बेमुर्वत विकासाला निसर्गाचा प्रखर विरोध!

‘देवभूमीतील दैत्य’ हा अग्रलेख (९ फेब्रुवारी) वाचला. देवभूमीतील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता तेथील पृथ्वीच्या भूस्तरात सतत हालचाल होत असते आणि भूपृष्ठ सतत बदलत असतात. गेली हजारो वर्षे ही क्रिया चालू असल्यामुळे हिमालय पर्वत हा घडीचा पर्वत बनला आहे. त्यामुळे तेथील खडक हा भुसभुशीत आहे. त्याची माती घट्ट धरून ठेवण्यासाठी घनदाट जंगल आवश्यक ठरते. पण अंदाधुंद विकासाच्या नावाखाली तिथे सरेआम जंगलतोड चालू आहे. त्याचा परिणाम म्हणजे परवाचा ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाचे प्रचंड नुकसान करणारा निसर्गाचा प्रकोप! हिमालयात धरण बांधणे किंवा रस्तेबांधणी करणे किती धोकादायक आहे याची निसर्गाने दाहक चुणूक दाखवली आहे; तेव्हा वेळीच सावध व्हायला हवे. नाहीतर देवभूमीत दैत्य जागा झालेलाच आहे.

पृथ्वीचे तापमान वाढल्याने हिमखंडांच्यावितळण्यात कशी आणि कितीवाढ होईल याचा विचार करून तसेच उत्तराखंडमधील हिमालयाच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून पर्यावरणवाद्यांनी अशा धरण प्रकल्पांना कायम विरोध दर्शवला होता आणि आहे. पण कागदी घोडे नाचवणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनी, पर्यावरणवाद्यांना देशाचा विकास व्हायला नकोय म्हणून ते देशविरोधी कृत्ये करीत आहेत, अशी ओरड सुरू केली. खरे पाहता पर्यावरणवादी अभ्यासून प्रकट होत असतात, तर सत्तेतील राजकारण्याचे लांगुलचालन करणारे अधिकारी मात्र अंध भक्तीने प्रकट होतात. त्याचा काय परिणाम होतो ते आपण आज उत्तराखंडमध्ये पाहतो आहोतच.

परदेशातही पर्वतराजीतून रस्ते बांधण्याचे काम केले जाते. पण तेथे पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान होईल अशा शास्त्रीय पद्धतीने ते करतात. तसेच ज्या प्रमाणात जंगलतोड झाली असेल तेवढय़ाच प्रमाणात नवीन जंगल उभारले जाते आणि त्यावर निगुतीने लक्ष ठेवले जाते. आपल्याकडे मात्र वृक्षारोपणाच्या नावाखाली कोटय़वधी झाडे लावण्याची फक्त बतावणी केली जाते; पण प्रत्यक्षात मात्र जंगलांचा ऱ्हासच होत असतो.

बहुसंख्याकांचे लांगुलचालन करण्याच्या नादात अंध भक्तांच्या तीर्थयात्रा सुकर व्हाव्यात म्हणून २०१६ साली चारधाम यात्रेसाठी ९०० कि.मी.चा चौपदरी रस्ता तयार करणाऱ्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ पंतप्रधान मोदींनी केली होती. तेव्हापासून निसर्गाला ओरबाडून रस्तेबांधणीसाठी ठिसूळ हिमालयातील जंगलांचा ऱ्हास आणि कंत्राटदारांशी साटेलोटे असणाऱ्या राजकारण्यांचा आर्थिक विकास अनिर्बंधपणे होत आहे. मग पर्यावरणवाद्यांच्या विरोधाला विचारतो कोण? पण उत्तराखंडातील निसर्ग प्रकोप पाहून आता तरी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारणारे उंटावरचे शहाणे पर्यावरणाशी जुळवून घेत विकास करण्याचे धोरण आखतील काय?

– जगदीश काबरे, सीबीडी, नवी मुंबई</p>

झोपेचे सोंग महागात पडणार..

