प्रा. शेषराव मोरे यांच्या ‘संस्कृतिसंवाद’ या सदरातील ‘भारतीय राष्ट्रवादाची पायाभरणी’ (३१ ऑगस्ट) हा लेख म्हणजे ‘आयजीच्या जिवावर, बायजी उदार’ या प्रकारचे वैचारिक धन उडविणारा आहे. या संपूर्ण लेखात प्रा. मोरे यांचे वैचारिक योगदान ते कोणते? ‘युरोपियन लोकांपेक्षा भारतीय संस्कृती थोर होती,’ असे एखादा अहिंदू म्हणत असेल; म्हणून ती थोर कशी काय होईल? (अच्छा.. म्हणून ‘इस्कॉन’सारख्या संस्थेचे इतके कौतिक होते तर!) ‘हिन्दू हे प्राचीन व आधुनिक कालात एक राष्ट्र आहेत’ असे मॅक्समुल्लर सन १८८८ साली म्हणला असेल; तर मग या महान राष्ट्राचे विभाजन का झाले? भारतात कालानुसार बदलणारी, भविष्याचा वेध घेणारी, सर्व सामाजिक घटकांना सामावून घेणारी शिक्षण व्यवस्था निर्माण होऊ दिली गेली नाही. म्हणूनच तर पाश्चात्त्य विद्येने इथले तरुण भारावले गेले ना! म्हणून तर इथल्या तरुणांना राष्ट्रवादाचा परिचय व्हायला युगे लोटावी लागली! मग पाश्चात्त्य विद्येला आणि शिक्षणाला कशासाठी झोडपायचे?

उत्तम, सजग, प्रगल्भ, जबाबदार नागरिक आणि ‘माणूस’ निर्माण करण्याचे शिक्षण कोणत्याही भारतीय ग्रंथात नाही. म्हणूनच तर पाश्चात्त्य शिक्षणाच्या भारतातील आगमनानंतरच इथल्या ‘राष्ट्रवादा’ला धुमारे फुटू शकले, असे तर मोरे यांना म्हणायचे नाही ना? इसवी सनाआधी सुमारे ३२२ वर्षांपूर्वी (म्हणजे आजपासून २३३७ वर्षांआधी) अ‍ॅरिस्टोटलने उत्तम जबाबदार नागरिकांच्या निर्मितीचे जे तत्त्वज्ञान सांगितले होते, त्यात नागरिक केंद्रस्थानी होते. ती खऱ्या कल्याणकारी राज्याच्या तत्त्वज्ञानाची मांडणी होती. आणि आमच्याकडे व्यक्तिकेंद्रित, विभूतिपूजनाची मांडणी होती. आजही आपण भारतीय त्या मानसिकतेतून बाहेर पडू शकलेलो नाही. त्याबद्दल मोरेसरांच्या ‘राष्ट्रवादी’ तत्त्वज्ञानात कोणते ‘भाष्य’ आहे?

शाहू पाटोळे, औरंगाबाद

 

कर्मचाऱ्यांमध्ये विषमता किती?

देशावर कोणत्याही भीषण समस्येचे सावट असो. सरकारी कर्मचाऱ्यांना आज नाही तर उद्या त्यांना पगाराची, बोनसची थकीत रक्कम ही मिळतेच. केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ सप्टेंबरपासून वेतनवाढ आणि दोन वर्षांचा थकीत बोनस मिळणार आहे, हा लाभ याच पठडीतला म्हणावा लागेल. कर्मचाऱ्यांवर होणारी गुंतवणूक आणि त्याचा फायदा याच्याशी ना सरकारचा संबंध, ना सरकारी बाबूंचा. या गुंतवणुकीस तोटय़ातील गुंतवणूक म्हणता येईल. आपले अर्थचक्र वर्षांनुवर्षे चुकीच्या पद्धतीने चालवले जात असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढत्या महागाईशी संबंध जोडणे म्हणजे अतिशयोक्तीच ठरेल.

याउलट, असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कोणीच वाली नाही. ही स्थिती आधीही होती, आजही आहे व पुढेही कायमच राहील यात शंका नाही. सरकारी व असंघटित क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांत आर्थिक समतोल राखला जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यास कोणताच वाव नाही. उलट आजकाल, शासकीय कामांचे कंत्राट देऊन ते कंत्राटी पद्धतीने करवून घेण्याचा आलेख वाढत आहे.

अमित पडियार, बोरिवली (मुंबई)

 

बंडारू दत्तात्रेय याविषयी गप्पच..

