‘स्वधर्म समजला तरच गांधीजींचे ‘स्वराज्य’ समजेल – मोहन भागवत’ ही बातमी (लोकसत्ता, २ जानेवारी) वाचली. सरसंघचालक मोहन भागवत अहिंसेचा गांधीविचार अनुकरणीय मानतात, याचा आजच्या भारतीय तसेच वैश्विक संदर्भात परामर्श घेणे सयुक्तिक होईल. रूढ अर्थाने महात्मा गांधी धार्मिक व्यक्ती होते तरी, प्रचलित सर्व धर्म-पंथ, तसेच आजवरच्या तमाम संस्कृती (भारतासकट) हिंसेवर आधारलेल्या नि निसर्गाचे शोषण करणाऱ्या आहेत, हे त्यांनी नि:संदिग्ध शब्दांत सांगितले आहे. आज आपण ज्यांना धर्म मानतो ते वास्तविक धर्म नसून ‘फेथ’ आहेत. अर्थात, ती ‘फेथ’ म्हणजे श्रद्धा बाळगण्याची प्रत्येकाला मुभा आहे! खरे तर धर्म म्हणजे व्यक्तिगत व सामाजिक जीवनाची आचारसंहिता. कमी-अधिक प्रमाणात जगातील सर्वच धर्मपंथांनी निसर्गाविषयी पूज्यभाव व माणुसकीची, भेदाभेद न करण्याची शिकवण दिली आहे. मात्र, जगात धर्माच्याच नावाने सर्वाधिक हिंसा, मानववंश संहार झाला, हे ढळढळीत सत्य नाकारण्यात काय हशील?
‘देर आये दुरुस्त आये’ या उक्तीनुसार, गांधीजींचा गौरव करताना गांधीजींच्या खुनाचा व खूनकर्त्यांचा जाहीरपणे निषेध करणे क्रमप्राप्त होईल. खरोखरच सत्य व अहिंसा या मूल्यांची चाड असेल, तर ६ डिसेंबर १९९२ रोजीची अयोध्येतील बळजोरी व हिंसेचादेखील सार्वजनिक व्यासपीठावरून निषेध करत राष्ट्राकडे क्षमायाचना केली पाहिजे. विषमतावादी मनुस्मृती व लोकशाही-समतावादी-इहवादी भारतीय संविधान हे दोन्ही एकत्र कसे नांदू शकतील? होय, ‘गांधी’ हा २१ व्या शतकाचा युगधर्म आहे; पण मोदी सरकारच्या अदानी-अंबानी विकासमार्गाने तो कसा साध्य होणार?

– प्रा. एच. एम. देसरडा, औरंगाबाद

 

सत्य हाच गांधीजींचा धर्म; त्याचा स्वीकार होईल?

‘स्वधर्म समजला तरच..’ ही सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाची बातमी (लोकसत्ता, २ जानेवारी) वाचली. ‘माझी देशभक्ती माझ्या धर्मातून येते’ या भागवत यांनी गांधीजींच्या तोंडी टाकलेल्या विधानाला आधार काय? देशभक्ती व धर्म यांची गल्लत गांधीजींनी कधीच केली नाही. त्यांचा धर्म होता सत्य! ‘सत्य हाच ईश्वर आहे’ असे ते म्हणत. जरी ते स्वत:ला ‘सनातनी हिंदूू’ म्हणवत असले तरी त्यांचा धर्म अन्य धर्मीयांच्या द्वेषावर आधारित नव्हता. रामधूनमध्ये त्यांनी अल्लाह् सामावला। ‘ईश्वर अल्लाह् तेरो नाम’ असे म्हटले. भागवत गांधीजींचा हा धर्म स्वीकारण्यास तयार आहेत? भागवत म्हणतात, हिंदू भारतद्रोही असू शकत नाही. याचा असाही अर्थ निघतो की, अन्य धर्मीय भारतद्रोही असू शकतात. याच्याही पुढे जाऊन भागवत विधान करतात की, स्वातंत्र्यसंग्राम हा दोन संस्कृतींमधला संघर्ष होता. त्यांच्या भाषणाचा हा परमोच्च बिंदू आहे. कोणत्या संस्कृती? हिंदू आणि मुसलमान? ‘हिंद स्वराज’ या गांधीजींनी लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख भागवत करतात. गांधीजी ज्या संस्कृतीची चर्चा ‘हिंद स्वराज’मध्ये करतात, ती यंत्रयुग आधारित संस्कृतीची आहे. त्या चर्चेचा धर्माशी काहीही संबंध नाही. यंत्रयुग युरोपात अवतरले म्हणून गांधी ‘पाश्चात्त्य’ व ‘पौर्वात्य’ हे शब्द वापरतात. कितीही शब्दच्छल केला, तरी हा देश गांधींचा आहे, हिंदुत्ववाद्यांचा नव्हे!

