‘सदाभाऊ खोत यांचे वडील, भाच्यास कृषी खात्याचे अनुदान’ हे वृत्त (१५ मार्च) वाचून धक्काच बसला. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांवरच सत्ताधारी कसा डल्ला मारत आहेत हे परत एकदा उघडकीस आले. ‘माझा जन्म शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी आहे. माझ्या मंत्रिपदाचा वापर या सर्वासाठीच होईल’, अशा बाता मारणारे सदाभाऊ खोत प्रत्यक्षात मंत्रिपदाचा दुरुपयोग करत आहेत. सत्तेबाहेर असतात तेव्हा सगळेच शेतकऱ्यांचा कैवार घेतात, पण सत्तेची खुर्ची मिळाली की नंतर सगळेच नेते गरीब बळीराजाला विसरतात,हे दुर्दैवी आहे.

-दत्तात्रय महादेवी पोपट पाचकवडे, चिखर्डे (ता.बार्शी, जि.सोलापूर)

कोणत्या चष्म्यातून स्वच्छता दिसली?

‘मोदी-मतदाराचे मनोगत’ हा पत्रलेख (१५ मार्च) वाचला. मोदी सरकारची त्यांच्या चांगल्या गोष्टीबद्दल पाठही थोपटायला हवी. यामध्ये त्यांनी टाकलेल्या ‘काही’ मुद्दय़ांचा विचार करू. १, २, ३ व ४ हे मुद्दे सबगोलंकारी आहेत. मुद्दा ५- डोकलाममध्ये पहिल्यांदाच भारताने चीनच्या डोळ्याला डोळा भिडवला आणि मान खाली घालायची वेळ आणली नाही. चीननं पहिल्यांदा माघार घेतली! पण दोन महिन्यांत तेथे परत घुसखोरी केली आणि आपले सुसज्ज तळ बांधले. हेलिपॅडही. हे बहुतेक लेखकास माहीत नसावे. मुद्दा ९ – परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची अतिशय कौतुकास्पद कामगिरी. म्हणजे नक्की काय? मालदीवने नौदलाच्या सरावासाठी भारताला नकार दिला. अगदी अलीकडची बातमी- इराणने चाबहार बंदरात पाक आणि चीनला यायचे आमंत्रण दिलेय. ‘लोकसत्ता’मधील ‘धोरणझोके’ हा अग्रलेख (७ मार्च) वाचा. चीनच्या दबावाखाली येऊन दलाई लामा यांना दिल्लीत कार्यक्रम करायची परवानगी कशी नाकारली ते जाणून घ्या. नुसते जगभर फिरून आपले ढोल वाजवले की झाले उत्तम परराष्ट्र धोरण?

मुद्दा १३ – रेल्वेगाडय़ा, फलाट येथील कचऱ्याचे प्रमाण खूपच कमी झाले. स्वच्छता जाणवू लागली. गेल्या दहा दिवसांतील बातम्या पाहा- औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न पेटला. नागरिक, महापालिका अधिकारी आणि पोलिसांत जोरदार बाचाबाची. तेथील पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवावे लागले. कल्याणमध्ये कचरा पेटल्याने धुराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मोदींचे एक सहकारी नितीन गडकरी म्हणाले –  डोंबिवली देशातले सर्वात घाणेरडे शहर.. लेखकाला नक्की कुठे, कोणत्या चष्म्यातून स्वच्छता दिसते? तुमचा चष्मा आम्हालाही पाठवून द्या!

-अभि  टिपणीस, शीव (मुंबई)

..तर येणाऱ्या मराठी पिढय़ा ‘ढ’ बनतील

येत्या रविवारी म्हणजे १८ मार्चला गुढीपाडवा आहे. मराठी / हिंदू नववर्षांच्या निमित्ताने अनेक कंपन्या (विशेषत: घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादक, बिल्डर, ऑनलाइन खरेदी कंपन्या) आपल्या ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी अनेकानेक सवलती जाहीर करतात. त्यासाठी भल्यामोठय़ा जाहिरातीही छापतात. मराठीतील जाहिरातींमध्ये नाही; परंतु, इंग्रजीमधल्या जाहिरातींमध्ये मात्र ‘गुढी’ (Gudi) हा शब्द सर्रास ‘गुडी’ (Gudhi) असाच लिहिला जातो. या वर्षीही काही वेगळे होताना दिसत नाहीये. आपल्या भाषेबद्दल, आपल्या सणाबद्दल असे अशुद्ध लेखन होत असतानाही आपण वर्षांनुवर्षे हे सहन करीत आलो आहोत. याचा दुष्परिणाम म्हणजे, समाजमाध्यमांवरही इंग्रजीमधून ‘गुढीपाडवा’ साजरा करण्यात मराठी नेटकऱ्यांना काही वावगे वाटेनासे झाले आहे.

