलष्कर  यांचा  लेख (लाल किल्ला, ९ नोव्हेंबर) वाचला. बिहार निवडणूकसंदर्भात जवळपास सर्वच मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडीच्या बाजूने आहेत. वास्तविक सुरुवातीला (लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआला बिहारमध्ये मिळालेल्या ४० पैकी ३९ जागा लक्षात घेता) रालोआसाठी एकतर्फी वाटणारी बिहार विधानसभेची निवडणूक नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवून नितीशकुमार यांच्या पक्षाच्या जागा कमी करून भाजपचा मुख्यमंत्री बनवण्याची तिरळ-खेळी भाजपकडून करण्यात आली. त्यासाठी चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचा वापर करण्याचे भाजपने मनसुबे रचले. सत्तेसाठी वाटमारी करण्याची भाजपची रणनीती बिहारच्या मतदारांच्या पचनी पडली नाही असे मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजावरून दिसते. मतदारांना गृहीत धरणाऱ्या वाचाळ संस्कृतीला अमेरिकेप्रमाणे बिहारचे मतदारसुद्धा योग्य उत्तर देऊन सत्तांतर घडवून आणतील हेच विविध मतदानोत्तर चाचण्यांचे अनुमान दर्शवितात. असे झाल्यास नजीकच्या भविष्यकाळात पश्चिम बंगालसह इतर राज्यांत होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपच्या धुरिणांना चिंतन करावे लागेल.

– नामदेव तुकाराम पाटकर, काळाचौकी (मुंबई)

खासगी कोविड-रुग्णालये आता तरी बंद करा

मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक प्रभागात खासगी हॉस्पिटल ‘कोविड हॉस्पिटल’ म्हणून ताब्यात घेतली. राज्यात अन्य ठिकाणीही याचे अनुकरण झाले, ती काळाची गरजच होती. पालिकेने विलगीकरण केंद्रे युद्धपातळीवर उभी केली. आता करोना रुग्णसंख्या घटत असताना पालिकेची व्यवस्था पुरेशी आहे. पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष घालून आपल्या ताब्यातील खासगी कोविड हॉस्पिटल पूर्णत: बंद करून त्यांना परवानगी द्यावी.

— कृष्णा काजरोळकर, विक्रोळी पूर्व (मुंबई)