ही आदळआपट क्षणभंगुरच..

‘आयात धोरणाचा ‘अर्थ’’ हा अग्रलेख (२९ जुलै) वाचला. जनतेच्या निष्ठा आणि वैचारिक अधोगतीचा प्रवास ‘होय-बा संस्कृती’कडे होत असताना आणि चंगळवादाच्या वृत्तीने माणूस प्रचंड स्वार्थी दिशेने आकुंचित होत असताना मूल्ये, वैचारिक बैठक या पुस्तकापुरत्या शिल्लक राहिल्या आहेत. अशा काळात, निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष फक्त ‘निवडून येण्याची क्षमता’ एकाच निकषावर उमेदवारी बहाल करत असतील तर तेही स्वाभाविकच! निवडणुकीत उमेदवाराच्या वलयाला, धनसंपन्नतेला ग्राह्य धरून तसेच जात-धर्माचा चष्मा लावून मते देणारेच जिथे आपला ‘पवित्र हक्क’ बजावण्याचा नैतिक अधिकार सर्रास अतिक्रमित करताहेत, तिथे ही आदळआपट क्षणभंगुर ठरणार नाही तर काय?  स्वातंत्र्याच्या तब्बल सात दशकांच्या वाटचालीत लोकशाहीने काय कमावले आणि काय गमावले याची जेव्हा बेरीज करण्यात येईल तेव्हा ही बाब उघड होईल, की स्वातंत्र्याचा अर्थ ज्याने त्याने आपल्या सोयीने घेतला आहे.

– सचिन देशपांडे, परभणी

.. त्यांच्यात आणि यांच्यात फरक काय?

‘आयात धोरणाचा अर्थ’  हे संपादकीय (२९ जुलै)  वाचले. आजघडीला देशात राजकीय पक्षांतरांचे जे काही नाटय़ चालले आहे, ते नक्कीच लोकशाहीच्या तत्त्वांना व विचारांना डावलणारे आहे. एकेकाळी उपमुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती तसेच कालपरवा विरोधी बाकांवर बसून विरोधी पक्षनेत्याची कामगिरी बजावणारी व्यक्तीच जर सत्ताधारी पक्षांकडे वळत असतील तर ही पक्षनिष्ठतेला आणि मतदारांच्या अपेक्षेला तडा देणारी बाब आहे. बरे हे झाले राजकीय पक्ष आणि प्रतिनिधींच्या बाबतीत मात्र ज्या सर्वसामान्य मतदारांनी ज्या अपक्षेने संबंधित प्रतिनिधीस निवडून दिले त्यांच्या तर अपेक्षांना सर्रास पायदळी तुडवले जाताना दिसत आहे. आणि विशेष म्हणजे ज्या ‘यूपीए’ (संयुक्त पुरोगामी आघाडी) सरकारला कंटाळून देशातील मतदारांनी  ‘एनडीए’ (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) सरकारला निवडून दिले, त्यांच्याच दारात आज ज्यांना जनता कंटाळली होती त्यांचे स्वागत होत आहे. मग आता प्रश्न पडतो की त्यांच्यात आणि यांच्यात फरक काय ? आणि मग येत्या काळात कोणाच्या धोरणांना पाठिंबा द्यायचा आणि कोणाला निवडून द्यायचे?

– आकाश सानप, नाशिक

जनतेचे प्रश्न मांडणार कोण?

‘आयात धोरणाचा ‘अर्थ’’(२९ जुलै) हे संपादकीय वाचले. ज्या गतीने राजकीय नेते आपले घरटे बदलत आहेत,त्यानुसार आगामी काळात सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर प्रश्न उठवण्यासाठी व चालू धोरणांमुळे सर्वसामान्यांना ज्या अडचणी येत आहेत त्यांची तड लावण्यासाठी विरोधी पक्ष असेल की नाही, याबाबतच शंका वाटते. विरोधी पक्षाचे कामच मुळी संसदीय मार्गाने व आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडणे हे आहे आणि हाच सक्षम लोकशाहीचा गाभा आहे. पण विरोधी पक्षातील जाणती मंडळीच जर सत्तेसाठी सत्ताधाऱ्यांची तळी उचलणार असतील तर सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणार कोण?

