भाजपचे मंत्री जाहीर माफी मागतील काय?

‘आयुर्वेदाच्या मुळावर..’ हा अग्रलेख (२३ फेब्रुवारी) वाचला आणि भाजपचा राष्ट्राभिमान किती जाज्ज्वल्य आहे हे दिसून आले! तसे नसते तर ‘कोरोनील’ या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केलेले नसतांनाही ते केले आहे असे रेटून खोटे बोलणाऱ्या रामदेवबाबाचे स्वत: डॉक्टर असलेले आरोग्य मंत्री समर्थन करते ना! अ‍ॅलोपॅथीची औषधे सर्व चाचण्यांतून तावूनसुलाखून निघालेली असतात. याउलट, रामदेवबाबाचा आयुर्वेद म्हणजे रस्त्याकडेच्या पालाला कॉर्पोरेट रूप देऊन कोणत्याही आजारावर दिली जाणारी जडीबुटीची पुरचुंडी! ज्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे ते अ‍ॅलोपॅथीची कास धरतात; पण ज्यांच्याकडे तथाकथित देशभक्तीच्या श्रद्धेने भरलेले मन आहे ते मात्र रामदेवबाबाच्या जडीबुटीच्या मागे लागतात. आयुर्वेदात काही औषधे काही रोगांवर खरेच गुणकारी आहेत. पण त्या औषधांच्या शास्त्रीय कसोटय़ांवर चाचण्या न घेतल्यामुळे दोन हजार वर्षांपूर्वीच्या जुन्यापुराण्या ठोकताळ्यांवर ती दिली जात आहेत. त्यामुळे त्यांचा आपल्या पूर्वजांचे प्राचीन ज्ञान यापलीकडे कुठलाही ठोस परिणाम जनतेस दिसत नाही. जे स्वत:ला आयुर्वेदाचार्य म्हणवतात त्यांनी अशा औषधांना सर्व शास्त्रीय चाचण्यांतून तावूनसुलाखून प्रमाणित करणे आवश्यक नाही काय? या पार्श्वभूमीवर भाजप सरकार आपण कशाची भलामण करत आहोत हेही विसरून गेले आहे. आता सत्य उघडकीस आल्यावर तरी साधनशुचितेचा गर्व बाळगणारे भाजपचे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन तसेच रामदेवबाबाच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले दुसरे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जाहीर माफी मागण्याचे धाडस दाखवतील काय?

– जगदीश काबरे, सीबीडी (नवी मुंबई)

आयएमएने आरोग्यमंत्र्यांना शिक्षा द्यावी

‘आयुर्वेदाच्या मुळावर..’ या अग्रलेखात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना खडसावण्याचे जे धैर्य भारतीय वैद्यक संघटनेने (आयएमए) दाखवले त्याबद्दल त्यांचे जे कौतुक केले आहे ते योग्यच आहे. हे करताना ज्या निर्भीड, परखडतेने दोन्ही केंद्रीय मंत्र्यांच्या संविधानविसंगत आणि अवैज्ञानिक भूमिकेवर कोरडे ओढले आहेत त्याबद्दल ‘लोकसत्ता’चे अभिनंदन. आयएमएचे कौतुक करताना एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, त्यांनी अशा प्रकारांना विरोध करण्यासाठी तसा उशीरच केला आहे. (तसा तो एकूणच भारतीय वैज्ञानिक जगतानेदेखील केला आहे.) कारण या सरकारातील अनेक मंत्री, खासदार, नेते विविध उपचारांच्या बाबतीत उघडपणे अवैज्ञानिक दावे गेल्या पाच-सात वर्षांपासून करीत आहेत. कोरोनाकाळात तर याला ऊत आला होता. वर्तमान प्रकरणातील मंत्र्यांचे वर्तन हे आधुनिक वैद्यकाच्या अगदी गळ्याशी आल्यावर मग आयएमए जागी झाली आहे. अर्थात हेही नसे थोडके. यापुढे जाऊन स्वत: डॉक्टर असलेले केंद्रीय आरोग्य मंत्री याबाबतीत स्पष्टीकरण देणार नसतील तर त्यांना संबंधित नियमांनुसार शिक्षा होईल, इतके धाडसदेखील आयएमएने दाखवावे.  छद्मविज्ञानाचे जाहीर समर्थन करून या मंत्र्यांनी संविधानातील ५१(अ) या कलमाची अवहेलना केली आहे. आयुर्वेदाला आधुनिक विज्ञानाच्या सर्व कसोटय़ांवर उतरवून जागतिक स्तरावरील विज्ञान म्हणून प्रकाशात आणण्याऐवजी ज्या अन्य लटपटी केल्या जात आहेत त्या आयुर्वेदाविषयी संशय निर्माण करणाऱ्या आहेत. आयुर्वेदाला आधुनिक विज्ञानाच्या स्तरासोबत आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न जरूर केले जावेत. सत्तेचा माज दाखवून किंवा भावनिक प्रचारतंत्र वापरून हे होणे शक्य नाही.