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन १ सप्टेंबरपासून वाढेल; परंतु ईपीएफ- ९५ मधील निवृत्तिवेतन राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड आता तरी वाढविणार आहे का? की ८०५ रुपयांत समाधान मानायचे? केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रेय याविषयी गप्प का? आमदार-खासदारांचे वेतन लक्ष रुपयांनी एका रात्रीत वाढते, पण निवृत्तिवेतनधारकांना फक्त मंत्र्यांच्या खोटय़ा आश्वासनावरच जगावे लागते. यालाही ‘अच्छे दिन’ म्हणायचे का? किमान ५००० रु. निवृत्तिवेतन असावे ही मागणी आहे. फक्त बोर्डाच्या नामांतराने ही कामे होणार नाहीत.

अमोल करकरे, पनवेल

 

आश्चर्यकारक लेखनतपश्चर्या

‘लोकसत्ता’ने वि. ग. कानिटकर या वाचकप्रिय, सिद्धहस्त परंतु समीक्षकांकडून उपेक्षित अशा लेखकाला अग्रलेखातून आदरांजली वाहून अत्यंत उचित अशी मानवंदना दिली आहे. वि. ग. यांची लेखणी चतुरस्र होती आणि त्यामुळे ‘माणूस’ साप्ताहिकाला किती अमाप लोकप्रियता लाभली होती ते आमच्या पिढीने प्रत्यक्ष पाहिले आहे. वि. गं.नी ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ हे एकच पुस्तक लिहिले असते तरी त्यांचे नाव अमर झाले असते, पण त्यांनी इतरही अनेक उत्तमोत्तम पुस्तके लिहिली आणि आपल्याला लाभलेले दीर्घ आयुष्य सार्थ केले.

त्यांची लेखनतपश्चर्या केवळ आश्चर्यकारक होती हे त्यांना जवळून पाहणारे कुणीही सांगू शकेल. आपल्या यशाचा त्यांना गर्वही नव्हता.

मृदुला प्रभुराम जोशी, अंधेरी पश्चिम (मुंबई)

 

अब्राहम लिंकनचे अजोड चरित्र

‘चरितकहाणीकार’ या अग्रलेखातून (३१ ऑगस्ट) वि. ग. कानिटकर यांना वाहिलेली आदरांजली यथोचित आहे. विशेषत अब्राहम लिंकनची ओळख भारतीय मनाला गुलामगिरी संपवणारा म्हणून करून दिली जाते. खुद्द अमेरिकेने मात्र ‘ही सेव्ह्ड द नेशन’, देश एकत्र ठेवणारा म्हणून जपली आहे. वि. ग. कानिटकरांनी हा मुद्दा ठसवण्याचा प्रयत्न त्यांच्या लिंकनच्या मराठीतल्या अजोड असणाऱ्या चरित्रात केला; एवढेच नव्हे तर लिंकनच्या हत्येमागे असलेल्या जेसुईटांच्या कटाचाही मागोवा घेतला.

रवींद्र कुलकर्णी, डोंबिवली

 

आजोबांची रसाळ गोष्ट

भरपूर ग्रंथसंपदेचा निर्मिता असूनही वि. ग. कानिटकर म्हटलं की ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ या ग्रंथाचे नाव समोर येते. ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखात नमूद केल्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धाची पूर्ण माहिती मराठी वाचकांना वि. ग. यांनी करून दिली. मी इयत्ता आठवीत असताना पहिल्यांदा हा ग्रंथ वाचला.. तेव्हापासून आजतागायत अनेक वेळा त्याची पारायणे केली आहेत. पण कधीही कंटाळा आला नाही. समोर बसून एखाद्या आजोबांनी रसाळ भाषेत गोष्ट सांगावी अशी लेखनशैली.. इंग्रजी भाषेचा आवश्यक तेवढा वापर.. आणि प्रत्येक प्रसंगाचं सर्व बाजूंनी केलेलं विश्लेषण! त्यांचं इतर सर्व लेखन म्हणजे दुधात केशरच.

अ‍ॅड. जनमेजय वि. खुर्जेकर, पुणे

 

अभ्यास आणि अभिजात !

‘चरितकहाणीकार’ या संपादकीयातून ‘नॉनफिक्शन’ वर्गातील लेखनाचे कौतुक करताना ‘फिक्शन’ प्रकारातील साहित्याबद्दल स्पष्टपणे दिसणारा हेटाळणीचा सूर निश्चितपणे खटकतो. ‘कचकडय़ाच्या कथा-कादंबऱ्या आणि उसासे टाकणाऱ्या कविता’ असे या प्रकारातील लेखनाचे अवमूल्यन अशा साहित्याच्या निर्मात्यांना आणि चोखंदळ वाचकांना मान्य होणार नाही.

