सहकारी बँका बोटचेप्या, म्हणून हे निर्बंध

रिझव्‍‌र्ह बँकेने सहकारी बँकांच्या भागधारकांना लाभांश न देण्याबाबत तसेच भाग रक्कम परत न करण्याबाबत आदेश दिलेले आहेत (बातमी : लोकसत्ता- २७ नोव्हें.); त्यासाठी दिलेली सबब न पटणारी आहे. केवळ लाभांश रक्कम न देण्याने सहकारी बँकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल हे रिझव्‍‌र्ह बँकेचे विधान व्यवहार्य तर नाहीच, परंतु सहकारी बँकांच्या आर्थिक परिस्थितीची यथायोग्य जाण नसल्याचे निदर्शक आहे. सहकारी बँकांचे समभाग गुंतवणूक म्हणून घेण्याचे प्रमाण अत्यल्प असते. कारण त्या गुंतवणुकीची खरेदी- विक्री कंपन्यांच्या शेअर्सप्रमाणे खुल्या बाजारात होत नाही. सहकारी बँकेतून कर्ज घेणाऱ्या व्यक्तीस हे समभाग घ्यावे लागतात. विनातारण कर्जाच्या रकमेच्या पाच टक्के, तर तारण असलेल्या कर्जाच्या दोन टक्के रकमेचे समभाग कर्जदारास संबंधित सहकारी बँकेकडून घ्यावे लागतात. या अटीमागील मुख्य कारणे कायदेशीर स्वरूपाची आहेत. त्यातील एक म्हणजे सहकारी बँकांसाठी सरकारने बनविलेल्या उपविधीनुसार ‘सहकारी बँक फक्त तिच्या सभासदालाच कर्ज देऊ शकते’. दुसरे कारण जास्त महत्त्वाचे आहे. सहकारी न्यायालयात आणि उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यासमोर महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम १९६० चे अनुक्रमे कलम ९१ किंवा १०१ अन्वये कर्जदाराविरुद्ध निकाल किंवा वसुली दाखला लवकर मिळावा यासाठी तो कर्जदार बँकेचा भागधारक असावा लागतो. असा कर्जदार हा बँकेचा थकबाकीदार असल्यास लाभांश रक्कम त्याच्या थकीत कर्ज खात्यातच जमा होते. त्यामुळे त्यांच्या लाभांशाची रक्कम ही बँकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आपोआपच वापरली जात असते. बँकेची भाग-पर्याप्तता (म्हणजेच बँकेचे भागभांडवल) वाढविण्यासाठी समभाग विक्री करण्याचा मार्ग अवलंबावा असे रिझव्‍‌र्ह बँक एकीकडे सांगते, तर दुसरीकडे त्यावर लाभांश न देण्याचे आदेश देऊन त्या गुंतवणुकीची निर्थकताच दर्शवून देते.

ज्या सहकारी बँकांनी उत्तम व्यवसाय करून नफा कमावला आहे त्यांच्या लाभांश वितरणास मनाई करण्यात काहीच हशील नाही, कारण नफा न कमावणाऱ्या किंवा आर्थिक गैर व्यवहारांनी जर्जर झालेल्या सहकारी बँका लाभांश वितरण करूच शकत नाहीत. शिवाय मुळात देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेतील सहकारी बँकांचे योगदान पाहता त्यांच्या लाभांशावरील निर्बंधाने देशाच्या आर्थिक स्थितीवर काही विशेष परिणाम होईल असे मानणे अज्ञानीपणाचे ठरेल किंवा तो दात कोरून पोट भरण्याचा प्रकार ठरेल. एकूणच सहकारी बँक ही एक बोटचेपे स्थळ किंवा ‘सॉफ्ट टार्गेट’ असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने दाखवून दिले आहे.

– विवेक शिरवळकर, ठाणे</p>

आधीच्या सरकारचा हा निर्णय रद्द का करत नाही?

‘अकृषक कराची पूर्वलक्ष्यी प्रभावाने वसुली’ ही बातमी (लोकसत्ता- २७ नोव्हें.) वाचली. अकृषक करात दर पाच वर्षांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. रेडिरेकनरच्या तीन टक्के अकृषक कर आकारण्याचा हा निर्णय म्हणजे, सहकारी गृहनिर्माण संस्थांवर केलेला घोर अन्याय असून याचा सर्व स्तरावरून निषेध व्हायला हवा. हा निर्णय आधीच्या सरकारचा असला तरी आताच्या आघाडी सरकारने त्या सरकारचे अनेक निर्णय रद्द केले आहेत व बदललेही आहेत, मग हा सर्वसामान्यांना जाचक असलेला कर का रद्द करीत नाही? सरकार अनेक ठिकाणी खर्चात कपात करू शकते, पण सरकार याला तयार आहे का?

