महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण खात्याने स्वतंत्र ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ’ काढून त्याच्यामार्फत शिक्षण क्षेत्रातील एक वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले. प्रचलित शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमापेक्षा या प्रयोगातील अभ्यासक्रम वेगळा असणार हे अपेक्षितच होते. या अभ्यासक्रमाला अनुसरून वेगळ्या प्रकारची पाठय़पुस्तके सिद्ध केली जाणार, हेसुद्धा स्वाभाविकच म्हटले जाते. या पाठय़पुस्तकांमधील इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाची चर्चा सध्या सुरू झाली. मी या चच्रेत भाग घ्यायचे कारण म्हणजे, शासनाच्या पाठय़पुस्तक महामंडळाच्या म्हणजेच बालभारतीच्या चौथ्या इयत्तेसाठी नेमल्या गेलेल्या इतिहासाच्या पाठय़पुस्तकाचा उल्लेख या चच्रेत केला जात आहे. सध्या मी बालभारतीच्या ‘इतिहास विषय समिती’चा अध्यक्ष आहे.

इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात चौथीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्या संदर्भात आणि तुलनेत आंतरराष्ट्रीय मंडळाच्या अभ्यासक्रमाच्या आणि पाठय़पुस्तकाचा विचार होणे हे अगदीच स्वाभाविक आहे. या नव्या बोर्डाची एकूणच भूमिका राज्य मंडळाच्या पुस्तकांपेक्षा वेगळी असण्याचे  व तसे असण्याची कारणमीमांसा खुलाशाच्या स्वरूपात मंडळाने घेतली आहे. त्यामागे एक वेगळा मुद्दा आहे जो संकल्पनांशी संबंधित आहे, अर्थात त्या खोल पाण्यात जायची मला जरुरी वाटत नाही. त्याची स्वतंत्र चर्चा होऊ शकते.

मला बालभारतीच्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाच्या संदर्भात एक मुद्दा उपस्थित करणे आवश्यक वाटते. छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि अर्थात महाराष्ट्राला महाराजांचा सार्थ अभिमान आहे. या अभिमानाची एक अपरिहार्य परिणती म्हणजे वेगवेगळे राजकीय पक्ष, विविध संस्था, संघटना यांनी शिवाजी महाराजांची विशिष्ट  प्रतिमा निर्माण करणे आणि तिचा अध्यापन उद्दिष्टांसाठी उपयोग करणे ही गोष्ट लाभदायक ठरते. असे लक्षात आल्यावर, असा उपयोग करून घेण्यासाठी स्पर्धा सुरू झाली असल्यास त्यात आश्चर्य नाही. इतकेच नव्हे ज्याची कदाचित या स्पर्धेत उतरण्याची इच्छा नसेल, त्यालाही नाइलाजाने त्यात उतरण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. आपणच कसे खरे शिवप्रेमी आहोत आणि आपले विचार आणि कार्य शिवाजीमहाराजांच्या विचाराशी आणि कार्याशी कसे सुसंगत आहे हे दाखवणे प्रत्येकाला आवश्यक वाटू लागले. महाराष्ट्राच्या या राजकारणाचा व समाजकारणाचा परिणाम अभ्यासक्षेत्रावरही झाल्याशिवाय राहिला नाही. इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पाठय़क्रमात शिवाजीमहाराजांच्या चरित्रग्रंथाचा स्वतंत्रपणे समावेश केला जाणे हा या परिणामाचा एक भाग असण्याची शक्यता आहे.

चौथीच्या विद्यार्थ्यांना शिवचरित्र शिकविणे, हा निर्णय पाठय़पुस्तक मंडळाच्या अभ्यासक सदस्यांनी घेतला असण्यापेक्षा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेने केलेल्या ठरावाची ती अंमलबजावणी आहे, असा माझा समज आहे. एकदा अशा प्रकारचा ठराव गृहात एखाद्या पक्षाने मांडला तर त्याच्याशी असहमती दाखवणे कोणत्याही पक्षाला शक्य होणार नाही हे उघड आहे. तसे करण्याचे धाडस आत्मघातकी ठरेल याची जाणीव प्रत्येकाला असते. आपली शिवनिष्ठा कमअस्सल नाही हे दाखविण्याची गरज प्रत्येकाला वाटते.