सर्वच सणावारांना / शुभ-प्रसंगांना दिल्या जाणाऱ्या ‘खूप खूप शुभेच्छा’ची जागा ‘खुप खुप शुभेच्छा’नी कधी घेतली, हे आपल्याला कळलेही नाही. बांधकाम विभागाच्या जवळपास सर्वच फलकांवर असलेला ‘सावधान, काम चालु आहे’ हा इशारा मराठी भाषेच्या संरक्षणाकरिताही तितकेच सतर्क राहण्यास सांगतो आहे, हेही आपल्याला उमजले नाही. त्यामुळेच, येणाऱ्या भावी मराठी पिढय़ा स्वत: ‘ढ’ होऊन गुढीपाडव्यातला ‘ढ’ मात्र विसरतील, अशी रास्त भीती आता वाटू लागली आहे.

-परेश वसंत वैद्य, गिरगाव (मुंबई)

चांगला पक्ष आहे कोणता?

‘व्यक्ती वाईट, पण पक्ष चांगला’ हे पत्र (लोकमानस, १६ मार्च) वाचले. विचार व्यक्त करणारी व्यक्ती सर्वज्ञ असल्यामुळे त्यांचे मत ग्राह्य़च समजावयास हवे. फक्त पक्ष चांगला अगर वाईट ठरवण्यासाठी त्यांनी कोणते निकष लावले हेही जाहीर करावे. म्हणजे आमच्यासारखी अज्ञ मंडळी डोळे झाकून त्या पक्षाला मत देतील. पण तसे तरी कशाला? एकदा पत्रलेखकाने चांगला पक्ष कोणता हे जाहीर केल्यावर निवडणूक तरी घेण्याची यातायात कशाला करायची? त्याच पक्षाला सदैव राज्यकारभार करू द्यायचा. म्हणजे रामराज्य यायला कितीसा वेळ लागेल?

-श्याम कुलकर्णी, पुणे  

विज्ञाननिष्ठेतूनच संकटावर मात करण्याचे बळ मिळते

‘‘काळ’पुरुष’ हे संपादकीय (१५ मार्च) वाचले.  ‘दुर्धर आजारपणात ईश्वर आणि धर्मश्रद्धा जगण्यास बळ देते’ ही समजूत निव्वळ पिढय़ान्पिढय़ांच्या संस्कारांमुळे दृढ होत गेली आहे. ती भ्रामक तर आहेच, पण तिचे रूपांतर घातक अंधश्रद्धेत कसे होते याचे प्रत्यंतर नुकतेच पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात आले. पण असे बळच नव्हे तर अशा आजारावर मात करण्यासाठी लागणारे खंबीर मन निव्वळ विज्ञाननिष्ठाच कसे देते हे स्टीफन हॉकिंग यांनी स्वतच्या आचरणाने साऱ्या जगाला दाखवून दिले आहे. मात्र केवळ नास्तिकतेपोटी आलेला हा दुराग्रह नसून संकटावर खऱ्या अर्थाने मात करण्यासाठी लागणारे आत्मबळ हे भ्रामक ईश्वरी श्रद्धेतून नव्हे, तर कार्यकारणभावाचा पक्का आधार असलेल्या विज्ञाननिष्ठेतूनच मिळू शकते ही वस्तुनिष्ठ बुद्धी यामागे आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. या सृष्टीचे कारण ईश्वर आहे हे एकदा मान्य केले की मग सृष्टीसंदर्भात ‘का’ हा प्रश्न विचारायचे राहोच, पण तो साधा सूचतही नाही. (आपल्या देशातील ज्ञान-विज्ञान परंपरा खंडित यामुळेच झाली.) पण आपण म्हणता त्याप्रमाणे हॉकिंग यांना ‘का’ने आयुष्यभर पछाडले आणि त्यातून पुढे त्यांनी विश्वाची अनेक रहस्ये उलगडून दाखवली ती त्यांनी ईश्वरी संकल्पनेवर शंका उपस्थित करून विज्ञाननिष्ठेची कास धरल्यामुळेच हे उघडच आहे.

-अनिल मुसळे, ठाणे</strong>