– जयंत दिवाण, गोरेगाव पश्चिम (मुंबई)

 

‘हिंदू धर्म’ व ‘हिंदूत्व’ यांतील फरकही समजून घ्यावा
‘स्वधर्म समजला तरच गांधीजींचे ‘स्वराज्य’ समजेल’ या शीर्षकाखाली सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाबद्दलचे वृत्त (लोकसत्ता, २ जानेवारी) वाचले. ‘गांधीजींचा अहिंसेचा विचार अनुकरणीय असला, तरी तो प्रत्यक्षात आलेला दिसत नाही. निर्भय असल्याशिवाय अहिंसा आचरणात येऊ शकत नाही,’ असे म्हणत भागवत हे ‘धर्म आचरण करणाऱ्या व्यक्तीचे संरक्षण गरजेचे आहे’ असे सांगतात. महात्म्याची निर्भयता संरक्षणबळाने आलेली नसते, तर त्याची निर्भयता भयाच्या अभावातून येते, ही गोष्ट भागवत यांनी समजून घेतली असती तर त्यांना धर्माचरण करणाऱ्या व्यक्तीच्या संरक्षणाची गरज भासली नसती. ‘हिंदू हा देशभक्त असतोच. देशभक्त असणे हिंदूंच्या नसानसांत भिनलेले असते. हिंदू भारतद्रोही असूच शकत नाही,’ असे सरसंघचालक म्हणतात. असे म्हणून त्यांना मुस्लीम, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट हे भारताचे अंतर्गत शत्रू असल्याचे गोळवलकर गुरुजींचे प्रतिपादन सूक्ष्म पातळीवर अधोरेखित करायचे आहे का? पण हे करताना त्यांनी पोरसाविरोधात अलेक्झांडरला मिळालेला आम्भी राजा, सोमनाथ मंदिर लुटायला गझनीच्या महम्मदाला मदत करणारा थानेसरचा राजा आनंदपाल, शिवाजी महाराजांवर तलवार उपसणारा अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, औरंगजेबाच्या वतीने महाराजांवर चालून आलेला मिर्झाराजा जयसिंग, ब्रिटिशांची साथ देणारे राजे-महाराजे व संस्थानिक आणि भागवत ज्यांना हिंदू देशभक्त समजतात त्या ‘राष्ट्रपिता महात्मा गांधीं’ची हत्या करण्याचे पाप करणारी गोडसे-आपटे आणि मंडळी यांचा धर्म कोणता होता, ही गोष्ट स्पष्ट करायला हवी.
आपल्याला अभिप्रेत असलेल्या धर्माचा अर्थ आणि ‘रिलिजन’चा अर्थ भिन्न असल्याचे प्रतिपादन करणाऱ्या भागवत यांनी ‘हिंदू धर्म’ आणि ‘हिंदूत्व’ यांतील फरकही समजून घेतला तर त्यांना गांधीजींचा धर्म आणि धार्मिकता योग्य प्रकारे समजेल. ‘गांधीजींना स्वराज्याच्या संकल्पनेत केवळ ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य नको होते. मूल्यांची पुनस्र्थापना अपेक्षित होती,’ हे भागवत यांचे प्रतिपादन मात्र अगदी योग्य आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या आधुनिक मूल्यांवर आधारलेले, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी भारत हे नवे राष्ट्र महात्म्याला सत्य आणि अहिंसा या मूल्यांच्या आधारावर उभारायचे होते.

– डॉ. विवेक कोरडे, ठाणे

 

संघाने स्वत:च्या हिंदुत्वसाच्यात गांधीजींना बसवू नये!

महात्मा गांधींच्या ‘हिंद स्वराज’ या पुस्तिकेवर बेतलेल्या ‘मेकिंग ऑफ ए हिंदू पेट्रियट’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही विधाने केल्याचा वृत्तांत (लोकसत्ता, २ जानेवारी) वाचला. त्यापैकी- ‘हिंदू हा देशभक्तच असतो, तो भारतद्रोही असू शकत नाही’ या विधानाचा पायाच उखडणारे अनेक पुरावे इतिहासात अपवादात्मक नव्हे, तर पुरेशा संख्येने आढळतात. वर्तमानचेच दाखले द्यायचे झाले तर लष्करी आणि अन्य गुपिते शत्रुराष्ट्राला पुरविणारे आजवर जे कुणी सापडले त्यांत हिंदूही होते. औषधे, अन्नधान्ये यांत भेसळ करणे, आपत्तीचा फायदा उठवत साठेबाजी व काळाबाजार करणे ही कृत्ये ‘देशद्रोहा’त मोडत नाहीत? अशा गैरकृत्यात हिंदू व्यापारी सामील नसतात काय? भागवतांच्या वरील विधानात जो अव्यक्त अर्थ दडलेला आहे तो तर जास्त चिंताजनक आहे; तो म्हणजे- जे जन्माने हिंदू नाहीत त्यांना त्यांची देशभक्ती त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून आणि उच्चरातूनच सिद्ध करावी लागेल, त्यांची देशभक्ती स्वभावत:च आहे असे मानता येणार नाही.