– उत्तम जोगदंड, कल्याण</p>

वैज्ञानिकतेचीच कसोटी

‘आयुर्वेदाच्या मुळावर..’ हा अग्रलेख वाचला. त्यात आयुर्वेदाच्या नावे अप्रमाणित जडीबूटी विकणाऱ्यांची भलामण करणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे ते योग्यच झाले. औषध अनावरणाच्या कार्यक्रमात दावा केल्याप्रमाणे रामदेवबाबाचे ‘कोरोनिल’ हे करोना निर्मूलनाचे टूलकिट खरोखरच गुणकारी असल्यास केंद्रीय आरोग्य खात्याने भारताच्या कानाकोपऱ्यांत तेत्वरेने पोहोचवायला हवे. तसे केल्यास नाकाबंदी, संचारबंदी, गर्दीवर नियंत्रण, मुखपट्टी, सामाजिक अंतर इत्यादी जालीम सरकारी उपायांतून जनतेची सुटका होईल व लशीकरणावरील नाहक खर्च कमी होऊन गेले वर्षभर रुळावरून घसरलेली अर्थव्यवस्था उभारी घेऊ शकेल. रामदेवबाबांच्या या टूलकिटच्या प्रचार-प्रसारातून भारताला ‘जगाची औषधशाळा’ म्हणून पुढे येण्यास नक्कीच हातभार लागेल. त्यामुळे आपल्या अर्थमंत्र्याचे अर्थसंकल्पातून ‘सब का विकास’ हे स्वप्नही पूर्ण होऊ शकेल. खरे पाहता भारतीय वैद्यक संघटनेप्रमाणेच इतर पॅथीच्या संघटना व विज्ञानाविषयी काम करणाऱ्या संस्था-संघटनांनीही या प्रकाराला विरोध करण्याकामी पुढाकार घेण्याची गरज आहे. येथे फक्त आयुर्वेदालाच वेठीस धरलेले नसून वैज्ञानिक शिस्तीलाच बदनाम केले जात आहे.

– प्रभाकरनानावटी, पाषाण,पुणे.

आरोग्यमंत्री, तुम्हीही?

‘आयर्वेदाच्या मुळावर..’ हे संपादकीय वाचले. आजकाल अशास्त्रीय औषधांची भलामण करण्यात बरेच जण धन्यता मानतात. त्यात आरोग्यमंत्री सामील असतील तर मग विचारायलाच नको!  आधुनिक वैद्यकशास्त्रात ‘बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर’ असं म्हटलं जातं. कारण पुरेसं संशोधन झाल्याशिवाय आधूनिक औषधे बाजारात आणताच येत नाहीत. करोनावरील लशींचे पुरेशा प्रमाणात प्रयोग झालेले नाहीत असे सगळे ओरड करत असताना कोरोनीलसारख्या अशास्त्रीय औषधाची चक्क आधुनिक वैद्यकशास्त्रातील पदवी घेतलेले आरोग्यमंत्री भलामण करतात तेव्हा डोक्यावर हात मारून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.

– डॉ. संजय पालीमकर, दहिसर पूर्व, मुंबई

वृत्तवाहिन्यांवरही कारवाई करावी

‘आयुर्वेदाच्या मुळावर..’ हे संपादकीय वाचले. रामदेवबाबांनी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत करोनावरील कथित औषधाचे अनावरण केले. हे औषध जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केल्याचा दावा पतंजलीकडून करण्यात आला. मात्र, अशी कुठलीही मान्यता दिली नसल्याचे आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले. पण त्यापूर्वीच कसलीही खातरजमा न करता काही वृत्तवाहिन्यांनी हे औषध आरोग्य संघटनेकडून मान्यताप्राप्त असल्याचा खोटा प्रचार करण्यात सुरवात केली. माहिती व प्रसारण मंत्रालयाने या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन खोटय़ा बातम्या प्रसारीत करणाऱ्या या वृत्तवाहिन्यांवर कारवाई करावी.