शिवचरित्राचा महिमा असा आहे की, कधीही, कोणीही व कोणालाही सांगावे; तथापि आपण एकूण अभ्यासक्रमाचा साकल्याने विचार केला तर असे दिसते की, चौथीच्या विद्यार्थाना तिसरीपर्यंत शिवपूर्वकालीन इतिहासाची काहीही माहिती झालेली नसते. महाराजांचे चरित्र सांगायचे झाले तर अर्थातच त्यापूर्वीच्या महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास ज्ञात असण्याची गरज आहे. भारतावर परकीय आक्रमणे केव्हा झाली? दिल्लीचे तख्त सुलतानांकडे कसे गेले? नंतर ते मोगलांकडे कसे आले? महाराष्ट्रात अल्लाउद्दीन खिलजीचे आक्रमण, तुघलकांची कारकीर्द, बहामनी राज्य, त्याची शकले, त्यातून महाराष्ट्रात पुढे आलेली निजामशाही व आदिलशाही व महाराष्ट्र काबीज करण्याचे अकबरापासून मोगलांचे प्रयत्न या गोष्टींची नीट व पुरेशी माहिती असल्याशिवाय शिवचरित्र सांगणे संयुक्तिक नाही व ते समजण्याचे त्या वयोगटातील विद्यार्थ्यांची पातळीही नसते.

तेव्हा खरी गरज राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्याची आहे. शालेय अभ्यासक्रम व पाठय़पुस्तके ही आपली शिवनिष्ठा दाखवण्याची व त्यायोगे सामर्थ्य प्राप्त करण्याची जागा नाही, हे जर २४ ऑक्टोबरनंतर अस्तित्वात येणाऱ्या विधानसभेने लक्षात घेतले व पूर्वी केलेला ठराव मागे घेऊन अभ्यासकांना आपले काम करण्याचे स्वातंत्र्य दिले तर मोठे उपकार होतील.

– सदानंद मोरे, पुणे.

भाजप तरी पुरेसा सक्षम दिसला का?

‘मतदारांची कसोटी’ हा महेश सरलष्कर यांचा ‘लालकिल्ला’ सदरातील लेख (२१ऑक्टोबर) वाचला. मतदार राजा कोणाच्या गळ्यात विजयाची माळा घालणार हे येत्या २४ तारखेला स्पष्ट होईल. भाजप स्वत:ला जरी एकतर्फी विजयाचा शिल्पकार समजत असला तरी, लोकशाहीत असे विधान योग्य नाही. देवेंद्र फडवणीस म्हणतात आमचा पलवान फडात तयार आहे पण विरोधकच सक्षम नाही, जर विरोधक सक्षम नाही तर नरेंद्र मोदी, अमित शहा, स्वत: फडणवीस यांना एवढय़ा सभांची आणि सतत विरोधकांना लक्ष्य करण्याची गरज का भासावी हा खूप मोठा प्रश्न आहे. भाजपने इतर पक्षाचे वजनदार ‘आयाराम’ जरी पक्षात घेतले तरी भाजपशी एकनिष्ठ असणारे आणि तळागाळातील कार्यकत्रे यांची नाराजी ही डोकेदुखी ठरू शकते. बहुजन वंचित आघाडीचे आव्हानसुद्धा काही ठिकाणी जड जाऊ शकते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत, रोजगारात मोठया प्रमाणात घट, अशा अनेक समस्यांमुळे तरुण वर्ग भाजपपासून दूर जाऊ शकतो.

– सूरज शेषेराव जगताप, नंदागौळ (परळी, जि. बीड)

राज्यातील नेत्यांऐवजी ‘मोदी लाटे’वर भिस्त

‘मतदारांची कसोटी’ हा लेख (२१ ऑक्टो.) वाचला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल भाजप-शिवसेनेकडे वळला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भारतासाठी मोदींचे नेतृत्व स्वीकारले. परंतु महाराष्ट्राला प्रभावी नेतृत्व अजूनही मिळाले नाही, कारण मागील पाच वर्षांपासून राज्यातील परिस्थिती अपेक्षेप्रमाणे सुधारली नाही. भाजपच्या मतदारांमध्ये मोदींसाठी जेवढे प्रेम आहे, किंबहुना तेवढाच संताप हा राज्यातील फडणवीस सरकारवरही आहे. शिवसेना युतीमध्ये कितपत टिकेल, याची काहीही शाश्वती नाही. दुसरीकडे, काँग्रेसकडे सरकारविरुद्ध बोलण्यासाठी काहीही नसल्याने, त्यांना सभाही घेता आल्या नाहीत. पवारसाहेबांनी भर पावसात भाषण देऊन ‘८० व्या वर्षांतला तरुण’ मोदींना दाखवून दिला; तरीही एकटी राष्ट्रवादी िरगण गाजवेल का? राज ठाकरेंची सभा प्रसिद्धी मिळवत असली तरी, मनसे मध्ये प्रभावी उमेदवार नाहीत. महाराष्ट्राला प्रभावी नेतृत्व यावर्षी तरी मिळेल का, हे २४ तारखेचा निकालच सांगू शकतो. अर्थात, मतदारांचा कौल हा मोदी लाटेवरच आहे, हे चित्र दिसून येते.

– युवराज भाऊसाहेब आहेर, नाशिक

‘मेट्रोमुळे प्रदूषणात घट’ हा दावा पोकळ!