घडलेल्या घडामोडींचाअभ्यासपूर्ण व्यासंग करून त्यावर आधारलेले  विवेचन, समीक्षा, चिकित्सा करू पाहणारे, पत्रकारितेच्या परिघात येणारे उपयोजित लेखन हे कितीही महत्त्वाचे असले तरी ते खरे स्वयंभू साहित्य नव्हेच. याउलट असामान्य प्रतिभेच्या अनेक लेखकांनी आपल्या विलक्षण कल्पनाशक्तीचा प्रत्यय देणारे, मानवी नातेसंबंधांचा शोध घेणारे, सजीवांच्या भाव-भावनांना, सुख-दु:खाला उलगडून कवेत घेणारे, अमूर्ताची अनुभूती देणारे असे ‘अभिजात’ साहित्य निर्माण केले आहे. हृदयाला हात घालणारे आणि अभिरुची, जाणिवा समृद्ध करणारे हे साहित्य रसिक वाचकांसाठी ‘स्वान्तसुखाय’ असते.    ‘मी काही त्या काल्पनिक कथा-कादंबऱ्या वगैरे वाचत नाही.’ असं म्हणणारे वाचक हे खरे रसिक वाचक नव्हेतच. इतिहास आणि संस्कृतीची उत्तरपूजा मांडणारे हे लेखन. त्याचे वाचन म्हणजे अभ्यास किंवा व्यक्तिमत्त्व विकास. स्पर्धात्मक, बाजारशरण युगात प्रत्येकाला स्वत:ची ‘मार्केट प्राइस’ वा किमान ‘बायोडेटा’ वाढविण्याची आत्यंतिक गरज वाचकांना निर्माण झाल्यामुळे या प्रकारातील लेखनाला आज वाढता लोकाश्रय मिळत आहे. असे मूल्यवर्धित, माहितीपर लेखन मराठी वाचक प्राधान्याने वाचू लागला आहे. भूतकाळाचा दस्तऐवज ठरणारे, व्यक्तिचित्रण, विवेचन, स्वानुभवकथन आणि मार्गदर्शन करू पाहणाऱ्या उपयोजित साहित्याच्या वाचनाकडे नव्या पिढीचा कल वाढला आहे. परिणामत: वाचनसंस्कृती टिकून राहत असली तरी वाचनातल्या अभिजाततेला ओहोटी लागली आहे याबद्दल शंका नाही. गर्दीचे वाचन आणि दर्दीचे वाचन यात फरक आहे.

  – प्रमोद तावडे, डोंबिवली

 

समाजनको- जातच म्हणा

आजकाल कोणत्याही जातीचा उल्लेख करताना त्या जातीचे लोक ‘आमची जात’  म्हणण्याऐवजी ‘आमचा समाज’ म्हणून करतात.. त्या जातीच्या नेत्यांना ‘त्या समाजाचे नेते’ म्हटले जाते.. माध्यमेही तसा उल्लेख करतात परंतु एक जात, हा समाज कसा होऊ  शकते? जर एक जात हाच समाज होत असेल तर मग सर्व जाती मिळून जे बनते त्याला नवा शब्द शोधावा लागेल. कदाचित जात ही गोष्ट संकुचित असल्याने जो अपराधीभाव येतो तो घालविण्यासाठी मोठा शब्द वापरत असावेत.

भारतीय जातिव्यवस्थेतून वर उठून राज्यघटनेने आणि महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळींनी आजचा समाज बनवला. समाज शब्दात जाती, धर्म, लिंगनिरपेक्ष व समान आकांक्षा असलेला मानवी समूह अपेक्षित आहे. तेव्हा ‘समाज’ हा शब्द मानवी प्रगतीचा टप्पा आहे. जात हा मागास, संकुचित व प्रतिगामी शब्द आहे. समाज शब्दात प्रगत व वंचित यांच्यात भ्रातृभाव असलेला मानवी समूह असे अपेक्षित आहे. त्याला जातीपुरते ठेवून मागे नेता कामा नये.

ज्यांना जातींचा अभिमान असेल त्यांनी सरळ न लाजता ‘माझी जात’ असेच म्हणा. ‘माझा समाज’ म्हणून समाज शब्द संकुचित व बदनाम करता कामा नये. माध्यमांनीही जातीचा उल्लेख इथून पुढे समाज असा करू नये. यातून जातीय अस्मितांचे उगाचच उदात्तीकरण होऊन त्या अधिक गडद होतात. महाराष्ट्रात आज सर्वच छोटय़ा-मोठय़ा जातींचे संघटन वेगाने होताना शब्द काळजीपूर्वक वापरावेत.

 –  हेरंब कुलकर्णी, अकोले (अहमदनगर)