– संकेत सतीश राजेभोसले, शेवगाव (जि. अहमदनगर)

रामदेवबाबांचे ‘साधना’सामर्थ्य

‘आयुर्वेदाच्या मुळावर..’ हा अग्रलेख वाचून आपण कोण आहोत आणि आपण काय करावयास नको होते याचे भानराजकीय नेत्यांना आले नाही तर त्यासारखे वाईट काही नसेल. आयुर्वेदाच्या नावाखाली काही महिन्यांपूर्वी विकले जात असलेले च्यवनप्राशही भेसळयुक्त होते व त्यात नामवंत ब्रँड म्हणवणाऱ्या कंपन्यादेखील होत्या, हे विशेष. आणि आता करोनावरील औषधाची रामदेवबाबांची ‘पुडी’ तर लोक आनंदाने घेतील, कारण त्यांचे सामर्थ्य इतके आहे की त्यांनी सांगावे आणि लोकांनी निमूटपणे ऐकावे, इतकी साधना त्यांनी केली आहे. काही माध्यमांना जाहिराती मिळतील, ते हे किती

परिणामकारक आयुर्वेद औषध आहे म्हणून वाहवाही करतील. परंतु ‘लोकसत्ता’ने मात्र सत्य समोर ठेवले आहे.

– सुनील समडोळीकर ,कोल्हापूर

लोकप्रतिनिधींवर ‘जबाबदारी’ टाका..

महाविकास आघाडी सरकार वा कुठलेही सरकार घोषणा करण्यात आघाडीवर असते, पण प्रत्यक्ष कृतीत बोंब दिसते. यापूर्वी ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ ही घोषणा झाली. उद्धवजींची तळमळ, हेतू याविषयी कुणाला शंका नाही. परंतु प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींना त्याचे गांभीर्य नाही. लोकप्रतिनिधीच कार्यक्रमांना करोनासंबंधात आवश्यक ती काळजी न घेता हजेरी लावताना दिसतात. चित्रवाहिन्यांवरील बातम्यांमध्येही लोकांनी मास्क लावलेले दिसत नाहीत. मास्क न लावता प्रवासी नियमांचे उल्लंघन करतात. अतिरिक्त प्रवासी घेऊन पोलिसांच्या समोरून वाहने जातात, पण कुणीच लक्ष देत नाही. आता करोनाग्रस्तांची संख्या वाढती असल्याने काही दिवस कडक धोरण दिसेल, पण नंतर पूर्वीसारखाच बेशिस्तपणा सुरू राहील. लोकप्रतिनिधी कायद्यात जबाबदारीची व्याख्या स्पष्ट केलेली नाही. ही जाणीव किंवा घटनात्मक नियमावली करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली तर प्रत्येक विभाग, गाव अनधिकृत फेरीवाले, खड्डेयुक्त रस्ते,अनधिकृत बांधकामे, गलिच्छपणा यापासून मुक्त होतील. रोगराई फैलावणार नाही. ग्रामपंचायत ते महानगरपालिकेतील ठेकेदारीमधील भ्रष्टाचाराला आळा बसेल. सरकारने  अशी  काही पावले जनतेसाठी टाकली तर ‘मी जबाबदार’, ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ हीघोषणा प्रत्यक्षात येईल.

– अरविंद बुधकर, कल्याण

करोनावाढीस आपणच जबाबदार

करोना काही दिवसांपासून पुन्हा डोके वर काढू लागला याला कारण आपला निष्काळजीपणा! सरकारने केलेले नियम आपण पाळत नाही. रेल्वे बंद असताना संपूर्ण ताण बसवर होता, तरीही करोना नियंत्रणात होता. कारण विनामास्क प्रवाशांना कंडक्टर बसमध्ये घेत नसे. पण रेल्वे सुरू झाल्यावर विनामास्कवाल्यांची संख्या वाढली. यात जेवढी सरकारची जबाबदारी आहे, त्याहून जास्त जबाबदारी आपली आहे हे जाणून आपण सहकार्य केले नाही तर पुन्हा कडक लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल.

– सुदेश पवार, वरळी