– प्रसाद लोखंडे, सातारा

पवार ‘जात्यात’, तर फडणवीस ‘सुपात’!

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचे राजकारण करत आहेत’ (बातमी: लोकसत्ता- २९ जुलै), असे शरद पवारांनी म्हटल्याचे वाचले. फोडाफोडीच्या राजकारणावर खंत व्यक्त करण्याची वेळ पवारांवर यावी म्हणजे, ‘खंजीर’ प्रकरणाने त्यांच्यावर उगवलेला सूड आहे. खुद्द पवारांनी त्यांच्या पाच दशकांच्या राजकीय कारकीर्दीत काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, इंदिरा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे चार वेळा पक्षांतर केले. छगन भुजबळ, भास्कर जाधव, गणेश नाईक, धनंजय मुंडे यांना ‘आयात’ करणे, रिपब्लिकन चळवळीत वा शेतकरी संघटनेत फूट पाडणे असे अनेक पराक्रम त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात केले आहेत. फोडाफोडीच्या राजकीय शाळेचे ते ‘हेडमास्तर’ आहेत. पवार हे सहकाराचे जाणकार म्हटले जातात. त्यांचा ‘राष्ट्रवादी’ हादेखील ‘(पक्षरूपी) सहकारी साखर कारखाना’ आहे आणि त्यांचे नेते हे सभासद. त्यांच्या ‘उसा’ला भाव नाही मिळाला तर ते दुसऱ्या कारखान्याला ऊस घालणारच. त्यामुळे त्यांनी आता या घडामोडींवर दु:ख व्यक्त करण्याचा नैतिक अधिकार गमावलेला आहे. राजकारणात अशी वेळ कुणावरही येऊ शकते. पवार आज ‘जात्यात’ आहेत. ‘सुपातील’ फडणवीसांनी हे ध्यानात ठेवलेले बरे.

– रोहित गोपाळ व्यवहारे, भूम (जि. उस्मानाबाद)

‘योग्य संधी’ की सत्तेची चटक?

सध्या सर्वच पक्ष ‘राजकीय शाळेतील मुख्याध्यापकां’च्या रस्त्याने जात आहेत. म्हणजेच आपल्या सर्व राजकीय पक्षांत योग्य संधी साधून कोलांटउडी कधी मारावी यात सुसंगतता आहे. पुन्हा काही वर्षांनी भाजपमुक्त भारत होईल.. तेव्हा पूर्वीच्या काँग्रेसवाल्यांची घरवापसी संभवेल. भाजप व शिवसेनावालेही तेव्हा सत्तेची चटक लागल्यामुळे पक्ष बदलून उडय़ा मारणार. हे असेच चालू राहणार.. ‘सत्तेविन करमत नाही.. मजला’!

– प्रवीण आंबेसकर, ठाणे</p>

हे काय पावित्र्य जपणार?

‘आमचा कारभार पाहून इतर पक्षांतले काही आमदार आमच्या पक्षामध्ये (सरकारमध्ये) सामील होण्याचा निर्णय घेतात,’ असे म्हणत प्रवेश देणारे हे विसरतात की, आपणच ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते कसे लुटारू आहेत हे दाखवले आणि यांना आम्ही सोडणार नाही, असे म्हणत यांची चौकशी करा, यांना तुरुंगात पाठवा, असा दबाव आणून त्यांना हतबल केले, तेच शेवटी ‘पक्ष बदललेला बरा’ म्हणून पक्षांतरित होतात आणि मग हेच सत्ताधारी त्यांना पारदर्शक उमेदवार म्हणून उभे करतात. मोठमोठे घोटाळे करून, सहकारी संस्था बुडवून आणि स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा मुलांसाठी संधी आहे म्हणून पक्ष बदललेल्यांची उदाहरणे ताजी आहेत. एवढे करूनसुद्धा पक्ष बदलला, की ते गंगास्नान केल्यासारखे सरकारी पक्षात वागतात; पण यांच्याकडून राजकारणाचे पावित्र्य काय जपले जाईल?

– लक्ष्मण ज्ञानदेव पौळ, बार्शी (जि. सोलापूर)

कार्यकर्त्यांचा तरी विचार करा..