गांधींची ‘हिंद स्वराज’ ही पुस्तिका वाचली तर वरील प्रकाशित पुस्तकाच्या लेखकद्वयीस गांधींमध्ये ज्या प्रकारचे हिंदुत्व दिसले त्याचा मागमूसही कुठे दिसून येत नाही. ‘हिंदुस्थानात नाना धर्माची माणसे राहू शकतात.. पण मी जसा गायीचा पूजक आहे, तसा माणसाचाही पूजक आहे. जशी गाय उपयोगी, तसा माणूसही उपयोगी आहे. मग तो मुसलमान असो की हिंदू असो. तेव्हा गाईला वाचविण्यासाठी मी काय मुसलमानाशी लढावे? त्याला मी मारावे?’- अशी अनेक विधाने गांधीजींच्या पुस्तिकेत (‘हिंद स्वराज’, परंधाम प्रकाशन, पवनार) आहेत. गांधीजी स्वत:ला ‘सनातनी हिंदू’ असे अवश्य म्हणवून घेत; पण त्यांना जे सनातन हिंदुत्व अभिप्रेत होते ते तत्कालीन हिंदुत्ववाद्यांना अजिबात रुचण्यासारखे नव्हते. म्हणून तर त्यांना ‘हिंदुद्रोही’ ठरवून त्यांच्यावर अनेक वेळा प्राणघातक हल्ले केले गेले आणि शेवटी त्यांचा खूनही करण्यात आला. पण आता संघ परिवाराला गांधीजींचे हिंदुत्व पटले असेल तर त्याचे स्वागतच आहे; पण गांधीजींना संघाला अभिप्रेत असणाऱ्या हिंदुत्वाच्या साच्यात बसवून नव्हे!

– अनिल मुसळे, ठाणे

 

इतिहास आणि मिजास

‘दिव्याचा हव्यास हवा..’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (‘अन्यथा’, २ जानेवारी) वाचला. जगभरातील कित्येकांना ‘होमलॅण्ड’ नाही आणि सर्वाना ते मिळेल अशी शक्यताही नाही. त्यासाठी इस्राएलची निर्मिती हा वस्तुपाठ ठरावा. पण वर्तमानातील अनेक राष्ट्रे आपला पूर्वेतिहास विसरल्याचे ‘कोविड लस’च्या निमित्ताने अधोरेखित झाले. याचा स्पष्ट अर्थ असा की,स्वत:च्या राष्ट्राच्या आर्थिक उन्नती आणि विकासात अन्य देशांच्या नागरिकांनी दिलेले योगदान या राष्ट्रांच्या विद्यमान राष्ट्रप्रमुखांना मान्य नाही. ज्यांना इतिहासाचे वावडे त्यांच्या दुर्गतीचे अनेक दाखले इतिहासातच आहेत. इतिहास विसरून स्वसामर्थ्यांची मिजास मिरविणाऱ्या ब्रिटन- अमेरिकेस आता आपल्या नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी स्थलांतरितांच्याच संशोधनाची, उत्पादनाची मदत घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे. आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी मानवी मूल्यांस पायदळी तुडविणाऱ्या जगभरातील राजकीय नेतृत्वास यातून भान आले तरी पुरे!

– लक्ष्मण संगेवार, नांदेड

 

‘आनंदवनभुवन प्रकरण’ ते ‘कल्पनेच्या तीरावर’..

‘लोकसत्ता’च्या ‘बुकमार्क’ पानावरील ‘अव-काळाचे आर्त’ या नव्या पाक्षिक सदरातला पहिला, नंदा खरे यांचा ‘अगा जे घडलेच नाही..’ हा लेख (२ जानेवारी) वाचला. त्यातली ‘युटोपिया’ व ‘डिस्टोपिया’विषयक चर्चा रोचक, विवेचक आणि ज्ञानवर्धक वाटली. हे सदर बहुलेखकी असल्याने त्यात नक्कीच विविधता असणार यात संदेह नाही. समर्थ रामदासस्वामींचे ‘आनंदवनभुवन प्रकरण’ हे मराठीतले आद्य युटोपियन साहित्यलेखन आहे. बाबा पदमनजी यांची ‘यमुना पर्यटन’ आणि ‘मोचनगड’, ‘मुक्तामाला’ आदी एकोणिसाव्या शतकातल्या कादंबऱ्यांमध्ये युटोपियाचे बरेच अंश आहेत. ह. ना. आपटे यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या, वा. म. जोशी यांच्या ‘रागिणी’तला हिमालय प्रवास, श्री. व्यं. केतकर यांच्या काही कादंबऱ्यांतही युटोपियामय चित्रण आढळते. हे लेखन वि. वा. शिरवाडकरांच्या ‘कल्पनेच्या तीरावर’च्या आधीच झालेले आहे.
– प्रा. विजय काचरे, कोथरूड (जि. पुणे)