X

नेतृत्वाचे मापदंड तयार केले

राजकीय विचारसरणी वेगळी असली तरी ते सर्वाना प्रिय होते. भले मुखवटा असेल पण ते अजातशत्रू होते.

‘गीत नहीं गाता हूँ..’ हा  अग्रलेख (१७ ऑगस्ट) वाचला.वाजपेयी हे संसदीय लोकशाहीचा आदर करणारे, सहभागी होणारे होते, पळ काढणारे नव्हते. स्वत: पत्रकारितेतून पुढे आल्यामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा त्यांनी कायम सन्मान केला आणि सामोरे गेले. राजकीय विचारसरणी वेगळी असली तरी ते सर्वाना प्रिय होते. भले मुखवटा असेल पण ते अजातशत्रू होते. हिंदू धर्माच्या सहिष्णुतेचे वाजपेयी दृश्य प्रतीक होते. त्यांनी द्वेषाचे आणि समाजात फूट पाडण्याचे राजकारण केले नाही. केवळ त्यांच्या पक्षात नाही तर पूर्ण देशासाठी नेतृत्वाचे मापदंड वाजपेयी यांनी तयार केले. पक्षातील स्पर्धकांविषयी त्यांच्या मनात कटुता नव्हती. या पाश्र्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचे व्यक्तित्व आणि राजकारण यामधील त्रुटी ठळकपणे समोर येतात.

– अ‍ॅड. संदीप ताम्हनकर, पुणे

आता तरी अटलजींच्या तत्त्वांनुसार वागावे

‘गीत नहीं गाता हूँ..’ हा  अग्रलेख  व अन्य लेख (१७ ऑगस्ट) वाचले.  कटुतेच्या राजकारणापलीकडील एक व्यक्तिमत्त्व आपणांतून  निघून गेले. खरे तर फक्त म्हणायला अटलजींचे शरीर गेले, विचार मात्र कायम राहतील. धर्मनिरपेक्ष आणि सर्वाना सोबत घेऊन चालण्याची त्यांची पद्धत होती. जयललिता, ममतादीदी, बाळासाहेब ठाकरे अशा भिन्न प्रवृत्तीच्या नेत्यांशी त्यांनी जुळवून घेतले. म्हणूनच प्रत्येक धर्मातील, जातीतील जनसमूहांत त्यांना आदराचे स्थान होते. वैचारिक मतभेद असले तरी संबंधांमध्ये कटुता येणार नाही याकडे ते कटाक्षाने लक्ष देत. भाजपला अटलजींमुळे नवसंजीवनी मिळाली हे विसरून चालणार नाही. त्यामुळे पक्षाच्या  नेत्यांनी आता तरी अटलजींच्या तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे.

– आकाश सानप, सायखेडा (नाशिक)

विचारांची हार बघवत नाही

‘गीत नहीं गाता हूँ..’ हा अग्रलेख वाचून चिंता वाटली. आता होत असलेली अटलजींच्या विचारांची हार बघवत नाही. अटलजी विरोधी मतांचा आदरपूर्वक विचार करत. ते खरे लोकशाहीवादी, सर्वसमावेशक, मुत्सद्दी राजकारणी होते. परंतु त्यांच्या ठायी असणारा हा लोभस गुण त्यांच्या सध्याच्या वारसदारांकडे दिसून येत नाही. आपले ते आपले व विरोधकांचेही आपलेच! ही वृत्ती सोडून अटलजींची ‘प्रवृत्ती’ स्वीकारल्यास तो अशक्त लोकशाहीला सशक्त करणारा व अटलजींच्या विचारगाथेचा विजय असेल. हीच त्यांना खरी आदरांजली असेल!

– अशोक दिलीप जायभाये, काकडहिरा (बीड)

अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली

अटलबिहारी वाजपेयी परवा गेले आणि अवघा देश शोकसागरात बुडून गेला. खंबीर आणि ताठ कण्याच्या माणसांच्याही डोळ्यात पाणी का आलं? असं काय होतं या माणसाकडे, जे आज या देशात दुर्मीळ झालं आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ‘गीत नहीं गाता हूँ..’ या अग्रलेखातून मिळाली. मराठी वृत्तपत्रातला हा सर्वाधिक सर्वसमावेशक आणि पत्रकारितेच्या उच्च मूल्यांचं दर्शन घडवणारा एक दस्तावेज ठरेल.