‘आयात धोरणाचा ‘अर्थ’’ हा संपादकीय लेख (२९ जुलै) वाचला. येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने, आणखी कितीकजण असल्या उडय़ा मारताना दिसतील. सध्या महाराष्ट्रात भाजप-सेनेचे सरकार आहे. साहजिकच सर्व नेत्यांचा ओघ या दोन पक्षांकडे आहे आणि त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांतील अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत; पण हे नेते एक गोष्ट विसरत आहेत की, या नेत्यांच्या मागे अनेक निष्ठावंत कार्यकत्रे आहेत; पण हे लोक या कार्यकर्त्यांचा विचार न करता केवळ आपल्या स्वार्थासाठी रात्रीतून पक्ष बदलतात.

– राजू केशवराव सावके, तोरणाळा (जि. वाशीम)

पूर येतच राहणार, सावध व्हा..

बदलापूर परिसरातील पुराविषयीच्या बातम्या वाचल्या. असा पूर आता दरवर्षी येतच राहील. त्याला कारण अधिकृत, अनधिकृत बांधकामे. ही बांधकामे ओढे, नाले, तलाव बुजवून किंवा त्यांचा प्रवाह वळवून झालेली असल्यामुळे पाण्याचा निचरा होणारी जमीनच उरत नाही. त्यातच बांधकामासाठी होणारी जंगलतोड. वेळीच सावध झाले पाहिजे.

– श्रीकांत चंद्रकांत देव, डोंबिवली

रेल्वेने सूचना-यंत्रणा मजबूत करावी

ठाण्याच्या पुढे मुसळधार पावसामुळे बदलापूर रेल्वे स्थानकातील रुळांवर पाणी साचलेले असताना महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या गाडीचालकाने स्थानक सोडून पुढे गाडी चालवून दोन स्थानकांमध्ये गाडी थांबवली. पूरस्थिती असल्याने गाडी मध्येच थांबविणे भाग पडले, पण पुढील अंदाज घेऊन गाडी बदलापूर स्थानकाच्या फलाटावर थांबवली असती तर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले नसते, मुख्य म्हणजे प्रवाशांना सुरक्षित वाटले असते. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने रात्रीच्या वेळेत रुळांवर धोका, अडथळा असल्यास तेथून जाणाऱ्या गाडीचालकास गाडी शक्यतो रेल्वे स्थानकात थांबविण्याची तातडीने सूचना देऊन सावध करावे व तशी संदेशवहन यंत्रणा उभारावी. रेल्वेने गाडीतील प्रवाशांनाही वेळोवेळी सूचना, माहिती देऊन धीर द्यावा.

– नंदकुमार आ. पांचाळ, चिंचपोकळी पूर्व (मुंबई)

निषेध आझम खान आणि अखिलेश यांचाही!

लोकसभेतील समाजवादी पक्षाचे सदस्य आझम खान यांनी संसदेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर होण्याच्या वेळी चच्रेदरम्यान, पीठासीन अधिकारी रमादेवी यांच्याबद्दल गलिच्छ व संसदेत अशोभनीय असलेले उद्गार काढले. ‘‘आपकी आँखोमें आँख डालके मैं बात करना चाहता हूं’’ हे उद्गार त्यांनी काढले. ही काय खासदाराची, महिला पीठासीन अधिकाऱ्याशी बोलण्याची पद्धत झाली? या घटनेचा सर्वपक्षीय महिला खासदारांनी निषेध केला आहे. त्यात सुप्रिया सुळे, स्मृती इराणी, नवनीत कौर राणा आदींचा समावेश आहे. निर्मला सीतारामन यांनी तर आझम खान यांना काही दिवसांसाठी निलंबित करावे, अशी विनंती लोकसभाध्यक्षांकडे केली आहे; परंतु आझम खान यांच्या शेजारीच बसलेले उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी याविषयी पत्रकारांशी बोलताना मात्र ‘सभागृहात नक्की काय झाले मला माहीत नाही’ असा पवित्रा घेतला हेही तितकेच निषेधार्ह आहे.

– अजित परमानंद शेटय़े, डोंबिवली पूर्व