‘वैज्ञानिक सत्यनारायण’ हा अग्रलेख (२१ जुलै)  वाचत असताना या महाकाय देशातील विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या भवितव्याची चिंता वाटू लागते. अग्रलेखात उल्लेख केल्याप्रमाणे (काही) वरिष्ठ वैज्ञानिकांचे विज्ञानेतर बाबीमध्ये नको तितका रस, विज्ञानविषयक संस्थांच्या निधींच्या तरतुदीत होत असलेली मोठी कपात आणि छद्मविज्ञानाचा नको तितका होत असलेला उदो उदो या गोष्टी २१व्या शतकात महासत्तेचे स्वप्न बघणाऱ्या राष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत.

राष्ट्रीय गणित केंद्राच्या निधीतील कपात हे विज्ञानाविषयी सरकारला किती तळमळ आहे हे दिसून येतेच.  एकीकडे गणित ही सर्व विज्ञान शाखांची जननी म्हणून स्तुती करत असताना दुसरीकडे मात्र पुढच्या पिढीला आपण गणिताच्या व तद्नुषंगे विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या अभ्यासापासून वंचित ठेवत आहोत याबद्दल ना चिंता ना खेद. भविष्यकाळातील कृत्रिम बुद्धिमत्ता, नॅनो तंत्रज्ञान, रॉकेट विज्ञान, वैद्यक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान या अत्युच्च तंत्रज्ञानाचा पाया गणित असून या विषयाचे सुलभीकरण करत राहिल्यास हा देश  जगाच्या कित्येक युगे मागे राहील याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

मुळात आपले वैज्ञानिक, तंत्रज्ञ व तंत्र-सत्ताधारी (टेक्नोक्रॅट्स) यांना फक्त आजच्यापुरते बघायची सवय जडलेली असून यांच्यात आपण काम करत असलेल्या संस्थांचे संवर्धन, प्रगती व त्या दीर्घकाळापर्यंत टिकतील यासाठीच्या दूरदृष्टीचा अभाव जाणवत आहे. इतर देशांतही सत्ताधारी विज्ञान संशोधक संस्थांना निधी देण्याच्या बाबतीत हात आखडते घेत असतात. परंतु वैज्ञानिकांची लॉबी आकाशपाताळ एक करत सत्ताधाऱ्यांना तसे करण्यास मज्जाव करते. वेळप्रसंगी तेथील उद्योगसंस्था वैज्ञानिकांच्या मदतीस येतात व त्यांच्यामागे भक्कमपणे उभे राहतात. मोठय़ा प्रमाणात आर्थिक मदतही करतात. परंतु आपल्या देशातील उद्योगसंस्थांबद्दल याविषयी न बोललेले बरे अशी स्थिती आहे. त्यामुळे पंतप्रधान – वैज्ञानिक संवाद हे एक न चुकवता होणारे श्राद्धकर्म न ठरता विज्ञान संवर्धनाची जबाबदारी वैज्ञानिक, तंत्रज्ञ व नागरिक या सर्वावर आहे हे विसरून चालणार नाही.

प्रभाकर नानावटी, पुणे</strong>

हे सारे धर्माध अनुयायी मिळवण्यासाठीच!

‘वैज्ञानिक सत्यनारायण’ या अग्रलेखात सरकारच्या दुटप्पीपणावर नेमके बोट ठेवले आहे. संघपरिवार व भाजपप्रणीत सरकारे यांची धार्मिक धोरणे जगजाहीरच आहेत. त्यात मध्य प्रदेश सरकारचे ज्योतिषआधारित रुग्णालय तसेच उत्तर प्रदेशच्या योगींनी मुख्यमंत्री निवासाचे केलेले शुद्धीकरण या अशा कृतींमधून यांचे धोरण अधोरेखितच करते. विद्यमान केंद्र सरकारने शिक्षणावरचा खर्च कमी केल्याचे अर्थसंकल्पातील आकडेच सांगतात. गोमाता, गोमूत्र व शेण या मध्ययुगीन बाबींवर जनमानसाला गुंतवून ठेवणारे सरकारांनी वैज्ञानिक मंडळींना शहाणपणाचे ज्ञानामृत पाजण्यापेक्षा स्वत:च्या वृत्ती व कृतीमधून आम्ही निखळ विज्ञानवादी आहोत, असा संदेश जनतेला दिला पाहिजे. वास्तविक पाहता यांना विज्ञान व विवेकवाद हा नेहमीच धार्मिकतेला मारक असतो, त्यामुळे विज्ञानाचे डोळे देऊन हे सरकार स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणार नाही. त्यामुळेच धर्माध अनुयायी मिळविण्यासाठी विज्ञानाचे व शिक्षणाचे डोळे फोडावेच लागतात.

