महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे गेल्या तीन वर्षांपासून अनेक वेळा २४ हजार शिक्षकांची भरती केली जाणार असे सांगत होते. स्वत:ची पाठ थोपटून घेऊन भावी शिक्षकांचे ते हिरो झाले. मात्र जेव्हा भरती प्रक्रिया घेण्याची वेळ आली तेव्हा केवळ १० हजार जागा भरणार असून त्यातील अर्ध्या जागा तर संस्थाचालक भरणार आहेत. म्हणजे केवळ ३ ते ४ हजार जागा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. तेव्हा संस्थाचालक खासगी अनुदानित जागा कशा स्वरूपात भरणार याचा अनुभव अनेक शिक्षकांनी घेतला आहे. तेव्हा ही भरती पारदर्शकपणे होईल व उमेदवारांना नोकरीसाठी पैसे मोजण्याची वेळ येणार नाही, हे तरी तावडे व त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांनी बघावे. असे न झाल्यास विधानसभा निवडणुकीत हेच सुशिक्षित बेरोजगार या सरकारला धडा शिकवतील.

– डी. के. घुगे, गुंजाळा (बीड)

युद्ध आणि निवडणुकीत फरक

योगेंद्र यादव यांचा ‘राष्ट्रीय सुरक्षेच्या राजकीयीकरणाचे धोके..’ हा लेख (१ मार्च) वाचला. लेखकाने व्यक्त केलेली भीती योग्य वाटते. राष्ट्रीय सुरक्षा हा विषय खरेच राजकारणाच्या पलीकडे ठेवला गेला पाहिजे. एखाद्या लढाईतील यशाला किंवा अपयशाला अनावश्यक हवा देऊन मते मागण्यासाठी त्याचा वापर केला जाता कामा नये. देशाच्या लढाईत सैनिकांचे सर्वात जास्त रक्त सांडले जाते. सैनिक देशासाठीच त्याग व बलिदान देतात. त्यात राजकीय हेतू नसतो. युद्ध व निवडणूक यामध्ये फरक आहे. निवडणूक ही देश व देशातील जनता यांच्या हितासाठीच्या विचार व धोरणातील मतभेदांनाच आधार बनवून आपापसांत लढली जाते. युद्ध हे देशाच्या शत्रूबरोबर असते. त्यात सर्वानीच सगळे भेद बाजूला ठेवून सरकार व देशाच्या सुरक्षाव्यवस्थेला एकजुटीने साथ द्यायची असते. सरकारमध्ये असलेल्यांनीही आपले पक्षप्राधान्य यात आणता कामा नये अशी अपेक्षा असते. म्हणूनच काही वेळा लोकशाही देशांत युद्धकाळात सर्व पक्षांचे मिळून राष्ट्रीय सरकार बनवले जाते. हेतू हा की सर्वानी ती लढाई आपली समजावी.

– विजय लोखंडे, भांडुप (मुंबई)

हा भारतीय लष्कराचा अपमान

जेव्हा भारताने पहिला सर्जिकल स्ट्राइक केला तेव्हा काँग्रेसने याचे पुरावे मागितले. नुकताच आपण जेव्हा हवाई हल्ला करून पाकिस्तानला धडकी भरवली तेव्हा ममता बॅनर्जी म्हणतात की, आम्हाला या हल्ल्याचे व्हिडीओ शूटिंग दाखवा, तरच आम्ही मान्य करू की भारताने हवाई हल्ला केला.  विरोधक खालच्या पातळीचे राजकारण करीत आहेत. या दोन्ही हल्ल्यांनंतर सरकारने तर सविस्तर माहिती दिलीच, पण आपल्या भारतीय लष्करानेही याला दुजोरा दिला. इतके होऊनही हे विरोधक म्हणतात की याला पुरावा काय? असा संशय घेणे म्हणजे आपल्या भारतीय लष्कराचा अपमान आहे.