– राजन बुटाला, डोंबिवली

ग्राहकांनी तारतम्य ढळू देऊ नये

‘हॉटेलमधील पदार्थसारणीचे पौष्टिक बारसे’ ही बातमी (२६ नोव्हेंबर) नेमका ‘ट्रेण्ड’ अगदी नेमक्या वेळी टिपणारी आहे. असे बारसे फक्त पदार्थसारणीचे होते आहे असे नाही, आणि ते आत्ता करोनाच्या पार्श्वभूमीवरच होते आहे असेही नाही. जाहिरातींमधून हे ‘बारसे’ होणे जुनेच आहे. खाद्यतेलात वा मुलांच्या चॉकलेटयुक्त पेयांत पूर्वी केवळ जीवनसत्त्वे, किंवा उंची वाढवणारी, मेंदू तल्लख करणारी ‘तत्त्वे’ असायची, आता त्यात ‘इम्युनिटी बूस्टर्स’सुद्धा आले! इतकेच काय, पण अगदी टूथपेस्टमध्ये आता केवळ तोंडातील बॅक्टेरियाच नव्हे तर करोनासकट ‘९९.९ टक्के’  विषाणूसुद्धा मारण्याची क्षमता आलेली आहे! साधे फरशी पुसण्याचे रसायन किंवा प्लायवूडसुद्धा आता करोनाला मारू लागले आहे. जेव्हा आयुर्वेद आणि सारे काही ‘कुदरती’ असण्याचा ट्रेण्ड जोरात होता तेव्हा अगदी परदेशांतून भारतात आलेल्या, चेहऱ्यावर लावायच्या सौंदर्यप्रसाधनांत बदाम, केशर, दूध, मलाई, हळद, इत्यादींचे इतके ‘गुण’ दिसू लागले की भारतीय गृहिणीला ते क्रीम चेहऱ्यावर लावण्यापेक्षा स्वयंपाकातच वापरण्याचा मोह व्हावा! अशी प्रसंगानुरूप बारशी वेळोवेळी होत असताना ग्राहकांनी त्यांचे तारतम्य न सोडता योग्य निर्णय घेतला पाहिजे.

– विनिता दीक्षित, ठाणे

त्याच्या जगण्यातून सामान्यांनी काय शिकावे?

‘देवत्वाचा शाप!’ (२८नोव्हें.)हा अग्रलेख वाचला. प्रसिद्धीच्या ओघात पैसा-संपत्तीला भुलून आनंदाचे नवनवीन पर्याय शोधणे, व्यसनाच्या आहारी जाणे, हे घडल्यावर आयुष्यात काहीच अर्थ राहात नाही, याची जाणीव कदाचित दिएगो मॅराडोनाला असावी. म्हणूनच, आपल्या हतबलतेचे खापर त्याने कोणावर फोडले नाही की कोणाविषयी मनात द्वेष बाळगला नाही. या फुटबॉलपटूच्या जीवनातून तुम्हा आम्हाला मिळणारा सारसंदेश एकच :  केवळ आपल्या क्षेत्रात महान असून चालत नाही, त्या महानतेमुळे तुम्हाला कवटाळू पाहणाऱ्या आसक्तीपासून विभक्त राहणे गरजेचे..अन्यथा तुमच्या कलेला गिळंकृत करण्याचे सामर्थ्य त्या असक्तीत असते.

-गौरव अनिल पितळे, गौरखेडा- कुंभी (ता.अचलपूर, जि.अमरावती)

हयात असतानाच दंतकथा!

‘ देवत्वाचा शाप! हा अग्रलेख (२८नोव्हें.) वाचला. प्रचंड मेहनत, पराकोटीची जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती असली की यशाचे शिखर गाठता येते. हे गरिबीतून जन्मलेल्या मॅराडोना यांनी सिद्ध करून दाखविले. फुटबॉलवर नियंत्रण, अफलातून पदलालित्य आणि आक्रमक गोल करण्याच्या अद्भुत कौशल्यामुळे ‘देव’पद देऊन त्यांच्या नावाने चर्च बांधले गेले आणि मूर्ती पूजन केले गेले. अमली पदार्थांची जडलेली व्यसने त्याचा घात करणारी ठरली. मात्र, इतके सगळे होऊनही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. त्यांच्या नावाचे वलयच इतके मोठे होते की, हयात असताना ते दंतकथा ठरले होते!

– सुनील कुवरे, शिवडी ( मुंबई)