लोकशाहीच्या उत्सवात लोकशाहीचेच विडंबन

‘पातळीचे प्रमाण’ हा अग्रलेख वाचला. राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या पातळीचे मार्मिक विवेचन त्यात केले आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. ‘लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेल्या राज्या’तील या उत्सवात मागील कामाचा आढावा आणि पुढील पाच वर्षांच्या कामाचे नियोजन यावर नेत्यांनी भाष्य करायला हवे. परंतु गल्लीतील नेत्यांपासून देशाच्या शीर्ष नेत्यांपर्यंत मागील निवडणुकीत दिलेली किती आश्वासने पूर्ण केली आणि येत्या पाच वर्षांत काय करणार, यावर चकार शब्दही काढायला तयार नाहीत, हे जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीचे दुर्दैवच म्हणावे लागेल. एकमेकांची उणीदुणी काढणे, शिवराळ भाषेचा वापर करणे; एवढेच काय, आपल्या राजकीय विरोधकांना चक्क ‘देशद्रोही’ ठरवून जनतेची दिशाभूल करत मूलभूत प्रश्नांची चर्चा न होऊ देणे यात नेत्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे हा निवडणूक प्रचार म्हणजे लोकशाहीचे विडंबनच होय!

– राजकुमार कदम, बीड

‘एक दिवसाच्या राजा’कडे लक्ष देतोच कोण!

‘पातळीचे प्रमाण’ हे संपादकीय (१९ ऑक्टोबर) आणि त्याच अंकातील ‘राज्यात पेड न्यूजचा सुळसुळाट’ ही बातमी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर चपखल भाष्य करणारी आहे. प्रचार शिगेला पोहोचताना पातळी अजून किती खाली घसरणार, याची मतदारालाही कल्पना येत नाही. किंबहुना इतका खालच्या दर्जाचा प्रचार होऊ  शकतो, याचे सामान्य मतदाराला वैषम्य वाटते. मात्र आपल्याकडे लोकशाही आहे; त्यामुळे मतदाना दिवशीचा एक दिवसाचा राजा असलेल्या सामान्य माणसाकडे लक्ष देतोच कोण! या निवडणुकीत ‘पेड न्यूज’ची वेगवेगळी ‘पॅकेजेस्’ असल्याची बातमी तशी नवीन नाही. फक्त वृत्तपत्रांतूनच एकांगी बातम्या येतात असे नाही, तर लोकप्रिय म्हणवणाऱ्या अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवरही प्रचाराचा रतीब कसा चालला, हे ‘याचि देही याचि डोळा’ मतदाराने अनुभवले आहे. शेवटी आपल्याला दिसत असलेली वस्तुस्थिती, परिस्थिती आणि सारासार विचार करून मतदानाच्या दिवशी सामान्य मतदार आपले अनमोल मत मतपेटीत टाकेल यात शंका नाही!

– राजेश श्रीराम बुदगे, ठाणे</p>

नव्या पिढीला चुका ऐकण्यात स्वारस्य नाही

‘किती काळ भूतकाळ?’ हे संपादकीय (१८ ऑक्टोबर) वाचले. लहानपणापासून मनावर सतत असे बिंबविण्यात आले, की मोठे होण्यासाठी कशालाही दोष देत बसू नये; आलेल्या संकटांना सामोरे जाऊन त्यावर मात करावी. यावरून सत्ताधारी पक्ष मोठा होईल असे वाटत नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितल्याप्रमाणे, आधीच्यांनी केलेल्या चुका माहिती असल्यामुळेच जनतेने विद्यमान सरकारला सत्तेवर आणले. नवीन पिढीला त्या चुका ऐकण्यात काही एक स्वारस्य नाही. ते शालेय पुस्तकांमधून योग्य प्रकारे शिकण्यास मिळत आहे. आधीच्यांच्या चुका दाखवून स्वत:चे पाप धुण्याचीच इच्छा असेल, तर जनतेच्या हातीसुद्धा एक बहुमूल्य मत आहे!