– डॉ. मयूरेश जोशी, पनवेल</strong>

परुळकर यांचे अनुभव तरुणांनी वाचावेत

आपले विंग कमांडर अभिनंदन यांना पकडण्यात आले. नंतर मग त्यांना सोडणार, असे जाहीर केले. १९७१च्या युद्धातही पाकिस्तानने काही भारतीय वैमानिकांना पकडले होते.अशा स्थितीत तेथून पळून जाण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न या वीरांनी केले होते. त्यापैकी एक होते फ्लाइट लेफ्टनंट दिलीप परुळकर. त्यांच्या तुरुंगवासातील अनुभवांवर फेथ जॉन्स्टन या भारतीय विमानदलातील अधिकाऱ्याशी लग्न केलेल्या कॅनडाच्या लेखिकेने पुस्तक लिहिले आहे. कदाचित त्याचा मराठी अनुवादही प्रसिद्ध झाला असेल. ते तरुणांनी वाचावे हे या निमित्ताने सुचवावेसे वाटते.

– प्रदीप राऊत, अंधेरी ( मुंबई)

खरी स्पर्धा चीनबरोबर

बराक ओबामांनी हिरोशिमाला भेट देणे आणि शिझो आबे यांनी पर्ल हार्बरला भेट देणे यातून दुसऱ्या महायुद्धातील कटू आठवणींना तिलांजली देऊन सकारात्मक आणि विकासात्मक बाबींकडे उचललेले पाऊल असते. परंतु छोटय़ा-छोटय़ा बाबीही फुगवून सांगून आणि पाकिस्तानची पत नसतानाही त्यांना अधिक महत्त्व देऊन आपणही नकळतपणे पाकिस्तानच्या रांगेत येऊन थांबतो. भारताची खरी स्पर्धा चीनबरोबर आहे. पण आपले घोडे पाकिस्तानपाशी येऊन अडकते. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी तरी काही गोष्टी आवरत्या घेणे गरजेचे आहे.

-सचिन वाळिबा धोंगडे, अकोले (अहमदनगर).

मूकबधिरांना झोडपणाऱ्यांवर कारवाई करावी

पुण्यातील समाजकल्याण आयुक्त कार्यालयासमोर शैक्षणिक सुविधांसह, रोजगाराच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या मूकबधिर, कर्णबधिर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी थेट लाठीमार केला. ही अत्यंत वेदनादायी तसेच शरमेची बाब आहे. देशात सध्या सीमेवर तणाव असल्याने या आंदोलनकर्त्यांची फारशी दखल घेतली गेली नाही; परंतु दिव्यांगांबाबत पोलीस किती असंवेदनशील आहेत हे दिसून आले. सरकारच्या प्रतिनिधीने त्यांची भेट घेण्याऐवजी सरकारने त्यांच्या शिष्टमंडळाला मुंबईत बोलावले. यावरून सरकारलासुद्धा कर्णबधिरांची किती काळजी आहे हे दिसून आले. या कर्णबधिर विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.

– सुनील कुवरे, शिवडी (मुंबई)

 कोणतेही ज्ञान वाया जात नाही..

‘वेदांचा सखोल अभ्यास की निव्वळ पोट भरण्याची संधी?’ हे पत्र (लोकमानस, १ मार्च) वाचले. पत्रलेखक विचारतात, यातून तरुण पिढीला कोणती दिशा देऊ  पाहत आहेत? माझ्या मते समाजातील सर्व स्तरांवरील व्यक्तींनी याचा अभ्यास केलाच पाहिजे. याकडे फक्त धार्मिक ग्रंथ म्हणून पाहिले तर प्राचीन विद्या, ज्ञान लोप पावेल. या अभ्यासातून समृद्ध युवा पिढी घडेल असे वाटते. भारतात अनेक विचार प्रवाह आहेत. प्रत्येक जण आपल्या चष्म्यातून पाहतो. म्हणून हजारो वर्षांपासून असलेले ज्ञान सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचले नाही. कोणतेही ज्ञान वाया जात नाही, असे म्हणतात ते खरेच आहे.

  – दत्ता केशवराव माने, नाईचाकूर, ता. उमरगा (लातूर)