– अवधूत परळीकर, घाटकोपर (मुंबई)

काश्मीर प्रश्नासाठी अटलजींची त्रिसूत्रीच योग्य

अटलबिहारी वाजपेयी हे एक फक्त नाव नव्हे तर एक सर्वसमावेशी विचार होता. तो विचार म्हणजे वैचारिक सहिष्णुता. प्रथम देश ही भावना आणि तशीच कृती. म्हणून त्यांनी १९७१ चे युद्ध, १९७४ ची पहिली अणुचाचणी यामध्ये इंदिरा गांधी सरकारला पाठिंबा दिला. तसेच जे देशासाठी चुकीचे त्याला विरोध केला.  त्यांच्या काळात खूप संकटे आली, पण त्यांनी त्यावर यशस्वी मात केली. कारगिल युद्ध, संसदेवरील हल्ला, विमान अपहरण इत्यादी.ोगतिक दबाव झुगारून पोखरण-२ अणुचाचणी घेऊन भारताला एक अणस्त्रसज्ज देश बनवले. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी व्यावहारिक आणि प्रामाणिक प्रयत्न केले. ‘जम्हूरियत, इन्सानियत, काश्मिरियत’ या त्रिसूत्रीचा वापर केला आणि आजसुद्धा काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी ही त्रिसूत्री उपयोगी आहे.

– अशोक वाघमारे, भूम (उस्मानाबाद)

विरोधात बोलण्याची हिंमत वाजपेयींकडे होती

‘संघटनेच्या संस्कृतीशी विसंगत सुसंस्कृत नेता!’ हा अजित अभ्यंकर यांचा लेख   (१७ ऑगस्ट) वाचला. लेखाातून अभ्यंकरांना जे सांगायचे आहे त्याचे खंडन वाजपेयी यांनी स्वत:च त्यांच्याविरुद्धच्या पहिल्या अविश्वास ठरावावर बोलताना केले होते. सर्व विरोधकांचे म्हणणे होते वाजपेयी चांगले आहेत, पण ते ज्या पक्षाचे आहेत त्यावर आमचा विश्वास नाही. त्यावर वाजपेयींनी ही एक प्रकारची राजकीय अस्पृश्यता कित्येक वर्षे चालत असल्याचे सांगितले. जर वाजपेयी यांना पक्षातून बाहेर काढले तर या वाजपेयींचे (तुम्ही) काय करणार, हा विरोधकांना प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यावर विरोधकांकडे उत्तर नव्हते.  ज्या कटू गोष्टींसाठी अभ्यंकर हे वाजपेयींना जबाबदार धरतात ती गोष्ट आधीच्या इतिहासात घडलेल्या अनंत गोष्टीचा परिपाक होती. त्यावर वाजपेयींची माध्यमांकडे प्रतिक्रिया होती, ‘‘.जो हुआ, वो बिल्कूल गलत है’’.  जनसामान्यांचा अनुनय न करता त्यांच्याही विरोधात बोलण्याची हिंमत वाजपेयींकडे होती याकडे अभ्यंकर डोळेझाक करतात. त्यामुळे ते मुखवटा नव्हते. आज ते सक्रिय असते तर काही अप्रिय घटनांविरोधात ते तितकेच खंबीरपणे उभे राहिले असते.  त्यामुळे वाजपेयींना संघटनेच्या संस्कृतीशी विसंगत म्हणण्याऐवजी ‘एकूण प्रचलित राजकारणाशी विसंगत सुसंस्कृत नेता’ असे म्हणणे योग्य ठरेल. त्यांच्या पक्षाचे जे चिन्ह ‘कमळ’ आहे, त्याचीच उपमा त्यांना सुयोग्य ठरेल आणि भोवतालची दलदल ही कोण्या एका संघटनेची नसून भारतीय राजकारणाच्या स्वरूपाची आहे.

– उमेश जोशी, पुणे