– शंतनु पऱ्हाड, साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा)

‘धनाची/मनाची भाषा’ हे चमकदार अर्धसत्य

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे ‘इंग्रजी धनाची, तर मराठी ही मनाची भाषा’ हे भाषणाचे इतिवृत्त (लोकसत्ता, २० ऑक्टोबर) वाचले. अनेकांना रुचेल, पटेल असेच हे विधान आहे; पण ते खरे नाही. भाषेचा जन्मच आपल्या मनातील विचार, भावना इतरांना कळवण्यासाठी होतो. इंग्रज व्यापारी होते आणि आधी व्यापारासाठी ते जगभर गेले हे खरे असले, तरी त्यामुळे ती केवळ धनाची भाषा ठरत नाही. अगदी आपल्यासारख्या इतर भाषकांच्या दृष्टीनेही हे खरे नाही. सुरुवातीला येथील लोक इंग्रजी शिकले आणि त्यांतूनच त्यांना युरोपातील आधुनिक विचारसरणीची ओळख झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुता यांसारख्या मूल्यांची प्रखरतेने जाणीव झाली. इहवादी, तर्काधिष्ठित विचारपद्धतीची ओळख झाली. इंग्रजी साहित्याची मोहिनी आपल्याला लागली. या सगळ्याचा अर्थ एवढाच की, इंग्रजी भाषा आपल्याला मनाची म्हणूनच भावली. ‘वाघिणीचे दूध प्याला, वाघबच्चे फाकडे’ असे माधव ज्युलियन म्हणतात; त्या वेळी त्यांना धनाची नव्हे, तर मनाची शक्ती वाढवणारी इंग्रजी भाषाच अभिप्रेत असते. आताचे आई-वडील मुलांना चांगली नोकरी मिळावी, परदेशात जाऊन स्थायिक होता यावे यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात हे मान्य केले, तरीही त्यामुळे इंग्रजी धनाची भाषा ठरवणे योग्य नाही. तेव्हा धनाची आणि मनाची भाषा हे विभाजन चमकदार अर्धसत्य (ब्रिलियंट हाफट्रथ) आहे, हे नीट लक्षात घ्यावे.

– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)

शिकण्याची नाही, तरी ऐकण्याची सवय हवीच!

राज्याचे मुख्यमंत्री तथा बरेच अन्य मंत्री आणि राजकीय नेते मुंबई आणि नागपूर येथे आणि कधी कधी औरंगाबादसारख्या ठिकाणी सार्वजनिक भाषणे हिंदीत करतात. महाराष्ट्राची राजभाषा मराठी असताना हे जबाबदार लोक हिंदीत का आणि कुणासाठी बोलतात? महाराष्ट्रात दीर्घकाळ राहूनही जे लोक इथली राजभाषा शिकत नाहीत, त्यांच्यासाठी हे मान्यवर मराठी डावलून हिंदीत भाषण करत असतील, तर ती महाराष्ट्राच्या राजभाषेची प्रतारणा ठरेल. मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक निर्वाळा दिला आहे की, महाराष्ट्रात मराठी समजत नाही ही सबब चालणार नाही. कमीत कमी न्यायालयाची बूज राखून तरी महाराष्ट्रात मराठीतून भाषण करण्याचे सौजन्य दाखवले जावे ही राजकारण्यांकडून अपेक्षा. तसेच मराठीला तुच्छ समजून ती न शिकण्यात फुशारकी मारणाऱ्या महाराष्ट्रातील अन्य भाषकांना मराठी बोलण्याची इच्छा नसेल, तर त्यांनी ती ऐकण्याची सवय लावून घेतलीच पाहिजे.

– अरविंद वैद्य, सोलापूर

पक्ष जातीवर आधारित; अन् मतदान जातमुक्त हवे?

‘जात तोडून विकासाच्या मुद्दय़ावर वंचितला मतदान व्हावे’ हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मत (‘सत्ताबाजार’, २० ऑक्टो.) आवडले; तरी जो पक्ष जातीवरच आधारित आहे आणि आता एमआयएम पक्षही त्यातून निघून गेला आहे, अशा वेळी वंचित बहुजन आघाडी निवडणुकीत काय मिळवेल, यावरच प्रश्नचिन्ह असताना अ‍ॅड. आंबेडकर कोणत्या विकासाबद्दल बोलत आहेत, ते स्पष्ट होत नाही. इतर विरोधी पक्षांप्रमाणे सरकारवर आसूड ओढणे त्यांचे कामच आहे; पण जात तोडून विकासाच्या मुद्दय़ावर वंचितला मतदान करावे ही अपेक्षा पटत नाही.

– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

सैन्यभरतीतूनच आझाद हिंद सेनेचे बळ वाढले

‘अज्ञान दूर होईलही; पण मूळ मुद्दय़ाचे काय?’ हे ‘लोकमानस’मधील (१८ ऑक्टोबर) पत्र वाचले. त्यातल्या एका महत्त्वाच्या मुद्दय़ाविषयी स्पष्टीकरण. स्वा. सावरकरांनी जो सैनिकीकरणाचा, सैन्यात भरती होण्याचा प्रचार-प्रसार केला, तो ‘ब्रिटिशधार्जिणा’ होता, हा एक भयंकर गैरसमज अनेकांच्या मनात आहे. मात्र, सावरकरांवर या मुद्दय़ावरून टीका करताना- त्यांत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख करणे, ‘आझाद हिंद सेना परदेशात ब्रिटिशांविरोधात लढत असताना, सावरकरांनी मात्र ब्रिटिश सैन्यात भारतीयांनी भरती व्हावे असे आवाहन करून ब्रिटिशांना साथ दिली होती’ असे म्हणणे, हे केवळ अज्ञान आहे. यासंबंधी वस्तुस्थिती (संदर्भ : धनंजय कीर लिखित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’, प्रकरण १८ – ‘काळ्या दगडावरची रेघ’) अशी :

आझाद हिंद सेनेच्या नेत्यांमध्ये सावरकर आपल्याला स्फूर्ती देणारे म्हणून सावरकरांविषयी कृतज्ञतेचा भाव होता. आझाद हिंद सेनेचे संस्थापक नि प्रमुख या दोघांनीही सावरकरांना नभोवाणीवरून खास संदेश पाठवले होते. २५ जून १९४४ रोजी रात्री सिंगापूर नभोवाणीवरून केलेल्या भाषणात नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले होते, ‘‘विक्षिप्त राजकीय लहरी नि दूरदृष्टीचा अभाव यांच्या आहारी जाऊन काँग्रेस पक्षाचे बहुतेक सर्व पुढारी भारतीय सैन्यातील सर्व सैनिकांना भाडोत्री म्हणून त्यांची अवहेलना करीत असताना, वीर सावरकर मात्र निर्भयपणे भारतीय तरुणांना सैन्यदलात भरती होण्यास प्रोत्साहन देत आहेत, हे पाहून मनाला नव्या आशेचा धीर चढतो. सैन्यात भरती झालेल्या या तरुणांमधूनच प्रशिक्षित सैनिक आम्हाला मिळत आहेत आणि आमच्या आझाद हिंद सेनेचे बळ वाढत आहे.’’ सावरकरांना उद्देशून नभोवाणीवरून केलेल्या भाषणात रासबिहारी बोस म्हणाले होते, ‘‘तुम्हाला अभिवादन करताना, माझ्या एका वडीलधाऱ्या सैनिक सहकाऱ्याविषयीचे कर्तव्य करीत असल्याचा मला आनंद होत आहे. तुम्हाला प्रणाम करताना मी आत्मत्यागाच्या मूर्तिमंत प्रतिमेलाच हा प्रणाम करीत आहे.’’ यावर अधिक भाष्य करण्याची गरजच नाही.

– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली (मुंबई)

भावनिक दृष्टिकोनातून इतिहासाचे विश्लेषण

‘समंजस सामाजिक व्यवहाराच्या भाग न होऊ  शकणाऱ्या कल्पना’ हे पत्र (‘लोकमानस’, १८ ऑक्टोबर) वाचले. सावरकर हे तज्ज्ञ इतिहासकार होते असे म्हणता येणार नाही. त्यांनी भावनिक दृष्टिकोनातून ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण केले असे स्पष्ट दिसून येते. ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात त्यांनी बौद्ध धर्मीयांवर घेतलेले आक्षेप हे या सदोष विवेचनाचे उदाहरण आहे. मात्र मुस्लीम आक्रमकांनी मध्ययुगीन प्रथांच्या तुलनेतही आत्यंतिक क्रौर्य दाखवले व विध्वंस केला हेदेखील ऐतिहासिक सत्य आहे. या आक्रमणाला तोंड देताना हिंदू राजांच्या काय चुका झाल्या, याचे विश्लेषण करताना सावरकरांनी आपला तर्क अतिरेकी टोकापर्यंत ताणला आहे, हे स्पष्ट दिसून येते. मात्र याच पुस्तकात त्यांनी हिंदू धर्मातील अनेक दोष दाखवले आहेत, ज्यामुळे त्यांचा युद्धात पराभव झाला. जातिव्यवस्था, समुद्रबंदी, धर्मातर केलेल्यांना हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश करण्यासाठी बंदी इत्यादी दोष त्यांनी प्रभावीपणे मांडलेले आहेत. या पुस्तकात सावरकरांनी भूतकाळातील लढाया व त्यात झालेल्या चुका याबद्दल विश्लेषण केले आहे. भूतकाळातील पराभवांचा सूड घ्यावा, असे त्यांनी कधीही म्हटलेले नाही. भारतात अल्पसंख्याकांना समान घटनात्मक हक्क असावेत असेच त्यांनी म्हटले आहे.

– प्रमोद पाटील, नाशिक