‘देवभूमीतील दैत्य’ हे संपादकीय (९ फेब्रु.) वाचले आणि एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे निसर्ग घडणाऱ्या घटनांमधून आपल्याला वेळोवेळी जागे करू पाहत आहे. पण सरकार आणि आपण नागरिक मात्र झोपेचे सोंग घेत आहोत. कारण उत्तराखंडमध्ये घडलेली घटना ही काही पहिलीच घटना नाही. याआधी २०१३ सालीही अशीच महाप्रलयंकारी घटना घडली होती. मागील काही वर्षांपासून तिन्ही ऋतूंमध्ये आपण अनुभवत असलेली अनियमितताही याचेच फलित आहे. हे असेच सुरू राहिले तर एक दिवस आपला विनाश अटळ आहे! या आपत्तींमागील नेमकी कारणे वेळोवेळी समोर आलेली आहेत. फक्त गरज आहे ही कारणे समजून घेण्याची आणि ती स्वीकारून त्यांवर मात करण्याची. आपत्ती आली कीे फक्त सरकारी मदत जाहीर करणे हा यावरील उपाय नक्कीच नाही. नाहीतर आहेच.. ये रे माझ्या मागल्या!

– दीपाली सुनंदा राजेंद्र गायकवाड, नेवासा (अहमदनगर)

शाश्वत विकासच तारेल

एकंदरीतच आता मानवजातीचा विकासाचा दृष्टिकोन हा मानवाच्याच विनाशाचे कारण बनतो की काय अशी परिस्थिती येत्या काही दिवसांत जर पर्यावरणाच्या बाबतीत कडक धोरणांची अंमलबजावणी केली नाही तर येऊ शकते. ‘अज्ञानी आनंद’ (१ फेब्रुवारी) या अग्रलेखात दावोस येथील हएा च्या अर्थकुंभात जगासमोरील संभाव्य धोक्यांबाबत विस्तृतपणे विश्लेषण केले गेले. त्यात प्रामुख्याने साथीचे आजार आणि मानवनिर्मित पर्यावरणीय संकटे असतील हेही अधोरेखित केले गेले होते. आणि त्यानंतर काही दिवसांतच उत्तराखंडची घटना समोर यावी, यातूनच पुढे परिस्थिती किती भयावह असू शकते याची कल्पना येते! आजमितीला पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास या संकल्पना केवळ चर्चासत्रे आणि कागदोपत्रीच मर्यादित आहेत की काय याची प्रचीती वेळोवेळी येते. आता मात्र वेळ आली आहे की याबाबत संपूर्ण जगाने एकत्र मिळून यासाठी कडक धोरणे आणि उपाययोजना आखून, त्या प्रभावीपणे कशा पद्धतीने अमलात येतील यासाठी प्रयत्न करण्याची!

– उमाकांत सदाशिव स्वामी, पालम (जि. परभणी)

..सबळ पुरावा नसूनही तुरुंगवास!

‘विनोदी कार्यक्रम सादरकर्ते मुनावर फारुकी याची सुटका’ हीबातमी वाचली. फारुकी याला सर्वोच्च न्यायालयाने जामीनमंजूर करण्याआधी इंदूरन्यायालय आणि भोपाळउच्च न्यायालय यांनी त्याचा जामीनअर्ज नामंजूर केला होता. सर्वोच्च न्यायालयाने तोमंजूर केला. मात्र, इंदूरतुरुंगाधिकारी राकेशभांगरे यांनी फारुकीची सुटका करायला ३६ तास लावले. भांगरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाने शेवटचा उपाय म्हणून आदेश वेब पोर्टलवर टाकला. तरीही जेलअधिकारी बधलेनाहीत म्हणून ‘वेब पोर्टलवर बघा’ असे बजावल्यानंतर फारुकीची सुटका झाली. कथित आरोपावरून फारुकीला १ जानेवारीला अटक झाली होती. आरोप होता हिंदू देवतांचा अपमान. आरोप करणारा एकलव्य गौर हा भाजप आमदाराचा मुलगा आणि ‘हिंदू रक्षक’नावाच्या संस्थेचाप्रमुख. पोलिसांकडे फारुकी असे काही बोलल्याचा सबळपुरावा नसताना त्याला एका महिन्याहून जास्त दिवस तुरुंगात काढावे लागले.

– उमाकांत पावसकर, ठाणे</p>

आस्तिक-नास्तिक भांडण सामाजिक प्रश्नांसाठी!

‘ कुरुंदकरांच्या धर्मटीकेतील निराळेपण..‘ हे पत्र (८ फेब्रुवारी) वाचल्यावर असा समज होण्याची शक्यता आहे की, कुरुंदकर हे धार्मिकांची मतं आणि श्रद्धा यांना हळुवारपणे जपतच धर्मटीका करीत. पण त्यांच्या धर्मटीकेतील अनेक दाखले देता येतील, की ज्यांत कुरुंदकरी शैलीचा धारदार आणि टोकदारपणा स्पष्ट दिसून येतो.