अॉक्टोबरअखेरीस नित्यनेमे दिल्लीतील हवाप्रदूषणात वाढ कशी होते याची कारणे सर्वज्ञात आहेत (अन्वयार्थ : २१ ऑक्टोबर). दिल्लीत मेट्रोचे जाळे विणूनही परिस्थितीत सुधारणा झाल्याचे दिसत नाही. मुंबईत नुकतीच मेट्रोकारशेडसाठी आरेतील वृक्षसंपदा रातोरात तोडली गेली, त्याच्या समर्थनार्थ ‘त्यामुळे  प्रदूषण कमी होईल’ असा मुद्दा मांडण्यात आला तो किती पोकळ होता हे दिल्लीतील उदाहरणावरून दिसून येते.  तेव्हा निसर्गाचे रक्षण करून विकास कसा साधला जाईल यादृष्टीने यापुढील धोरणे आखली जाणे आवश्यक आहे हे ‘विकासाचा अखंड ध्यास’ बाळगणाऱ्या सरकारच्या लक्षात येईल तो सुदिन.

– डॉ.किरण गायतोंडे, चेंबूर (मुंबई )

‘प्रत्याचार’ आदी विचारांना चष्मा हिंदुत्वाचाच

‘भावनिक दृष्टिकोनातून इतिहासाचे विश्लेषण’ हे पत्र  (‘लोकमानस’- २१ऑक्टोबर) वाचलं. सावरकर हे तज्ज्ञ इतिहासकार नव्हते; उलट त्यांनी हिंदुत्वाचा चष्मा घातला होता आणि आपल्या उफाळलेल्या ‘हिंदुत्वा’च्या भावना ओतून एक कथन तयार केलं होतं हे ‘सहासोनेरी पानं’  वाचताना वारंवार आपल्या लक्षात येत जातं. आपल्या गुंतागुंतीच्या इतिहासाकडे दुर्लक्ष करून सावरकरांच्या कल्पनांनी भारावून गेलेल्या किमान दोनतीन तरी पिढय़ा आपल्याकडे आहेत. हिंदू धर्मातले अनेक दोष सावरकरांनी दाखवले हे ऐतिहासिक सत्य आहे; पण त्यामागचा संदेश कोणता ? तर  जातीभेद आणि अंधश्रद्धा यांनी विभागलेला हिंदू समाज आधुनिक आणि संघटित व्हावा आणि एकदिलाने त्याने ‘इतरां’चं निर्दालन करावं हा ! आणि जेव्हा ‘प्रत्याचार’ न केल्याबद्दल ते शिवाजीमहाराज आणि चिमाजीअप्पांवर टीका करतात तेव्हा ते एक नैतिक विधान करत असतात. हिंदुत्वाच्या समर्थकांना असली विधानं नैतिक  बळ पुरवणारी असतात. ज्या पद्धतीने हिंदुत्वाच्या समर्थकांनी कठुआ आणि उन्नावमध्ये हिंसक कृती करणाऱ्या व्यक्तींची पाठराखण केली ती या नैतिक विधानाला पुष्टी देणारी आहे. सावरकरांच्या विचारांत अनेक परस्परविरोधी गोष्टी आहेत. उदाहरणार्थ वेदांखालोखल मनुस्मृती हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ आहे असं सावरकर का म्हणतात ? एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असेल तर त्यासाठी  तिला तिच्या वर्णाच्या अनुसार वेगवेगळ्या शिक्षा व्हाव्यात असं मनुस्मृतीत म्हटलं आहे. त्यावर सावरकरांचं काय भाष्य आहे हे त्यांच्या विचारांत स्पष्ट नाही. सावरकरांनी अस्पृश्यतेवर प्रहार केले असले तरी दलित जनता जागृत झाल्यावर मनुस्मृती स्वीकारणार नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही.

‘‘भारतात अल्पसंख्याकांना समान घटनात्मक हक्क असावेत’असेच त्यांनी म्हटले आहे’ असं एक विधान पत्रात आहे. पण परधर्मियांबद्दल सावरकरांच्या समग्र  साहित्यात जो रोष आणि त्वेष दिसतो त्याच्या कोंदणात हे बसत नाही. १९४४ साली टॉम ट्रीनर नावाच्या एका अमेरिकन पत्रकाराने सावरकरांची एक मुलाखत घेतली होती. स्वतंत्र भारतात मुस्लिमांचं स्थान कसं  असेल असा प्रश्न त्याने सावरकरांना विचारला होता. त्यावर सावरकर म्हणाले : तुमच्या देशातल्या निग्रोंसारखं! हे उत्तर सावरकरांच्या हिंदुत्वाच्या चष्म्यातून केलेल्या  समग्र विचारांच्या  संदर्भात चपखल बसतं.

-अशोक राजवाडे , मुंबई