मनोज वैद्य, बदलापूर

अंतराळ संशोधनापेक्षा संरक्षणसिद्धता महत्त्वाची

‘चीनशी आपण लढू शकू?’ हा किरण गोखले यांचा लेख (२० जुलै) वाचला. भारताची शस्त्रसिद्धता किती कमकुवत आहे हेच या लेखातून स्पष्ट झाले. या पाश्र्वभूमीवर मनात विचार येतो भारत अंतराळ क्षेत्रावर जो खर्च करीत आहे त्यापेक्षा संरक्षणावर खर्च करून शस्त्रसिद्ध झाला असता तर चीनची भारताला धमकावण्याची व हल्ला करण्याची धमकी देण्याची हिंमत झाली असती का? व लेखकाने म्हटल्याप्रमाणे युद्धाची पाळी आली तर दुसऱ्या देशांकडे मदतीसाठी आशाळभूतपणे पाहण्याची वेळ आली नसती.  केंद्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असो संरक्षण खाते नेहमीच दुय्यमस्थानी असते. त्यांना अजूनपर्यंत संरक्षण खात्याला पूर्णवेळ मंत्रीदेखील देता आलेला नाही, यावरूनच सरकार संरक्षणाच्या बाबतीत किती गंभीर आहे हेच दर्शवते.

चंद्रशेखर सु. खारकर, ठाणे</strong>

भारतीयांना अभिमान वाटावा, असे संशोधन

‘सरस्वतीचा शोध’ हे शनिवारचे संपादकीय (१५ जुलै ) वाचले. खगोलशास्त्र हा अतिविराट असा विषय असून मानवी प्रज्ञेला त्याने कायमच जबरदस्त आव्हान दिले आहे. या विषयात महत्त्वाचे संशोधन करण्यासाठी प्रचंड मेहनत आणि अफाट बुद्धिमत्ता लागते. त्यामुळे सरस्वती या दीर्घिका -समूहाचा शोध ही खरोखरीच फार मोठी घटना आहे. १५ वर्षेअथक प्रयत्न केल्यानंतर हा शोध लागला असून तो भारतीय संशोधकांनी लावला याचा प्रत्येक भारतीयाला अत्यंत अभिमान वाटला पाहिजे. खगोलशास्त्रातील अथवा एकूणच मूलभूत विज्ञानांतील शोधांचा सामान्य माणसाला काय उपयोग, असा अजागळ प्रश्न नेहमीच विचारला जातो – त्याचे समर्पक उत्तरही आपण दिले आहे. आजचे विज्ञान हे उद्याचे तंत्रज्ञान असते. पण हा ‘उद्या’ किती वर्षांचा असेल हे मात्र सांगता येत नाही. त्यासाठी दम धरावा लागतो. उतावीळ होऊन चालत नाही. या संदर्भात (बहुधा) मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाची एक मार्मिक गोष्ट सांगतात. त्याने विद्युतशक्तीचा शोध लावल्यानंतर गावातील लोकांना एका मदानात बोलावले आणि शोधाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या एका स्त्रीने त्याला विचारले, ‘पण या विद्युतशक्तीचा सामान्य माणसाला काय उपयोग?’ त्या स्त्रीच्या कडेवर एक छोटे मूल होते. त्याच्याकडे निर्देश करून फॅरेडे म्हणाला, ‘या मुलाचा तरी जगाला काय उपयोग आहे?’

-डॉ. गिरीश पिंपळे, नाशिक

खारीच्या वाटय़ाची दखल घ्यावी

साधारण २००८ सालापासून जनतेत रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व समजू लागले. काही जण आपापल्या घरी असा प्रयोग करून पावसाचे पाणी जमिनीत घालू लागले. काही पालिका व महापालिका त्यासाठी प्रोत्साहन म्हणून घरपट्टीत थोडी सूट देऊ  लागल्या. भूजल पातळी वाढवण्यासाठी नागरिकांनी अशा प्रकारे केलेली मदत मोठय़ा प्रमाणात नसली तरी खारीचा वाटा नक्कीच आहे. अशा प्रकारे केलेल्या मदतीमुळे किती पाणी जमिनीत घातले गेले याचा हिशेब केल्यास नागरिकांना समाधान वाटेल. जे नागरिक असे करतात त्यांनी किती क्षेत्रात तसे केले हे एकदा समजले की किती पाऊस पडला यावरून किती पाणी जमिनीत गेले ते समजेल. स्वयंसेवी संस्था याबाबतीत मदत करू शकतात.

वि. म. मराठे, सांगली</strong>