‘मी आस्तिक का नाही?’ या लेखात कुरुंदकर एके ठिकाणी म्हणतात, ‘समाजातील हजारो, लाखो माणसांच्या भावना या ईश्वरावर श्रद्धा ठेवणाऱ्या आहेत. तेव्हा एवढाच मुद्दा असेल तर काय म्हणून त्यांच्या भावना दुखवायच्या ?..पण अडचणीची गोष्ट अशी की, मुद्दा फक्त एवढाच नाही. सबंध समाजातील आस्तिक्यबुद्धी ही समाजाला हानिकारक असणाऱ्या चालीरीती, परंपरा, रूढी यांना घट्ट धरून बसते आणि समाजाचा विनाश झाला तरी तो विनाश नसून प्राक्तन आहे असे सांगण्याचा प्रयत्न करते. समाजाच्या प्रगतीच्या सर्व शक्यता या आस्तिक्यबुद्धीमुळे नाहीशा व्हायला लागतात. तेव्हा मग हे सांगण्याची वेळ येते की, हा सर्व मूर्खपणाचा भाग आहे उरलेल्यांच्यासाठी व लबाडीचा भाग आहे काही जणांसाठी. शेवटी आस्तिक किंवा नास्तिक हे भांडण केवळ तत्त्वज्ञानापुरते नाही, तर सामाजिक प्रश्नांसाठी आहे.’  आपल्या म्हणण्यात अधिक धारदारपणा आणताना कुरुंदकर म्हणतात, ‘सर्व धार्मिक माणसांचा बुद्दूपणा हे माझ्या जीवनामधले फार मोठे दु:ख आहे. धार्मिक माणसाची बुद्धीच मंद होते अशी माझी समजूत आहे. माणसाच्या बुद्धीला मंदत्व आणण्याचे, प्रगतीला अडथळा आणण्याचे काम धर्माने केले आहे.’

तेव्हा धार्मिक श्रद्धाळूंविषयी व्यक्तिश: सौहाद्र्रता आणि नम्रभाव; पण त्यांच्या धार्मिक मतांची आणि श्रद्धांची कुठलेही दडपण येऊ न देता (ज्या यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांचा वाचकपत्रात उल्लेख आहे, त्यांनी कुरुंदकरांच्या नास्तिकपणावर एकदा प्रश्न विचारल्यावर त्यांना कुरुंदकरांनी किती उपरोधिक शब्दांत उत्तर दिले तेही त्यांच्या वरील लेखात वाचायला मिळते.) तर्ककठोर आणि धारदार चिकित्सा हाच कुरुंदकरांच्या लेखनाचा गाभा आणि स्थायीभाव होता.

– अनिल मुसळे, ठाणे (पश्चिम)

असहिष्णु आग्रह घटनाद्रोहाकडे नेणारे

‘‘आस्तिकांना ‘देव आहे’ म्हणण्याने आपले काही नुकसान होत नाही, हे मला समजू शकते. त्याचप्रमाणे माझ्या ‘देव नाही’ म्हणण्याने त्यांचेही काही नुकसान होत नाही. हे समजून घेण्याची बुद्धी त्यांच्याजवळ असावी, इतकीच आपली अपेक्षा आहे,’’ हे कुरुंदकरांचे प्रतिपादन ‘कुरुंदकरांच्या धर्मटीकेतील निराळेपण’ या ‘लोकमानस’ सदरातील पत्रात (८ फेब्रुवारी) वाचले. ‘‘आस्तिकांच्या ‘देव आहे’ असे म्हणण्यामुळे आपले काही नुकसान होत नाही हे खरे असले तरी नास्तिकांनी आणि धर्मनिरपेक्ष देशाच्या सरकारनेही ते मान्य करावे आणि त्यानुसार राज्यकारभार करावा अशा दुराग्रहामुळे जनतेचे फार मोठे नुकसान होते हे लक्षात घेण्याची बुद्धी त्यांच्याकडे नाही, हे जास्त घातक आहे. कुरुंदकरांजवळ असणारा परमसहिष्णुता हा गुणधर्म जपण्यासाठी त्यांच्याशी मतभेद असणाऱ्यांची परमसहिष्णुतादेखील तेवढीच आवश्यक ठरते. धर्मपालनाचा अतिरेक आणि देवस्थानाचा उपयोग करून समाजाच्या सहजीवनात धर्माध द्वेषाचे विष कालवणे हा घटनाद्रोह देशाचे नुकसान करणारा ठरतो. म्हणूनच तो आक्षेपार्ह आहे.

– प्रमोद तावडे, डोंबिवली